Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***लक्ष्मीपूजन की कर्जलक्ष्मीपुजन? धनलक्ष्मीपूजन की ऋणलक्ष्मीपूजन?

लेखनविभाग: 
ललितलेख
लेखनाचा विषय: 
शेतकऱ्याचा राजा बळीराजा
लक्ष्मीपूजन कि कर्जलक्ष्मीपुजन?
धनलक्ष्मीपूजन की ऋणलक्ष्मीपूजन?

 

       आपल्या हाती असलेला पैसा आपला केव्हा असतो? जेव्हा सर्व देणे देऊन झाले, सर्व कर्ज चुकता करून झाले, दुकानांची सर्व उधारी फेडून झाली.... म्हणजे सर्व तऱ्हेचे देणे देऊन झाल्यानंतर जो उरतो... तो पैसा आपला असतो. तो पैसा आपल्या मालकीचा असतो.
 
        ज्याचे निव्वळ शेतीवर पोट आहे आणि व्यवसाय केवळ शेतीच आहे, दुसरा अन्य कोणताच व्यवसाय नाही (म्हणजे रात्री चोरी व दिवसा उचलेगिरी करण्याचीही ज्याला सवय नाही) .... अशा ओरिजिनल शेतकऱ्याचा विचार केला तर माझा दावा आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ९५ टक्के शेतकऱ्याकडे स्वतःची लक्ष्मी नसतेच आणि ते कर्जाच्या लक्ष्मीची पूजा करत असतात.

       व्यापारी खातेवहीची पूजा करतात कारण खातेवहीच्या पानावर देणे आणि घेणे लिहिले असते. त्या देण्या-घेण्याची गोळाबेरीज केली तर त्या खातेवहीत शिलकी रक्कम असते आणि ती शिलकी रक्कम त्याच्या स्वतःच्या मालकीची असते. त्यांचे लक्ष्मीपूजन शुभ-लाभदायक असू शकते.
 
        भिकाऱ्याकडे फारसे काहीच नसते, केवळ एक ताटली व झोळी असते पण ती सुद्धा त्याच्या मालकीची असते. त्याच्या अंगावरील कपडे आणि झोपायचा गोणपाट देखील त्याच्याच मालकीचा असतो. तो भिकारी असतो. गरीब असतो, हीनदीन, कफल्लक असतो पण तरीही त्याच्याकडे असलेल्या साधनसामुग्रीचा तो स्वामी असतो.
 
       शेतकऱ्याचे मुद्देमालासह शेत आणि भांडीकुंडीसहित घर बँकेला किंवा सावकाराला गहाण असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीचे काय असते? जो पैसा आपला नाही, दुसऱ्याचा कुणाचा तरी आहे.... त्या पैशाची पूजा करणे म्हणजे लक्ष्मीपूजन करणे नसून कर्जपुजन, कर्जलक्ष्मीपूजन करण्यासारखे आहे. पूजन धनलक्ष्मीचे करायचे असते की ऋणलक्ष्मीचे पूजन करायचे असते, इतका तरी विचार शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे?
 
       लक्ष्मीची पूजा केली तर लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरी येते.... हे जर खरे असेल तर कर्जलक्ष्मीची/ऋणलक्ष्मीची पूजा केली तर कर्जलक्ष्मी प्रसन्न होऊन पुन्हा शेतकऱ्याच्या घरी कर्जच येईल ना? शेतीवर कर्ज आणि शेतीतला कर्जबाजारीपणा हा काही फार नवीन किंवा अलीकडच्या काळातील प्रकार नाही. जुन्या साहित्यात सुद्धा शेतीवरील कर्जाचे, सावकारी देणीचे उल्लेख आढळतात. कधीकाळी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी अशी समाजरचना अस्तित्वात असताना शेतीवर कर्जबाजारीपणा आलाच कसा, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
 
         शेतकऱ्याला बळीराजा का म्हटले जाते किंवा बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा का ठरतो, याविषयी फारसे काही चिकित्सक लेखन उपलब्ध नाही. बळीराजा हा रयतेचा राजा होता. त्याच्या राज्यात जनता अत्यंत सुखी होती. बळीच्या राज्यात उत्तम आणि कौशल्यप्रवीण शेतीमुळे पिकलेल्या धान्याने धान्याची कोठारे भरली होती. बळीराजा हा शेतकऱ्यांवरती कुठे अन्याय अत्याचार घडत असतील तर लगेच तो त्यास कठोर शासन करीत असे. बळीराजाच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व संपन्न होता, असे मानले जाते. आजही ग्रामिण भागातील विशेषतः शेतकरी महिला आपल्या भावांना ओवाळताना “इडा पिडा टळो आणि बळिचं राज्य येवो!” अशी सदिच्छा व्य़क्त करीत असतात. 
 
          म. ज्योतिबा फुल्यांनी बळीराजाला शेतकऱ्याला कुलस्वामी मानले. बळीराजा हाच शेतकऱ्यांचा पूर्वज असल्याचे आजही एका उदाहरणावरून तरी अधिक स्पष्ट होत जाते. शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते कारण तो दानशूर होता. शेतकऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थापुरताच विचार केला किंवा केवळ स्वतःचा व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी आणि आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी अनैतिक मार्गाने प्रयत्न केला, याची नोंद कोणत्याच युगाच्या इतिहासात शोधूनही सापडत नाही. शेतकऱ्यांनी बिगरशेतकऱ्यांना लुटले किंवा शोषण केले असा तर कुठल्याच युगात पुरावा उपलब्ध असल्याचे आढळत नाही.
         शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात कारण बळीराजाच्या दानशूरपणाचा गूण शेतकऱ्याच्या रक्तामासांत पुरेपूर भिनलेला आहे. आजही शेतकरी समाजाएवढे दानशूर दुसरे कोणीच नाही. अन्नदानाच्या बाबतीत आजही शेतकरी समाज सर्वात पुढे आहे. गणेश स्थापना, महालक्ष्मी स्थापना, माऊंदे, बारसे, लग्नकार्य, व्रतांचे उद्यापन या निमित्ताने शेतकऱ्याच्या अंगणात जेवढ्या पंगती बसतात, तेवढे अन्नदान अन्य कोणत्याच समाजात, टाटा, बिर्ला, अंबानीच्या अंगणात किंवा व्यापारी, उद्योजक, नोकरदार यांच्या अंगणात होत नाही, ही वास्तविकता आहे. वर्षभर घरात चटणी-भाकर खायची पण अन्नदान करताना इतरांना वरण-भात-भाजी-पोळी खाऊ घालायची हा शेतकरी समाजाचा धर्मच बनला आहे. ही वृत्ती चांगली की वाईट, हा स्वतंत्र वादाचा विषय असू शकेल पण शेतकरी माणसापेक्षा पन्नास पटीने अधिक मिळकत मिळविणारी बिगर शेतकरी मंडळी आपली संपूर्ण मिळकत स्वतःच्या स्वतःपुरत्या मर्यादित प्रपंचातच खर्च करीत असतात. 
 
               शेतकऱ्यांमधील दानशूरपणाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. शेतकऱ्याच्या घरी येणारा पाहुणा कधीच उपाशी जात नाही. चहा-सुपारीवर पाहुण्याची बोळवण करणे अजूनही शेतकऱ्याला जमलेच नाही. अर्धा लाख मासिक मिळकत मिळवूनही भिकाऱ्याच्या ताटात चार आणे टाकण्यासाठी का-कू करणे किंवा त्याऐवजी भिकाऱ्याला दुनियाभराची अक्कल सांगत सुटणाऱ्या विज्ञानवादी, पुरोगामी, सनातनी, बुद्धिवादी लोकांच्या या देशात आजही शेतकऱ्याच्या दारात भिक्षेकरी गेला तर त्याच्या झोळीत अगदीच सहजपणे शेर-दोन शेर धान्य पडतच असते. स्वेच्छेने लोकवर्गणी देऊन गावात एखादा सार्वजनिक उत्सव साजरा करणे त्याच्या अंगवळणीच पडले आहे.
 
             विनोबांच्या भूदान यज्ञात शेतजमीन दान करण्याची हिंमत शेतकऱ्यांनी दाखविली आहे. जनावरे (मुख्यत: गाय) दान करण्याची फार जुनी परंपरा आहे. काही काळापूर्वी झाडे सुद्धा दान दिली जात. आजही महसूल खात्याच्या नोंदी तपासल्या तर शेतीची मालकी एकाची आणि त्याच शेतातील झाडाची कायदेशीर मालकी दुसऱ्याची, असे प्रकार आढळतात.
 
          शहरातील मनुष्य जर खेड्यात शेतकऱ्याकडे आला तर येताना सोबत रिकामी पिशवी घेऊन येतो. शेतकरीही अगदी आनंदाने चिंच, बोर, आंबे, संत्री, केळी, वांगी, मिरची, टमाटर, कोबी यापैकी त्याच्याकडे जे उपलब्ध असेल त्या वस्तूंनी ती रिकामी पिशवी भरून देतो. त्याचा तो कधीच मोबदला घेत नाही कारण रिकामी पिशवी घेऊन येणारा कधी मोबदला देतच नाही. मला अगदी बालपणापासून पडलेला प्रश्न असा की हे वनवे ट्रॅफिक का? शहरी माणसाला शेतकऱ्याकडून ताजा भाजीपाला, फुले-फळे प्रेमाच्या नात्याखातर विनामूल्य घेऊन जावे असे वाटत असेल तर त्यात गैर काहीच नाही; पण येताना तो पिशवी रिकामीच का घेऊन येतो? शहरामध्ये असे अनेक पदार्थ असतात की जे शेतकऱ्यांनी कधीच पाहिलेले किंवा खाल्लेले नसतात. बालूशाही, बर्फी, चमचम, रसगुल्ला, फरसाण वगैरे तर लहानसहान शहरातही उपलब्ध असतात. मग शहराकडून खेड्याकडे येणारी पिशवी हमखास रिकामीच का असते? ज्याला इकडून काहीतरी घेऊन जायची सुबुद्धी असते त्याला तिकडूनही काहीतरी घेऊन येण्याची देव सद्‍बुद्धी का देत नाही? शेतकऱ्यांनी हे पदार्थ खाणे त्यांच्या प्रकृतीला हानिकारक असते काय? की शेतकऱ्याला हे पदार्थ पचतच नाही, खाल्ले तर शेतकऱ्याला अंदाधुंद ओकाऱ्या होतील असे शहरी माणसाला वाटते का?  बरे या एकतर्फी प्रेमाचे समीकरण शेतकऱ्याच्या लक्षात येत नसेल काय? बहुतेक नाहीच कारण पाहुण्याची पिशवी भरून देताना त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान उमटते ते काही औरच असते. त्याची नैसर्गिक दातृत्ववृती अधोरेखित करणारे असते.
 
        शेतकऱ्याला बळीराजा मानले जाते आणि बळीराजाला शेतकऱ्याचा राजा मानले जाते. बळीराजा दानशूर होता. तोच अनुवंशिक गूण शेतकऱ्यांमध्ये आढळतो. हा एकच दातृत्वाचा जनुक शेतकरी बळीराजाचा वंशज ठरायला पुरेसा ठरायला हरकत नाही. डीएनए चाचणीच्या इवल्याशा चाचणीचा पुरावा जर कायदेशीर मान्य होतो तर शेतकऱ्यांच्या दातृत्वाचा हा व्यापक व ढळढळीत पुरावा मान्य करायला कुणालाच कशाचीही अडचण येऊ नये. युगोनयुगे, पिढ्या न पिढ्या उलटून गेल्यानंतरही अजूनही शेतकऱ्याचा दातृत्वाचा गुण काही केल्या संपत नाही. आणि याच दातृत्वाच्या गुणाचा गैरफायदा घेऊन जसे तत्कालीन वामनाने बळीराजाला पाताळात घडले तसेच शेतकऱ्याच्या आजच्या दातृत्वगुणाचा गैरफायदा घेऊन आधुनिक वामन शेतकऱ्यांना पाताळात गाडत आहेत, यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

- गंगाधर मुटे

Image: 
Shetkaryancha raja baliraja
Share

प्रतिक्रिया