करोना माहात्म्य ||४||
कोरोनाचा पहिला बळी
या बातमीत "पहिला" हा शब्द आल्याने बातमी उत्साहवर्धक समजावी लागेल. खूप स्कोप आहे म्हणायचा प्रेत मोजण्याला. एक... दोन... तीन... चार.... ग्यारा SSSSS बारा. कथानक पुढे आणखी लांबले तर मग दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी, पाच अंकी..... प्रेतांची संख्या मोजताना दमछाक व्हायची.
कृपया हे लक्षात घ्यायचा प्रयत्न करावा की जर तुम्हाला स्वतः प्रेत व्हायचे नसेल किंवा इतरांचे प्रेत मोजण्याची फारशी हौस नसेल तर ३ मे २०२० पर्यंत कडाक्याने लॉकडाऊन पाळण्याचा अवश्य प्रयत्न करावा. दुसरा अन्य मार्ग उपलब्ध नाही. पुढील १५ दिवस जर हालअपेष्टा सहन करून कळ काढली तर कोरोना संक्रमणाचे विषाणू चक्र बऱ्यापैकी खंडित होण्याची पुरेपूर शक्यता आहे. तसे झाले तरच पुढील काही महिन्यात करोनावर मात करणे शक्य होईल.
भाजीपाला खायला-विकायला, आपापल्या घरी परतायला, घराबाहेर पडायला, लोकांशी गोडीगुलाबीने वागून आपापली लोकप्रियता वाढवून घ्यायला, आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन नाचायला.... वगैरे वगैरे करायला मे २०२० पासून पुढील पूर्ण आयुष्य शिल्लक आहे. कृपया हे समजून घ्यायचा प्रयत्न करावा.
पावसाळा तोंडावर आलाय. यंदा भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात विदर्भात मोठ्या प्रमाणावर विषाणूजन्य आजाराची सुरवात होते. सर्दी, पडसा, खोकला मोठ्या प्रमाणावर वाढतो. ग्रामीण भागात कोणता रुग्ण सर्दी-पडसा-खोकल्याचा आणि कोणता रुग्ण करोना संक्रमणाचा हे ओळखणे सुद्धा पावसाळ्यात अवघड होईल. त्यातल्या त्यात ग्रामीण भागाचा शहराशी संपर्क तुटेल. रस्ते खराब होतील.. प्रशासन दूरवरच्या सखोल ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे अवघड नव्हे तर अशक्य होऊन जाईल. आपण आणि सरकार काही करू शकू असा केवळ आता एप्रिल महिना उरला आहे. कोरोनाची देशांतर्गत स्थिती कशीही असो.... रुग्ण कितीही वाढोत... जरी करोनाने तिसरी स्टेप गाठली तरीही मे २०२० च्या पहिल्या आठवड्यापासून किंवा दुसऱ्या आठवड्यापासून संचारबंदी व लॉकडाऊन तुरळक अपवाद सोडून उठवावेच लागेल... त्याला अन्य दुसरा कोणताही पर्याय नसेल. लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी जनतेतूनच होत असल्याने सरकार हात झटकून मोकळे व्हायला मोकळे झालेले असेल.
एव्हाना एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट झाली आहे की, करोना आता रिकाम्या हाताने परत जायचा नाही. मात्र समाधानाची बाब एकच आहे की, करोनाला प्राणहानी किंवा वित्तहानी या दोन पैकी एक काहीही दिलं तरी त्याला चालतं. प्राण गमवायचे कि वित्त गमवायचे याचा निर्णय सुद्धा त्याने मानवजातीवर सोपवला आहे. स्वार्थ हा माणसाचा उपजत गुण असल्याने धन-द्रव्याचे नुकसान माणसाला सहन होत नाही. मोह-माया माणसाला कधीही टाळता आली नाही पण आजच्या स्थितीत करोनाने सर्व मानवजातीला एका रांगेत उभे करून ठोस निर्णय घेण्यास बाध्य केलेले आहे. आता यातून मानवजातीची सुटका नाही. मोहमाया - द्रव्य - संपत्ती यातून मनुष्य बाहेर पडला नाही आणि आर्थिक नुकसान सोसायचे नाही म्हणून घराबाहेर पडत राहिला तर करोना त्याला कडेवर घेणार आणि खांद्या-डोक्यावर खेळवणार हेही स्पष्ट झाले आहे. आता ठोस निर्णय मानवजातीला घ्यायचा आहे. तिसरा पर्याय उपलब्ध नसल्याने केवळ दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायचा आहे. एक तर प्राणहानी स्वीकारा किंवा आर्थिक नुकसान स्वीकारा.
आज भारतात करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असला तरी आपण अजून तिसरा टप्पा गाठलेला नाही, ही भारताची सर्वात मोठी उपलब्धता आहे आणि त्याचे मुख्य कारण तातडीने संचारबंदी व लॉकडाऊन यासारख्या कठोर निर्णयांची अंमलबजावणी केल्या गेली हेच आहे. जर भारताने कच खाऊन असे कठोर निर्णय तातडीने घेतले नसते तर आज भारतात करोना रुग्णांची संख्या लाखो नव्हे तर कदाचित करोडोमध्ये पोचली असती, अशी शक्यता नाकारता येत नाही. अजूनही दररोज नवनवीन रुग्ण सापडत आहेत कारण शंभर टक्के जनतेने 100% लॉकडाऊनचे नियम पाळले नाहीत. बर्यापैकी संचार, दळणवळण आणि आपसी गाठीभेटी सुरूच राहिल्या. त्यामुळे स्थिती शतप्रतिशत नियंत्रणात येऊ शकली नाही हे समजून घ्यावे लागेल.
फेब्रुवारी महिन्यामध्ये एका प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती. त्यात लिहिले होते की, चीनमध्ये वुहान शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी तेथील सरकार कठोरपणे, निष्ठूरपणे आणि निर्दयीपणे करत आहे. लष्कराने लोकांच्या घराला बाहेरून कुलूप लावून त्यांना घरात कोंडले आहे. घरातील पाणीपुरवठा व वीज कनेक्शन खंडित केले आहे. वुहान शहरात करोना संक्रमण झाल्यामुळे या शहरातील जितके नागरिक मरतील तितके मेले तरी चालेल; पण उर्वरित चीनमधील नागरिक सुरक्षित ठेवण्यासाठी चीन सरकार असे क्रूर आणि कठोर पाऊल उचलत आहे, असे या बातमीत म्हटले होते. बातमीच्या सत्य-असत्येविषयी मी बोलू शकत नाही पण ज्याअर्थी ही बातमी एका प्रतिष्ठित दैनिकात उमटली होती; त्याअर्थी त्या बातमीत काहीतरी काहीतरी तथ्यांश असणारच असे गृहीत धरता येते.
तुलनेने भारतातील केंद्र शासन व सर्व राज्य शासन मात्र मानवतेची पाठराखण करूनच निर्णय घेत आहे, याची नागरिकांनी जाणीव ठेवून सरकारला यथोचित सहकार्य केले पाहिजे. पण सहसा असे घडत नाही. मोठ्या प्रमाणावर भारतीय मनुष्य अनुवंशिक राजकारणी असल्याने त्याला पावलोपावली राजकारणात दिसते आणि त्याची प्रत्येक कृती राजकारणाला अनुसरूनच असते. त्याच्या नावडीच्या पक्षाने घेतलेले सर्व निर्णय हे त्याच्या दृष्टीने बेताल आणि मूर्खपणाचे असतात तर त्याच्या आवडीच्या राजकीय पक्षाने घेतलेले सर्व निर्णय त्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व दूरगामी दूरदृष्टीने घेतलेले असतात. ज्या देशातील जनतेचे हातपाय राजकारणात गुरफटलेले असेल आणि त्याच्या नाका-तोंडात राजकारणाची घाण ठासून शिरलेली असेल, अशा देशात सरकारला बिकट राष्ट्रीय संकटात व युद्धजन्य स्थितीमध्ये निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी लोकांकरवी करून घेणे अत्यंत अवघड असते.
निसर्ग क्रूर असतो याची प्रचिती आपल्याला अधून-मधून येत असते पण सरकारसुद्धा गरजेनुसार किती क्रूर होऊ शकते याची आपल्याला कल्पना नसते. जनतेचे पुरेपूर सहकार्य मिळाले नाही आणि राष्ट्रीय संकटाची हाताळणी करणे जसजसे अवघड होत जाते; तसतसे सरकार (मग ते कोणत्याही पक्षाचे असो) क्रूर होत जाते. असे प्रसंग वारंवार येत नसल्याने नवीन पिढीला अशा संकटाची पुसटशी देखील कल्पना नसते. माणसाने विषाची परीक्षा घेऊ नये असे म्हणतात, तसेच नागरिकांनी सुद्धा आपत्कालीन स्थितीत व युद्धजन्य परिस्थितीत सरकारला सहकार्य न करता सरकारचा अंत पाहण्याची धाडसी परीक्षा घेऊ नये. असे धाडस केल्यास त्यात सरकारचा घात होण्याऐवजी जनतेचाच घात होण्याची पुरेपूर शक्यता असते.
- गंगाधर मुटे आर्वीकर
दि. १५/०४/२०२०
(क्रमशः)
=============
टीप : हा लेख आपण माझ्या नावासकट किंवा माझ्या नावाशिवाय किंवा तुमचे नाव घालून कुठेही शेअर किंवा कॉपी करून पेस्ट करू शकता.
=============