नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
**अंगाई गीत**
दुष्काळाची व्यथा
कशी सांगू आता ? |
नीज नीज बाळराजा
नाही दुध भाता ||धृ||
झोपली रे बघ
आई ही उपाशी |
कवटाळी बाळ ती
आपल्या उराशी ||
गळा भरून येतो
तिचा अंगाई गाता |
नीज नीज बाळराजा...||१||
लावून घेतली रे
बापाने फाशी |
गुन्हा न करताच
ठरला तो दोषी ||
बाळा तुझा बाप
इमानदार व्हता |
नीज नीज बाळराजा...||२||
हुंदके देत तुला
आई देते झोका |
तुझ्याच दारिद्रयाने
दिला तुज धोका ||
भूक शमवीण्यासाठी
शेला बांधू पोटा |
नीज नीज बाळराजा...||३||
शेती नाही रे कामी
फक्त उजाड रान |
कधीही होणे नाही
शेतीचे कल्याण ||
आश्वासन देई रे
राजकारणी खोटा |
नीज नीज बाळराजा...||४||
कोरड पडे घशात
घरी नाही पाणी |
सांग रे कशी गाऊ
समृद्धीची गाणी ? ||
घरातल्या दिव्यासाठी
नाही तेल वाता |
नीज नीज बाळराजा...||५||
सहन खूप केल्या
तुझ्यासाठी यातना |
तूचं आहेस बाळा
लाडला रे तान्हा ||
मारू नको आईला
मोठेपणी लाता ? |
नीज नीज बाळराजा...||६||
घे रे तू आज शपथ
होय अधिकारी |
शेतकरी होऊन सन्या
हिंडू नको दारोदारी ||
दरसाली असा रे
खाऊ नको घाटा |
नीज नीज बाळराजा...||७||
वेदनेवर आपुल्या
मार तू फुंकर |
आनंदाने भर तू
उजाडेल घर ||
इच्छा पूर्ण कर बाळा
झोपी जाता जाता |
नीज नीज बाळराजा...||८||
तुझ्या भविष्यासाठी
खूप राबते रे आई |
तू झोपावं म्हणून
गाते रे बाळा अंगाई ||
लिहिली तेवढी कमी
वैभव शेतकरी गाथा |
नीज नीज बाळराजा...||९||
शिवकवी✏वैभव भिवरकर.
कारंजा लाड जि. वाशीम
मो.
प्रतिक्रिया
निःशब्द करणारे काव्य
सुरेख!
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद !!
धन्यवाद !!