Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



रिकामं पोट...

लेखनविभाग: 
कथा

रिकामं पोट...

दिवस गारठ्याचे होते. अजूनबी नदीनं खडकांच्या कुशीत पाणी जपले होते. बारीक खडकी वघळ्यांच्या तोंडाशी बारके डोह पोटात न मावणारे पाणी खुशाल पुढे जाऊ देत होते. त्याच नदीतल्या गुळगुळीत खडकांवर आजूबाजूच्या मळेकरणी धुणं धुताना मनाचे पिळे मोकळ्या करत होत्या. अनेक पिढ्यांच्या सुख-दु:खांना त्या खडकांनी पाण्यासंगत खळखळून वाहताना पाहिलं होतं. सकाळच्या पारगात खडकांच्या अंगावर नदीभर नुसत्या बायाच बाया. सोबतच वाळूत वाळूमय होऊन गेलेली बारकी पोरं आन डोहाड्यातल्या पाण्यात बुटकुळ्या मारणारी जरा जाणती पोरं- पाण्याच्या गढूळपणाचे गूढ उकलण्याचं वय न झालेली-.
आज जरा उशीरानं आलेल्या नंदानं नदीतल्या मोकळ्या खडकावर धुण्याचं गाठोडं टाकलं. आन एरव्ही खडकाचे अंग मिळवण्यासाठी भांडणारी रखमा आपले धुण्याचे पिळे उचलून जरा लांबच्या खडकाकडे पळाली. काही बाया हसल्या. काहींनी नाकं मुरडली. काही आडून-पाडून बोलणं बोलत राहिल्या.
“दोन जीवाशी बाईनं आसं वाकून धुणं आपटू नयी.” रखमाचं हे बोलणं न समजण्याइतकी नादान नव्हती ती. काहींनी फिदीफिदी हसत घसड्यांचा वेग वाढवला. काहींनी गालात मूलकत पाण्यात टाकलेले कपडे जोरात विसळले तर काहींनी दाबले पिळे उलगडत कपड्यांसोबत हातही झटकले.
अंगानं बलदंड आन डोक्यानं हुशार असणाऱ्या नंदाला अचानक काळजात खडक घुसल्यागत झालं. हा एकटेपणा धुण्यासोबत ती पाण्यात वाहता करू लागली. तिच्याशी मोकळं बोलणारी पमी सुद्धा आता तिला टाळू पाहात होती. आपल्यापायी दहा वर्ष बिनविरोध सरपंच असलेल्या संजूच्या आजोबांना सरपंचकी गमवावी लागंल अन् संजूसोबत आपलं असं बिनधास्त हिंडणं इतकं महागात पडंल, असं वाटलं नव्हतं तिला. “किती चांगलाय तो, एव्हढं सगळं होऊन बी... जरा दोष दिला नाही आपल्याला. तसा कोण लागतो तो आपला? बालपणापासून एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, एकत्र शिक्षण झालं आणि आज बालपणाचा तो टप्पा ओलांडताच आमच्या नात्यात एवढी खोल सीमारेषा आखावी समाजानं? त्याच्या आजोबांचा तर किती भरवसा आहे आपल्यावर. कॉलेज सरून महिना उलटला तरी एकदाही बोलला नाही तो. तरीबी लोकांनी असा नको तो अर्थ लावावा? कालपरवापर्यंत जवळीकीने वागणाऱ्या ह्याच बाया आज आपल्याशी अशा फटकून वागाव्या? ह्यापेक्षाबी आपल्यामुळं संजूच्या आजोबांना उगाच त्रास सहन करावा लागावा.” याचं दु:ख अधिक तीव्रतेने जाणवू लागलं होतं तिला.
बराच वेळ मग नंदा धुण्याऐवजी काळीजच खडकावर आपटत राहिली. त्यातच कालपर्यंत बिनधास्त संजूसोबत हिंडणाऱ्या नंदाला वास्तवाची जाणीव होऊ लागली होती. ती एकटी पडली होती. आईच्या शब्दांचं गांभीर्य तिला उमजू लागलं होतं. आपण खडकावर बसलो नसून सुसरीच्या पाठीवर बसलोय, असा भास तिला होऊ लागला. क्षणभर गरगरलं. खडक थरथरू लागला. आणि खरंच दोन जीवाशी असल्याचा भास होऊ लागला. मान उचलली तरी फिरल्या सारखं वाटू लागलं. खडकावर ती बसली नसून संजू बसला आहे आणि तो खडक त्याला सुसर होऊन ओढून नेऊ लागला आहे. असं तिला वाटू लागलं. हातातला धुण्याचा पिळा पाण्याकडं फेकण्यासाठी उभी राहताच धाडकन कोसळली. धुणेकरणी धावल्या. कोणी जवळ बसत दातखीळ उचकू लागल्या. तर कोणी हळूच पोटावर हात फिरवून मनातल्या शंका दूर करून घेऊ लागल्या. कोणी लांब उभ्या राहून “वाटंतं का गं तसं?” अशा शंका शेजारणीच्या कानात ओतून पाहू लागल्या. तिच्यापासून फटकून राहणारी पमी मात्र धावत सुटली. संजुला गाठलं.
आला संजू. तो येताच साऱ्या बाया दूर सरकल्या. अंतर ठेवून उभ्या राहिल्या. तटस्थ, चित्रासारख्या... त्यानं तिचा हात धरून नाडीचे ठोके पहिले. छातीवर हात ठेवून छातीतली धडधड पाहिली. उचलून खांद्यावर घेतली आणि धावतच थडी चढला. वाटेवर उभ्या केलेल्या जीपगाडीत तिला ठेवलं. जीप निघून गेली दवाखान्याच्या दिशेनं...
जरावेळानं धुण्यासोबत अर्ध्यामुर्ध्या सुकत आलेल्या बाया एकमेकींना मनात असेल ते आणि जमेल तसं सांगत आणि शक्य तितकं ऐकतही राहिल्या.
“मी म्हन्ल व्हतं ना, तोच येईल. आला का नयी?” रखमा शेवंतीला सांगत होती.
“गंज पाह्यलं म्या बी पॉट चाप्लून, पर तसं काई जाणवलं नयी गं.” हौसाबाई अनुभवाचे बोल तरण्या फसीला सांगत होती.
“मालाबी नई वाटत. मांगच्या मंगळवारी संगच धुणं धुतलं आम्ही.” पमी असलीयत सांगत होती.
“नको सांगू. माहितीय मला, तू तिचीच बाजू घेणार...” विषयाचा डोह आटू न देण्याची काळजी घेणारी सुगंधा पमीला डोहातल्या पाण्याचं भेव दावू लागली. अखेर धुण्याच्या सुकण्यासोबत प्रत्येकीच्या तोंडात तोच एक विषय भिजत राहिला. न सुकण्यासाठी... कितीतरी वेळ.
“मानसिक तणाव आणि जरासं आम्लपित्त.” ह्या डॉक्टरांच्या निदानानंतर जरासा उपचार घेऊन सायंकाळी दोघंही घरी परतले. त्यानं तिला तिच्या घरी पोहचवलं. तिच्या आईला औषधे देण्याच्या वेळा समजावल्या आणि केलेली मदत हे आपले कर्तव्यच आहे असं मानत अन स्वत:ला शाबासकी देत आपली गाडी घेऊन स्वत:च्या घरी गेला. विश्रांतीसाठी घरी झोपलेल्या नंदाला भेटण्यासाठी आलेली प्रत्येक बाई लांब हुसासा टाकत आणि नंदाच्या बोलण्यावर काहीसा अविश्वास दावत “जप बाई जीवाला...” एवढाच सहानुभूतीमय सल्ला देऊन जाता जाता गूढ उकलण्याचा प्रयत्न करून जात होती.
“बाई व्हयचं ते झालं, इपरीत इचार नको करू काई. कधी न कधी करावच लागंल ना, मंग टाक ना करून लवकर... तसं घरानं चांगलंय तेचं. चुका काय व्हून जात्यात ह्या वयात...” अखेर भेटायला आलेल्या म्हाताऱ्या ईठाइने आपल्या मोकळ्या स्वभावानुसार चाचरत का होईना पण मोकळं सांगून टाकलं...
“आजे, अगं, तसं काय नाहीये गं....” असं सांगण्याचा विचार नंदाच्या मनात आला पण मनातच ठेवला आणि फक्त हसली... स्वत:च्या रिकाम्या पोटाकडं पाहत....
आणि मग जरावेळानं एकटी उरताच तिची नजर ‘पुढं काय?’ असल्या प्रश्नांची पोटं फोडत पुढं पुढं सरकू लागली... अखेर गुलाबी भूतकाळाची गोधडी धूसर वर्तमानाच्या अंगावर ओढत कोंबून घेतलं तिनं स्वत:ला भविष्याच्या पोटात... पापण्या जड झाल्यावर....

रावसाहेब जाधव (चांदवड)
९४२२३२१५९६
rkjadhav96@gmail.com
७०, महालक्ष्मी नगर, चांदवड
जि. नाशिक ४२३१०१

.........................................................

Share

प्रतिक्रिया