![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"बळीराजा सुखी भव''
बळीराजा खरे सांग तुला या रासायनिक शेतीतील वारे सुखावतात का रे ?कारण तू अनुभवली जैविक शेती .शेणखत टाकून आणि गावरान बियाणे पेरून तू पूर्वी शेती केलीस .गावरान ज्वारीचा हुरडा त्याची चव अजूनही तुझ्या जिभेवर खेळत असेल. संयुक्त कुटुंब तू अनुभवले असेल आणि संयुक्त शेती सुद्धा केली असेल. त्यावेळच्या आबादानीचा चित्रपट अजूनही तुझ्या डोळ्यासमोर येत असेल .भरपूर होणारा पावसाळा पावसाचा झडी हिवाळ्यातील तो गारठा तो निसर्ग आता लोप पावला कालाच्याओघात हवामान बदल होऊन संपूर्ण निसर्ग चक्रच बदलले.ऋतू बदलले शेती करण्याची पद्धत बदलली आणि बळीराजा तुही बदलला. कुटुंबे विभक्त झालीत शेतीचे तुकडे झालेत . हे बळीराजा निसर्गाच्या लहरीपणामुळे तुझा शेती व्यवसाय मोडकळीस येईल किंवा काय अशी तुला भीती तर वाटत नाही ना पावसाच्या लहरीपणामुळे कित्येकदा तुझ्या तोंडाशी आलेलं पीक वाया गेलं असेल आणि हाताशी आलेल्या पिकाला मातीमोल भावात विकावे लागले असेल यावेळी तुला होणाऱ्या वेदना आणि निराशा तूच समजू शकतो . व्यापाऱ्यांकडून तुझी होणारी लूट तू निमुटपणे सहन करतोस कारण शेती कुटुंबाकरिता खर्च करून तू कर्जबाजारी झालेला असतो आणि लोकांचे देणे पूर्ण करण्याकरता तुला शेतीमाल त्वरित विकावाच लागतो आणि व्यापाऱ्यांना सुद्धा तुझी ही आगतिकता एक संधी बनते .त्याचा तो फायदा घेऊन तुला ओरबाडतो रक्तबंबाळ करतो तू लुटल्या जातो आणि मग गळफास लावायची वेळ येते तुझ्यावर .कालचक्रामध्ये तुझी शेती रासायनिक शेतीत परिवर्तित झाली. जास्त उत्पन्न घेण्याची स्पर्धा लागली आणि त्यात बेसुमार रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करून संपूर्ण शेतमाल भाजीपाला विषारी झाला. बळीराजा तू सुद्धा विषारी झालास. परंतु घाम गाळतो शेतात म्हणून विषही तुझ्या पोटात पचत आहे पण शेतमाउली त्याने कासावीस झाली. मृ तवत होत आहे रासायनिक खत आणि कीटकनाशकाने कारण तिच्या पोटातील मित्र कीटक आणि मूलद्रव्ये ही नष्ट होत आहे मृदा ही नावाप्रमाणे नरम असायला पाहिजे पण रासायनिक खताने ती कडक होत आहे निर्जीव होत आहे बळीराजा तुझ्या अधोगतीला स्वार्थी राजकीय पुढारी सुद्धा कारणीभूत आहे. शेत मालाची आवश्यकता नसताना आयात करणे निर्यात थांबवणे यामुळे शेतमालास भाव मिळत नाही त्यांना तुझ्याशी काही घेणं देणं नाही. फक्त म्हणतात तुला ते तू जगाचा पोशिंदा पण तुझं रक्त पितात ते राजकीय पुढार्यांचा स्वार्थ शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करतो बळीराजा तुला पाहून कीव येते कारण बदलत्या परिस्थितीनुसार तू बदलला नाही निसर्ग बदलला शेतीचे तंत्रज्ञान बदलले पण तू शेतीचे नवीन तंत्रज्ञान अवगत केले नाही स्वीकारले नाही .तीच सोयाबीन, तूर आणि कापूस वर्षानुवर्षे चालू आहे. त्यामुळे या धावपळीच्या जगात तू मागे मागे जात आहे. समाजापुढे तू हीन दीन ठरला जात आहेस इतका की तुझ्या मुलासोबत कोणी मुलगी लग्न करण्यासही नकार देते. बळीराजा तुला वाटत असेल शासनाने शेती विकासाच्या विविध योजना सामूहिक रित्या राबवून त्यात तुझा सहभाग घ्यावा शेती संलग्न व्यवसाय जसे कुक्कुटपालन शेळीपालन दुग्ध व्यवसाय इत्यादी गट बनवून करावे शेतकऱ्याकडून त्यांचे शेतात किंवा घरावर सौर ऊर्जा निर्मिती करून त्याचा शेतकऱ्यांना लाभ द्यावा पवन ऊर्जा प्रकल्प शासनाने उभारून त्यात शेतकऱ्यांचा आर्थिक सहभाग घ्यावा त्यांना त्यापासून मिळणारा आर्थिक लाभ द्यावा हरितक्रांती करता शासनाने नदीला नदी जोडावी कोरड्या विहिरीत कालव्याचे पाणी सोडावे नदीचे खोलीकरण करून धरणाचे पाणी त्यात सोडावे नदीला बाराही महिने पाणी राहील .कोरड्या नद्यांना सिमेंट बांध करून त्यात पाणी अडवावे. यामुळे नदी किनाऱ्याच्या प्रदेशात जलसिंचनाचे क्षेत्र वाढेल वन्यजीवापासून शेती पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेती क्षेत्रातील वन्यजीव पकडून संरक्षित क्षेत्रात सोडावे व संपूर्ण वनक्षेत्राला जाळीचे कुंपण करावे. वन्य जीवापासून शेती पिकाचे संरक्षणाकरिता शेतकऱ्यांना सवलतीचे दरात विजेची झटका मशीन पुरवठा करावी सौर उर्जेवर चालणारे जलसिंचनाचे मोटर पंप शेतकऱ्यांना सवलतीचे दरात देऊन त्यांची सिंचनसमस्या कायमची सोडवावी गोबर गॅसचे सिलेंडर भरण्याचे तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. त्यामुळे गोबर गॅस चा वापर वाढेल. कार्बन क्रेडिट बाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यापासून शेतकऱ्यांना वृक्ष लागवड करून आर्थिक लाभ देता येईल .या सर्व गोष्टीमुळे बळीराजाचे जीवन उंचावेल काही साहित्यिक म्हणतात तुझा कोणी वाली नाही पण बळीराजा माझ्या मते तूच सर्वांचा वाली आहेस कारण तुझ्या मनगटात जोर आहे तुझ्याजवळ वावर आहे आणि वावर आहे तर पावर आहे. देव बरोबर करते. फक्त प्रयत्नशील राहा .बळीराजा सुखी भव
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने