परीक्षकांचीच परीक्षा घेणारा गझलसंग्रह
दि. १४/०२/२०१४
प्रति,
श्री. गंगाधर मुटे,
आर्वी छोटी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा
सप्रेम नमस्कार
अलीकडेच प्रकाशित झालेली तुमची 'वांगे अमर रहे' व 'माझी गझल निराळी' ही दोनही पुस्तके वाचली. वाचकाला अस्वस्थ करण्याचे व विचार करायला भाग पाडण्याचे काम या लिखाणातून निश्चितपणे झाले आहे. कृषिप्रधान भारतातील, शेतात घाम गाळणार्या शेतकरी समाजाचे दुर्दैवी भयाण वास्तव परिणामकारक शब्दांत या लिखाणात व्यक्त झाले आहे.
'वांगे अमर रहे' या लेखसंग्रहातील प्रत्येक लेखात तुम्ही मांडलेली व्यथा भारताच्या अर्थव्यवहारातील व्यंगांवर नेमकेपणाने बोट ठेवणारी आहेच आणि त्याचबरोबर 'शेतकर्याचा आसूड' ओढण्याची ताकदही त्यातून समर्थपणे प्रगट झाली आहे.
गणित विषयात पदवी घेतलेल्या तुमच्यासारख्या शेतकरी कुटुंबातील तरुणाकडून या साहित्यकृतींची निर्मिती अधिकच अभिनंदनीय व परीक्षकाचीच परीक्षा घेणारी झाली आहे. दुसर्या बाजुने असेही म्हणता येईल की, शेतकरी संघटनेने मांडलेले अर्थशास्त्र कदाचित इतरांपेक्षा अधिक बारकाव्याने तुम्हाला समजले व त्यामुळेही ते परिणामकारक शब्दांत तुमच्या साहित्यात उतरले आहे. साहित्यनिर्मितीसाठी अनेक बाजू किंवा उद्देश्य असू शकतात. तथापि, सामाजिक अन्यायाविरुद्ध पोटतिडीकीने जी वेदना व्यक्त होते ती सामाजिक परिवर्तनाकडे नेमकेपणाने अंगुलिनिर्देश करणारी ठरते आणि म्हणूनच मूल्यवान ठरते. तेच मूल्य आपल्या पुस्तकांतील या शब्दांना प्राप्त झाले आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरू नये. 'आनंदाचे डोहीं, आनंद तरंग' याप्रमाणे आनंदाच्या डोहात डुंबण्याचा अनुभव घेण्याचे सामर्थ्य या शब्दांत आणि अनुभूतीत नसेल तथापि, तुकारामांच्या अभिव्यक्तीतील 'नाठाळाचे माथां, हाणूं काठी' असा आत्मविश्वास त्यांतून व्यक्त झाला आहे. समाजातील कुप्रथा, जातीपातींच्या अतूट भिंती आणि लोककल्याणकारी राज्याच्या नावाने चाललेल्या भ्रष्ट कारभारातील विसंगतीवर वेगवेगळ्या कालखंडात अनेक समाजधुरीणांनी (उदा. गाडगेबाबा, महात्मा फुले इ. इ.) कठोर शब्दांत आवाज उठविला याची आठवण करून देणारा तुमचा आक्रोश आहे असे वाटते. या पुस्तकांच्या निमित्ताने तुलना करण्यासाठी मी जे लिहिले आहे त्यामुळे काहीना आश्चर्यही वाटेल. परंतु, ज्या देशात, आजच्या परिस्थितीत, घाम गाळणारा व कष्ट करणारा जगाचा पोशिंदा शेतकरी लाखोंच्या संख्येने आत्महत्या करतो आहे त्या परिस्थितीत कोणत्या शब्दांचा प्रयोग करावा? शरीराला महारोग झाला म्हणजे त्या शरीराची संवेदना नष्ट होते; तथापि, त्याच्यावरही उपचार करता येऊ शकतात. मात्र, आज समाजमनाला बधीरतेचा असा कोणता रोग झाला आहे की ज्याचा शोध घेऊन त्यावर उपचार करणे कठीण व्हावे, अशक्यप्राय व्हावे? त्या व्यवस्थेचे वर्णन-विश्लेषण कोणत्या शब्दांत करावे? अश्या परिस्थितीत तुमच्यासारखा तरूण आपल्या ठिकाणी असलेल्या प्रतिभेच्या माध्यमातून काही मांडतो आहे, लिहिण्यासाठी सुधारण्याच्या अपेक्षेने सतत धडपडतो आहे त्यामुळे अशा प्रकारे तुलनात्मक मांडण्याचा प्रयोग मी करतो आहे.
सन १९८० नंतरच्या दोन दशकांत महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे वादळ उठले. भूतकाळाचे अचूक विश्लेषण आणि भविष्यकाळाचा नेमका वेध घेणारे शरद जोशी यांचे नेतृत्व संघटनेला लाभले. संघटनेच्या भरतीचा हा काळ. या भरतीच्या लाटा छातीवर झेलण्यासाठी असंख्य तरूण यात उतरले. शतकानुशतके घाव झेलून वेदना मुकी झालेल्या व सदान् कदा मनं मारली जाऊन मुर्दाड झालेल्यांना नवी ऊर्मी, नवी प्रेरणा या विचाराने निश्चितपणे मिळाली. लाखोंच्या संख्येने शेतकरी भाऊबहिणी रस्त्यावर उतरले. शेतकर्याच्या व कष्टकर्याच्या स्वातंत्र्याची प्रेरणा घेतलेल्या आणि घरदार सोडून काम करण्यासाठी तयार झालेल्या तरूण संघटनापाईकंची फौज उभी राहिली. पारतंत्र्यानंतर प्रथमच शेतकरी भावांच्या बरोबरीने मायभगिनी तुरुंगात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. धास्तावलेल्या स्वकीयांच्या सरकारातील आमच्याच राज्यकर्त्या पोरांनी आपल्या भावांच्या छातीत गोळ्या घालून त्यांचे बळी घेतले, मायभगिनींना लाठ्याकाठ्यांनी सोलून काढले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांतही शेतकरी संघटनेच्या प्रभावाखाली शेतकर्यांची एकजूट झाली. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांना संघटनेच्या अर्थशास्त्रीय विचारांची दखल घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र संघटनेच्या मागण्यांची पूर्तता अजूनही पूर्णत्वाने झालेली नाही. त्यामुळे चळवळीचे सामर्थ्य टिकविणे आणि वाढविणे आवश्यक असल्याचा तुम्ही मांडलेला आशावाद योग्यच आहे.
संघटनेचा विचार जितका मूलगामी आणि परिवर्तनवादी तितका तो समाजाच्या विविध थरांतून व विविधांगांतून खोलवर रुजतो. शेतकरी संघटनेला असे भाग्य लाभले. संघटनेच्या विचारांचा व आंदोलनांचा प्रभाव साहित्यक्षेत्रातही झालेला आहे. विशेष करून ग्रामीण साहित्यिक नव्याने लिहू लागले. एक नवीन साहित्यधारा तयार झाली. सकस आणि परिवर्तवादी साहित्यलेखकांची दमदार पिढी संघटनेच्या विचाराने प्रभावित होऊन लिहू लागली, बोलू लागली. आज ही यादी लक्षात घेण्याइतपत मोठी झाली आहे. संघटनेच्या या मंतरलेल्या कालखंडात काम केलेल्यांची पिढी आता वृद्धत्वाकडे झुकली आहे. अनेकजण परलोक(!)वासी झाले आहेत. परंतु, हा वारसा समर्थपणे पुढे सुरू राहील याचा भरवसा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे पाहून 'अभय' देणारा वाटतो.
'घामाची कत्तल जेथे, होते सांजसकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी' आणि
'युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी'
ही तुमच्या गझलेमधली भूमिका केशवसुतांच्या 'तुतारी'ची आठवण जागविणारी आहे यात शंका नाही.
सभोवतालचे भयाण वास्तव आणि उद्ध्वस्त ग्रामव्यवस्था यांचे चित्रण वेगवेगळ्या गझलांमध्ये टोकदार शब्दांत व्यक्त झाले आहे.
'बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले'
'शिवारात काळ्या, नि उत्क्रांतलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?'
'टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला'
'दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठीण झाले'
'विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली
पूजन-अर्चन, जंतर-मंतर, तमाम तेव्हा करून गेलो'
अश्या प्रकारच्या ओळींतून हे वास्तव स्वरूपात व्यक्त झाले आहे. जीवन जगण्यातील हतबलता आणि त्यामुळे होणारी आत्महत्या याची व्यथा
'असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी'
अश्या ओळींतून व्यक्त झाली आहे. तरीसुद्धा या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याची जिद्द ठाम आहे.
'राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे'
'आता अभय जगावे अश्रु न पाझरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना'
या ओळींमधून तुमची संकटावर मात करण्याची लढावू वृत्ती व्यक्त झाली आहे.
राजकारणी आणि एकूणच भ्रष्ट राजसत्ता यांचे विकृतिकरण नेमक्या शब्दांत गझलांमधून व्यक्त झाले आहे.
'घराणे उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो आम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे'
'आम्हास नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही अभय पदांचे
लबाड वंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे'
'जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे'
'लोंढेच घोषणांचे, दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला'
'भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा'
या प्रकारच्या अनेक गझलांमधून या विकृतीचे चित्र मांडले गेले आहे ते निश्चितच विषण्ण करणारे तर आहेच आणि त्याच बरोबर विचार करायला लावणारे आहे. या सगळ्या विसंगतीत तुमची मातीशी असलेली अतूट नाळ
'अभय एक युक्ती तुला सांगतो मी करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे'
या शब्दांमधून व्यक्त झाली आहे, ती खरोखरी भावणारी वाटली यात काही शंका नाही.
गझल या काव्यप्रकाराची हाताळणी तुम्ही अगदी अलीकडे सुरू केली तथापि त्यात जे लिखाण केले त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना दाद देणे भाग आहे. मात्र त्याच वेळी तंत्राच्या मार्गाने जाताना अंतःकरणातल्या ऊर्मी व्यक्त करताना काही राहून तर जात नाही ना याचा विचार होण्याची आवश्यकता व्यक्त करावीशी वाटते.
'वांगे अमर रहे' या लेखसंग्रहातील शेवटचा 'असा आहे आमचा शेतकरी' हा लेख सर्वांनाच अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. आणि 'शेतकरी समाजासाठी कार्य करणे हे तुलनेने अधिक कठीण काम असले तरी ऐतिहासिक आणि महान कार्य आहे याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून घेणे गरजेचे आहे' असा व्यक्त केलेला आशावाद बरेच काही सांगून जाणारा आहे. एकूणच सर्व लेखसंग्रह अभ्यासनीय झाला आहे.
पुस्तके वाचण्याची संधी जाणीवपूर्वक करून दिली याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.
श्री. श्याम पवार
महाळुंगे (इंगळे), जि. पुणे
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------