नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बायोडाटा..!!
जीवाचा
आटापिटा
हाच त्यांचा
बायोडाटा .....॥१॥
चोचीत मिळण्या
तृणवत काडी
फ़िरवित पंख
रान पछाडी .....॥२॥
तृणकाड्यांची
गुंफ़ण करुनी
खोपा विणला
लक्ष धरुनी .....॥३॥
कोणती विद्या?
गुरू कोणता?
घरटे बांधणे
शिकवीत होता .....॥४॥
कसे उडावे
किती उडावे
कसे उमजले
कोणा ठावे .....॥५॥
करुनी फ़डफ़ड
प्रयास करणे
हव्यास धरणे
निरंतर धरणे .....॥६॥
गवसून घेतो
स्वयेच वाटा
तोच त्यांचा
बायोडाटा .....॥७॥
गंगाधर मुटे
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
....................................................................