![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कास्तकार नायी बनाचं...(वऱ्हाडी बोली )
कालचा बाबु आज आयकत नाई बापाचं
रोज सांगते मले कास्तकार नाई बनाचं
सांगू नोका आमाले तुमी वावराच पुरान
तग नाई धरत आता मार्केटात कोंत वान
थ्या वावराच्या खानीत आता नाई उतराचं
मान्य हाये ना आजलोक पोसलं थ्या मातीनं
आता मातर मरत हाये वावराच्या साथीनं
जीतेपनी नाई मले मुरदयावानी जगाचं
रातोरात बदलुन जाते अयरेगयरे
उरावर आमच्या नाचोते त्याईचे सोयरे
गावात मले आता परक्यावानी नाई व्हाचं
अभायाच्या नांदी लागून तुमी खेयता जुवा
निकद्रया वानाचं थे पलटून टाकते हवा
डोयाम्होरं भरोस्याचं मरन नाई पहाचं
कास्तकारी तं आजघळीले झाली मोठा शाप
वावराच्या नावान बुजाडते पोरीचा बाप
लईनित मले मुंज्याच्या उभं नाई रहाचं
दिऊ नोका घळीघळी सातबाऱ्याच्या धवसा
कागदापायी जीवं टांगून देते भरदिवसा
गयात मले आता हे लोळनं नाई बांधाचं
अजून कसं घूसत नाई तूमच्या डोकश्यातं
कास्तकारासाठी कोनी झुरतो काहो मनात?
दिल्लीतल्या रस्त्यावर बेमोत नाई मराचं
जमान्याच्या हिसाबान अजमावू द्या ना मले
काई तं लागन आता माती परीस हाताले
मातेऱ्यावानी जिवाले अजूक नाई धुवाचं
असं नाई हो बाबा का मले समजत नाई
मेयनतिले तं तुमच्या जगात तोळ नाई
घरादारासाठी आता मले भाईर पळाचं ...
रवींद्र अंबादास दळवी
२०२ श्री. वल्लभ अपार्टमेट , विधाते नगर ,नाशिक -४२२००६
७०३८६६९५४२