अध्यक्षीय भाषण : ८ वे अ.भा.म.शे.सा.सं, रावेरी
ज्यांनी विचार करायला शिकवलं, शेतकऱ्याची घरलक्ष्मी असल्याचा आनंद ज्यांच्यामुळे कळला, त्या आदरणीय युगात्मा शरद जोशी यांच्या, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनात असलेल्या स्मृतींना अभिवादन. मंचावरच्या आदरणीयांना प्रणाम आणि सगळ्या सारस्वतांना माझा नमस्कार.
हे साहित्य संमेलन आगळंवेगळं आहे. वाल्मीकीच्या रामायणाचं लोक साहित्यातलं प्रतिबिंब इथे अक्षरशः मूर्त रूप घेऊन उभं आहे. युगात्मा शरद जोशींनी मूर्ती नव्याने घडवल्या, मंदिराचा जीर्णोद्धार केला. रावेरीचं परित्यक्ता सीतामंदीर, स्वयंसिद्धा सीतामंदिर झालं. जुने संदर्भ नव्याने मांडून त्यांच महत्त्व इथे अधोरेखित झालं. त्या वेळी शेतकरी संघटना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यासाठी जिवाचं रान केलं. महिला आघाडीसाठी हे अतिशय आदराचं आणि आनंदाच ठिकाण आहे. म्हणून अध्यक्ष पदावर महिला आहे.
साहित्यिक म्हणजे शब्दप्रभू! साहित्यात समाजाचं प्रतिबिंब असतं. समाज म्हणजे आपण सगळे. आपल्या जगण्याचे प्रतिबिंब म्हणजे साहित्य. काय असतं आपलं जगणं? आपल्याला अन्न,वस्त्र, निवारा हवं असतं, ते मिळावं - रोज मिळावं आणि आज आहे त्यापेक्षा दिवसेंदिवस चांगलं मिळत राहावं, यासाठी आपण संपत्ती गोळा करतो. नुसती संपत्ती असून चालत नाही, आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं अशी आपली इच्छा असते. म्हणजे आपल्याला सन्मान हवा असतो. संपत्ती आणि सन्मान सतत मिळत राहण्याकरिता आपल्याला सत्ता आवश्यक वाटते. संपत्ती, सन्मान आणि सत्ता या तीन गोष्टींच्या असण्यात आणि नसण्यात कथा कवितांची बीज असतात जे साहित्यिक या तीन गोष्टी शिवाय अप्रतिम शब्दलेणी घडवतात ते संत असतात. संत साहित्याचा विषय - ”शाश्वत समाधान”. सगळे संत शाश्वत समाधानात शांत असतात. आपण संपत्ती, सन्मान आणि सत्ता यांच्या वर्तुळात फिरत असतो आणि या तिन्हींची वर्तुळं मोठी मोठी होत जावीत अशी आपली धडपड असते.
साहित्याचा आणखी एक “विषय” स्त्री-पुरुष संबंध. हजारो हजार वर्षापूर्वी, स्त्रीपुरुष संबंध अनिर्बंध होते. माणसाने अनुभवाने, आरोग्याच्या निकषांवर त्याचे नियम ठरवले. त्या-त्या प्रदेशातील ऋतुमान आणि माणसाची जीवन पद्धती लक्षात घेऊन, स्त्री-पुरुषांचं वैयक्तिक आरोग्य, संततीच आरोग्य, परिणामत: समाजाच शारीरिक मानसिक आरोग्य लक्षात घेऊन सगळ्या जगभर या संबंधांचे नियम ठरवल्या गेले. माणसाच्या बौद्धिक उत्क्रांतीच्या दरम्यान त्याला नैतिकतेचा आयाम मिळाला म्हणून अनेक देशात, अनेक समाजात या नियमांमध्ये खूप फरक दिसतो: पण जगाच्या पाठीवर सगळ्या देशात, सगळ्या समाजात हे नियम आहेत. नियम पाळणे किंवा तोडणे हा ज्याचा त्याचा विचार आहे. म्हणजे संपत्ती, सन्मान, सत्ता आणि संबंध याचं वर्णन म्हणजे साहित्य! या विषयांवर लेखक - कवी - लिहितो, कारण त्याच्याजवळ अनुभव असतो. अनुभव हे बीज आहे. विचारांमुळे त्या अनुभवाला शब्दाचे अंकूर फुटतात. अर्थवाही वाक्यांचे धुमारे फुटतात.
साहित्याच्या विषयावरून, साहित्य निर्मितीच्या काळावरून, साहित्यिकाच्या जातीवरून आणि आता साहित्यिकाच्या राजकीय भूमिकेवरूनही साहित्याची विभागणी होते. साहित्याचा दर्जा मात्र विधायक परिणामांवरून ठरतो. क्लिष्ट, अलंकारांनी जड झालेली भाषा वाचताना शीण येतो. भाषा साधी सोपी असेल तर मन लावून वाचलं जातं. भाषा उगीचच उग्र असेल तर मनस्ताप होतो. भाषा शिवराळ असेल तर उथळपणाचा खळखळाट वाटून पुस्तक न वाचता मिटल्या जातं.
शेती आणि शेतकरी या विषयांवर हजारो कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. “शेती” व्यवस्थेने किती तरी विषय दिले साहित्यिकांना. काळी आई, भेगाळलेली जमीन, डोळ्यातला पाऊस, उशिरा येणाऱ्या पावसाचा कौतुक, पेरणी, ढवळ्या-पवळ्या, सर्जा-राजा, कारभारणीची हिरवी स्वप्नं, विहीर, मोटेवरची गाणी, हिरवा शालू, मोत्यांची कणसं, पांढरं सोनं - हे कौतुक वाटण्याचे विषय! तर ओला, कोरडा दुष्काळ, पीक करपणं किंवा पूर-पीक वाहून जाणं, गारपीट, शेतमाल मातीत मिसळणं, भाव न मिळणं, कांदे-टमाटे फेकून देणं, उलटी पट्टी, मुलांना बायकोला चप्पल कपडे आणता न येणं, मुला-मुलींना चांगलं शिक्षण देता न येणं, त्यांची शहराकडे धाव, तिथे निर्वासितांचं अधांतरी जगणं, शहरी राहणीची भूल पडणं, वाईट संगत, व्यसन लागणं, आयुष्याचं पोतेरं होणं आणि...... आत्महत्या हा आणखी एक विषय. आजकाल शेतीपेक्षाही जास्त महत्त्वाचा. शेतकऱ्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग.... राजकारण! ग्रामपंचायत ते लोकसभा व्हाया जिल्हा परिषद.. मग ग्रामीण नेतृत्व, सरपंच, पाटील, आमदार - खासदारांच्या संस्था आणि संस्थानांमधली बेधुंदशाही. त्या कुरणात चरणारी धूर्त नोकरशाही, नोकरीसाठी लाचार होणारी शेतकऱ्यांची मुलं-मुली.... हे वैफल्य यावं असे विषय. किती किती तरी विषय दिलेत “शेती”ने साहित्यिकांना! कविता करा, कथा लिहा, नाटक-कादंबऱ्या लिहा, सिनेमे काढा.... विषयच विषय! या सगळ्या विषयांवरच्या साहित्यकृती अतिशय उत्तम असतात. दर्जेदार असतात; पण या साहित्यकृतीमुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्थिती सुधारली नाही. ही परिस्थिती बदलायला साहित्यिकांनी मदत करावी, एवढीच “रास्त” अपेक्षा आम्ही शेतकरी करत आहोत. साहित्यिकांनी छातीवर बिल्ला लावून आंदोलनात उतरावे अशी अपेक्षा नाही. पण लेखणीची धार आणि शब्दाचं वजन वापरून, आपला बुद्धिजीवीपणा पणाला लावून समाजाला वस्तुस्थितीचे भान साहित्यिक करून देऊ शकतात ना? शेतीने पुरवलेल्या विषयांवर फक्त मनोरंजनासाठी न लिहिता “वास्तव आणि त्याचे भयानक परिणाम” जे बिगर शेतकरी, शहरी सुशिक्षितांना सुद्धा भोगावे लागतील - ते साहित्यिकांनी सांगितले पाहिजेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
माननीय जयंत नारळीकरांनी “विज्ञानकथा” ही एक नवीन संकल्पना कथा विश्वात रुजवली. आता साहित्यिकांनी सत्यघटनांवर आधारित “कृषी - विज्ञानकथा” लिहाव्या अशी अपेक्षा आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पन्न कसं वाढतं, बीटी आणि एचटीबीटी बियाणं, जनुकीय सुधारणा केलेलं बियाणं वापरून - शेतकरी कर्जाच्या विळख्यातून कसा मोकळा होतो. शेतकरी आणि त्याच्या घरलक्ष्मीचे कष्ट, पैसा आणि वेळ कसे वाचू शकतात..... या “सत्यकथा” साहित्यिकांनी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
आज शेतीव्यवसायच तोट्याचा. शेतीत कष्टणारे मायबाप नोकरी देणारं शिक्षण देऊ शकले नाहीत म्हणून मुलं-मुली मायबापांना मानत नाहीत, जुमानत नाहीत. शेती करणाऱ्या मुलांची लग्न होत नाही. शेतकऱ्याशी लग्न ठरलं तर मुली जीव देतात. शिक्षणासाठी शहरात आलेली काही मुलं-मुली वाईट संगतीला लागून आयुष्याची लक्तरं करून घेतात. कुटुंबाच्या स्थैर्याला तडे जातात. कुटुंब ही मानवी उत्क्रांतीची सर्वोत्तम व्यवस्था आहे. ग्रामीण भागात अजूनही कुटुंब व्यवस्था भक्कम आहे. शेतकरीन गरीब असेल पण नात्यांची श्रीमंती तिने जपली आहे. कुटुंब तुटल्याचे परिणाम “शहरी - सुखवस्तू - पुरोगामी” समाजात दिसत आहेत. नाती जोडून ठेवण्याची, दुसऱ्याला समजून घेण्याची या लोकांची “कुवत” दिवसेंदिवस कमी होत आहे. युगात्मा शरद जोशींनी “शेतकरी कुटुंब” हेच सुखाचं एकक मानलं. आम्हा शेतकरी बहिणींना त्यांनी चांदवडची शिदोरी दिली. त्यातल्या एका - एका वाक्यात कथा - कवितेचे बीजं आहेत. फक्त सकारात्मक दृष्टिकोन हवा. युगात्मा शरद जोशींनी स्वयंसिद्धा सीतामंदिर बांधलं. समोर एक सभागृह बांधलं. “परित्यक्ता प्रशिक्षण केंद्र” असं त्याचं बटबटीत पुरोगामी नाव ठेवता आलं असतं पण त्याचं नाव ठेवलंय “माहेर” कारण नात्याचा सन्मान सर्वोच्च. वाल्मीकी आणि जनक जसे सीतेच्या पाठीशी “बाप” होऊन उभे राहिले तश्या बापांची समाजाला गरज आहे. समाजात परित्यक्ता असूच नये, पण चुकून कोणी दुर्दैवी असेल.... असा “बाप” तिच्या पाठीशी उभा राहिला तर परित्यक्ता - “स्वयंसिद्धा” होते. हा त्या “बाप माणसाचा” मोठा विचार! हा विचार घेऊन साहित्यिकांनी लिहितं व्हावं अशी अपेक्षा आहे.
“अभिव्यक्ती स्वातंत्र्य” हा सतत चर्चेत येणारा शब्द. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही सुबुद्ध समाजाची विशेषता आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना असलंच पाहिजे; पण कुठलंही स्वातंत्र्य फुकटात मिळत नाही. त्यासाठी किंमत मोजावी लागते. अभिरुची असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहतं अन्यथा स्वातंत्र्य नासतं. विनोदी लेखन सुद्धा अभिरुची असेल तर सशक्त होतं. त्या विनोदावर सगळ्यांनाच खळाळून हसू येतं. नाहीतर कीव करावी असे विनोद आपल्याला बघावे, ऐकावे, वाचावे लागतात.
साहित्यिकांनी विद्रोही सुद्धा असलंच पाहिजे. त्याशिवाय तुंबलेल्या विचारांवरचं शेवाळ दूर कसं होणार? विद्रोही साहित्यातही अभिरुचीचं भान असेल तर त्या विद्रोहाचा परिणाम कायम राहतो. खरंतर साहित्याला “विद्रोही” असं नाव देण्याची गरजही भासू नये. “उलगुलान” ची हाक देणारा - बिरसा मुंडा - समाजाला मिळतो. नंतर त्याचं जगणं महाश्वेतादेवींच्या लेखणीतून त्याच ताकदीनं साहित्यात येतं. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या क्रौर्याची आणि मिशनऱ्यांचा ढोंगी प्रेमळपणाची आपल्याला चीड येते. ते तर परकेच, पण इथल्याच कुळवंत जमीनदारांनी, जंगलच्या ठेकेदारांनी मुडांचा तिरस्कार करणं, त्यांना लुटून भिरकावून देणं आपल्याला अस्वस्थ करतं. “आरण्येर अधिकार” वाचतांना “कृष्णभारत” महाश्वेतादेवींच्या शब्दाशब्दातून जाणवतो, पानापानावर दिसतो.
विद्रोही साहित्याचं आणखी एक देखणं रूप म्हणजे “बहिष्कृत भारत” आणि “मूकनायक”. बहिष्कृत भारताच्या प्रत्येक अंकात पहिल्या पानावर ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातली ओवी आहे.
आता कोंदंड घेऊनि हाती। आरूढ पांइये रथी।
देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने।
जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानु वाढवी।
इया भारापासोनि सोडवी। मेदिनी हे।
आता पार्थ निःशंकु होई। या संग्रमा चित्त देई।
एथ हे वाचूनी काही। बोलो नये।
प्रत्येक शब्द अर्थ आणि संदर्भ घेऊन उभा आहे. यातला देखणा वाक्यांश - “जगी कीर्ती रुढवी”! रुढवी म्हणजे वाढवी. पण त्यात आधी रुढी सारखं रुजणं आहे. मातीत मुळं रोवणं आहे. मातीत कष्टाची मूळ रुजल्याशिवाय कीर्ती उगवून येत नाही. चार दिवसांची टिमकी म्हणजे कीर्ती नव्हे. कीर्ती मागून, पैसे मोजून, भीती दाखवून, ओरबाडून, मारून टाकूनही मिळत नाही. आयुष्यभर मातीत घट्ट रुतून-रुजून काम केल्यावर ती मिळते. संघटनेत आयुष्यभर मातीतून रुतून-रुजून काम केलेल्या व्यक्ती आहेत.... त्यांची व्यक्तिचित्रं साहित्यिकांनी रेखाटावी.
“मूकनायकात” तर जगद्गुरू तुकोबाराय ठणकावून सांगतात.
काय करू आता धरूनिया भीड।नि:शंक हे तोंड वाजविले॥
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण ।सार्थक लाजून नव्हे हीत॥
आले ते उत्तर बोलो स्वामीसवे।धीट नीट जीवे होऊनिया॥
तुका म्हणजे जीवा समर्थांशी गाठी।घालावी हे मांडी थापटूनी॥
किती उंचीवर नेऊन ठेवलंय विद्रोहाला! विद्रोह करतांनाच कृतीत विधायकता आहे. म्हणून हा विद्रोह आजही धगधगता आहे. तोडा, फोडा, मोडा, झोडा. कापा, पेटवून द्या, जाळून टाका..... रस्त्यावर उतरून दहशत पसरवणे म्हणजे विद्रोह नव्हे. विद्रोह हे क्रांतीचं बीज आहे. बियाणं सशक्तं जोमदार असेल तर झाड उगवून. तरारून येतं. उथळ अशक्त विद्रोहातून उन्मादाची आणि वैफल्याची खुरटी झुडपं येतात. क्रांती लाट किंवा पूर नसते. लाट विरते पूर ओसरतो- चिखल रोगराई देऊन जातो. अशी क्रांती समाजाला पुन्हा गर्तेत ढकलते. एक व्यवस्था नाकारतांना, दुसरी निरोगी, स्वच्छ, सशक्त व्यवस्था उभी करण्याची सकारात्मकता हवी.ती आपल्याला युगात्मा शरद जोशींनी शिकवली. समाजवादी म्हणजेच शोषणवादी व्यवस्था नाकारतांना, स्वातंत्र्यवाद मांडतांना शरद जोशींनी शेतीचा, मातीचा, पाण्याचा, बियाणांचा, खतांचा, बाजारपेठेचा, लुटीच्या कायद्यांचा, अर्थव्यवस्थेचा आणि अनर्थव्यवस्थेचाही अभ्यास करायला शिकवलं. माज घरात जाऊन निगुतीने पदार्थ रांधायला सांगितलं. ते विकायला शिकवलं. अभ्यास करून, अनुभव घेऊन भांडायचं, वाद घालायचा. “धीट नीट जीवे होऊनिया.” कृषीकारण आणि अर्थकारण या विषयांची वैचारिक उधारी-उसनवारी करणारे कथित शेतकरी नेते आणि शरद जोशींच्या पाठशाळेतला अभ्यासू शेतकरी यातला फरक साहित्यिकांनी समाजापुढे आणावा अशी अपेक्षा आहे.
आपल्या व्यवहारात भाषेला खूप महत्त्व आहे. ग्रामीण भाषा मातीशी, शेतीशी जोडलेली असते. पण ग्रामीण भाषा म्हणजे भ ची बाराखडी नव्हे. शिव्या देऊन लिहिणं, बोलणं कुणी कुणी पुरोगामीपणाचं लक्षणं मानतात. स्त्रियांचा अपमान होईल असे शब्द, अशी भाषा पुरोगामी कशी असेल? स्त्रियांना दुय्यम मानणं हाच मुळी प्रतिगामीपणा आहे. जुनाट, बुरसटलेल्या, रूढिग्रस्त विचारांच्या लोकांची, स्त्रिया त्यांची मालमत्ता असल्याचे जे समजत होते अशा कोणे एकेकाळच्या अप्रगत लोकांची ती भाषा आहे. स्त्री पुरुषांच्या प्रत्येक नात्याला सन्मानांनी सांगणं हा पुरोगामीपणा आहे. नात्यांचा सन्मान करणं ही वैचारिक प्रगल्भता आहे. यासाठी साहित्यिकांचं सहकार्य हवं!
स्वतःला पुरोगामी म्हणवणारे आजकाल शाळकरी मुलांची प्रेमप्रकरण रंगवत असतात. सहावी सातवीतल्या मुलामुलींची प्रेम प्रकरणं, असे सिनेमे, अशा मालिका फार प्रसिद्धी पावतात. मुलामुलींच्या शिक्षणात हा असा अडथळा? मग बालविवाहाला विरोध करणाऱ्या, स्त्री शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाईंची आठवण फक्त फोटोला हार घालण्यापुरती? जिजाऊच्या लेकी, सावित्रिच्या लेकी..... फक्त भाषणाचा विषय? आधीच ग्रामीण भागात शैक्षणिक गुणवत्ता कमी..... त्यात शाळेच्या पाऊलवाटेवर लागणारा हा चकवा! कसं शिकायचं खेड्यातल्या मुलामुलींनी? याचा परखडपणे विरोध करून ग्रामीण मुलामुलींच्या शिक्षणाची पाऊलवाट साहित्यिक सुरक्षित करतील अशी अपेक्षा आहे.
आजकाल छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची नावं, उठता बसता घेण्याची पद्धत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातल्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याची “आज्ञा” शिवाजी महाराज “लिखित पत्रात” देतात. छत्रपती संभाजी महाराज शेतकऱ्यांना शेतीसाठी कायद्यांनी संरक्षण, प्रोत्साहन देतात. प्रसंगी खाजगीतून मदत देतात. त्यांनी कायदे करून शेतीला संरक्षण दिलं. आज कायदे करून शेतीची लूट होत आहे. स्वतंत्र भारतात दोन-अडीचशे कायदे शेती विरुद्ध आहे. शेतकऱ्यांच्या आसुडाबद्दल बोलतांना बोलणारे अशा अभिनिवेशात बोलतात की जणू काही तेच महात्मा फुले आहेत. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कसं फसवलं जातात, असाहाय्य, अगतिक केलं जातं. स्वार्थासाठी शेतकऱ्यांना कसं वापरलं जातं. हे सगळ्यांनी अनुभवलं आहे. या विषयावर लिहिण्यात जोखीम आहे खरी, पण साहित्यिक हे आव्हान पेलतील अशी अपेक्षा आहे.
साहित्यात भारताचे चित्र दिसते, इंडियाचेही! भारत-इंडिया दरी स्पष्ट जाणवते. ही दरी दिवसेंदिवस जास्त रुंद व जास्त खोल होत आहे. शेती उद्ध्वस्त म्हणून शहरे असुरक्षित होत आहेत. साहित्यिकांनी ग्रामीण आणि शहरी या दोन्ही समाजांना जागं केलं पाहिजे. शाई गाळून, शब्दांची शेती आणि पुस्तकांची सुगी नको. समाजाला “आवडेल” तेच साहित्यिक लिहीत राहतील तर ते दुर्दैव आहे. समाजाला “आवश्यक” ते साहित्यिकांनी लिहिलं पाहिजे हा आग्रह आहे, ही अपेक्षा आहे.
सौ. प्रज्ञा जयंत बापट