शेतकरी मोरया गीत
तुझ्या पावलाने देवा झुंजूमुंजू होई
काळीजाचा रोग, भोग नशिबाचा जाई
मांगल्याचे पेव, चेव ठेवा तुझ्या पायी
तुझ्या पायी, ठायी देवा काही कमी न्हाई
तरी का रे माही आर्त आली व्यर्थ जाया
जाया, जाया, जाया, जाया...... आली व्यर्थ जाया?
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया
नांगर गेला, गेली तिफन, आता आला टॅकटर
नवा मंतर, नवे तंतर, नव्या युगाचे यंतर
तरी काहून बाप्पा देतो माह्या उरावर?
बोजा साऱ्या दुनियेचा अन् कर्जाचा डोंगर
अपराध माझा काय सांग तरी देवा?
आता नाही सोसवत... खंगली रे काया
काया, काया, काया, काया..... माही खंगली रे काया
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया
कवा वारा सोसाट्याचा, कवा आसमानी
मनमानी जिथं तिथं चाले सुलतानी
कवा बोंडअळी, कवा शेंडे-खोडकिडा
सरणार नशिबाची कवा ईडापीडा?
बीज जाते बांड कवा दुष्काळाची छाया
छाया, छाया, छाया, छाया... दुष्काळाची छाया
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया
बाप-आजा होता तरी, तवा तीच मरमर
तवा धोतर फाटे, आता पॅन्ट टरटर
उसवत जाय धागे, नित बारोमास
कवाकवा खुणावतो, जिवा दोरफास!
आता तरी जगण्याची दे रे अभय माया
माया, माया, माया, माया... दे रे अभय माया
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया
- गंगाधर मुटे 'अभय'
अठ्ठावीस/आठ/वीस
प्रतिक्रिया
शेतकरी मोर्या गीत
शेतकरी मोर्या गीत
शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या मांगल्याचं दान मागणारी ही सुंदर कविता म्हणावी लागेल.
नवराष्ट्र १ ६ /० ९ /२ ० २ ४
शेतकरी तितुका एक एक!
पाने