संपादकीय : अंगारमळा - शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यसूर्य विशेषांक : फेब्रुवारी २०१६
अंगारमळा..... एक नवं नियतकालिक. त्याचा शुभारंभ इतका अनपेक्षितपणे होत आहे की माझाच या अविश्वसनीय घटनाक्रमावर विश्वास बसत नाही आहे. योगायोगाचा योगही मोठा विचित्र असतो. बरेचदा जे जाणीवपूर्वक करायचे असते, ज्यासाठी आपण जीव तोडून प्रयत्न करत असतो आणि नेमके तेच घडत नाही. याउलट कधीकधी असे काही अनपेक्षित योग जुळून येतात आणि कार्य विनाप्रयत्नानेच सिद्धीस जाते की त्या घडामोडी स्वप्नवत वाटायला लागतात. आज माझ्याकरवी एक नवे नियतकालिक प्रकाशित होत आहे हा प्रसंगच मला मोठा विस्मयकारक वाटत आहे. एखादे नियतकालिक सुरू करावे अशी फार पूर्वीपासूनची इच्छा होती हे काहीसे खरे असले तरी या क्षेत्रातला पूर्वानुभव लक्षात घेऊन मी तसा विचार कधीच सोडून दिला होता, हे त्यापेक्षाही खरे आहे.
यावेळेसचा घटनाक्रम तसा दुर्दैवी, दु:खद आणि क्लेशदायकही आहे. यंदाचे दोन दिवसाचे दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे २० आणि २१ फेब्रुवारी २०१६ रोजी आयोजित करायचे निश्चित झाले आणि या निमित्ताने पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरद जोशी यांच्या गौरवार्थ “शेतकर्यांचा स्वातंत्र्यसूर्य” हा गौरव विशेषांक काढण्याचे ठरले आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये तशी जाहीर घोषणाही करण्यात आली होती.
संमेलन आयोजन आणि नियोजनाचे कार्य सुरळितपणे चालू होते मात्र डिसेंबर महिना उजाडला आणि त्यानंतर अकस्मात घटनाक्रम बदलत गेला. दुर्दैवाने शेतकर्यांचा स्वातंत्र्यसूर्य दि. १२/१२/२०१५ रोजी मावळला. साहेबांच्या जाण्यामुळे पंचप्राण निघून गेल्याच्या अवस्थेत एकतर हे संमेलनच रद्द करावे किंवा पुढे तरी ढकलावे, एवढाच पर्याय शिल्लक होता. पण सहकारी म्हणाले की, आता खचून जायचे नाही याउलट अधिक जिद्दीने आपण घेतलेला वसा पुढे नेऊयात. पावले माघारी वळवण्याऐवजी आणखी त्वेषाने शरद जोशींचे अपुरे कार्य पुढे नेण्यासाठी कामाला लागूयात. नियोजितवेळी, नियोजितस्थळी संमेलन घ्यायचे एवढा निर्णय झाला पण “शेतकर्यांचा स्वातंत्र्यसूर्य” हा गौरव विशेषांक काढण्याची जबाबदारी शतपटीने वाढली. शरद जोशी सारखे बहुआयामी व्यक्तिमत्त्व एखाद्या विशेषांकात मावण्यापलीकडे होते तरीपण निदान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा तरी अंक निघायला हवा यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे झाले. त्यातूनच स्मरणिकेऐवजी एखादे नियतकालिकच सुरू करून विशेषांक काढण्याचा प्रयत्न का करू नये, हा विचार बळावला.
शेतकरी संघटनेचा विचार अधिक प्रभावीपणे बिगरशेतकरी आणि शहरी माणसांपर्यंत पोचला पाहिजे अशा व्यापक उद्देशाने चालणारे शेतकरी संघटनेच्या मुखपत्राव्यतिरिक्त एखादे नियतकालिक असावे, असे एक स्वप्न शरद जोशींनी पाहिले होते. नुसते पाहिले नव्हते तर १९८६-८७ च्या सुमारास नाशिक येथून ‘आठवड्याचा ग्यानबा’ हे साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्याची जबाबदारी स्व. मुरली खैरनारांकडे सोपवण्यात आली होती. ‘आठवड्याचा ग्यानबा’ची सुरुवात तर चांगली झाली होती, या कामात खैरनारांनी कठोर परिश्रम घेतले होते आणि शरद जोशींनी त्यांना भरपूर साथ देऊन मौलिक मार्गदर्शनही केले होते परंतू शेतकरी संघटनेमधील तत्कालीन नेत्यांच्या दुसर्याफ़ळीतील काही कार्यकर्त्याकडूनच खैरनारांना प्रचंड त्रास देण्यात आला. त्रासाचे रूपांतर वादात झाले आणि साप्ताहिक बाळशे धरायच्या आतच म्हणजे आठनऊ महिन्यातच बंद पडले. ‘आठवड्याचा ग्यानबा’चा मध्यांतर व्हायच्या आधीच पडदा पाडण्यात आला. तेव्हापासून हा विषयच अडगळीत पडला गेला.
साहेबांच्या जाण्यानंतर आणि शेतकरी संघटनेचे मुखपत्र शेतकरी संघटक सुद्धा एक वर्षापासून बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर अंगारमळा हे नियतकालिक सुरू करण्याचा निर्णय काळाच्या कसोटीवर कितपत फलद्रुप होतो हे सांगणे जोखिमेचे असले तरी एक मात्र खरे की या शरद जोशींनी फुलवलेल्या अंगारमळ्यावरून नामधारण केलेल्या या नियतकालिकाचा जन्मच शरद जोशींसारख्या युगपुरुषाचा गौरव विशेषांक काढून साजरा होत आहे, ही फार मोठी गौरवास्पद बाब मानावी लागेल.
या गौरव विशेषांकाच्या कामी अनेकांची अनमोल मदत झाली. यानिमित्ताने सर्वाचा ऋणनिर्देश करणे अशक्य असले तरी सर्वश्री कडुअप्पा पाटील (जळगाव), विट्ठलराव पवार (पुणे), निवृत्ती करडक (नाशिक), चिमनभाई पटेल (अमळनेर), सतीष देशमुख (अकोट), दासा पाटील कणखर (बुलडाणा), राजू झोटिंग (यवतमाळ), धोंडबाजी गावंडे (वर्धा), सतीश दाणी (वर्धा), शालिक पाटील नाकाडे (गडचिरोली), माधवराव कंदे (लातूर), राजाभाऊ पुजदेकर, विजुभाऊ विल्हेकर (अमरावती) यांच्या भरीव सहकार्यानेच हा विशेषांक आकारास येत आहे, हे नमूद करणे अपरिहार्य आहे. तसेच अंकाच्या जडणघडणीत श्री राम नेवले यांची अत्यंत मोलाची मदत झाली, हेही आवर्जून नोंदवावेच लागेल.
अंगारमळा हे लोकाभिमुख नियतकालिक बनून सृजनप्रेमी शहरी वाचकांसोबतच दुरवरच्या प्रत्येक गावात, गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचून शेतकर्यांच्या मनात शरद जोशींनी चेतवलेला अंगार मशालीत रूपांतर करण्यासाठी निदान खारीचा तरी वाटा उचलण्याइतपत उपयोगी ठरावा, अशी खूणगाठ मनाशी बांधून वाटचाल करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणे गरजेचे आहे. या कार्यात तमाम सृजनशील, सृजनप्रेमी, शेतकरी, शेतकरी हितचिंतक आणि शेतकरी संघटनेच्या खंद्या निष्ठावान पाईकांची सदैव साथ लाभेल, अशी खात्री आहे.
- गंगाधर मुटे
२०/०२/२०१६