नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"आयुष्याच्या कॅनव्हासवरील विविध रंगांची गुंफण म्हणजे 'दस्ती' गझल संग्रह"
गझल आणि त्यामधले सुटे शेर हा प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेणारा साहित्यप्रकार आहे. मराठी गझलेला तर खूप जुनी परंपरा आहे. गझल सम्राट सुरेश भटांपासून सुरू झालेला मराठी गझलेचा प्रवास खूप मोठा आहे. आज घडीला महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये अनेक नामवंत गझलकार आहेत ज्यांनी आपल्या दमदार गझलेच्या लिखाणाच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्रभर नाव कमावलेले आहे. त्यापैकीच अत्यंत सटीक आगळीवेगळी आणि मार्मिक अशी गझल लिहिणारं मराठी गझलेतलं विदर्भाच्या मातीतलं एक नाव म्हणजे अकोल्याचे भूमिपुत्र निलेश श्रीकृष्ण कवडे. शिक्षकी पेशा सांभाळत साहित्याच्या क्षेत्रात अत्यंत चपखलपणे वावर असणारे निलेश कवडे यांचा गझलेमधला प्रवास हा एका महत्त्वाच्या वळणावर म्हणजेच दस्ती गझल संग्रहाच्या रूपात समोर आला.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून अनुदानास पात्र ठरलेला निलेश श्रीकृष्ण कवडे या आजच्या पिढीतील आघाडीच्या गझलकाराचा दस्ती हा गझल संग्रह मार्च २०२२ मध्ये प्रकाशित झाला. पायगुण प्रकाशन अमरावती यांनी प्रकाशित केलेल्या 'दस्ती' या मराठी गझल संग्रहाचे समर्पक असे मुखपृष्ठ आजच्या घडीतील आघाडीचे मुखपृष्ठकार चित्रकार कविवर्य विष्णू थोरे यांनी केलेले आहे. वर्तमानातील स्थित्यंतरे गुंडाळलेली दस्ती ही मराठी गझलेतले मानबिंदू असलेले ज्येष्ठ गझलकार आदरणीय शिवाजी जवरे सरांची प्रस्तावना समर्पक आणि वाचनीय आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ साहित्यिक युवा कादंबरीकार पुष्पराजदादा गावंडे यांनी अत्यंत कमी शब्दात कवीचा योग्य परिचय करून दिलेला आहे. तसेच मराठी गझलेचे अभ्यासक ज्येष्ठ गझलकार आदरणीय श्रीकृष्ण राऊत सर यांनी दिलेले मलपृष्ठावरील ब्लर्बही समर्पक आहे.
९६ पृष्ठसंख्या असलेल्या या गझल संग्रहामध्ये एकूण ८० गझलांचा समावेश आहे. निलेश कवडे यांचा त्यांच्या आई-वडिलांच्या चरणी समर्पित असलेला हा 'दस्ती' गझलसंग्रह मानवी भावभावनांची नात्यांची आजच्या परिस्थितीतील वर्तमानातील स्थित्यंतरांची मानवजातीपुढील आव्हानांची व येणाऱ्या काळातील बदलांची सुंदर गुंफण करतो. या दुनियेतील शाश्वत वेदनेपासून सुरुवात करणारा हा गझल संग्रह शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवतो.
"ताठ पाठीचा कणा ज्या माणसांचा
तीच येथे माणसे कलदार झाली"
हा निर्भीड विचार निलेश कवडे यांच्या गझलेमध्ये ठासून भरला आहे
"हेच होते ठोस कारण रक्तस्त्रावाला
गंध जातीचाच होता आडनावाला"
"यास कमजोरी म्हणू मी की म्हणू ताकद लोकशाही फक्त घाबरते जमावाला"
आजची परिस्थिती सांगणारे असे अनेक जिवंत शेर दस्ती या गझलसंग्रहामध्ये वाचायला मिळतात.
"शोधतो आहे निवाऱ्यासारखे काहीतरी
ईश्वरा दे ध्रुवताऱ्यासारखे काहीतरी"
"सांगतो झिजवून काया मर्म जगण्याचे खडू जिंदगी म्हणजे घसाऱ्यासारखे काहीतरी"
या धावपळीच्या जगात मानवी जीवनाचं खरं अस्तित्व सांगणारे असे शेर वाचकाला मनोमन चिंतन करायला भाग पाडतात.
तर दुसरीकडे
"हसू आज गाली गुलाबी गुलाबी
निशाणी मिळाली गुलाबी गुलाबी"
"मला ठार केले सखे लोचनांनी
नजर वार घाली गुलाबी गुलाबी"
या गझलसंग्रहामधील अशा काही गझल व शेर वाचकाला प्रेमाच्या दुनियेत घेऊन जातात.
" टोक द्वेषाचे कधी कोमल असू शकते वाहवा सुद्धा छुपी टिंगल असू शकते"
"येत नाही शोधता हे वन्यजीवांना
राहिले शिल्लक कुठे जंगल असू शकते"
ही गझल वाचकाला चिंतन करण्यास भाग पाडते तसेच या गझल संग्रहातील अशा अनेक शेरांमधून निलेश कवडे यांचे सूक्ष्म निरीक्षण त्यांच्या गझलेला व लिखाणाला अधिक नावीन्यपूर्ण व वास्तववादी बनवते.
"उमलण्याआधी कळीचा जीव गुदमरतो
आजही का द्रौपदीचा जीव गुदमरतो"
"कोरड्या पात्रामध्ये लिहले प्रवाहाने
शहर आले की नदीचा जीव गुदमरतो"
'दस्ती' या गझल संग्रहाचा शेवट या गझलेने झालेला आहे. आपल्या सूक्ष्म निरीक्षण शैलीतून अभ्यासपूर्ण असा आजच्या वर्तमान परिस्थितीचा आढावा निलेश कवडे यांची गझल घेते व त्यावर प्रखर विचार मांडते. या गझल संग्रहातील अनेक गझला बोलक्या आहेत ज्या वाचकाशी संवाद साधतात कदाचित यामुळेच हा गझलसंग्रह वाचताना वाचकाला ही गझल आपली वाटते आणि हे निलेश कवडे यांच्या गझलेचं वेगळेपण आहे असे जाणवते.
प्रत्येकाने जरूर वाचावा व संग्रही असावा असा हा 'दस्ती' गझल संग्रह आहे. निलेश कवडे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा!
दस्ती गझल संग्रह (महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून अनुदान प्राप्त)
गझलकार निलेश श्रीकृष्ण कवडे अकोला
पायगुण प्रकाशन अमरावती
मूल्य १५०/ रुपये
••••
श्री. अनिकेत जयंतराव देशमुख
अकोला