नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखन विभाग- काव्यसंग्रह समिक्षा
*वावरातल्या रेघोट्या...*
*स्वेदसागराच्या मंथनातून निपजलेल्या कलदार कविता*
वावरातल्या रेघोट्या हा कवी संदीप धावडे यांचा पहिलाच काव्यसंग्रह .कवीने पहिल्याच चेंडूवर षटकार हाणला आहे. अगदी संजय ओरके या गुणी कलावंताने काढलेल्या मुखपृष्ठापासुनच हे पुस्तक लक्षवेधी ठरते. आतील रेखाचित्रे सुद्धा बन्सी कोठेवारांनी आपल्या किर्तीला साजेल अशीच चितारली आहेत.
आपले मनोगत व्यक्त करतांना कवी म्हणतो, "मी कवी आहे, हा शोध मला अद्याप लागायचा आहे. तो न लागण्यातच माझी भलाई आहे. कारण मी येथल्या प्रत्येकासारखाच आणि प्रत्येकजण माझ्यासारखा"
आणि याच ओळी कवीची उंची कळण्यास पुरेशा आहेत.
आडतासाचा समास बाजुला सारत कवीने लिहिलेल्या ह्या हिरव्या कविता,वावर या पहिल्या कवितेपासुनच मंत्रमुग्ध करतात, वाचकाला विचार करण्यास बाध्य करतात.थेट मातीतून उगवलेले हे.शब्द.इतके अस्सल वाटतात, की संदीप धावडेंच्या दैहिक उंचीप्रमाणेच वैचारिक उंची सुद्धा उत्तुंग आहे, ह्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. काळ्या मातीत आयुष्यभर घाम गाळणाऱ्या कास्तकाराविषयी कविच्या मनात असलेली अपार श्रद्धा पहिल्या, वावर,या कवितेतच दिसून येते *आभार ढगाला द्यावे, की बाराही महीने कोसळणाऱ्या बापाला* असा संभ्रम कविला पडतो. आणि इथल्या सृजनाचे खरे श्रेय तो शेतात राबणाऱ्या आपल्या बापाला देतो *जीवे जीवष्य जीवनम* च्या निसर्गमंत्राचा उच्चार करत स्वैर विहरणारी ही कविता आहे. मात्र ती सैराट कधीच होत नाही. गाव बोलीतल्या शब्दांनी अलंकृत झालेली ही कविता वाचकांच्या मनावर अक्षरशः कोसळते. वावरातलं वास्तव ज्यानं अनुभवलं, त्याच्या कलेज्याला थेट हात घालते.शेती आणि शेतकऱ्यांकडे शासनाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, कायदे या कवितेत कवी अधोरेखित करतो. शासन, मग ते कोणाचेही असो, शेतकऱ्यांसोबत त्याने केलेले वायदे हे हमेशाच वांझोटे ठरलेले आहेत.
*सांगू नको मले पोचट योजनेचे फायदे रद्द कर आंदी शेतीशोषनाचे कायदे*
असा झणझणीत इशारा कवी सरकारला देतो.
पण कवी या शब्दांना ओढून ताणून आपल्या दावणीला बांधत नाही. किंवा प्रसिद्धी आणि मोठेपणाच्या हव्यासापोटी कवी हपापलेला नाही. कवितेच्या जन्माविषयी कवी म्हणतो,
मी धना जातो
कईक वक्ताले मी गाभण राह्यतो
तवा लेक मले जनल्याशिवाय नाही ज्येमत
त्याचंच नाव कविता....
किंवा
मला कवितेचा जेव्हा गर्भ राहतो
तेव्हा
मृदुकणांचे रवं गूदगुदतात,
वा-याला चंदनाचा गंध सुटतो.....
काही शब्द , काही प्रतिमा, प्रतिके नागरी प्रमाण भाषेला अनोळखी वाटू शकतात, प्रसंगी काहिसे तिव्र वाटू शकतात, पण आपल्या बोलीतील अस्सल गावठी शब्दांची पेरणी कवीने संपूर्ण वावरभर केली आहे. आणि तेच एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य खरेतर ह्या काव्यसंग्रहाचे आहे. म्हणूनच कवीला शंका येते, की तथाकथित समकालीन समिक्षकांना आपली कविता झेपेल की नाही?
कवी शेतकरी आहे. त्यांच्या कविता शेतीमातीला सोडून पुढे जात नाहीत.पण असे असले तरी अनेक विषयांना कवीची लेखणी लिलया तोलतांना दिसते. शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांना अभिवादन करतांना *पुजनीय खांदे वंदे वंदे वंदे* अशा शब्दांनी तो आपल्या गुरूजनांपुढे नतमस्तक होतो. तर कधी, आजकालच्या तरूण तरूणींचा प्रेमाच्या नावाखाली बोकाळलेला अंधाधुंद स्वैराचार, अल्पवयात अल्पमतीने निवडलेला चुकीचा जोडीदार, आणि त्यामुळे स्वतःला व मायबापाला भोगावा लागणारा मनस्ताप, या सर्वांची चिरफाड कवी विनोदी ढंगाने, चाल पिंके या कवितेत करतो. ही हलकीफुलकी वाटणारी कविता, सध्याच्या मोबाईल युगात अत्यंत महत्त्वाचा संदेश देऊन जाते, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
अस्सलतेच्या अचूक अभिव्यक्तीसाठी कवी अनेक ठिकाणी तथाकथित दृष्टीने अश्लील समजले जाणारे शब्द वारंवार वापरतो. आणि प्रिये या कवितेत,
*मी नग्नतेलाच खरा समाजवाद समजतो* असे म्हणून आपल्या लिखाणाचे समर्थन सुद्धा करतो.उलट अश्लीलता ही शब्दांमध्ये नसून, वाचकांच्या नजरेत असते असे म्हणून कवी, वाचकालाच
*पंचकर्म करून घे* असा सल्ला देतात.
भीमराव या कवितेत बाबासाहेबांप्रती कवीचा निस्सीम श्रद्धाभाव प्रकट झाला आहे. तर हे राम या कवितेत, गांधी आपल्याला समजलेच नाही, किंबहुना नेहरूंनी ते आपल्याला समजूच दिले नाही. असे निर्भिडपणे मांडायलाही कवी कचरत नाही.
कवीचे स्त्री विषयीचे विचार प्रगल्भ आहेत, तद्वतच नम्र आहेत. मातृशक्तीला त्याने केलेला प्रणिपात कवितेत ठायी ठायी आढळतो.
"खाली धरणी पण तीच
वद्रे निळाई पण तीच
भरती अन् ओहोटी लाटा पण तीच
सा-या ईश्वाची गोलाई पण तीच......"
कवी संदीप धावडे एक इमानदार कवी आहेत. जे जसं भावलं तसंच ते लिहितात. त्यांनी तथाकथित शालीनतेच्या शाली आड स्वतःला लपवले नाही. एक गावठी रांगडे स्वरूप धारण करूनच त्यांची कविता वाचकांना निडरपणे सामोरी जाते.मानवी
देहाच्या नैसर्गिक अपरिहार्यतेचे त्यांचे चिंतन कोणतेच बेगडी वेस्टन धारण करून येत नाही.
"प्रेम म्हणजे नुसतच ,
भेटनेच काय गं
पेटनेच काय गं
दोन देहाचे गुरफटनेच काय गं
तुझ्या नाजूक कंबरेला
विखारी
अजगरागत हिंसक हाताचा विळखा घालत
उभार वक्षाला छाती भिडवत
तोडावेत तुझे गुयचट ओठ......
श्लील-अश्लीलतेच्या बेगडी वल्गना हा कवी मंजूर करत नाही. पण मर्यादा सुद्धा सोडत नाही. आशयाला आवश्यक असणारी बोलीभाषा वापरतांना कवी आपल्या लिखाणाची उंची कधीच कमी होवू देत नाही.
आजकाल शेतकरी जाणिवांच्या कविता भरपूर लिहिल्या जात आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमुळे तो विषय सध्या ऐरणीवर आहे. पण बहुतेक अशा लिखाणातून शेतकऱ्यांची हतबलता आणि व्यवस्थेची अन्याय्य वागणूक दाखविली जाते. पण संदीप धावडे व्यवस्थेला आव्हान देतात.
"वाटते हाती घ्यावं रूमणं तिफणीचं
तुये झन्न शेकावे बहिरे कान लेका"
आणि सोबतच शेतकऱ्यांना सुद्धा हिम्मत देतात.
"काळ कठीण आहे
तर तू पण कठीण हो
जगात सोपं काय तेवढं सांग
साधा मृत्यू म्हणजे सुटका नाही
तू तुझा उभा हा जन्म लांघ."
गाव कवितेत कवी एक प्रातिनिधीक गाव उभे करतात. जे विदर्भातील कोणत्याही खेडेगावातल्या ग्रामीण जीवनाचा आर्त हुंकार या कवितेत प्रस्फुटित झाला आहे. बन्सी आणि मंजिरी ह्या प्रतिमांमुळे तर कवितेला चार चांद लागले आहेत.
बाप ही आणखी अशीच एक नितांत सुंदर कविता.कवी आपल्या बापाला महारथी कर्णाच्या शौर्याची उपमा देतो. शेतीमातीत आमरण राबणाऱ्या बापाबद्दल इतके आदरयुक्त गौरवोद्गार बोलीभाषेत कसे उमटतात बघा-
*त्याची अख्खी जवानी मले दान बाप मायासाठी सोन्याची खाण*
*मले साक्षात सौर उर्जा डाबरीतलं,माथ्यावरलं तासातलं, आडतासातलं बिहाळ्यातलं,झगडीतलं उभ्भच्या उभ्भ धिंगा मस्तीखोर पीक
मायाच नावानं*.....
अशा अनेक एकसेबढकर एक कविता या संग्रहात आहेत. आई ही सुद्धा एक ताकतवान कविता आहे
आई वर तर जवळजवळ सर्वच जण लिहितात. पण धावडेंची आई बघा-
"*आई कधी कधी तू मला बाबाचा नवरा वाटायची बाबाला तुझ्याभोवती
भोवरा होतांना मी पाहिलय*....
या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रिये या शिर्षकाच्या तब्बल तीन कविता आहेत. तीनही कवितांत कवीने आपले प्रगल्भ चिंतन प्रियेला उद्देशून मांडले आहे. अर्थात, तीनही कवीतांचे आशय भिन्न भिन्न आहेत. माय या शिर्षकाच्या सुद्धा दोन कविता आहेत. त्याशिवाय एक आई ही पण कविता आहे. संदीप्या ही कविता कवीने स्वतःलाच उद्देशून केलेले एक अप्रतिम चिंतन आहे. माणसाने मर्दासारखे जगावे आणि नेहमी सकारात्मक असावे हा मोलाचा संदेश, आजच्या बिखरलेल्या हतबल तरूणाईला नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
*राज्या कायीतं कवतिक कर सोताचं उतरून टाक भूत पराभवाच्या प्रेताचं* यापेक्षा अधिक प्रेरक शब्द कोणते असू शकतील?
वैशाख, शेला, उजेड, धग,मीठ, मला माणूस व्हायचं,कलदार,स्वातंत्र्या,आई जिजाऊ, दिवाळी, बैमान लेका, वासना इत्यादी आणि एकंदरीत या संग्रहातल्या सर्वच कविता लक्षणीय आहेत. वाचनीय आहेत. कमजोर म्हणता येईल अशी एकही नाही. हे शब्द म्हणजे संदीप धावडेंच्या काळजातले धुमसते निखारे आहेत. गावगाड्यात राहूनच गावगाडा अनुभवता येतो. जीवनाचे सारे रंग आजही गावात जीवंत आहेत. परिस्थिती बदलली असेल, व्यवस्था बदलली असेल, पण माणूस अजूनही तोच आहे. त्याचे शरीर, त्याचे मन तेच आहेत. त्याच्या गरजा ,त्याची भूक भलेही वाढली असेल पण ती भागवण्यासाठी तो जी धडपड करतो, ती धडपड सनातन आहे. वावरातील रेघोट्या हा संग्रह असाच विचार घेऊन आपल्याला सामोरा येतो. हा विचार चिरंतन आहे. चिरंजीव आहे.
कवी संदीप धावडेंचे अभिनंदन
आणि त्यांच्या भावी कलाकृतीस शुभेच्छा!
प्रदीप बा.देशमुख
महेश नगर, तुकूम, चंद्रपूर
संवाद- ९४२१८१४६२७
काव्यसंग्रह- वावरातल्या रेघोट्या
कवी - संदीप शामराव धावडे
'वावर', पालोती रोड, अल्फोंन्सा शाळेसमोर,
काशी नगर, सावंगी मेघे, वर्धा४४२१०७
संवाद -८६०५१४८९३०
प्रकाशक - जनशक्ती वाचक चळवळ
समर्थ नगर, औरंगाबाद
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने