नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अजूनही क्रांतिसूर्य महात्मा फुलेंचे विचार उमजले नाहीत का...?
आज महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती. महात्मा फुले नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त त्यांनी बहुजनांसाठी खुली केलेली विहीर आणि स्त्री शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार इतक्याच गोष्टी आठवतात आणि महात्मा फुले यांची उपलब्ध छायाचित्र दाखवून दरिद्री प्रतिमा नेहमी समोर आणली जाते. पण खरंच महात्मा फुले यांचे कार्य बहुजन सुधारणे इतपत मर्यादित होते का? तर अजिबात नाही.
शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले ज्योतीराव यांनी मोठ्या कष्टाने वडिलांना मदत करून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले व समाजातील अनिष्ठ प्रथा विरोधात आवाज उठवला. इतकेच नव्हे तर त्यांनी उच्च शिक्षणाद्वारे एक यशस्वी व्यावसायिक बनले. व्यवसाय करत असताना त्यांचा देशी विदेशी लोकांसोबत संबंध आला आणि त्यातून भारतीय व पाश्चिमात्य संस्कृतीचा अभ्यास करून त्यांनी भारतीय समाजातील चुकीच्या प्रथांचे उच्चाटन करण्याचे ठरविले. या कामी त्यांना तत्कालीन कर्मठ लोकांनी प्रखर विरोध केला परंतु या विरोधाला ना जुमानता त्यांना समाजातील विविध स्तरातील अनेक जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य केले म्हणून आज आपण एक पुरोगामी राष्ट्राचे नागरिक म्हणून अभिमानाने पाठ थोपटून घेऊ शकतो. न्याय, समता, बंधुता या तीन तत्वांवर महात्मा फुले यांनी आपले कार्य अविरत सुरू ठेवले.
शेतकरी धोरणसंबंधी समाजात मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि जागृती करण्याचे कार्य महात्मा फुले यांच्या व्यतिरिक्त कोणी केल्याचे इतिहासात तरी आढळून येत नाही. “शेतकऱ्यांचा आसूड” या पुस्तकाद्वारे महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे नमूद करताना शेतकऱ्याना दारिद्र्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविला आहे. कर्मकांड आणि धर्मातील अनिष्ठ रूढी परंपरा यांचा त्याग केला तरच शेतकऱ्यांचं भलं होऊ शकतं हा कानमंत्र दिला.
दुर्दैवाने आज महात्मा फुले यांचे नाव फक्त स्वतःचे पुरोगामीत्व दाखविण्यासाठी किंवा बहुजनांची निवडणुकीत मते मिळविण्यासाठी केला जातो ही खूप चिंताजनक बाब आहे. हिंदुत्ववादी लोकांचा नेहमीच फुले यांच्या विचारांना विरोध आहे आणि त्या विरोधात कधी उघड तरी कधी छुप्या पद्धतीने विरोधी कारवाया सुरूच असतात. महात्मा फुले ब्राम्हणेतर चळवळीचे एक मुख्य अंग होते आणि त्यांनी नेहमीच समाजातील भट शाहीला कडाडून विरोध केला परंतु ते कधी ब्राम्हण विरोधी नव्हते कारण त्यांचे कित्येक सहकारी ब्राम्हण समाजातील आहेत.
काही वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली तेव्हा त्यांच्या समोर कोणत्या विचारांवर पक्ष चालवावा यासाठी दोन पर्याय होते. एक महात्मा फुले आणि दुसरे कार्ल मार्क्स. दुर्दैवाने शेतकरी कामगार पक्षाने कार्ल मार्क्स यांची विचारसरणी अंगीभूत केली आणि पुढे या पक्षाची काय अवस्था झाली ते साऱ्या महाराष्ट्राने पहिलेच. शेकापने महात्मा फुले यांची विचारसरणी का अमलात आणली नाही हा काळाच्या आड गेलेला एक अनुत्तरित प्रश्नच आहे. परंतु जर त्यांनी फुलेंच्या विचारांवर पक्ष चालवला असता तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी त्यांना सत्तेत बसवले असते. कालांतराने शरद जोशी यांची शेतकरी संघटना ही संपूर्णपणे महात्मा फुले यांच्याच विचारांवर काम करणारी संघटना ओळखली जाऊ लागली. महात्मा फुले यांच्या नंतर शेतकऱ्यांना त्यांचा कैवारी फक्त शरद जोशी यांच्यात दिसला. पण फुटीचे ग्रहण लागून ही संघटना सुद्धा कमकुवत झाली आणि पुन्हा एकदा बहुजन शेतकरी संकटात सापडला.
महात्मा फुले यांचे विचार इतके आधुनिक आहेत की राजकीय पक्षांनी जर फुलेंच्या विचारांवर विकासाची धोरणे आखली तर या देशाला खरोखर महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पण यासाठी बहुजन समाजातील युवकांनी महात्मा फुले यांचा वारसा चालवून सुधारक बनण्याची नितांत गरज आहे. देशाला भटशाही, अनिष्ठ रूढी परंपरा आणि धार्मिक कर्मकांड यापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहायला हवे हीच महात्मा फुले यांना खरी आदरांजली असेल.
#माझी_लेखणी
#पंकज_गायकवाड
www.PankajSGaikwad.blogspot.com