Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.कोरोना, 5G आणि बिनबुडाचे षडयंत्रकारी सिद्धांत

Krishijagat: 
चर्चा
कोरोना, 5G आणि बिनबुडाचे षडयंत्रकारी सिद्धांत
 
गेले काही दिवस महाराष्ट्राच्या सोशल मीडियात 5G व कोरोनाच्या संबंधाने काही अतिशय हास्यास्पद पोस्ट फिरत आहेत. महाराष्ट्राच्या एकूण सोशल मीडिया वर्तुळात तांत्रिक तसेच विज्ञान विषयांवर माहिती लिहिणाऱ्यांचा दुष्काळ असल्याने हिंदी पट्टयातून येणाऱ्या खऱ्या-खोट्या मेसेजेसचा पाऊस येथे पडत असतो. यातून कोविड-19 सारख्या घातक आजाराच्या गांभिर्याकडे दुर्लक्ष होऊन अस्तित्वात नसलेल्या जागतिक षडयंत्राच्या वायफळ चर्चा घडत आहेत. या विषयावर तांत्रिक प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न.
 
5G नेमके काय आहे?
 
रेडियो ते आजच्या मोबाईलपर्यंत सर्व बिनतारी तंत्रज्ञान हे Electromagnetic radiation म्हणजेच विद्युतचुंबकीय उत्सर्जन तंत्रज्ञानावर चालते. धातुच्या दांडीमधून विजेचा प्रवाह सोडल्यानंतर त्या प्रवाहाने भारीत कण जेंव्हा वेग घेतात त्यातून विद्युतचुंबकीय उत्सर्जन होते. या उत्सर्जनातून विद्युतचुंबकीय तरंग तयार होतात. यातून निर्माण होणाऱ्या तरंगांना विद्युत प्रवाह कमी-जास्त करून नियंत्रित केले जाते. हवा नसलेल्या पोकळीत या तरंगांना जाऊ दिल्यास एक सेकंदात हे तरंग प्रकाशाच्या वेगाने 299,792,458 मीटर जाऊ शकतात. प्रकाशाचा वेग भागिले तरंगाची लांबी म्हणजेच या तरंगाची फ्रीक्वेन्सी. तरंगाची फ्रीक्वेन्सी मोजण्याचे एकक आहे हर्ट्ज. अशा 1000 हर्टजचा 1 मेगाहर्ट्ज बनतो. (विस्तारभयास्तव यावर खूप थोडक्यात लिहिले आहे, जिज्ञासूंनी इंटरनेटच्या माध्यमातून याविषयी अधिक माहिती घ्यावी.)
 
तर या रेडियो तरंगाचे प्रसार होण्याच्या पद्धतीवरून ढोबळ 3 प्रकार होतात.
 
1. दृष्टिक्षेपात होणारा प्रसार: यात रेडियोचे प्रसारण करणार अॅंटेना आणि त्याचा स्विकार करणारा अॅंटेना हे दोन्ही दृष्टिक्षेपात म्हणजे नजरेच्या टप्प्यात असावे लागतात. याचे उदाहरण म्हणजे मोबाईल फोन, एफ. एम. रेडियो, जुन्या पद्धतीचा दुरदर्शन अॅंटेना. पृथ्वीवर याची प्रसार मर्यादा आहे 64 किमी. मात्र हेच तंत्रज्ञान जमीनिवरच्या मोठ्या अॅंटेनाच्या माध्यमातून अवकाशात असलेल्या सॅटेलाइट व अंतराळ स्थानक यांच्याशी संपर्क साधू शकते!
 
2. भू-प्रसार: या तरंगांचा वापर मुख्यत्वे सैन्याकडून होतो. या तरंगांचा प्रसार जमिनीच्या आधारे दूरवर होतो. अगदी समुद्रात शेकडो फुट खोल असलेल्या पाणबुडीपर्यंत सुद्धा!
 
3. आकाशीय प्रसार: यात आकाशाकडे तरंग सोडून नंतर ठराविक अंतरावर जमिनीवर बनवलेल्या केंद्राद्वारे त्यांचे पुनःप्रसारण करून दूरपर्यंत पोचवले जातात. उदाहरणार्थ आकाशवाणी सारखे रेडियो स्टेशन व इतर देशांशी संपर्क साधण्यासाठी असणारी रेडियो यंत्रणा.
 
प्रत्येक रेडियो प्रसारण तंत्रज्ञानाची फ्रीक्वेन्सी वेगळी असते. तर अशाप्रकारे बिनतारी तंत्रज्ञान कोणतेही असो त्याचे मूळ आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजे विद्युतचुंबकीय तरंग. या तरंगांचा वापर करणारे तंत्रज्ञान जगभरात सारखेच असावे या उद्देशातून रेडियो तरंगांची फ्रीक्वेन्सी वेगवेगळ्या विभागात वाटून त्यांची ठराविक कामे निश्चित केलेली आहेत. म्हणजे उद्या तुम्ही भारतातून अमेरिकेत गेले तरी तुमचा मोबाइल तिथल्या नेटवर्कवरही चालावा.
 
ज्याप्रकारे जगभरात रेडियो तरंगांची विभागणी केलेली आहे तशीच मोबाईलच्या तंत्रज्ञानाचे फ्रीक्वेन्सी व तंत्रज्ञानानुसार पिढ्यावार विभाग केलेले आहेत. मोबाईल नेटवर्कची सुरुवात ही 1G पासून झालेली आहे जे जपान मधील निप्पॉन टेलिग्राफ व टेलिकम्युनिकेशन या कंपनीने 1979 मध्ये सुरू केले होते. 1G पासून सुरू झालेला मोबाइल नेटवर्कचा प्रवास 2G, 3G, 3.5G, 4G, 4.5G मार्गे 5G पर्यंत आलेला आहे. यातील G म्हणजे जेनेरेशन अर्थात पिढी. 5G ही मोबाइल तंत्रज्ञानाची पाचवी पिढी आहे यापेक्षा जास्त त्यात काही नाही.
 
रेडीएशनमुळे फुफ्फुसाला अथवा श्वास घेण्यास धोका आहे का?
 
फ्रीक्वेन्सीच्या आधारे रेडियो तरंगांचे केलेले विभाग म्हणजे स्पेक्ट्रम बॅंड, ज्याचा लिलाव नैसर्गिक संपत्ती म्हणून जगभरातील सरकारी नियमन संस्था करत असतात. हा स्पेक्ट्रम बॅंड म्हणजे हवेतून प्रवास करणाऱ्या विद्युतचुंबकीय तरंगांसाठी असणारा रोड समजा. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे 2G फ्रीक्वेन्सी हा एकपदरी रस्ता आहे मात्र तो लांब जाऊ शकतो. 5G फ्रीक्वेन्सी हा आठपदरी रस्ता आहे मात्र तो जास्त दूर नेऊ शकत नाही. दोन्हीत फरक फक्त किती वाहने (डेटा) एकावेळी जाऊ शकतात हाच आहे, रस्ता डांबरीच आहे.
 
आपल्याला आठवत असेल CDMA मोबाइल असताना तालुक्याच्या ठिकाणी एक टॉवर असायचे आणि त्याची रेंज खेड्यापाड्यात पोचायची. कारण CDMA फ्रीक्वेन्सीची ट्रान्समिशन पॉवर जास्त होती. 2G त्यापेक्षा कमी. 3G, 4G त्याहून कमी आणि 5G सगळ्यात कमी आहे म्हणून छोटे छोटे सेल गल्लीबोळात लावावे लागणार आहेत. यासाठी खूप खर्च येणार आणि याला खूप वेळ लागणार आहे.
 
वर सांगितल्याप्रमाणे कोणतेही बिनतारी तंत्रज्ञान असले तरी ते Electromagnetic radiation म्हणजेच विद्युतचुंबकीय उत्सर्जन यावरच काम करते! रेडीएशनचा परिणाम झाला तरी त्वचेवर होतो, श्वासावर नाही. तरीही असा घातक परिणाम हे तंत्रज्ञान वापरणाऱ्यावर होऊ नये म्हणून कोणत्याही उपकरणातून होणाऱ्या रेडीएशनची मर्यादा ठरवून दिलेली असते आणि त्यासाठी वेगवेगळी मानके आहेत. या तरंगांची रेडीएशन प्रसार मर्यादा जगभरातील सरकारी संस्था ठरवत असतात. भारतात याची मर्यादा F भागिले 2000 आहे येथे F म्हणजे फ्रीक्वेन्सी, मग ती 2G, 3G, 4G फ्रीक्वेन्सी असो किंवा 5G.
 
यात अजून एक महत्वाची बाब म्हणजे मोबाईल टॉवरच नाही तर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूतून रेडीएशन होत असते. उदाहरणार्थ मोबाईल हँडसेट मधून होणाऱ्या रेडीएशनची मर्यादा त्वचेने शोषून घेणाऱ्या ऊर्जेच्या स्वरूपात ठरवून दिलेली आहे. भारतात याची मर्यादा 1.6 वॅट प्रती किलो आहे. आपल्याकडे असलेला "मोबाईल हँडसेट मॉडेल + SAR" असे गुगल सर्च केल्यास मोबाईलच्या माध्यमातून किती रेडीएशन आपण रोज अनुभवतो  हे लक्षात येईल. अगदी तुमच्या घरातील टीव्हीसुद्धा काही प्रमाणात रेडीएशन बाहेर टाकतो, त्याचमुळे टीव्हीपासून 2 फुट लांब बसा हे सांगतात.
 
विजेला हात लावल्यासही माणूस मरतो मग वीज वापरणे सोडून द्यायची का? त्यासाठी काळजी घ्यावी लागते. रेडीएशनचे प्रमाण धोकादायक पातळीवर नसल्यास त्याला भिऊन काय होणार? असा वाईट परिणाम होऊ नये म्हणून जगभरातील सरकारी संस्था रेडीएशनचे प्रमाण ठरवून देतात! भारताही दूरसंचार विभाग हे काम करतो. इतकेच नाही तर प्रत्येक टॉवरची माहिती तरंग संचार पोर्टलवर सार्वजनिक आहे. आपल्याला आपल्या जवळच्या टॉवरवर शंका असल्यास पैसे भरून रेडीएशनच्या प्रमाणाची खाजगी टेस्टही करून घेता येते!
 
अमेरिका-युरोपमध्ये 5G विरोधात आंदोलन होत आहे त्याचे काय?
 
तिकडे 5G विरोधात होणाऱ्या आंदोलनाचे फोटो पुरावा म्हणून या षडयंत्र कथांच्या सोबतीने फिरत आहेत. पण आंदोलन करणारे लोक कोण आहेत याविषयीची माहिती जाणीवपूर्वक झाकण्यात आली आहे. 5Gच्या विरोधात आंदोलन करणारे लोक हे धार्मिक कट्टरपंथीय आहेत. ते सगळ्याच विज्ञान व तंत्रज्ञानाला विरोध करतात. या आंदोलनाविषयी माहिती घेतल्यास आपल्याला कळून येईल की त्यांचे मुद्दे व तर्क किती हास्यास्पद आहेत. या लोकांच्या म्हणण्यानुसार कोविड-19 लसीतून मेंदूवर नियंत्रण करणाऱ्या 5G चिप बसवत आहेत! कोणताही विज्ञानाचा गंध नसलेला व्यक्तीही विचारेल की लसीतून चिप कशी जाईल? कोणीतही चिप ही विना विजेची चालत नाही. इंजेक्शनच्या सुईतून चिप कशी जाईल? त्या चिपला बॅटरी कोणती लावणार?
 
जगात मूर्खांची कमतरता नाही! प्रत्येक बाबीत असा बिनडोक आंधळा विरोध करणारे विज्ञानाचे कलमकसाई भारतातही आहेत (नोटबंदीच्या काळात 2000च्या नोटेत बसवलेल्या जिपीएस चिप आठवा!). या पोस्टसोबत काही मेलेल्या पक्षांचे फोटो फिरत आहेत. 5G मुळे पक्षी मेल्याचा कुठलाही प्रकार समोर आलेला नाही. याविषयी कुठेही बातमी आलेली नाही, बाकी मेलेल्या पक्षांचे फोटो कुठेही सापडतील, त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. तसेच बर्ड फ्लूचा आणि 5Gचा काही संबंध नाही. बर्ड फ्लूचा विषाणू पहिल्यांदा 1878मध्ये निदर्शनास आलाय! त्यावेळी 5G होते का?
 
अमेरिका तसेच युरोपीय देशात 5Gला विरोध करणारे लोक फक्त 5G तंत्रज्ञानच नाही तर प्रत्येक लसीला विरोध करतात कारण त्यांचे म्हणणे आहे की लस धर्माच्या विरुद्ध आणि सैतानाची देणगी आहे. हे लोक आजच नाही तर 18व्या शतकापासून अशी आंदोलने करत आहेत. 18व्या शतकात अमेरिकेतील काही धार्मिक पुढाऱ्यांनी लस ही सैतानाची निर्मिती आहे म्हणून लसीकरण करू नका असे आवाहन केले होते. अशा लोकांना Conspiracy theorist (षडयंत्र सिद्धांतवादी) तसेच Anti-Vaxxer (लस विरोधक) म्हणून ओळखतात. अशा बावळट लोकांवर कोणताही विवेकी व्यक्ती विश्वास ठेवू शकेल का?
 
मोबाइल किंवा बिनतारी तंत्रज्ञान येण्यापूर्वी जगात साथीचे आजार नव्हते का? हा साधा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. यात चीनवर जैविक युद्धाचा आरोप करणारेही काही लेख आहेत. याला कुठलाही आधार नाही. चीनने हा आजार कसा नियंत्रित केला हे त्यांच्याकडून शिकण्यापेक्षा आपण ह्या असल्या षडयंत्राच्या शेंडा ना बुड असलेल्या कथा चघळत बसलोय. प्लेग युरोप मधून आला तसा कोरोना चिनमधून आला. यात फार काही शोधण्यासारखे नाही. रेडीएशनचा घातक परिणाम आहे तसा रोडवर वेगवान वाहन चालवण्याचा पण आहे. यात कळीचा मुद्दा आहे प्रमाण. अति तिथे माती असते पण म्हणून सरसकट प्रत्येक तंत्रज्ञान धोकादायक होत नाही.
 
अजून एका जगदाळेंच्या नावाने लेख फिरतो आहे त्यातही 5G टेस्टिंगच्या संदर्भाने हास्यास्पद दावे करण्यात आलेले आहेत. अजून भारतात 5G तंत्रज्ञान आलेच नाही, त्यासाठी लागणाऱ्या एअरवेव्हची हर्राशी झाली नाही तर टेस्टिंग कुठून झाले? वैज्ञानिक व शोधकर्ते आयुष्यभर अभ्यास करून, डिग्र्या-पीएचड्या घेऊन 5G सारख्या गोष्टीवर काम करतात, IETE, ITD सारख्या खाजगी व सरकारी संस्था हे तंत्रज्ञान विकसित करून त्याला स्टॅंडर्ड बनवण्यात लाखो रुपये खर्च करतात त्यांच्यावर विश्वास ठेवावा की 2 हास्यास्पद दावे असलेले, तंत्रज्ञानाचा गंध नसलेले लेख वाचून तथाकथित आंतरराष्ट्रीय षडयंत्रवाद्यांवर?
 
भविष्यातील तंत्रज्ञानाला अज्ञान वा भितीतून आंधळा विरोध करून मराठा-बहुजनांनी नुकसान करून घेऊ नये. उत्तम शेतीच्या बागूलबुव्यामध्ये मराठा-बहुजनांच्या कित्येक पिढ्या खपल्या. आता भविष्यात महत्वाच्या ठरणाऱ्या तंत्रज्ञानाविषयीच्या अंधश्रद्धेतून आपले नुकसान होऊ नये हीच इच्छा आहे! 5G किंवा कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाविषयी गैरसमज न बाळगता मराठा-बहुजनांनी ते आत्मसात केले पाहिजे, त्या क्षेत्रातील "शिवाजी" बनले पाहिजे तरच भविष्य उज्वल आहे अन्यथा जशी सरकारी नोकऱ्यांची गाडी समाजाने फुका अभिमान बाळगत सोडली तशीच तंत्रज्ञानाची गाडी सुटली तर पुढच्या पिढ्यांच्या भविष्यात बिगारी कामच राहील.
 
ता.क. भाजप म्हणजेच पूर्वाश्रमीच्या जनसंघाने कॉम्प्युटरच्या विरोधात आंदोलन केले होते बरं का! कॉम्प्युटरच्या तोटयांवर वृत्तपत्रांत पान-पान भर लेख यायचे. पण हेच तंत्रज्ञान आत्मसात करून विरोध करणाऱ्यांचे भाऊबंद आज सिलिकॉन व्हॅलीत जाऊन बसले आहेत.
 
विनीत वानखेडे
अंजनी खुर्द, ता. लोणार,
जि. बुलडाणा
9561848661
 

Share

प्रतिक्रिया