नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हुंदका काळ्या आईचा
या सदरासाठी लेख.१
कधी काळी भारत देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता असे म्हटले जाते. भारत देश सोन्याची चिडीया होता. परकीयांच्या आक्रमणा अगोदर ही परिस्थिती होती. त्या वेळेला काही मोठे उद्योगधंदे नव्हते मोठमोठे कारखाने नव्हते मग हा सोन्याचा धूर कसा निघत होता? तर हा धूर शेतीतून निघत होता भारतातील शेती त्या वेळेला इतकी संपन्न होती के भारतातून त्या काळामध्ये भारतातल्या कापूस, भारतातले मसाले निर्यात करून देशाला उत्पन्न मिळत असे. इंग्रज आले आणि देश गरीब होत गेला. त्यांनी लुटीची व्यवस्था सुरु केले आणि ती पुढे कायम ठेवली. इंग्रजांनी देशातला कापूस स्वस्तात खरेदी करायचा त्याचे कापड तयार करायची आणि भारतात येऊन पुन्हा महागात विकायचा या लुटीच्या व्यवस्थेमुळे भारतातील कापूस उत्पादक शेतकरी गरीब झाला.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही लुटीचे व्यवस्था बंद होईल अशी अपेक्षा होती परंतु तसं काही झालं नाही. स्वातंत्र्यानंतर देशाला लाभलेले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशामध्ये मोठी कारखानदारी वाढवण्यासाठी शेतीतील कच्चा माल स्वस्त मिळावा, ग्रामीण भागातील तरुण, कारखान्यात मजुरीसाठी स्वस्त मिळावा यासाठी शेतीमाल स्वस्त ठेवण्याचे धोरण नेहरूंच्या सरकारने अवलंबले. त्यासाठी शेतीवर अनेक बंधने घालणारे कायदे केले. जमीन लाटण्याची व्यवस्था निर्माण केली. शेतीसाठी पाहिलेले सर्व स्वप्न धुळीला मिळताना दिसली. महात्मा गांधींनी दाखविलेला मार्ग बाजूला ठेवून समाजवादी विचारसरणीने देश पुढे चालत राहिला आणि शेतकरी गरीब होत गेला, दरिद्री होत गेला, कर्जबाजारी होत गेला. आत्महत्या करू लागला. शेतीत भागत नाही म्हणून ग्रामीण भागातील तरुण गावं सोडून शहरांकडे धावू लागले. लोंढेच्या लोंढे शहराच्या झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन राहू लागले आणि तसले नरकातले जीवन जायला तयार झाले.
कधीकाळी ज्या काळ्या आईच्या उदरातून सोन्याचा धूर नघत असे त्या काळ्या आईची लेकरे फाशी घेत आहेत, विष प्राशन करत आहेत हे पाहून त्या काळ्या आईला हुंदके अनावर होत असतील. तिने आपली उत्पादकता पणाला लावून आज देशाला पुरुन उरेल इतके अन्न धान्य पिकविले, तिच्या शेतकरी लेकरांनी रात्रंदिवस कष्ट करून देशात ठेवायला जागा नाही इतके उत्पादन केले पण लुटीच्या व्यवस्थेने सर्व फुकटात लुटून नेले.
आपली लूट होत आहे हे समजणयासाठी १९८० चे दशक उजडावे लागले. शरद जोशी नावाचा युग पुरूष भारतात आल्या नंतर शेतकरी पुत्रांना काळ्या आईच्या आश्रूंचे कारण समजले व लढा सुरु झाला. स्वातंत्र्याचा. हक्काचा. समृद्धी मिळवण्याचा.
गेल्या वर्षी, दोनशे वर्षाच्या गुलामी नंतर स्वातंत्र्याची पहाट दिसू लागली होती पण समाजवादी बांडगुळानी हा स्वातंत्र्याचा उगवता सूर्य पुन्हा पाताळात ढकलला. लेकरांची दुख दारिद्यातून सुटका होईल, आत्महत्या थांबतील व काळी आई या वेदनेतून मुक्त होईल असे वाटत होते पण तसे काही झाले नाही. आजही येणार्या आत्महत्येच्या बातम्या ऐकून काळ्या आईच्या काळजाला पीळ पडत असेल.
शेतकर्यांच्या तरुण पिढीची ही जवाबदारी व कर्तव्य आहे या पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्याची. आपले घामाचे दाम मिळवण्याचा मार्ग, व्यापार स्वातंत्र्य व तंत्रज्ञान स्वातंत्र्याच्या महामार्गाने जातो. आपला खरा शत्रू ओळखायला हवा. आपला शत्रू ग्राहक नाही, तो तर ग्राहक राजा आहे. आपला शत्रू व्यापारी नाही, कारखानदार नाही. आपला शत्रू सरकरी शोषण व्यवस्था आहे. काळ्या आईच्या लेकरांना लुटणारी व्यवस्था. तिचे सुत्रधार नेता, तस्कर, गुंडा, अफसर हे खरे दुश्मन!! यांच्या कचाटयातून देश सोडवण्यासाठी जर शेतकरीपुत्र पुढे सरसावले तरच या काळ्या आईच्या वेदना शमतील, दबलेल्या हुंदक्यांतून कायमची मुक्ती मिळेल.
४/१/२०२२
अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भरत पक्ष.