नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
११ वे अ.भा.म.शे.सा.सं, मोहाडी : कव्हरस्टोरी
‘उद्योग तंत्रज्ञानातून चतुरंग शेतीस संजीवनी’
या मातीस आता देऊया आकार उद्योगाचा
‘चतुरंग’ शेती ठरणार पाया भविष्याचा
वर्धा, नागपूर, गडचिरोली, मुंबई, पैठण, अलिबाग, आर्वी (ऑनलाईन दोन), रावेरी, मोझरी, गत दहा शेतकरी साहित्य संमेलनाव्दारे पेरलेल्या अस्सल शेतीनिष्ठ जाणिवा, तंत्रज्ञानाधारीत उद्योगरूपी काळसुसंगत विचार घेऊन उगवल्या मोहाडी येथील अकराव्या संमेलनात. आज अनेक क्षेत्रांनी विकासाच्या दृष्टीने कात टाकलेली असतांना, शेती मात्र अजूनही अस्मानी सुलतानी चक्रव्यूहात अडकलेली असून पारंपारिक शेती आता उद्योगधंद्याच्या मार्गावर नेण्याशिवाय पर्याय नाही आणि हे आपण यशस्वीपणे करू शकतो हा कृतिशील विचार सप्रमाण दाखवून देणारे, नाशिक जिल्ह्यामधील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे आयोजित ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने उद्योग तंत्रज्ञानातून चतुरंग शेतीस संजीवनी देण्याची नांदी ठरले.
एखादं संमेलन कार्यशाळा त्याच्या परिणामकतेसाठी, यशस्वितेसाठी रूढ अर्थाने काही मानकांची पूर्तता करणे अपरिहार्य असते. त्यावरूनच त्याची काळसुसंगत उपयोगिता सिद्ध होत असते. पण हे झाले एखाद्या विषयाचे, जसे भाषा संस्कृती परंतू जेव्हा एखादा विषय प्रत्यक्ष मनुष्याच्या जगण्या-मरण्याशी निगडित असतो आणि त्याचा परिणाम थेट मोठ्या मानव समूहावर होत असेल आणि ह्या मोठ्या समूहाची व्याप्ती देशातील सत्तर टक्क्या पर्यंत असेल आणि तो एका समृद्ध संस्कृतीचा भाग असेल तर मात्र त्या विचारावर फार जबाबदारीने संयमाने काम करणे गरजेचे असते; किंबहुना ती प्राथमिक अटच असते. अनेक तार्किक कसोट्यांवर त्या विचाराची धार तपासून घ्यावी लागते. कारण या विचारात जर काही कच्चे दुवे राहिले तर त्याचा परिणाम त्या विचारधारेची मर्यादा किंवा मग आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण होवून, त्याच्या फलनिष्पत्ती संदर्भातील संदिग्धता ही मूळ हेतूलाच मारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. युगात्मा शरद जोशी यांनी शेती अर्थ व्यवस्थापनाचे दिलेले मॉडेल हे मुळातच प्रत्यक्षरीत्या अनुभवाधारीत असून त्याची शास्त्रीय मांडणी वैज्ञानिक विचारावर आधारीत असल्यामुळे त्याची वस्तुनिष्ठता कुणालाही तपासून घेणे शक्य आहे.
शेतीमधील कच्च्या मालाच्या लुटीतून शहरातील औद्योगिक विकासाचा डोलारा निर्माण करणे आणि ज्यांच्या कष्टावर श्रमावर हा डोलारा उभा आहे, त्याला मात्र कायम त्या लाभापासून वंचित ठेवणे, याची सैद्धांतिक संख्याशास्त्रीय मांडणी अगदी सोप्या भाषेत केल्यामुळे, शेतकरी चळवळीतील शेवटच्या घटकांपर्यंत युगात्मा शरद जोशीचा शेती अर्थ विषयक विचार मुरत गेला. ही तीच भाषा होती ज्या भाषेने अडाणी शेतकऱ्यांना शहाणे केले होते. ह्या क्रांतिकारक विचाराने शेतकऱ्यामध्ये आपल्या हक्काबाबत जाणीव जागृती झाल्याने, हा विराट समूह संघर्षाच्या पवित्र्यात येऊन आंदोलन रूपाने ही सर्व खदखद रस्त्यावर उतरली. यातून धोरणकर्त्यावर दबाव निर्माण होऊन काही प्रमाणात यशही आले. या चळवळीची सर्वात महत्त्वाची फलश्रुती म्हणजे गावागावात समर्पित कार्यकर्त्यांची फौज निर्माण होवून एक वैचारिक शेतीसाक्षर पिढी घडविण्यात याची परिणिती झाली. परंतू कुठल्याही चळवळीचा प्रसार, प्रचार होण्याकरिता समाजाच्या विविध स्तरामधून, व्यापक समूहाच्या पाठिंब्याची गरज असते. पाठिंब्या करिता तो विचार वस्तुनिष्ठपणे, त्या त्या स्तरांपर्यंत विविध माध्यमाव्दारे पोहचविणे आवश्यक असते. आणि हे काम साहित्यामधून शक्य झालेले आहे, हे आपल्याला सप्रमाण जागतिक इतिहासामधून अभ्यासता येते. साहित्य हा समाज मनाचा आरसा असून तत्कालीन समाजमन त्यात प्रतिबिंबित होत असते. एखाद्याच्या वेदनेची तीव्रता सार्थ शब्दकळेतून या हृदयी ते त्या हृदयी पोहचविण्याची क्षमता त्या साहित्यकृतीत असते आणि हीच ती शब्दाची महती जी, संत तुकाराम महाराजांनी
“आम्हा घरी धन! शब्दांचीच रत्ने !
शब्दांचीच शस्त्रे !यत्न करू”
या अभंगामधून प्रतिपादित केलेली आहे. युगात्मा शरद जोशींनी या बाबत खंत व्यक्त केली होती; जर तत्कालीन साहित्यिकांनी या चळवळीस पाहिजे त्या प्रमाणात पाठिंबा दिला असता तर या चळवळीचे टोक टोकदार झाले असते. साहित्यिकांच्या या उदासीनते बाबत 'आम्ही लटिके ना बोलू' असे खडे बोलही सुनावले होते.
साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या जिभेने बोलले पाहिजे. ह्याच विचारांचा धागा पकडून मा. गंगाधरजी मुटे यांनी २०१५ मध्ये मराठी शेतकरी साहित्य ही चळवळीची मुहूर्तमेढ रोवली होती. शेतकरी कष्टकऱ्यांचा हुंकार लेखणीतून उमटला पाहिजे कारण आता शेतकऱ्यांची मुले शिक्षित झालेली असून सुशिक्षित होईपर्यंत त्यांनी शेतीची पडझड स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. एकूणच हा व्यवसाय आता आम्हाला भविष्यात उभारी देणार नाही; अशा मनोवस्थेत पोहचलेला आहे. हे घडत असताना ज्या शेतीमातीवर आपला पिंड पोसला आहे त्या शेतीमातीबद्दलची कृतज्ञताही तो विसरला नाही. शेती की नोकरी या संभ्रमावस्थेत असताना जेव्हा तो शेतीपासून फारकत घेऊन नोकरी बाबत विचार करायला लागतो, तेव्हा नोकरीमधील जीवघेणी स्पर्धा, सुशिक्षित बेरोजगार आणि उपलब्ध रोजगार याचे व्यस्त प्रमाण बघता, तिथेही त्याच्या पदरी निराशाच येत असल्याने तर ग्रामजीवनात विशेषतः युवावर्गात अनेक जटिल प्रश्न निर्माण झालेले आहेत. तेव्हा शेती शेतकरी शेतीव्यवसाय संलग्न बाबी वस्तुनिष्ठपणे साहित्यात यायला पाहिजे. जेणेकरून या बाबत जाणीव जागृती होऊन शेतकऱ्याच्या प्रश्नास वाचा फोडण्यास मदत होईल कारण आता आपल्या मदतीला तंत्रज्ञान धावून आले आहे. त्याचा सक्षमपणे वापर करून आज आपण वैश्विकस्तरांवर व्यक्त होऊ शकतो. माहिती घेऊ शकतो. माहिती देऊ शकतो. तेव्हा आपल्यावर कुणीतरी लिहिल याची वाट न बघता आपणच आपले प्रश्न मांडले पाहिजे आणि त्याची उत्तरेही शोधली पाहिजे. त्यामुळेच महाराष्ट्रांतील वेगवेगळ्या जिल्ह्यात अगदी भौगोलिक दृष्ट्या हवामान पीक पद्धती या वैशिष्ट्यासह त्या त्या जिल्ह्यात जाणीवपूर्वक आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाचा उद्देशच मुळी हा होता की, त्या भागात हा विचार आणि त्या त्या भागातील प्रतिनिधींचा सहभाग व्हावा. हवामान पीक पद्धती जरी वेगळी असली तरी मात्र समस्त शेतकऱ्याच्या समस्या समान असून, अजूनही शेतीस सुखाचे दिवस दूर असल्यामुळे संघर्षही अपरिहार्य आहे.
नुकतेच पार पडलेले ११ वे संमेलन हे अनेक अर्थाने यशस्वी ठरलेले असून या चळवळीस एका महत्त्वाच्या वळणावर प्रेरणादायी अध्याय जोडण्याचे काम श्री. विलास शिंदे यांच्या सह्याद्री फार्म या उद्योग आस्थापना रूपाने झालेले आहे. एक शेतकरी शेतीला अद्यावत तंत्रज्ञानाच्या मदतीने, उद्योगधंद्याची जोड देऊन कठोर मेहनत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारांचा सूक्ष्म अभ्यास, आयात निर्यात धोरणांचा सातत्याने पाठपुरावा करून उच्चतम निर्मिती प्रक्रिया राबवून आरोग्यदायी उत्पादनाच्या गुणवत्तेसह रोजगाराची निर्मिती; असे प्रचंड मोठे चौफेर यश याच शेतीत संपादन करू शकतो याची गौरवगाथा संमेलनाच्या निमित्याने उपस्थित प्रतिनिधी रसिक आणि शेतकरी यांना प्रत्यक्ष अभ्यासता आली.
उद्घाटन सत्रातील प्रास्ताविकात संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे प्रणेते श्री. गंगाधरजी मुटे यांनी, गेल्या दहा संमेलनाचा धावता आढावा घेऊन प्रत्येक संमेलनच्या आयोजनामधून चळवळीच्या अनुषंगाने युगात्मा शरद जोशी, रा.र.बोराडे, डॉ. अभय बंग, शेषराव मोहिते, विठ्ठल वाघ, इंद्रजीत भालेराव, भास्कर चंदनशिव, वसुंधरा काशीकर, किशोर सानप, यांचेसह एक एक पाऊल कसे पुढे पडत गेले याबाबतीत काही ठळक घटनांचा उल्लेख करून, या संमेलनास नाना पाटेकरांनी यावे ही आपली फार पूर्वीपासून इच्छा होती, त्यामागची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, नाना पाटेकरांच्या सहृदयतेचा एक स्वानुभव सांगितला. नाना पाटेकर भूमिका करीत असलेले पुरुष नावाचे नाटक आपण पाहायला गेलो असता, त्याच काळात मराठवाड्यामधील किल्लारीला मोठा भूकंप झालेला होता, भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी नानांनी नाट्यसभागृहातील प्रेक्षकांना आर्थिक मदतीचे आव्हान केले असता, त्या झोळीत मीही काही पैसे टाकले होते. हे संमेलन म्हणजे कार्यशाळा असून इथे येणारा शेतीवाचक, अभ्यासक येथून काहीतरी घेऊन जाणारच. पुढे आपल्या विवेचनात, महात्मा फुलेनी शेतीविषयक जाणिवांतून केलेली वस्तुनिष्ठ साहित्य निर्मितीनंतर, युगात्मा शरद जोशींनी मांडलेल्या,शेती अर्थ व्यवस्थापन आणि त्या संदर्भातील लेखनाला उजाळा देऊन, सन्माननीय अपवाद वगळता, एकूणच सौदर्यवादी भूमिकेतून शेती आणि शेतकऱ्याबद्दल जे साहित्य म्हणून लिहिण्यात आले ते बहुतांशी शहरी मध्यम वर्गाचे मन रिझविण्याकरिता होते. त्यातून खरा शेतकरी आणि त्याचा जीवनमरणाचा संघर्ष पोहचविण्यात बाधक ठरले. हीच उणीव भरून काढण्याकरिता या चळवळीची आवश्यकता प्रतिपादित करून “आता सुजाण व्हावे, शिकण्यास लेखणीने, 'चतुरंग' वित्तशेती, रुजण्यास लेखणीने, नवज्ञान निर्मितेला, जेथे उभार तेथे, आशय हळूच न्यावा, भिजण्यास लेखणीने” या सार्थ ओळीतून आता यापुढील काळात चळवळीची दिशा आणि संमेलनाचे प्रयोजन स्पष्ट करताना, आता धुऱ्यांवरच्या शेतकऱ्याने, एका हातात नांगर व दुसऱ्या हातात लेखणी धरावी असे आवाहन केले.
या संमेलनाबाबत एक गोष्ट आवर्जून नमूद करावी ती म्हणजे, रसिकांची उपस्थिती.संमेलनपूर्व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून पाचशेच्यावर प्रतिनिधींनी, ऑनलाईन पद्धतीने उपस्थितीकरिता नोंदणी केलेली होती. अगदी पहिल्या २०१५ मध्ये वर्धा येथे झालेल्या संमेलनापासून,ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणीची सुरू केलेली पद्धत सुरवातीला अनेकांना तांत्रिकदृष्ट्या अडचणीची ठरली. त्या करिता बळीराजा डॉट कॉम या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून तंत्रसाक्षरतेकरीता संकेतस्थळ तथा व्हाट्सएपवर अभ्यासवर्गाचे आयोजनही केल्या गेले. गेल्या दहा वर्षात ही ऑनलाईन नोंदणी हळूहळू अंगवळणी पडत गेल्याची प्रचीती ११ व्या संमेलनाकरिता झालेल्या नोंदणीतून दिसून येते. प्रतिनिधीची ऑनलाईन नोंदणी सोबतच, संमेलना निमित्त आयोजीत करण्यात येत असलेली विश्वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धा, ज्यात शेतीमातीच्या अनुषंगाने वैचारिक लेखन व्हावे, या उद्देशाने एक विषय देऊन साहित्यामधील सर्व प्रचलित प्रकारात आपापल्या अभिव्यक्तीनुसार लेखन अभिप्रेत असते. स्पर्धेच्या पारदर्शी परीक्षणासाठी तज्ज्ञ परीक्षकांची नेमणूक करण्यात येऊन गुणानुक्रमे विजेत्यांना संमेलनात पुरस्कृत करून, भेट म्हणून पुस्तकांचा संच देऊन लेखकास प्रोत्साहन देण्यात येते. गेल्या अकरा वर्षात याच स्पर्धांमधून शेतीविषयक समृद्ध जाणिवांची पेरणी झाल्याने, साहित्यिकांची दमदार फळी निर्माण झालेली आहे.याची परिणिती अनेक साहित्यिकांची पुस्तके प्रकाशीत होण्यात झाल्याने शेतीसाहीत्याचे वस्तुनिष्ठ दस्तावेजीकरण होणे, ही या चळवळीची मोठी उपलब्धी म्हणावी.
उद्घाटन सत्रात नोंदणीकृत प्रतिनिधीसह परिसरातील साहित्यिक, रसिक, अभ्यासक, शेतकरी अशी सहाशेच्यावर उपस्थिती होती. नाना पाटेकर सरांची उपस्थिती एक आकर्षण असले तरी पुढील दोन दिवसातील विविध सत्रात, चारशेच्या वर उपस्थितीची झालेली नोंद हे समकालीन साहित्य संमेलनामधून या संमेलनाची वेगळी जातकुळी स्पष्ट करण्यास पुरेसे आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सह्याद्री फार्मचे संचालक मा. विलास शिंदे यांनी, मनोगतामधून आपल्या भावनांना मोकळी वाट करून देताना म्हणाले की,या आयोजनामधून शेतीच्या समस्या समजून घेऊन त्याच्या प्रश्नाची नेमकी जाण सर्व समाजापर्यंत जावी आणि ते साहित्यात उतरताना फक्त एखाद्या साहित्य प्रकारापुरते मर्यादित न राहता, त्यामधून प्रश्नाची उकल कश्या प्रकारे दिशादर्शक होईल हे अपेक्षीत आहे. युगात्मा शरद जोशी आणि महात्मा फुले यांच्या विचारांची शिदोरी घेऊन आपण सर्व पुढे जात असताना, त्यांनी मांडलेले तत्त्वज्ञान हे प्रत्यक्ष कृतीत आणून कृतिशीलता जपावी. वर्तमानकाळी जरी शेतकऱ्याची स्थिती बिकट असेल अनेक समस्या असेल तरी येणारा काळ हा उज्ज्वल असणार आहे. कारण मी जेव्हा सुरवात केली होती, तेव्हा हे माळरान उजाड होते. इथे नावाला फक्त एक झाड होते, १५ जणांच्या सोबतीने सुरू केलेल्या कामाची व्याप्ती आज ६ हजारा पर्यंत येऊन पोहचायला कारणीभूत ठरली. कृतिशीलता. ह्या सर्वाच्या मुळाशी भक्कमपणे युगात्मा शरद जोशीच्या विचारांचा आधार होता आणि त्या विचाराच्या आधारानेच ह्या सह्याद्रीची वेल फुलली बहरली आणि आज याचा सुगंध परदेशातही जाऊन पोहचला. तेव्हा आपण आता आपल्या दोन दिवसीय वास्तव्यात येथील प्रकल्प बघावा. प्रक्रिया उद्योग समजून घ्यावा. हा निसर्ग, ही शेती,यांसह आजूबाजूच्या परिसरातील अन्य शेती प्रकल्पासही भेटी देऊन, खऱ्या अर्थाने हे संमेलन निवाशी प्रशिक्षण शिबीर किंवा कार्यशाळा ठरावे.आणि यामधून प्रशिक्षित सुजाण कार्यकर्त्यांच्या रूपात आपण शेतीअनुषंगिक साहित्यात कृतिशील साहित्याची भर घालावी.
प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, प्रसिद्ध वऱ्हाडी साहित्यिक मा. पुष्पराज गावंडे यांनी आपल्या खास वऱ्हाडी बोलीमधून मनोगत मांडताना, शेतीमाती आणि शेतकरी यावर लिहून साहित्यिकांना मान सन्मान मिळतो परंतू शेतकऱ्याचे दिवस मात्र बदलत नाही. नाशिक मध्ये शेतकऱ्याचे एवढे हायटेक संमेलन आयोजित केले त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी असेच आयोजन करावे त्या बद्दल कार्याध्यक्ष गांगाधरजी मुटे यांचे आभार मानून, शासनाकडून मराठी साहित्य संमेलनास दोन कोटीचा निधी मिळूनही तिथे रिकाम्या खुर्च्या बघायला मिळतात ह्या वस्तुस्थितीची जाणीव करून देताना, इथे मात्र दर्दी रसिकांची गर्दी होणे ही बाब निश्चितच अभिनंदनीय असून मी स्वत: एक शेतकरी असल्यामुळे मला विशेष आनंद झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ तथा संमेलनाचे संयोजक अॅड. मा.सतीश बोरुळकर यांनी आपल्या मनोगतामधून उपस्थितांना नाशिक जिल्ह्याचा, पौराणिक आध्यात्मिक इतिहास विविध घटनांचा दाखला देऊन सांगताना शिवाजी महाराजांनी केलेल्या लढाईच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून दिली. भारतीय राज्यघटने मधील अस्पृश्यता निवारण्याकरिता असलेले समतेचे अनुच्छेद १५ व १७ या दोन्ही कलमांचा उगम नाशिक येथील, १९३२ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहा मधून होतो. चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके,कुसुमाग्रज वसंत कानेटकर यांचे साहित्यलेखनाचे भरणपोषण करणारी ही भूमी, शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची कार्यशाळा राहिलेली आहे. १० नोव्हेंबर १९८० मध्ये युगात्मा शरद जोशींनी केलेले ऐतिहासिक असे ऊस आंदोलन नाशिक मध्ये केलेले आहे.याच नाशिकामधून समृद्धी मार्ग जातो परंतू शेतकऱ्याची समृद्धी सह्याद्री फार्ममधून जातो आणि हेच आपले भविष्य आहे.
प्रमुख अतिथी माजी विधानसभा सदस्य तथा शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मा. सरोजताई काशीकर यांनी आपल्या मनोगतात; कृषी विषयात मी पदव्युत्तर शिक्षण घेऊनही मला शेतकऱ्याच्या जीवनमरणाचे प्रश्न मला कळले नव्हते याला कारण, आम्ही जे शिकलो त्यात सर्व काही छान छान सुंदर सुंदर अश्या प्रकारची मांडणी असल्यामुळे मूळ प्रश्नापर्यंत पोहचता आले नाही. त्या प्रश्नांची दाहकता आम्हाला युगात्मा शरद जोशींच्या विद्यापीठात येऊन कळली. युगात्मा शरद जोशीबरोबर विविध कार्यशाळा मार्गदर्शन शिबिरांमधून एकेक एकेक पाऊल टाकत आम्ही घडत गेलो. जाणीव जागृती होत गेली.त्या काळी संवादाची कुठलीही साधने नसतांनाही आंदोलनाकरिता लाखोंच्या संख्येने माणसं एकत्र यायची. ही जादू होती शेतकरी संघटनेची. लक्ष्मीमुक्ती आंदोलनाची परिणामकता म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुधाकरराव नाईक यांना शासकीय अध्यादेश काढावा लागला.हे यश होते आंदोलनाचे. आता शेतकऱ्यांनी उद्योजकतेकडे वळणे ही काळाची खरी गरज आहे. सह्याद्री फार्म हे आजचे भविष्य असून भविष्यात शेतकरी उद्योजक नवरा पाहिजे असा समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून, आता शेतकऱ्याची रडगाथा न लिहिता त्याला उभारी मिळेल अश्या गौरवगाथेचे लेखन साहित्यिकांकडून व्हावे असे आवाहन केले.
शेतकरी संघटनेची मुलूख मैदान तोफ म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केल्या जातो ते शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, माजी विधानसभा सदस्य अॅड. वामनराव चटप, प्रमुख अतिथी म्हणून आपल्या मनोगताची सुरवात उत्स्फूर्त अश्या ओघवत्या शैलीत करताना म्हणाले की, युगात्मा शरद जोशींप्रणीत चतुरंग शेतीचा प्रयोग, आम्ही शिवार अॅग्रो, शेतकरी सॉल्व्हंट अश्या उपक्रमामधून सुरवात केल्यावर आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, यांत आम्ही तेव्हा हरलो होतो परंतू विलास शिंदेच्या सह्याद्री फार्मच्या माध्यमातून मात्र आज आम्ही जिंकलो. युगात्मा शरद जोशी म्हणायचे, भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो, आणि कर्जातच मरतो. शेतीवर जगणारा मालक स्त्री पुरुष मजूर हा माणूस आहे. त्याला देखील देशातील इतर माणसांप्रमाणे सन्मानाने सुखाने जगता यायला पाहिजे. त्यासाठी त्याचा धंदा फायद्याचा झाला पाहिजे. म्हणजेच त्याच्या घामाला दाम मिळाला पाहिजे, खर्च भरून निघेल एवढा रास्त भाव मिळाला पाहिजे. यामधून शेतीत बचत निर्माण होईल त्यातून तो कुटुंबाकरिता हवी ती साधने घेईल, याचाच अर्थ त्याच्या स्वातंत्र्यांच्या कक्षा रुंदावत जाईल. एवढं साधंसोप्प तत्त्वज्ञान शेतकऱ्याच्या प्रश्नाची उकल करताना मांडलं होतं. ते म्हणायचे मरणाआधी मला शेतकरी कर्जमुक्त झालेला बघायचं आहे. परंतू आज्यांपर्यंत देशात चार लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा अशी भयावह स्थिती शेतीव्यवसायाची झालेली असून त्यात केवळ विदर्भातील पस्तीस हजार आत्महत्येचा समावेश हा चिंतेचा विषय असून आत्महत्या हा पर्याय नाही, परंतू हे चित्र बदलत नाही ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा साहित्यिकांनी या आत्महत्या रोखण्याकरिता सकारात्मकपणे विश्वासाची आशेची संघर्षाची सृजनात्मक अक्षरपेरणी शेतकऱ्याच्या मनःपटलावर आपल्या साहित्यामधून करावी. जेणे करून तो आत्महत्येपासून प्रवृत्त होवून नव्या विश्वासाने उमेदीने शेतीव्यवसायाकडे बघण्यास प्रवृत्त होईल.
नाना पाटेकर सर एक कलावंत म्हणून तर श्रेष्ठ आहेतच परंतू एक संवेदनशील माणूस म्हणूनही तितक्याच उंचीचे आहेत. हे त्यांच्या सामाजिक कार्यामधून दिसून येते. विशेषतः शेतकऱ्याप्रती असलेली अपार संवेदनाशीलता ही त्यांच्या नाम फौंउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर उभारलेल्या प्रचंड कामामधून अनुभवास आलेली आहेच.उद्घाटन सत्रातील काही निरीक्षणे नोंदविताना मलाही आनंद होतोय. जसे नानांनी सभागृहात प्रवेश केल्यानंतर व्यासपीठापर्यंत प्रत्येकांशी हस्तांदोलन करीत जाणे. आस्थेनं चौकशी करणे, कार्याध्यक्ष श्री.गंगाधर मुटे यांचे स्वागत स्वागताध्यक्ष श्री. विलास शिंदे यांचे कडून होणार असे पुकारल्यावर, नानांनी स्वतः पुढे येऊन मुटे सरांचे स्वागत करून उराउरी भेट घेणे, श्री.गणेश मुटे यांनी नानांना ग्रंथभेट केल्यानंतर जेव्हा गणेश मुटे नानांना वाकून नमस्कार करायला गेले, तेव्हा नानांनी सुद्धा त्याच पद्धतीने नमस्काराचे उत्तर वाकून देणे, सूत्रसंचालकाकडून श्री. भानू काळे संमेलनाध्यक्ष, यांना अध्यक्षीय मनोगताकरिता पाचारण केल्यानंतर संमेलनाध्यक्षांचा, परिचय वाचणे सुरू केले, तोच नानांनी त्यांना मध्येच थांबवून म्हणाले; ‘काळे सरांचे पाच मिनिट मला जास्त मिळतील’ आणि लगेच व्यासपीठावरून खाली उतरून प्रेक्षकांत बसून संपूर्ण भाषण मन लावून ऐकले. या ठिकाणी योगायोग म्हणा की ऋणानुबंध काय असतो याचे उदाहरण म्हणजे नाम फाउंडेशनचे दुसरे सदस्य, प्रसिद्ध अभिनेते समाजसेवक मा. मकरंद अनासपुरे हे मुंबई येथील चौथ्या संमेलनाचे उदघाटक म्हणून लाभले होते. नानांचे भाषण म्हणजे एक पर्वणीच ठरावी. मुळातच नानांच्या स्वभावाप्रमाणे, सुरवातच सरकारकडे मागू नका, कुठले सरकार करायचे ते ठरवा. कशाला कुणाला काही मागायचे? आपणच आपले भविष्य घडवायचे, त्यासाठी प्रयत्न करायचे. या ठिकाणी युगात्मा शरद जोशींनी दिलेली ‘भीक नको हवे घामाचे दाम’ ह्या घोषणेचे स्मरण व्हावे हेही तितकेच औचित्यपूर्ण. असा स्वाभिमानी बाणा जागवत कधी व्यवस्थेवर आसूड ओढत तर कधी अतिशय भावनिक साद घालताना, जीवन संघर्षासाठी सुपीक मनोभूमीकरीता वैचारिकतेची पेरणी केली. या करिता स्वानुभवाचा दाखला देताना म्हणाले की, सिनेमासृष्टीतील प्रचलित मानदंडानुसार लौकिकदृष्ट्या आखीव रेखीव चेहरा नसतानाही, केवळ आतील आत्मविश्वासामुळेच या मोहमयी चित्रनगरीत गेल्या पाच दशकापासून यशस्वीपणे काम करीत आहे.तुमच्या समोर उभा आहे. असा हा नानांचा संमेलनातील आत्मीयतेचा आपुलकीचा प्रेरणादायी नैसर्गिक वावर उपस्थितांची मने जिंकून गेला.
‘अंगारमळा’ या युगात्मा शरद जोशी यांच्या आत्मचरित्राचे लेखक मा. भानू काळे सर संमेलनाध्यक्ष म्हणून लाभणे हि या संमेलनाची मोठी उपलब्धी म्हणावी, आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. काळे सरांनी मुख्य तीन मुद्द्यावर आपले विवेचन मांडले, शरद जोशीचे आत्मचरित्र का लिहिलं, अंगाराकडून ज्योतीकडे आणि तिसरा शरद जोशीचे साहित्य आणि गंगाधर मुटेंनी सुरू केलेली शेतकरी साहित्य चळवळीचा एक भाग म्हणून हे संमेलन, पहिल्या मुद्द्यावर बोलताना, १९९४ मध्ये जेव्हा मी अंतर्नाद मासिक सुरू करण्याकरिता मुंबईवरून पुण्यात स्थायिक झालो. तत्पूर्वी शरद जोशी बद्दल काही त्रोटक स्वरूपात वाचण्यात आलेले होते. कुठे तरी रस्ता रोको केला, आंदोलन केले, अश्या स्वरूपाच्या कृतक बातम्या त्याही वर्तमान पत्रातील तिसऱ्या चौथ्या पानावर. ज्याअर्थाने जार्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईच्या जनतेने आयकॉन मानले होते, तसे शरद जोशीच्या बाबतीत मात्र घडले नव्हते. शेतकरी संघटनेचे निःसीम कार्यकर्ते श्री.बद्रीनाथ देवकरांमुळे शरद जोशींची ओळख झाली. १९९९ मध्ये अंतर्नाद दिवाळी अंकाकरिता ‘स्वयंस्फूर्त कार्यांचं समाजजीवनातील स्थान’ या विषयाच्या अनुषंगाने लेखन मागविण्यात आले होते. त्यांकरिता जोशींनी एक लेख दिला होता, इतरांपेक्षा वेगळ्या धाटणीचा, जो शीर्षकापासूनच स्फोटक होता. ‘बस करा हे समाजसेवेचे ढोंग’ आणि यात त्यांनी ‘स्वार्थ हीच प्रगतीची खरी प्रेरणा आहे’ अश्या आशयाने तथाकथित समाजसेवा आणि समाजसेवक यावर दंभस्फोटी भाष्य केले होते. एकूणच मासिकाच्या वर्गणीदार आणि प्रकृतीनुसार हा लेख थोडा जड वाटल्याने, स्वत: मी संपादनामध्ये त्या लेखामधील अनेक मुद्दे खोडूनही काढले होते. परंतू या लेखामुळे एक मात्र झाले, मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकृष्ट होत गेलो. पाच लाख महिला चांदवड सारख्या ग्रामीण ठिकाणी एकत्र येणं, येतांना दोन भाकऱ्या बांधून अनवाणी पायाने चालणं हे कल्पनातीत होतं. आमच्या मनात असलेल्या स्त्रीमुक्तीच्या कल्पना, ह्या शहरात राहणाऱ्या विद्वान आणि पाच पन्नासच्या संख्येत एकत्र जमणं, अश्या प्रकारे शहरी संस्कारातून आकारास आलेल्या होत्या. एकीकडे ही स्त्रीमुक्तीची व्याख्या आणि दुसरीकडे शरद जोशींनी केलेल्या लक्ष्मीमुक्ती आंदोलनाच्या रूपाने, दोन लाख शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचे नावं सातबाऱ्यावर नोंद करणे, ही घटनाच मुळी ऐतिहासिक. नाशिक आंदोलनात ३१००० हजार आंदोलकांना पोलिसांनी कारागृहात बंद केले होते, मुळात एखाद्या आंदोलनात ३१००० हजार, हा आकडाच मुळी त्या आंदोलनाची व्याप्ती सांगण्यास पुरेसा आहे.त्यावेळी दौलतराव घुमरे नावाचे वकील, ज्यांनी बार कौसील मध्ये एक ठराव मंजूर केला होता की, या आंदोलनातील सर्व लोकांच्या जामिनाकरिता वकिलांनी मोफत काम करावे आणि सर्वांनी ते केले सुद्धा. पुढे त्यांनी दौलतराव घुमरे यांच्या ‘लॉयर’ या आत्मचत्ररित्रातील एक दाखला दिला तो असा ही, जामिनावर सुटलेल्या शेतकरी आंदोलकांची जेव्हा पंगत बसली तेव्हा त्यांना जेवायला वाढण्याकरिता, तत्कालीन जाधव नावाचे पोलीस प्रॉसिक्यूटर यांच्या पत्नी गेल्या होत्या. न्यायाधीशांना देखील कारागृहात जावे लागले, कारण इतक्या मोठ्या संख्येने आंदोलकांना, न्यायालयात आणणे शक्यच नव्हते आणि हे प्रथमच घडत होते. हा इतिहासच मुळातच रोमांचकारी आहे.
पुढे जेव्हा अंगारमळा पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात दौलतराव घुमरे यांच्या उपस्थितीने अख्खं सभागृह भावविभोर झाल्याची अत्यंत भावुक आठवणीस उजाळा दिला. एकदा मी चर्चेदरम्यान, त्यांना म्हटले होते की, तुम्ही जी पुस्तके लिहिलीत, हि पुस्तके म्हणजे शेतकरी संघटक मध्ये जे प्रसंगोपात्य लेखन केलेले आहे, त्याचे हे संकलन आहे. यातून कुठेही तुमचे चरित्र येत नाही. त्यातील एकही पुस्तक हे पुस्तक म्हणून लिहिलेलं नाही. त्यावेळी अत्यंत चर्चेत असलेल्या दोन पुस्तकांबद्दल कल्पना दिली ती म्हणजे, पी साईनाथ यांचे शेतकरी आत्महत्तेवरील ‘Everyone loves a good drought’ या सातशेपानी पुस्तकांत शरद जोशी, शेतकरी संघटना, आंदोलन या बाबतीत साधा उल्लेखही नाही. दुसरे रामचंद्र गुहा यांच्या ‘India after Gandhi’ या पुस्तकांत सुद्धा फक्त तीन वाक्यात, ‘टीकैत यांच्या जोडीने तुम्ही बड्या बागाईतदारांचेच प्रतिनिधित्व करता’, असा अत्यंत चुकीचा तुमच्यावर अन्याय करणारा उल्लेख आहे. आता मला वाटते की, एकूणच शरद जोशी, शेतकरी संघटना, आणि आंदोलन हे पर्व पारदर्शीपणे पुस्तकरूपाने लोकांपुढे जाणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, या करिता शेतकरी संघटनेकडून कुठलीही आर्थिक मदत होणार नाही, कारण संघटनेकडे पेसेच नाही, काय करायचे ते तुम्ही स्वत: बघा. मी होकार दिला. मात्र एखाद्या चरित्र लेखनाकरिता ज्या मूलभूत स्रोतांची आवश्यकता असते, त्यापैकी एकही त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे हे चरित्रलेखन करणे म्हणजे एक दिव्यच होतं. कारण की कुठल्यातरी वैफल्यग्रस्तक्षणी ते त्यांनी फाडून टाकले होते ज्यात त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांचाही समावेश होता. तेव्हा त्यांनी शेतकरी संघटक मध्ये एक निवेदन प्रकाशित केले, त्यात म्हटले होते की, माझ्या बद्दल तुमच्याकडे जी काही माहिती उपलब्ध असेल ती माहिती तुम्ही भानू काळे कडे द्या. विदर्भामधील आंदोलनात जेव्हा शरद जोशींनी स्वतःला रेल्वेरुळावर झोकून दिले, तेव्हा पुरुष मंडळी तुरुंगात असताना केवळ महिलांनी सुरू ठेवलेले हे आंदोलन, ज्यात ६०,००० आंदोलकांना पोलिसांनी बंदिस्त केले होते. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती मध्येही इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं बंदिस्त झालेली नव्हती. नर्मदा धरणातील पाणी कालव्यात टाकण्यासाठीचा गुजरातमध्ये जाऊन केलेला सत्याग्रह. पंजाबातील अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये कुठलीही सुरक्षा न घेता ग्रामीण भागात फिरणे.डंकेल प्रस्तावाचे समर्थन करून जागतिकीकरणाचे १०० टक्के स्वागत करणारी शरद जोशी ही एकमेव व्यक्ती होती. कारण अश्या प्रकारच्या विचाराच्या माणसांना भारतीय विचारवंतामध्ये कुठेही स्थान मिळणे शक्य नाही; हे माहीत असूनही त्यांनी, त्याची पर्वा केली नाही.
त्यांनी कधीही शेतकऱ्याची रांगडी भाषा वापरली नाही, की अंगावरचा टीशर्ट बदलला नाही की ब्यूजीन्स. मी जसा आहे तसाच राहणार. तडजोड केली नाही. पण त्यांची तळमळ प्रामाणिक होती म्हणूनच ते शेतकऱ्याचे पंचप्राण ठरले. त्याच्या शब्दाखातर लाखो माणसे जीवावर उदार व्हायला तयार व्हायची, हा सगळा भारताच्या इतिहासातील अभूतपूर्व अध्याय आहे. परंतू याची नोंद ज्या प्रमाणात समाजात घ्यायला पाहिजे होती त्या प्रमाणात घेण्यात आलेली नव्हती.दुसरा मुद्दा अंगाराकडून ज्योतीकडे... आंदोलनाने आपले प्रश्न सुटणार नाही, याची जाणीव शरद जोशींना होती, एका ठराविक काळात ते आवश्यक असते.एका विशिष्ट क्षणी अंगाराची आवश्यकता असते, ठिणगी पडावी लागते, त्याच्या मते सुरवातीचा कालखंड म्हणजे आंदोलनाचा काळ हा अंगाराचा ठिणगीचा होता.त्यांबाबतचा एक लेखही शेतकरी संघटक मध्ये प्रसिद्ध आहे ‘ठिणगीने आपलं काम केलं’ आता गरज आहे ज्योतीची. स्थिर स्वरूपाचे दीर्घ काळ टिकणारे उपक्रम आता राबवायला पाहिजे. त्यातून चतुरंग शेतीची मांडलेली कल्पना, या मागे त्याच्या स्वित्झर्लंड येथील आठ वर्षे वास्तव्यातील अभ्यास आणि निरीक्षणासह महात्मा ज्योतिबा फुलेंची प्रेरणा होती. मुळात शेतीप्रधान असलेला स्वित्झर्लंड, त्यांची एकही वसाहत नाही, त्यांनी कुठल्याही वसाहतीचे शोषण केले नाही, तरीही युरोपमधील सर्वात श्रीमंत राष्ट्रात ते कायम पहिल्या नंबरवर आहे. याचे कारण त्यांनी शेतीस दिलेली तंत्रज्ञानाची जोड. त्यावेळी २२००० हजार दुध उत्पादक संघ आणि नेस्ले सारखी आंतरराष्ट्रीय कंपनी सोबत शेतकऱ्याची सांगड, यातून झालेली तेथील समृद्ध शेती. सह्याद्री फार्म खऱ्या अर्थाने त्या विचारांचे वारसदार आहे.
तिसरा मुद्दा शरद जोशीचे साहित्य आणि गंगाधर मुटेंनी सुरू केलेली शेतकरी साहित्य चळवळ. यावर बोलताना म्हणाले की, युगात्मा शरद जोशींनी साहित्य आणि साहित्यिक या बद्धलची त्यांची मते इस्लामपूर आणि परभणी येथील भरलेल्या साहित्य संमेलनामधील दिलेल्या भाषणामधून व्यक्त झालेली आहे. भारतातल्या शेतीचं प्रतिबिंब साहित्यात उमटले नसल्याची त्यांना विलक्षण खंत होती. साहित्य ह्या शब्दाची आता व्याख्या अधिक व्यापक करायला हवी. कथा कविता कादंबरी हे ललित साहित्य, हा साहित्याचा एक भाग आहे. त्यापुढे जाऊन वैचारिक साहित्याची निर्मिती व्हावी आणि त्याला साहित्य म्हणून मान्यता मिळावी. विस्टन चर्चिल यांना वैचारिक साहित्याकरिता नोबल पारितोषिक मिळाले असल्याचा दाखला आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी दिला. आणि शेवटी कुसुमाग्रजाची ‘कणा’ या कवितेतील शेवटच्या ओळीचे वाचन करून शरद जोशींप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करीत असताना त्यांना गलबलून आलं. या सर्व मान्यवरांनी आपल्या ओजस्वी वाणीने उद्घाटनसत्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
दोन सत्रात पार पडलेले शेतकरी कवी संमेलन, शाहीर स्व.वामनदादा कर्डक यांचे नातू सुभाष कर्डक आणि दिव्यांग कवीसह एकूण सत्तर कवींनी आपल्या ऊर्जादायी रचनांनी वातावरण निर्मिती केली. नुकतीच विदर्भात गारपीट झाल्याने या अस्मानी संकटाची बोलकी व्यथा, अमरावती येथील प्रसिद्ध कवी सूत्रसंचालक श्री. खुशाल गुल्हाने यांनी आपल्या समर्थ शब्दकळेतून ‘गारपीट’ या कवितेव्दारे उजागर केली. वाशिम येथील प्रसिद्ध कवी लेखक सूत्रसंचालक अनिकेत देशमुख यांनी आजच्या सामाजिक वास्तवाची दाहकता आपल्या ‘च्याटा’ या मार्मिक उपहासात्मक कवितेमधून उपस्थितांपर्यंत पोहचविली. अकोला येथील प्रसिद्ध कवी, निवेदक प्रा. संजय कावरे सर यांनी ‘जसं होईन तसं’ या अत्यंत प्रेरणादायी कवितेमधून शेतकरी आत्महत्या या विषयाची जाणीव जागृती करतांना, दुर्दम्य आशावाद जागवत, आत्महत्या हा उपाय नसून जीवनावरची श्रद्धा हीच श्रेष्ठ आहे, या कवितेने कवी संमेलनास सकारात्मक रित्या उंचीवर नेऊन ठेवले.
शेतकरी गझल मुशायरा हे सत्र, शेतकरी संमेलनामध्ये सुरवातीपासूनच आपला एक वेगळा दर्जा राखत आलेले आहे. कारण शेती माती या विषयाभोवतीचं गझलमंथन केवळ या संमेलनातच घडून येते. महाराष्ट्रातील नामवंत गझलकारांच्या दर्जेदार रचना नजाकतीने केलेल्या सादरीकरणास उपस्थितांनी मनसोक्त दाद दिली. युवा गझलकार आकाश कंकाळ यांच्या “बियाण्यासारखा मृत्यू मलाही दे देवा, किती आनंद होतो रे कुणाचा घास झाल्यावर” अशी अतिशय तरल रचना असो की गझल अभ्यासक संजय गोरडे यांच्या “राब राब राबलो काय लागले हाती, माती माती माती माती माती” अश्या प्रकारे कृषीसंस्कृती आणि कृषीवलांच्या झालेल्या वाताहातीचा चढता आलेख भावनिक ओलाव्याने शब्दात पेरून उपस्थितांना अंतर्मुख केले.
कार्यक्रम पत्रिकेतील निर्धारित सत्रानुसार. ’शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोन’ या परिसंवादात प्रा. डॉ.ज्ञानदेव राऊत यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतीप्रधान साहित्याचा धांडोळा घेतांना, विविध कालखंडातील लेखकांच्या नावांसह त्यांच्या साहित्यकृतीचा वैशिष्ट्यपूर्ण परिचय करून दिला. विशेष म्हणजे डॉ.राऊतांच्या पीएचडीकरिताच्या प्रबंधाचा विषयच, ‘शेतकरी संघटना आणि साहित्याचा अनुबंध’ असा असल्याने, अस्सल शेतीप्रधान साहित्याला विशेष उजाळा दिला. प्रा. विकास पांढरे यांनी विषयाच्या अनुषंगाने, न्हाव्याच्या मुलाने चांगले सलून थाटले.सोनाराच्या मुलाने दागिन्याचे दुकान सुरू केले, म्हणजेच आपापल्या जातीनुसार काम करणारे त्यांच्या पुढील पिढ्यांनी तो व्यवसाय प्रगतिपथावर ठेवण्यात यशस्वी ठरले. मात्र शेतकऱ्याचा मुलगा आपला व्यवसाय पुढे नेऊ शकला नाही हे वास्तव आहे.आज शेतरस्ता, पांदन रस्ता अशी अनेक शेतकऱ्यांची प्रकरणे वर्षानुवर्षे न्यायप्रविष्ठ असून याकडे साहित्यिकांचे लक्ष गेले नाही. ब्राझील इस्राईल येथील शेती उद्योग आणि भारतीय शेती व्यवसाय याचा तुलनात्मक अभ्यास, अश्या प्रकारच्या वैचारिक साहित्याचे प्रतिबिंब अजूनही साहित्यात उमटलेले नाही. सुरेश मोहितकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट कारखान्याचा संदर्भ देत, विषयाच्या अनुषंगाने, कारखान्यामधून उत्सर्जित होणारी राख शेतीमधील पिकांवर साचून झालेला प्रादुर्भाव, घटलेला उत्पादनाचा दर्जा याची साहित्यात अजूनही नोंद झालेली नाही. मधुसूदन हरणे यांनी, ज्याप्रमाणे कारखानदार त्यांच्या उत्पादन निर्मिती करिता विविध स्वरूपाचा कच्चा माल बाजारातून विकत घेत असतो, त्यावर जीएसटी स्वरूपात कर भरत असतो आणि एका ठराविक रकमेनंतर त्याला जीएसटीचा परतावा मिळतो, तसा शेतकरी सुद्धा शेतीकरिता विविध प्रकारची बी-बियाणे कीटकनाशके, यंत्रे आदी खरेदी करीत असतो परंतू त्याला मात्र जीएसटीचा परतावा मिळत नाही. कारण शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात आलेला नाही. हि तफावत साहित्यात येत नाही. या परिसंवादाचे अध्यक्ष ॲड. ललित बहाळे सर आपल्या ओघवत्या घणाघाती प्रहाराने साहित्यिकात जाणीव जागृतीचे काम मार्मिक कानपिचक्या देऊन करीत असतात. याचा प्रत्यय, प्रत्येक संमेलनातील परिसंवादामधून सातत्याने येत आहे. याही परिसंवादात आपल्या अभ्यासपूर्ण अश्या वक्तव्यातून, अध्यक्षीय मनोगतात, म्हणाले की, आम्ही शेतीत राबणारे आहोत, आम्ही आंदोलन करू शकतो, ही आमची ताकद आहे, परंतू साहित्यिकांकडे शब्दांची श्रीमंती असते. शेतीसारख्या रुक्ष विषयास ते आपल्या प्रतिभेने वाचनीय श्रवणीय करू शकतात, या करिता त्यांनी कार्ल मार्क्स यांच्या ‘दास कॅपीटल’ या प्रसिद्ध ग्रंथाचे उदाहरण दिले. रशियन राज्यक्रांती, भारतीय राज्यघटना व त्यातील दुरुस्त्या याचा काळजीपूर्वक अभ्यास जरी केला तरी विपुल प्रमाणात शेती साहित्याची निर्मिती होवू शकते. आणि हा अभ्यास करताना अंकित राहून करू नये. तो पारदर्शीपणे करून आपल्या अभ्यासाच्या कक्षा रुंदाव्यात.जेणे करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या संघर्षाची शेती व्यवसायाची वस्तुस्थिती समाजापर्यंत पोहचण्यास मदत होईल.
भारताकडून इंडियाकडे अर्थात शेती बदलाचे वारे, या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना राहुरी कृषी विद्यापीठाचे मृदशास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे म्हणाले की, ज्याप्रमाणे मानवी शरीराला निरोगी ठेवण्याकरिता त्याची काळजी घ्यावी लागते आजारी पडल्यास वेळीच योग्य तो उपचार करावा लागतो, त्याच प्रमाणे समृद्ध शेतीकरिता निरोगी मातीचीही आवश्यकता आहे. गेल्या ११० वर्षात एकूण २६ वेळा महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असून त्यातील दोन दुष्काळाची तीव्रता ही सर्वात जास्त होती. सातत्याने बदलत गेले हवामान, रासायनिक खतांच्या वापराबाबतचे अज्ञान, एकच एक पीक पेरल्यामुळे पिकांचे न झालेले चक्रीकरन, पशुधनाची खालावत गेलेली संख्या,सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे नष्ट होत गेलेली जमिनीची सुपीकता. शासनाच्या मृदा विभागाकडून केलेल्या एका सर्वेक्षणातून, जमिनी खराब झाल्यामुळे ४० ते ८० टक्क्या पर्यंत उत्पादन क्षमता कमी झालेली आढळून आलेली आहे. हरितक्रांती नंतर सातत्याने वाढलेला रासायनिक खतांचा वापर, आज हेक्टरी १५५ किलो पर्यंत झालेला असून आज गरज आहे ती पिकांची फेरपालट करणे, जैविक खत आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे, पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे. माती आणि पाणी परीक्षण करून घेणे, अन्न सुरक्षा आणि सुरक्षित अन्न याचे जर संतुलन साधायचे असेल तर शेती जिवंत ठेवायला हवी आणि शेती जिवंत ठेवायची असेल तर माती जिवंत राहिली पाहिजे. परिसंवादातील दुसऱ्या वक्त्या शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मा. सीमा नरोडे यांनी विषयाच्या अनुषंगाने, बोलताना म्हणाल्या की, भारत आणि इंडिया अशी मांडणी युगात्मा शरद जोशी यांनी केली होती. जो पर्यंत सरकारचे धोरण बदलणार नाही तो पर्यंत भारत आणि इंडिया मधील तफावत दूर होणार नाही आणि शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार नाही. उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारायला पाहिजे, पाणी बचत व्हायला पाहिजे त्यांकरिता जगभरात जीएम तंत्रज्ञानावर संशोधन सुरू आहे आणि जीएम तंत्रज्ञानाच्या बाजूने आंदोलन करणारी एकमेव शेतकरी संघटनाच आहे. शेतकऱ्यांच्या मुलाला लग्नाकरिता मुली मिळत नाही, कारण प्रत्येकजण मालक व्हायचे सोडून आज नोकर होण्यातच धन्यता मानत असेल तर हे चित्र बदलणार नाही. त्यांकरिता शेतीवर आधारीत छोट्या छोट्या प्रक्रिया उद्योगाची उभारणी करून आपणच आपली उत्पादने निर्माण करून मालक होवू शकतो, भारताचा इंडिया करू शकतो. हे शेती बदलाचे वारे भारताकडून इंडियाकडे नेत असताना, तंत्रज्ञान व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळण्याकरिता व्यवस्थेशी संघर्ष अटळ आहे, तो करावाच लागणार.त्यांकरिता साहित्यिकांनी या बदलांना लेखणीमधून वेग द्यावा. परिसंवादाचे अध्यक्ष मा.अनिल घनवट (अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष ) सरांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात,कोरोना काळात हजारोंच्या संख्येने डोक्यावर बिऱ्हाड घेऊन चालत इंडियामध्ये आलेले भारतीय, यावर आपण एक लेख लिहिला, ‘हतबल भारतीयाचे इंडियातून पलायन’ ऍग्रोवन हे शेतकऱ्यांमध्ये जाणारं वर्तमान पत्र असून, त्यात तो प्रसिद्ध झाला आणि अश्या प्रकारे लेखनास सुरवात झाली हे लेखन लोकांना भावत राहिलं वाचकांनी स्वागत केलं प्रतिक्रियारूपी भरभरून प्रतिसाद दिला.समाजवादी व्यवस्थेमध्ये सरकारचे नियंत्रण असल्यामुळे भाव ठरविण्याच्या अधिकारही सरकारचाच. तो भाव रास्त असायला पाहिजे या करिता युगात्मा शरद जोशींनी उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव अशी मागणी केली त्यांकरिता आंदोलन केलीत. परंतू यश आले नाही. जेव्हा डंकेल प्रस्ताव, गट करार आणि सोबतच जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली तेव्हा मात्र वाटलं होतं आता जग खुलं होणार परंतू व्यापाराचे स्वातंत्र्य फक्त उद्योगांना दिल्या गेले. शेतकऱ्यांपर्यंत हि खुली व्यवस्था येऊ दिली नाही औद्योगिक माल आज जगभरात जातो, परंतू शेतकऱ्यांना मात्र निर्यात बंदी असल्यामुळे त्याच्या मालाला भाव भेटत नाही.हि व्यवस्था बदलण्याची आज आपली जबाबदारी आहे.एकीकडे अन्न ठेवायला जागा नाही, दुसरीकडे मात्र वाढता भूक निर्देशांक अशी वस्तुस्थिती. देशातील प्रश्न सोडवायचे असतील तर शेती मालाला रास्त भाव मिळणे आवश्यक आहे. आता भारत विरुद्ध इंडिया असा संघर्ष थांबवून भारत आणि इंडिया एकत्र येण्याकरिता आपली लेखणी उचलूया, यातच सर्वाचे कल्याण सामावले आहे.
ऍग्रोवनचे संपादक मा. आदिनाथ चव्हाण यांची मा. ज्ञानेश उगले यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीमधूनअनेक मुद्द्यावर सखोल विश्लेषण करताना, महात्मा फुले नंतर शेतकऱ्याचा खरा उद्गार म्हणजे युगात्मा शरद जोशी आणि महात्मा फुले हे पहिले कृषीपत्रकार होते हे त्यांच्या समग्र वाड्मयामधून प्रतिपादित होते. शेतकरी संघटनेने अभ्यासपूर्ण कार्यकर्त्यांची फळी घडविली आहे. अगदी साधी साधी वाटणारी माणसं रडारड न करता आकडेवारीनुसार शेतीविषयावर वस्तुनिष्ठपणे बोलतात हे पाहून आश्चर्य वाटते आणि कौतुकही. साठ टक्के समूह असूनही शेतकरी म्हणून आपण राजकीय ताकद निर्माण करण्यात असफल झालेलो आहे, कारण राजकारणात जातीला प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे हे शक्य होत नाही. ऍग्रोवन हे भूमिका घेऊन काम करणारे वृत्तपत्र असून यातील यशोगाथा वाचून प्रगती करणारेही शेतकरी आहेत. अनेक विषयाचे जागतिक अभ्यासक ऍग्रोवन मध्ये पत्रकार म्हणून काम करतात. साहित्यिकाच्या अंगानेही ऍग्रोवन मधून अनेक नामवंत लेखकांना लिहिते केले आहे. सह्याद्री फार्म हि कृतिशील साहित्याची साहित्यकृती आहे.लालित्यपूर्ण लिहिल्या गेले तरच ते मनामनात पोहचतात. साहित्यिकांनी आपलं अनुभव विश्व विस्तारलं पाहिजे माणूस म्हणून घडवायचा असेल तर ते वाचना मधून शक्य होतं. हि ऊर्जादायी मुलाखत अनेक अर्थाने संस्मरणीय ठरली.
११ व्या संमेलनाच्या उद्घाटनाचे सत्र हे आदर्श म्हणून इतर संमेलनाकरिता ठरावे एवढे बौद्धिक वैचारिक ठरले. खऱ्या अर्थाने सह्याद्री फार्मची उद्योगमय हिरवळ भविष्यातील ‘चतुरंग’ शेतीकरिता पोषक तत्त्व म्हणून हे संमेलन कायम स्मरणात राहील.
- रविंद्र दळवी
नाशिक