करोना माहात्म्य ||७||
भाजीपाल्याच्या भावात, कोरोना गावात
करोनाने मानवजातीची अक्षरश: बंडी उलार करून टाकली आहे. आता संकटाला सामोरे जायचे नाही तर संकटाच्या भीतीने दूर पळायचे आहे. संभाव्य संकटाला तोंड द्यायचे नाही तर आपणच आपले तोंड लपवायचे आहे. संकट आल्यावर रणात उतरून त्याचेशी दोन हात करायचे नसून आपणच आपल्या घरात जाऊन दडायचे आहे. जिवाभावाची व्यक्ती बऱ्याच कालावधीनंतर भेटली तर आता तिला प्रेमभावे आलिंगन द्यायचे नसून दोघांमधील अंतर कटाक्षाने मोजायचे आहे. भावनातिरेकात एखादा आप्त चुकून जवळ आला तर त्याला मागे सरकायला सांगायचे आहे. करोनाने एकंदरीतच मानवी जीवनाच्या काही जुन्या रेशीमवाटा पार उखडून टाकल्या आहेत. आता ह्या रेशीमवाटा तोपर्यंत पूर्ववत व्हायच्या नाहीत जोपर्यंत करोनाचे अस्तित्व भूतलावर आहे. करोनाला समूळ हद्दपार केल्याशिवाय आता यातून मानव जातीची सुटका नाही.
उण्यापुऱ्या सहा महिन्यात ज्या तऱ्हेने करोनाने पूर्ण जग बाहुत घेत बत्तीस लक्ष लोकांपेक्षा जास्त लोकांना संक्रमित केले आहे, इतक्या अल्पकाळात ज्या वेगाने करोनाचा शिरकाव झाला ते पाहता करोना विषाणूची तुलना आगीच्या ठिणगीशीच करावी लागेल. आग विझवली पण एक ठिणगी जरी विझायची शिल्लक राहून गेली तर जसा पुन्हा एका ठिणगीचा आक्राळविक्राळ वणवा व्हायला वेळ लागत नाही, जवळ जवळ त्याच धर्तीवर करोनाची वर्गवारी करावी लागणार आहे. त्यातल्या त्यात अनुकूल स्थिती असेल तर मग आग प्रचंड वेगाने पसरत जाते. आगीवर जसे नुसते नियंत्रण मिळवून उपयोगाचे नाही तर तिची पूर्णतः राख करून टाकायची असते तसेच करोनाला सुद्धा पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकावे लागेल. संबंध पृथ्वीवर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एक विषाणू देखील शिल्लक उरणार नाही, इतके शतप्रतिशत नियंत्रण मिळवावे लागेल. तरच निर्धोक मानवी जीवनशैली परत पुनर्स्थापित होऊ शकेल.
पुढील काही दिवसात दूध, भाजीपाला, किराणा, अनाज व औषध विक्रेते हेच करोना संक्रमणाचे मुख्य संक्रमक ठरण्याची भीती आहे. पैकी मेडिसिनवाले खरोखर काळजी घेतील पण दूध, भाजीपाला, किराणा, अनाज विक्रेते काळजीपूर्वक काम करण्याची शक्यता फार कमी आहे. जर दूध, भाजीपाला, किराणा, अनाज यापैकी काही विक्रेत्यांना करोना संक्रमण झाले तर त्यांच्यात धास्ती तयार होऊन नंतर ते कामे स्वतःहून ठप्प करण्याची, स्वतःच दुकाने बंद करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. बळाचा वापर करून दुकाने बंद करायला भाग पाडणे सोपे असते पण बंद झालेली दुकाने चालू करायला सरकार कोणता मार्ग अवलंबेल व त्याला किती यश येईल, याचे आराखडे बांधणे खरोखरच अवघड आहे.
करोनाचे आव्हान पेलवणे वाटते तितके सहजसाध्य असणार नाही कारण एकदा जर का करोना सखोल ग्रामीण भागात पोचला आणि करोनाचे पाळेमुळे मजबूत व्हायला लागली तर त्याचा नायनाट करणे कठीणच नव्हे तर अशक्यप्राय होऊ शकते. सध्या महानगरापुरता सीमित असलेला करोना पुढच्या टप्प्यात दूरवर खेड्यापाड्यांमध्ये पोहचणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळातही बऱ्यापैकी शेतमालाची खरेदी-विक्री सुरु असल्याने भविष्यात करोनाचा मुख्य वाहक शेतकरीच ठरणार असण्याची दाट शक्यता आहे. संपूर्ण देश स्वतःची व कुटुंबाची सुरक्षा करण्यासाठी आपापल्या स्वगृही थांबलेला असताना शेतकऱ्यांनी सुद्धा जीवावर उदार होऊन घर किंवा शेतीच्या बाहेर पाडण्याचे काहीही कारण नाही परंतु स्वतः शेतकरी आपला माल विकण्यासाठी घराबाहेर पडायला स्वतःच उत्सुक असेल तर कोरोनाचे नियंत्रण आणि ग्रामीण भागातील संभाव्य जीवितहानी या दोन्ही कसोट्यांवर ही बाब धोकेदायकच ठरते. शेतकऱ्याला कुठलेही सुरक्षा कवच न पुरवता, विम्याची तजवीज न करता सरकार किंवा अन्य सामाजिक घटक केवळ हिरव्या ताज्या पालेभाज्या जेवणात दररोज मिळाल्याच पाहिजेत म्हणून घराबाहेर पडून शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करत असेल तर निव्वळ भाजीपाल्याच्या किंमतीत शेतकऱ्यांना करोनाच्या दाढेत ढकलण्यासोबतच ग्रामीण भागात करोनाचा प्रसार करण्याचा हा अधिकृत शासकीय कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे. करोना संक्रमण काळात गावाबाहेर जाऊन शेतमाल विकण्याचे प्रलोभन म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या घरातून बाहेर ओढून काढून करोनावर नरबळी चढवण्याइतका हा गंभीर गुन्हा असणार आहे.
करोनाचे पुढील लक्ष ग्रामीण भारत असणार आहे, असे अगदीच स्पष्ट दिसत आहे. पावसाळी हंगाम येऊ घातलाय. बियाणे, खते, औषधासह अन्य शेतीविषयक साधने, औजारे वगैरे सर्व साहित्य शहरी भागातून ग्रामीणभागात जाणार आहेत. ग्रामीण माणसांचा शहरी माणसांशी संपर्क वाढल्याने संसर्गाचा धोकाही वाढणार आहे. शासनाने या बाबीवर लक्ष केंद्रित करून अधिकृत पुरवठा साखळी तयार करणे गरजेचे आहे. या सर्व पुरवठा साखळ्यांची अधिकृत नोंदणी करून त्यांना सुरक्षा साहित्य पुरवून ओळखपत्र दिले पाहिजे, त्यांना विमा सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले पाहिजे, त्यांना ओळखपत्र देऊन कायम स्वरूपी गळ्यात घालायला सांगितले पाहिजे. निदान दर आठवड्यात या साखळीतील प्रत्येकाची आरोग्य चाचणी झाली पाहिजे. साखळीतील प्रत्येकाला आरोग्य तपासणी प्रमाणपत्र जवळ बाळगायची सक्ती केली पाहिजे. ग्राहकांनी सुद्धा फक्त अशा अधिकृत व्यक्तींकडूनच साहित्य खरेदी केले पाहिजे. विक्रेता आणि ग्राहक यांच्यात जर करोनामुक्त व्यवहार झाला तरच करोना संक्रमणाला काबूत ठेवणे शक्य होणार आहे.
शेती आणि शेतकऱ्यांसमोर आधीच उभ्या असलेल्या प्रचंड समस्या या करोना संकटाने आणखीनच उग्र करून टाकलेल्या आहेत. त्या समस्यांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी पावले उचलली गेली पाहिजेत. पीककर्जासाठी आता बँकामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होणे सुरु होईल. बँका माणसांनी तुडुंब भरायला लागतील. जिथे माणसांना धड उभे राहण्यासाठी पाय ठेवायला जागा नसते तेथे सोशल डिस्टंसिंग वगैरे कसे पाळले जाईल, याचे उत्तर तर साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा गवसण्यासारखे नाही.
कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे
हे तर नेहमीचेच रहाटगाडगे आहे. पण संभाव्य करोना संक्रमणाची शक्यता लक्षात घेता यावर्षी शेतकऱ्यांना बँकेत न बोलावताच जुन्या तपशिलाच्या आधारे कर्जमंजुरी करून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली पाहिजे. जुन्या कर्जाचे नूतनीकरण करून टाकले पाहिजे. करोनाला वेशीबाहेर थांबवायचे असेल तर शासनाने खंबीरपणे ऐतिहासिक निर्णय घेण्याचा कणखरपणा दाखवला पाहिजे.
- गंगाधर मुटे आर्वीकर
~~~~~~~

प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/3272727169418615
https://www.facebook.com/gangadharmute/posts/3277637755594223
शेतकरी तितुका एक एक!
पाने