Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका - करोना महात्म्य ।।२।।

करोना माहात्म्य ||२||
तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका
 
       मनुष्य मरणाला भीत नाही आणि हाच करोनाशी लढताना सगळ्यात मोठा अडचणीचा भाग ठरणार आहे. जो मरणाला भीत नाही, तो स्वतः बेसावध असतो आणि दुसर्‍याचे जीवनही बेसावधपणे धोक्यात घालू शकतो. मनुष्य शौर्यवान असतो हा त्याचा उपजत गूण असतो पण हाच उपजत गूण करोनाशी लढताना नुकसानकारक ठरणारा आहे. कालपर्यंत माणसाची जी शक्तिस्थाने होती तीच शक्तिस्थाने आज रोजी करोनाने दुर्बलस्थाने करून टाकलेली आहेत.  मनुष्याने वाघ, सिंह, हत्ती यासारख्या बलाढ्य आणि हिस्त्र प्राण्यावर विजय मिळवला, तेव्हा शौर्याची आवश्यकता होती. साधने वापरायला शौर्य आवश्यक असते पण करोना हे संकटच मुळात आगळेवेगळे असल्याने कालपर्यंतची सर्व मापदंड आज रोजी रद्दबातल झालेली आहेत. त्यामुळे माणसाला आपल्या एकंदरीतच लढण्याच्या व संरंक्षणाच्या कौशल्याची नव्याने आखणी करावी लागणार आहे. आज मापदंड इतकी बदललेली आहेत की, कालचे कौशल्य, गुणवत्ता, प्रावीण्य आज याक्षणी पूर्णतः निरुपयोगी झालेले आहेत. 
 
       जेव्हा जेव्हा समाजावर सार्वत्रिक संकट येते तेव्हा उपाययोजनात्मक प्रबोधनाची सक्त आवश्यकता भासते पण करोंनाने यासंदर्भात सुद्धा होत्याचे नव्हते करून टाकले आहे. जनप्रबोधन करायचे असेल तर एक सोशल मीडिया सोडला तर बाकी सर्व मार्ग बंद झालेली आहेत. लाऊडस्पीकर लावून दहावीस हजार लोकांची सभा घेऊन त्यांना विषय समजून सांगणे, त्यांचे प्रबोधन करणे वगैरे  आजच्या घडीला शक्य राहिलेले नाही. यानंतर कधी शक्य होईल तेही सांगता येत नाही, अशा विचित्र परिस्थितीमध्ये करोनाने जगाला आणून सोडले आहे. मी जिथे राहतो ते एक छोटेसे खेडेगाव. केवळ अडीच हजार लोकसंख्येचे. एक दवंडी देऊन किंवा लाऊडस्पीकर लावून पूर्ण गाव एकत्र गोळा करून तासाभरात त्यांना जे सांगणे सहज शक्य होते ते आज अशक्य झाले आहे. 
 
 
       मी सध्या दररोज गावात फिरतो आणि केवळ पाच-सहा लोकांना एकत्र करून अर्थात सोशल डिस्टन्स राखून त्यांच्याशी संवाद करतो. त्यांना याविषयी जे माहित नसेल ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो. फेसबुक आणि व्हाट्सअप यासारखे संवादाचे माध्यम जवळ-जवळ घरोघरी पोचले असल्याने आणि त्यावर करोना विषयक भरपूर माहिती व मजकूर घरोघर पोहोचत असल्याने पुन्हा लोकांना भेटून वेगळी माहिती द्यायची काय गरज आहे? असा अनेकांना प्रश्न पडतो. पण एक लक्षात घेतले पाहिजे की, निव्वळ साधनांच्या आधारे माणसाला संबंधित विषयाची माहिती पूर्णपणे करून प्रशिक्षित होता आले असते तर शाळा-कॉलेज चालवण्याची काय गरज होती? विद्यार्थ्यांना पुस्तकेच देऊन सोशल मीडिया व वेबसाईटच्या माध्यमातून माहिती पुरवून मोकळे होता आले असते. पण माणसाचा माणसाशी थेट संवाद याचा वेगळा प्रभाव असतो.  प्रबोधन हे तसेच काहीसे असते. एखाद्या विषयाची एखाद्या माणसाला किती माहिती मिळाली आणि किती ज्ञान प्राप्त झाले यापेक्षा त्याला ज्या माहितीची अनिवार्य गरज आहे, ते मुद्दे कळले की नाही, हे जास्त महत्त्वाचे असते.
 
       लोकांची संवाद साधत असताना ३५ वर्षाच्या एका धडधाकट तरुणाने मला सांगितले की, मी काहीही काळजी घेणार नाही. जे व्हायचे ते होईल. जगायचे असेल तर जगेल आणि मरायचे असेल तर मरेल. मी मरायला सुद्धा तयार आहे. माणसाचे असेच असते. त्याला असे वाटते की मला सर्व कळलेले आहे पण नेमके जे कळायला हवे तेच त्याला कळले नसते. करोनामुळे एखादा तरुण मरणाची भीती सोडून जर बेशिस्त वागत असेल आणि त्यामुळे जर त्याला करोना संक्रमण झालेच तरी तो मरेलच अशी काहीही शक्यता जवळ जवळ नाही. गेल्या चार महिन्यातली आकडेवारी असे सांगते की करोनामुळे सगळ्यात जास्त भीती १० वर्षाच्या आंतील  मुलांना आणि ६० वर्षावरील व्यक्तींना जास्त असते. १० ते ६० या वयोगटातील व्यक्तींचे मरण्याचे प्रमाण जवळजवळ अत्यल्प आहे. म्हणजे एखाद्या ३५-४० वर्षाच्या धडधाकट व्यक्तीने बेमुर्वतपणे वागून जर करोना घरात नेला आणि पूर्ण कुटुंबाला संक्रमित करण्यास हातभार लावला तर जो मरणाला भीत नाही त्याला मरण येण्याची शक्यता कमी आणि कुटुंबातील जी करोन्याची गुन्हेगार नाहीत, ज्यांनी पूर्णपणे शिस्त पाळली, घराच्या बाहेर पडले नाही, इतरांशी वागताना, बोलताना तोंडाला मास्क लावला, सोशल डिस्टन्स सांभाळले, वारंवार हात धुतले तरीसुद्धा त्यांचेवर गंडांतर येणार आहे. घरातील निष्पाप आणि निर्दोष बालक आणि वृद्ध धोक्यात येणार आहेत. 
 
       कुणी स्वतः मरणाला भीत नसेल तर हरकत नाही पण त्या व्यक्तीला त्याचा लहानसा मुलगा मरण पावला चालेल का? त्याचे वृद्ध आई-वडील त्याला मेलेले चालतील का? याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे की त्याला हे अजिबात चालणार नाही. त्याचे त्याच्या कुटुंबावर, मुलावर, आईवडिलावर अपार प्रेम असते. जर आपल्या काळजाचा तुकडा मरून गेला तर जगणारा मनुष्य आयुष्यभर सुखाने आणि समाधानाने जगू शकणार नाही. ही अवस्था मरणापेक्षाही वाईट अशी अवस्था असते. यापूर्वी अनेक महामारी आल्यात. प्लेग, कॉलरा, देवी या महामाऱ्यांनी शतकापूर्वी प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे. गावच्या गाव उद्ध्वस्त झालेली आहेत. अनेक गावांमध्ये फक्त मारुतीची देऊळ उरले आणि बाकी पूर्ण गाव व सर्व कुटुंबे सरसकट मृत्युमुखी पडलेली आहेत. आजही सर्वत्र रानावनात एकटे मारुतीचे मंदिर दिसते, ज्याला आपण रीठ म्हणतो; तो सारा प्लेग, कॉलराचे प्रताप आहेत. पण करोना वेगळा आहे. संक्रमण झालेल्या पैकी २,३,४,५  टक्केच लोकं मरण्याची शक्यता आहे आणि बाकीची सर्व वाचण्याची शक्यता आहे. जे मरतील त्यात कुणाचा बाप,  कुणाचा मुलगा, कुणाची बायको तर कुणाचा नवरा मरणार आहे आणि ही माणसाच्या आयुष्यातली सर्वात क्लेशदायक व पीडादायक अवस्था आहे. जर अशा अवस्थेला पोहोचायचे नसेल तर माणसाला तातडीने स्वतःला बदलावे लागेल. नव्याने नवी जीवनशैली अंगीकारावी लागेल. त्याशिवाय अन्य पर्याय नाही. इथे एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी की, बाहेरचा करोना तिथून उचलून घरात आणण्याचे पाप मुख्यत्वे १० ते ६० या वयोगटातील व्यक्तीच करणार आहेत आणि त्याचे पाप मात्र १० वर्षाखालील व ६० वर्षावरील व्यक्तींना भोगावे लागणार आहे. हे कृत्य म्हणजे आपल्याच प्राणप्रिय व्यक्तीची आपणच हत्त्या करण्यासारखे आहे.
 
       एका अंगाने विचार केला तर मला करोना एखाद्या सज्जन पुरुषासारखा, निरूपद्रवी ऋषिमुनीसारखा आणि न्यायप्रवीण न्यायाधीशासारखा दिसतो. करोना निर्दोष व्यक्तीला हानी पोहोचवत नाही पण जो स्वतःहून त्याच्या पर्यंत चालत जाईल आणि त्याची गाठभेट घेण्याचा गुन्हा करेल त्याला अजिबात सोडत नाही. म्हणजे "करेल तो भरेल" आणि "जैसे ज्याचे कर्म" या थीमवर तो तंतोतंत काम करतो. हा एकंदरीतच प्रश्न धास्तीचा नसून केवळ काळजी घेण्याचा आहे. घराबाहेर पडू नये, पडायची गरज पडलीच तर डोळ्यात तेल ओतून पुरेपूर काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स राखावे आणि वारंवार साबणाने हात धुवावे...... इतकी साधी काळजी ज्या माणसाला घेता येणार नसेल तर त्याचा किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कुणाचा तरी घात होण्यापासून त्याला त्याची विद्वत्ता, त्याचे प्राविण्य, त्याचीडिग्री, त्याची अपरंपार हुशारी, त्याचा धर्म, त्याची जात, त्याचा पक्ष, त्याचा देव, त्याचे विज्ञान, त्याची साधने, त्याची मालमत्ता, त्याची संपत्ती वगैरे यापैकी कुणीही त्याला वाचवू शकणार नाही कारण त्याची गाठ अन्य कुणाशी नव्हे तर थेट करोनाशी आहे. इतके कायम लक्षात ठेवलेच पाहिजे कारण पक्षपातीपणाने तुम्हाला झुकते माप द्यायला करोना म्हणजे तुमच्या जातीचा पुढारी नव्हे आणि तुमच्या आवडीचा तुमचा प्राणप्रिय पक्षही नव्हे...!
 
गंगाधर मुटे, आर्वीकर
    दि. ०७/०४/२०२०
(क्रमशः)
=============
टीप : हा लेख आपण माझ्या नावासकट किंवा माझ्या नावाशिवाय किंवा तुमचे नाव घालून कुठेही शेअर किंवा कॉपी करून पेस्ट करू शकता.
=============
 
या लेखमालेतील इतर लेख http://www.baliraja.com/carona इथे उपलब्ध आहे.

                 Carona

Share