नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मातीत हरवलेल्या कविता: शेती मातीच्या नव्या कोंबाची कविता। मातीत हरवलेल्या कविता हा संतोष आळंजकर या नव्या दमाच्या कवीचा संग्रह नुकताच हातात पहिलावहिला असलेला हा संग्रह खऱ्या अर्थाने शेती मातीत राबणाऱ्या माणसाचा भावनिक कल्लोळ असून, शेतकऱ्यांच्या स्पंदनाचा शब्दरूपी आलेख आहे असे म्हणायला हरकत नाही. वारसाहक्काने गावाच्या माथ्यावर लागलेला कुणबीपणाचा टिळा कवीच्याही माथी लागलेला आहेच, त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना त्यांच्यासह संपूर्ण कुटुंब भोगत आहे याची जाणीव त्यांच्या कविता वाचत असताना सतत होत राहत सतत होत राहते. मलपृष्ठावरील सुंदर अशा कवितेमध्ये कवीने शेतकरी असलेल्या बापाचे दुःख शब्दांकित केलेले आहे, ती कविता वाचताच कवीच्या कवितेमधील काव्यात्मकता, तसेच वेदनांकित शब्दांचे सामर्थ्य इत्यादी गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात. खरे म्हणजे शेतकऱ्याचे हे दुःख कुणाला असं नवीन नाही, मात्र त्यातील मांडणी अधिक खोलवर करून त्या दुःखाच्या जाणिवा गडद करत कवीने आपले शेतकऱ्यांच्या वेदनेचे वास्तवदर्शी चित्र आपल्या कवितेतून सजीव केले आहे. माझ्या बापाच्या शेताला नाही कुंपण काटेरी ; लांडग्याच्या लचक्यांनी रोज फाटते पोटरी!! शेतकऱ्यांच्या मेहनती मध्ये वेगवेगळ्या मार्गाने हिस्सा लुटून घेणाऱ्या व्यवस्थेवरच वरील ओळी मधून प्रहार केला आहे. शासकीय प्रणाली पासून तर शेतकऱ्याचा मला मधील दलाली पर्यंत सर्व बाबीवर संतोष आळंजकर यांनी जो राग व्यक्त केलेला आहे, तो राग सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात धुसमुसत असतो. त्याला नेमक्या शब्दांमध्ये वाट करून देण्याचे काम कवीने या संग्रहामध्ये केलेले आहे. अनेक निसर्ग कविता या संग्रहामध्ये वाचायला मिळतात. त्यामध्ये कोण ग आई... हिरवी बोली, नि:संगाचे देणे, पाऊस, श्रावण सरी, विविध करणाऱ्या कविता आहे मात्र या कवितेच्या निसर्ग प्रकटीकरणाचे कार्य साधून सातत्याने शेतकऱ्यांच्या जीवनाशी ह्या कवितांचा सहसंग जोडलेला दिसून येतो. जसे वळीव स्पर्श या कवितेमध्ये, कुणब्याची लगबग, होता वापसा मातीला, बीज तिफणता पडे हिरवं सपान धरतीला. किंवा मिरुग या कवितेमध्ये मृग नक्षत्रातील नैसर्गिक घडामोडी आणि आध्यत्मिक वातावरण ह्यांच्या वर्णनासोबत, येता मिरुग शिवारी, पीक येई भरघोस; जाई मिटून कष्टाचा , पुरेपूर मागमोस. एकंदर सर्व कवितांमधून सारासार विचार केला तर प्रत्येक कविता ही शेती मातीशी निगडित आहे असे दिसून येते. द्या निवडून या कवितेमध्ये निवडून देत असताना आपण किती वरवरचा विचार करतो हे सांगून उपहासात्मक रीतीने आपल्या कवितेतून नेमके काय केले पाहिजे यावर कवीने सूचक भाषेत केलेले दिसून येते. गरिबाच्या विकासाला सारेच कसे दक्ष आहे, हिरव्या कुरणावर मात्र तिरपे तिरपे लक्ष आहे अशा शब्द मधून देशाचा विकास विकास म्हणणाऱ्या राजकीय लोकांचे शेतकऱ्याकडे आणि देशाच्या मूलभूत पोशिंद्याकडे कसे दुर्लक्ष झालेले आहे हेच कवीने अधोरेखित केलेले आहे. कोणतेही क्षणाला होऊ शकतो एल्गार असे भाष्य करीत आता इथून पुढे शेतकरी आपले हक्क मागण्यासाठी लढायला सज्ज झालेला आहे असेही कवी सांगून टाकतात. तुकोबाची माफी मागून इथे तुकारामाची संवाद साधणारी कविता या संग्रहामध्ये दिसून येते. पण या कवितेमधील तुकोबा तुम्ही आता पुन्हयांदा लिहा आणि असले निरर्थक शब्द दुरुस्त करा नाहीतर असं करा एक डाव घेऊन चला सगळ्यांच तुमच्या त्या विमानातन असे जेव्हा कवी लिहितो तेव्हा तुकारामाचे नेमके कोणते शब्द दुरुस्त करण्याची गरज आहे ते निदान मला तरी कळले नाही. कारण संत श्रेष्ठ तुकारामाचे काही चुकले असेल असे वाटणे म्हणजे आपला तुकाराम याबाबत अभ्यास नसणे असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यातच तुकारामाच्या विमानाचा उल्लेख कवी करतात तुले तुकारामांनी स्वतः कुठेही केलेला नव्हता, त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात जे गूढ कोडे निर्माण झालेले आहे, जे संशयाची वलय तयार झालेले आहे त्याचा विचार करता एक तर वास्तवदर्शी म्हणून तुकारामावर होणाऱ्या अन्यायाबाबत कवीने लिहायला हवे होते मात्र तुकारामाला कसली दुरुस्ती करायची हे सांगणे निश्चितपणे धाडसाचे ठरेल. कदाचित भावनेच्या भारतामध्ये कवी ते लिहून गेले असावेत. उतराई कवितेमध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बैल या प्राण्याचे असलेले अनन्यसाधारण नाते कवीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हि कविता वाचत असताना तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात ह्या कवितेची प्रकर्षाने आठवण झाली. या कवितेमध्ये बैलाने म्हातारपणी जी सल व्यक्त केली आहे तिच्या दुसऱ्या बाजूने विचार करून कवीने बैलाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण काय करू शकतो अशा विचारातून आपल्या भावना शब्दांकित केलेल्या दिसून येतात. दावण हीसुद्धा अशीच एक कविता या संग्रहमध्ये दिसून येते. संतोष आळंजकर यांच्या कवितेमधील भाषा आणि शब्द लाघव विलोभनीय असून त्यांच्या कवितेमधील शब्द कातर सुरावटीतून झाल्यासारखे वाटतात. न्हाले दवात निळूल्या, पर्ण हिरवे कोवळे। झाले सोनकिरणात अंग झाडून मोकळे।। अतिशय लाघवी शब्दांमध्ये निसर्गाचे वर्णन करणाऱ्या या कवीचे मन तितकेच कोवळे आणि सुंदर असल पाहिजे, कारण जे हृदयामध्ये उतरते त्याचेच प्रतिबिंब शब्दांमधून व्यक्त होत असते. याच कवितेमध्ये जीवनातील चढ-उतार याबद्दल बोलताना कवीने अतिशय समर्पक उदाहरण देत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. येता क्षणात वादळ, गेला पाचोळा आकाशी; जागा हिरव्या पर्णाला, आता मोकळी तळाशी. क्षणापूर्वी जो पाचोळा सर्वांच्या पायाखाली तुडवला जात होता तोच पाचोळा वादळ आल्यावर उंच आकाशात जाताना दिसतो, आणि पाचोळयाच्या मानाने पुढचा वर असलेले हिरवी पाने पानगळी मध्ये पुन्हा जमिनीवर येतात. त्यामुळे कोणी कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये कारण कोणती वेळ कशी येईल? हे सांगता येत नाही असेच जणू कवीला सुचवायचे आहे. शेती मातीतील त्या कविता लिहित असताना कवीने अनेक कवितांमध्ये शेतातील पिकांचे विलोभनीय वर्णन आपल्या शब्दांमधून केलेले दिसून येते. तर काही कवितांमधून शेतकऱ्याने आत्महत्या करू नये म्हणून त्यांची भाषा धीर देणारी, तसेच जगण्याचे बळ देणारी असल्याचे दिसते. नको खचूरे कुणब्या, नको असा धीर सोडू; तोड बाभळीचा फास, खोड एकेकाची मोडू। शेतकऱ्यांनी फक्त हतबल होऊन चालणार नाही, तर प्रसंगी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. हातात येईल ते शस्त्र करून जगण्याच्या संघर्षामध्ये लढवय्या म्हणून उतरले पाहिजे असे कवीला अभिप्रेत आहे. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी कविता मनामध्ये ईश्वर पेक्षा जास्त भक्ती आहे, ही अतिशय सकारात्मक बाब मला या संग्रहात पाहायला मिळाली. देव देव करत बसण्यापेक्षा मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये किंवा स्वतःच्या कष्टकरी वडिलांमध्ये बाप पाहणारा हा तरुण जेव्हा गावागावातील तरुणा मध्ये दिसेल निश्चितच सुखावह परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळेल अशी आशा वाटते. देवाशी बोलताना असे म्हटले पेक्षा विठ्ठलाशी बोलताना आपले आई वडील गरीबी मध्ये मेहनत करून किती आनंदात राहतात याचे वर्णन कवीने केले आहेच शिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती किती भीषण आहे तेही एकाच वेळी सांगितले आहे. काय ठाकलासी उभा, ठेवी कर कटेवर ; बाप माझा विठूराया, कष्टी रोज शेतावर. कमरेवर हात ठेवून कायमस्वरूपी उभा असलेला मंदिरातल्या देवापेक्षा शेतामध्ये कष्ट करणाऱ्या बापाचे महत्व कवीला जास्त वाटते त्याच वेळी विठ्ठलाच्या रुसून बसलेल्या रुक्मिणीला तो बोलतो, काय झाले विठाबाई, काय रुसते फुगते; माय माझी आनंदाने, विठू संगात राबते. अगदी शुल्लक कारणावरून पतीशी भांडून रुसून बसणाऱ्या रुक्मिणी पेक्षा आनंदाने कष्ट करणारी आपली आई श्रेष्ठ आहे अशी जाणीव देणे या कवितेत करून दिलेली आहे. माय, तीन पाट्या, कढ, एक म्हातारी अशा कवितांमधून सुद्धा आई तिची ममता इत्यादी गोष्टी कवीने अधोरेखित केलेल्या आहेत. सर्व स्त्रियांना माहेरपण म्हणजे स्वर्ग सुखाचा ठेवा वाटतो. अशात एका सासरवासींनीचे माहेरा बद्दलचे विचार माहेरपण या कवितेमध्ये व्यक्त झालेले दिसतात. माहेरचे बालपण बाई मनात झुरते; . बळ देऊन सासरी, उभ्या जन्माला पुरते. माहेरच्या आठवणी च्या बळावर सासरी जाणाऱ्या स्त्रीला शक्ती मिळते. आणि ती माहेर पण झाल्यावर रिचार्ज झाल्यासारखे पुन्हा सासरी जाऊन तेथे राबण्यात आणि कष्ट करण्यात आपले आयुष्य घालवते त्यामुळे प्रत्येक स्त्रीला माहेरपण म्हणजे शक्तीदाते नवसंजीवन असते असे वाटते. सरकारी सपान आमच्या रोज डोळ्यात सलते अशा ओळींमधून शासनाकडून होणाऱ्या फसवणुकीबद्दल सुद्धा कवीने एका केलेली दिसून येते. हरवली माणसं, गावाची कविता, जातं, शहाडा, लेकीबाळी, आजी पोपडे, जुन घरट अश्या कवितांमधून हरवलेली गाव संस्कृती, विसरत चाललेले नातेसंबंध, नष्ट होत चाललेली माणुसकी, खेड्याचा बदललेला चेहरामोहरा इत्यादी गोष्टी प्रकर्षाने समोर येत जातात. प्रसंगी सुन्न करतात, तर कधी गाव सोडतानाच्या आठवणी अधिक गडद करतात. मृत्यू, करार, जात कोणती, अशा काही गझल सदृश कविता सोबतच मन उधाणले, घर दोघांचे , हिंदोळा, मोठेपणीचे कविता अशा काही गीत रचना सुद्धा या संग्रहामध्ये आकर्षून घेणाऱ्या ठरले आहेत. चल बांधूया घर दोघांचे आभाळाच्या झाडावरती; एकच गाणे तुझे न माझे चल गाऊया तालावरती. इथे मिळाले जे जे काही सारे आता इथेच ठेवू; उगावयाला दोघांनाही फक्त मूठभर माती घेऊ, आभाळाला फुटेल पाने, पाय मातीत असल्यावरती; एकच गाणे तुझे न माझे चल गाऊया तालावरती. खूप आकर्षक आणि प्रेरक अशा विचारसरणीतून आळंजकर यांचा हा कविता संग्रह तयार झाला आहे असे त्यांची प्रत्येक कविता वाचतांना जाणवत राहते. मातीत हरवल्या कविता खऱ्या अर्थाने शेती मातीची आणि मातीतल्या माणसाची कविता आहे. जनशक्ती वाचक चळवळ औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेला हा संग्रह वर्तमान काळातील शेतकऱ्याचा जीवनपट आहे. अरविंद शेलार यांचे मुखपुष्ट संग्रहाचे बाहेरून अधिक आकर्षित करण्यास मदत करते पहिला संग्रह असला तरी या संग्रहातील जास्तीत जास्त कविता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नियतकालिकातून सातत्याने वाचकांपर्यंत आहेतच कवीच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. विठ्ठल वाघ, इंद्रजीत भालेराव, केशव सखाराम देशमुख यासारख्या शेती मातीच्या कवितांमधून फिरताना यांच्यानंतर कोण? असा प्रश्न अनेकदा पडायचा, कारण शेती मातीतील कविता अभावानेच वाचायला मिळते मात्र संतोष आळंजकर यांच्या कविता वाचल्यावर नवीन पिढीमध्ये सुद्धा शेती मातीच्या कवितेला साकार करून आकार देणारे लोक आहेत याची जाणीव होते.
******************************* किरण शिवहर डोंगरदिवे, , समता नगर, वॉर्ड न 5, मेहकर ता मेहकर, , , जि बुलढाणा पिन 443301 , मोबा 7588565576
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने