शेतकरी संघटनेने सारथी गमावला
आरंभापासून अंतापर्यंत आंबेठाण निवासी होऊन युगात्मा शरद जोशींचा शेजार निभावणारे व शेतकरी संघटनेचे केंद्रीय स्तरावर सारथ्य करणारे बबनराव शेलार शेतकरी संघटनेला पोरकी करून आज पहाटे आपल्यातून निघून गेलेत.
बबनराव केवळ साहेबांच्या गाडीचे ड्रायव्हर नव्हते तर ते त्यांचे बॉडीगार्ड, सेक्युरीटी ऑफिसर, आहारवैद्य आणि लेखनवीसही होते. स्वभावाने मिश्किल, रोकठोक आणि हजरजबाबी होते. ते उच्चकोटीचे विचारवंतही होते. शेतकरी संघटनेचा विचार ज्यांना नेमकेपणाने कळला त्यातही बबनराव अव्वलस्थानी होते. राज्यभरातील कार्यकर्ते आणि नेते यांना जर एखादी बाब नीट कळली नाही तर ते शरद जोशींना थेट गाठण्याऐवजी आधी बबनरावांना गाठायचे. मग शेतकरी संघटनेचा विचार बबनराव आपल्या शैलीत समजावून सांगत त्यांच्या मनातील संभ्रम दूर करायचे.
बबनराव शिस्तीचे आणि वेळेचे पक्के होते. याचा उत्तम नमुना त्यांच्या ड्रायव्हींग कौशल्यात दिसून यायचा. युगात्मा जोशी गाडीच्या दिशेने निघायच्या आधी बबनराव ड्रायव्हींग सीटवर बसून गाडीला चाबी लावून व चाबी फिरवून असायचे. साहेब गाडीत बसले की गेट लागल्याचा आवाज आणि गियर पडल्याचा आवाज, टायर फिरल्याचा आवाज एकाचवेळी यायचा. ज्या गाडीत साहेब जात आहेत त्या गाडीत अन्य कुणी जाणार असेल तर साहेब सीटवर बसण्यापूर्वी त्यांनी गाडीत बसायचे असा बबनरावांचा शिस्तबद्ध नियम असायचा. एकदा साहेब गाडीत बसले की बबनरावांची गाडी अन्य कुणासाठी न थांबता सुसाट निघून जायची. एकदा आंबेठाणवरून पुण्याला जायचे असतांना मला १५ सेकंदाने उशीर झाला आणि साहेब गाडीत बसायच्या आत मी गाडीत बसू शकणार नाही याची मला खात्री झाल्याबरोबर मी दुरून हातवारे करून बबनरावांना "मी येत नाही आहे" असा इशारा करून टाटा-बायबाय केले. बहुधा बबनरावांच्या ते लक्षात आले असावे कारण त्यांनी माझ्याकडे बघून मस्तपैकी स्मित केले.
बबनराव गंभीर होते त्यापेक्षा जास्त विनोदी होते. थोडेसे चेष्टेखोर आणि मस्करीखोरही होते. आम्ही मिळून अनेकांची मस्करी करायचो पण म्हात्रे सरांची व साहेबांची मस्करी करण्याची संधी फारच तुरळकपणे मिळायची. पण मिळाली कि त्या "संधीचे सोने" करायचा आमचा कायमच प्रयत्न असायचा. पद्धतशीरपणे खडा टाकून म्हात्रे सर व साहेबांची जुगलबंदी सुरु करून देणे हा आमचा आवडता छंद असायचा.
एकदा हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर साहेबांनी वेटरला टीप म्हणून शंभर रुपयाची नोट ठेवली. बबनरावांनी मला डोळ्यांनी इशारा केला. मग आमची "आँखोंही आँखोंसे बात हुई." मी लगेच खिशातून दहाची नोट काढून मेनूकार्डात ठेवली आणि ती शंभरची नोट उचलून स्वतःच्या खिशात घातली. हे करताना साहेबांच्या डोळ्याला डोळे भिडवण्याची माझी शक्ती नसल्याने मी दुसरीकडे बघत होतो पण तिरप्या चोर नजरेने साहेबांची प्रतिक्रिया न्याहाळत होतो. या कटाचा सूत्रधार बबनराव आहेत, असा त्यांना पक्का अंदाज आला असावा कारण साहेब बबनरावाकडे आणि बबनराव भिंतीकडे पाहत होते.
साहेबांना सारथी म्हणून बबनराव मिळणे ही स्व. भास्करराव बोरावके यांची देण होती. बबनरावातील कार्यकुशलता ओळखून त्यांनीच आपला सारथी साहेबाना दिला होता. एकदा आम्ही म्हणजे साहेब, म्हात्रे सर, बबनराव व मी भाऊंकडे येवल्याला गेलो होतो. परतताना निरोप द्यायला भाऊ गाडीच्या बाजूला उभे होते. गाडी निघणार इतक्यात भाऊ साहेबांना म्हणाले की, साहेब, तुम्हाला आणखी गाडीचालक पाहिजे असेल तर सांगा, माझ्याकडे आणखी एक आहे. त्यावर साहेब म्हणाले कि आणखी पुन्हा दुसरा नको, आहे तोच परत घेऊन घ्या. त्यावर बबनराव म्हणाले कि ठीक आहे, तुम्हाला माझी आवश्यकता नसेल तर मी थांबून जातो आणि खरेच बबनराव गाडीच्या खाली उतरले. साहेब सुद्धा खाली उतरले आणि ड्रायव्हींगसीटवर जाऊन बसले. त्यांनी चाबी फिरवली आणि गियर टाकणार इतक्यात म्हात्रे सरांनी मागील दरवाजा उघडला आणि बबनरावांना आत घेतले, तोवर गाडी पळायला लागली होती. साधारण एक दीड किलोमीटर अंतरावर साहेबांनी गाडी थांबवली व बबन, माझ्यापेक्षा तूच छान गाडी चालवतोस, असे म्हणत ते आपल्या सीटवर जाऊन बसले.
असे हे बबनराव! सर्वांचे आवडते!! परत एकदा युगात्मा शरद जोशींच्या रथाचे सारथ्य करायला त्यांचेकडे निघून गेले आहेत. लीलाबाई, अभिमन्यू व बळी यांना या धक्यातून सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांना प्रदान करो.
माहिती व तंत्रज्ञान आघाडी, शेतकरी संघटना, महाराष्ट्र कडून बबनरावांना विनम्र अभिवादन!
गंगाधर मुटे
प्रदेशाध्यक्ष
माहिती व तंत्रज्ञान आघाडी
शेतकरी संघटना, महाराष्ट्र