Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



राजाचा शोध

राजाचा शोध

एका सुंदर शांत तळ्यात शेकडो बेडूक राहत होते. तसे सगळे खून पिऊन सुखी होते. फक्त एकच खंत होती,त्यांना कोणी राजा नव्हता. किरकोळ कलागती व्हायच्या पण वयस्कर बेडूक सांभाळून घेत. जेव्हा कधी राजाचा विषय निघे तेव्हा तरुण बेडूक राजा शिवाय प्रशासकीय शिस्त कशी राहील, याबद्दल तवातावाने डराव डराव करून आपली बाजू मांडत. राजा नाही म्हणून तळ्यात किती अव्यवस्था आहे, कोणी बेडूक तालासुरात रेकत नाही. कसेही उड्या मारतात. वगैरे कागाळ्या वाढू लागल्या..... आणि वयस्कर बेडकांच्या विरोधाला न मानता एक बेडूक मोर्चा डराव डराव करत भगवान शंकराच्या गुहेसमोर धडकला. बेडकावरचा अन्याय दूर झालाच पाहिजे... डराव डराव ! आम्हाला राजा मिळालाच पाहिजे ... डराव डराव ! शेवटी भोलेनाथानी स्वत: मोर्चाला सामोरे जायचा निर्णय घेतला..! त्यांच्या गळ्यातल्या नागोबाला पाहताच बेडूक जरा कचरले, डराव डराव चा कोलाहल गपकन थांबला. . पण देवाचे स्मितहास्य पाहून काही बेडकांनी धीर करून आपले गाऱ्हाणे मांडले.

"बेडूक जात ही समजदार, निरुपद्रवी असल्याने त्यांना राजाची गरज नाही असे मला आजही वाटते." भोलेनाथ बोलले.

पण दोन चार उत्साही बेडूक निषेधार्थ रेकल्यावर, बाकीच्यांनाही आपला मोर्चा कशासाठी आहे याची आठवण येऊन कोलाहल मजला. शेवटी युवा रक्ताची स्पंदने जाणून मह्देवाने तथास्तु म्हणून एक कासव तळ्यात धपकन टाकून, डोळे मिटले. आनंदित बेडूक मोर्चा मस्तीत तळ्यात परतला. त्यांना राजा मिळाला होता. त्या दिवसापासून काही दिवस आनंदात गेले. कासव बिचारे तळ्यात मजेत पोहत फेरफटका मारत असे. सुरुवातीला बेडूक त्याला घाबरून राहत. पण लवकरच हा राजा निरुपद्रवी आहे हे कळल्यावर त्यांची भीती गेली तरीही ते त्याच्याशी आदबीने राहत. पण कासव बिचारे पाडले कुटुंब वत्सल. किनाऱ्यावर बसले असतांना बेडकांची तरुण बाळे त्याच्या अगदी जवळ जात. ते काहीच करत नाही म्हणून नंतर त्याच्या अंगावर उड्या मारत. ते बिचारे शांतच राही. फारच वाटले तर आपले पाय डोके कवचात घेऊन मजेत पडून राही. बाल बेडूक त्याच्या पाठीवर उड्या मारून खेळत... हळूहळू तरुण बेडकांना राजाचे भय वाटेनासे झाले. तरीही तसे सगळे मजेत चालले होते.

पण एक दिवस घोटाळा झालाच ... पावसाळ्याच्या दिवसात दोन तरुण बेडकांचे एकाच बेडकीनीवर प्रेम बसले. ती बिचारी घाबरून दूर चिखलात दडली. ..आणि तिच्या मर्जीचा विचार करण्या ऐवजी दोघात भांडण लागून प्रकरण कासव राजाकडे गेले. त्यात एवढा खमंग विषय म्हणल्यावर दोघांचे समर्थक, हौसे, गवसे असा जमाव कासव राजाकडे गेला. डराव डराव कोलाहल ऐकून कासव अर्धे आकासले. कसेबसे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, पण काही बोलण्याचा प्रयत्न व्यर्थ झाल्यावर आपले डोके पाय कवचात घेऊन बसले. आणि आपला राजा अगदीच कुचकामी आहे ही चर्चा उघडपणे सुरु झाली. सदरील प्रकरणात एका बेडकाला हद्दपार करून सापाच्या तोंडी द्यायला पाहिके होते अशी दोन्ही गटांची भावना होती. राजा कसा कडक आणि न्यायनिष्ठुर असावा, यावर तरुण बेडूक सहमत होऊ लागले.... डराव डराव असंतोष वाढू लागला...

भोलेनाथाकडे पुन्हा मोर्चा जाणार हे ऐकून आता काहीतरी अनिष्ट होणार म्हणून म्हातारे बेडूक अस्वस्थ झाले... त्यांना न जुमानता तरुण बेडूक टणाटण उड्या मारत भोलेनाथाच्या गुहेला घेराव घालायला निघाले.... बेडकांना कमी लेखले ... असं राजा दिला जो ढिम्म हलत नाही... त्याला बेडूकबाळेही घाबरत नाही... आता फैसला झालाच पाहिजे ... हम सब एक है .. डराव डराव... भोलेनाथांच्या गणांच्या पायामधून उड्या मारून बंडखोर बेडूक थेट देवाच्या पायाशी जाऊन रेकू लागले. ... भोलेनाथाच्या गळ्यातील नागाचेही त्यांना भयं वाटले नाही. तो बिचारा कौतुकाने पाहत जिभल्या चाटत राहिला. भोलेनाथ त्या गल्क्याने जरा नाखुशीनेच नेत्र उघडून पाहू लागले... !

"देवाधिदेवा तुम्ही आम्हाला एकदम नेभळट राजा दिला... "

"त्याला कोणीही घाबरत नाही, तो कोणाला शिक्षा करत नाही..."

"सगळे तळे अराजकाने दुषित झालेय... आम्हाला कडक राजा पाहिजे.."

"हमारा राजा सुंदर हो, चुस्त हो, अनुशासनप्रिय हो..."

डराव डराव वाढत चालली.

आधीच समाधीभंग झाल्याने भोलेनाथ त्रस्त होते. त्यात हा दोषारोप ऐकून खिन्न झाले.

कसेबसे स्मित करत म्हणाले ठीक आहे... यावेळी मी तुम्हाला हवा तसा राजा देतो... पण ही अखेरची संधी आहे. नीट विचार करा... तुम्ही पुन्हा या विषयावर डराव डराव करून समाधीभंग केला तर मात्र मी शाप देईन.... बोला दुसरा राजा पाहिजे... ? शंकराच्या बोलण्यातली मेख ध्यानात न घेता किंवा त्याच्या गळ्यातल्या जिभल्या चाटनार्या नागाला न घाबरता सगळे ओरडले , " नवा राजाच पाहिजे ..... ठराव मंजूर ...डराव डराव "

झाले, भगवान शंकरांनी तथास्तु म्हणून नागोबाला तळ्यात जायची आज्ञा देऊन डोळे मिटले. इतके तरुण बेडूक पाहून केव्हा पासून जिभल्या चाटनारा नाग सळसळत तळ्याकडे निघून गेला. आणि बेडूकही शेवटी देवाकडून मागणी पूर्ण झाली म्हणून डराव डराव आनंदोत्सव करत परतले. .

नागोबाला शंकराच्या गळ्यात राहून कंटाळा आलाच होता. त्याने तळ्यात पोहत मस्त एक चक्कर मारली. तळ्यातले बेडूक धास्तावून लपले... नंतर नागोबा काठावर वेटोळे घालून आपल्या प्रजाजानाकडे फना काढून पाहत राहिले... त्यांची सुंदर राजबिंडे रूप, धडकी भरवणारी रोखलेली नजर सगळे बेडूक प्रजजन भायमिश्रीत कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिले. .. म्हातारे चिंताग्रस्त बेडूक पोरांनो सांभाळून राहा रे ... म्हणून पिलांना समजावू लागले. पण तरून पिढी कोणाचे ऐकते थोडेच... ते डराव असे रेकून मुद्दाम पोहुन् तरुण बेडकीनीवर इम्प्रेशन मारू लागले. नागोबाही नव्या प्रजेचे कौतुक पाहत त्यांना आश्वस्त करत शांत वेटोळे घालून बसून राहिले.

आणि लवकरच नव्या राजाला न्यायनिवाडा करायची वेळ आळी. दोन बेडकामध्ये भांडण होऊन तंटा नागोबाकडे गेला. भीत भीतच त्यांनी नागोबाला तक्रार सांगून एकमेकाला शिक्षा करायची विनंती केली. नागोबा एकटक पाहत अधून मधून जिभल्या चाटत होते. सगळ्यांचे लक्ष ते काय न्याय करतात याकडे होते. डोलता डोलता नागोबा स्तब्ध झाले. सगळ्यांचे श्वास आयता स्तब्ध झाले. आणि जणू वीज चमकली... तक्रारकर्त्या बेडकावर झडप घालून नागोबाने त्याला तोंडाकडून गिळायला सुरुवात केली.... बाकीच्या बेडकांनी घाबरून पाण्यात उड्या मारल्या .... तळ्यात स्मशान शांतता पसरली... पण दिसरा गट त्याही परिस्थितीत खुश होता. विरोधी गटाचा अध्यक्षच गट्टम झाला होता. गतिमान शासन, न्यायनिष्ठुर राजा, मिळाला होता. शिवाय तो सुंदर, चपळ आणि पाण्याबाहेरच्या प्राण्यांचा कर्दनकाळही होता. आता इतका श्रेष्ठ असला तरी शेवटी त्यालाही पोट असणारच. त्यामुळे वेळप्रसंगी खाल्लाच एखादा बेडूक तर त्याचा एवढा इशु कशाला करायचा ? चानाक्यानिती ही काही माणसांचीच मक्तेदारी नाही. आम्हीही आमच्या विरोधी बेडकाला खुबीने नागाच्या तोंडी देऊ शकतो अशा फुशारक्याही मारल्या जात होत्या. शेवटी काही झाले तरी बेडूक समजदार होते.तळे राखील तो पाणी ( आणि बेडूकही ) चाखील ही माणसांच्या राज्यातली म्हण त्यांना भारीच आवडलेली दिसत होती. त्यांची राजकीय समज चांगलीच वाढली होती.

आणि मग कठोर,गतिमान, सक्रीय प्रशासनाचा सिलसिला सुरु झाला. नागोबा काहीतरी निमित्त काढून एकेका बेडकाला शिक्षा देऊ लागले. त्यांच्याकडे एकच शिक्षा होती, देहांत शिक्षा... तळ्यातील बेडकांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली.. सगळे तळे भयभीत झाले... पण भोलेनाथाने आधीच तंबी दिली असल्याने काहीच उपाय उरला नव्हता. सबब बेडकांचा कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम रद्द करून पैदास वाढवायचा ठराव एकमताने मंजूर झाला... बैठक संपल्यावर सहज एका बेडकाचे लक्ष तळ्याच्या काठावर गेले आणि भीतीने त्याची वाचाच बसली. नागोबा एका मस्त नागिणीच्या विळख्यात मस्ती करत होते... आता लवकरच तळ्याला युवराज येणार ... आता या नागोबाचे कुटुंब नियोजन कसे करायचे या विचाराने सगळे बेडूक काळे ठिककर पडून चिखलात लपले... कारण आता परिस्थिती हाताबाहेर गेली होती..!!

---नवनाथ बंडू पवार

औरंगाबाद, महाराष्ट्र

१० सप्टेंबर २०११

सर्व हक्क लेखकाचे आधीन

Share

प्रतिक्रिया