"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग ३
मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा
अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा एकदाच्या पूर्ण झाल्या की नंतरच माणसाचं खरंखुरं माणूस म्हणून आयुष्य सुरू होतं. सर्व सजीव प्राण्यासमोरचा प्राथमिक आणि मूलभूत प्रश्न स्वसंरक्षणाचा असतो, त्यानंतरच उदरभरणाची पायरी सुरु होते. मनुष्य आणिि त्याचे पाळीव प्राणी सोडले तर आजही स्वसंरक्षण हाच मुख्य प्रश्न अन्य प्राणिमात्रांच्या समोर कायमच आहे. त्यामुळेच स्वाभाविकपणे सर्व प्राणिमात्रांमध्ये स्वसंरक्षणासाठी बचाव आणि आक्रमण हे दोन विशेष गुण आपोआपच विकसित झालेले आहेत.
गुणवैशिष्ट्यामध्ये मनुष्य हा सुद्धा इतर प्राण्यांपेक्षा फार वेगळा नसल्याने त्याच्यामध्ये सुद्धा बचाव आणि आक्रमण हे दोन्ही गूण निसर्गतःच विकसित झालेले आहे आणि इथेच नेमकी मानवतेची घाऊकपणे सदैव कुचंबणा होत आहे. माणसाचे नैसर्गिक शत्रू उदाहरणार्थ हिंस्त्र पशूपक्षी, वन्यप्राणी वगैरेपासून (वन्यप्राणी माणसाचे शत्रू नसून मित्र आहेत अशा दृष्टिकोनातून या मुद्याचा विचार करू नये. ज्याअर्थी मनुष्य हिंस्त्र पशूपक्षांना भितो आणि जीवाला धोका आहे असे तो स्वतः समजतो, त्या अर्थी शत्रू आहे असे गृहीत धरावे) माणसाच्या जीविताला अजिबात धोका उरलेला नाही. त्यामुळे माणसाच्या नैसर्गिक शत्रू सोबत लढाई करणे, त्यांच्यावर आक्रमण करणे ही संधी आता माणसाला उपलब्ध नाही. नैसर्गिक रित्या मिळालेली आक्रमणाची कला व्यक्त करण्यासाठी माणसाला शत्रू उरला नसल्याने त्याचा दुष्परिणाम असा झाला की माणूस आता माणसावरच आक्रमण करायला लागला. येथे एक उदाहरण नमूद करावेसे वाटते की, एकमेकाशी आपसात लढणारी प्राणिजात म्हणून कुत्री ही जात मान्यता पावलेली आहे पण जेव्हा त्यांच्यावर जर कुण्या अन्य प्राण्याने आक्रमण केले तर अशा स्थितीत सर्व कुत्री एकवटतात, एकजीव होतात आणि शत्रूशी लढतात. पण शत्रू नसेल तर मग मात्र सर्व कुत्री आपसातच भांडतात.
मनुष्यजातीचे गणितही त्यापेक्षा फार वेगळे नाही. माणसाच्या स्वभावात बचाव आणि आक्रमण ही दोन्ही कौशल्ये निसर्गदत्त आलेली आहेत. भूतकाळात झालेल्या लढाया, युद्ध यामागे माणसाचा आक्रमणकारी स्वभावच कारणीभूत आहे. भांडणतंटे सुद्धा आक्रमण व बचावाचे सौम्य स्वरूपच आहे. शाब्दिक आक्रमणाच्या पातळीवर बघितले तर तुरळक अपवाद सोडले तर प्रत्येक मनुष्य भांडखोर असतो. भांडण्यासाठी मनुष्य नवनवी कारणे शोधत राहतो. शत्रूशी तर भांडतोच पण शत्रू नसेल तर मग तो शेवटी मित्रासोबत तरी भांडणतंटा करून आपली हौस पूर्ण करून घेतो. बायकासुद्धा बायकांशी भांडतात. त्यांना सार्वजनिक नळावर किंवा पाणवठ्यावर भांडायची संधी उपलब्ध नसेल तर त्या निदान नवऱ्याशी तरी निष्कारण भांडून आपली हौस पूर्ण करून घेतात. पण त्यातही गंमत अशी आहे की आपण कुणालाही "तुम्ही भांडखोर आहात का?" असा प्रश्न विचारल्यास उत्तर नकारार्थीच येते. पण हे सत्य नाही. मनुष्यातील हेच दुर्गुण प्रामुख्याने संतांनी, समाजसुधारकांनी आणि महापुरुषांनी ओळखले होते म्हणून त्यांनी माणसाच्या तमोगुणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे धर्म, पंथ, संप्रदाय, शाळा, विद्यापीठे वगैरे स्थापन केलीत. संतांनी भजने लिहून, प्रवचने करून माणुसकीची शिकवण देण्याचा प्रयत्न केला. पण सुधारक बदलत गेले पण माणूस काही सुधारला नाही. परिणामतः माणसामध्ये माणसाचे कमी आणि प्राणिमात्रांचेच गूण जास्त आढळतात.
अरे माणूस माणूस, जसा निर्ढावला कोल्हा
धूर्त कसा लबाडीने, रोज पेटवितो चुल्हा
कोल्ह्यासारखी लबाडी, सरड्यासारखी गरजेनुसार हवा तसा रंग बदलण्याची वृत्ती, बगळ्यासारखा ढोंगीपणा, सापाच्या विषासारखी विखारी भाषा, गाढवासारखा अविचारीपणा, माकडासारख्या कोलांटउड्या वगैरे माणसाला हमखास अंगवळणी पडलेले असते. काही केल्या अंगवळणी पडत नाही ती एकच भाषा म्हणजे मानवतेची भाषा. पण त्यातही गंमत अशी आहे की, जे निसर्गदत्त मिळते ते शिकावे लागत नाही व शिकवावेही लागत नाही कारण ती मूळ मानवी प्रवृत्ती असते. मानवी मूळ प्रवृत्ती अमानुष असते. माणसाला माणसासारखे जगायचे असेल तर मूळ मानवी प्रवृत्तीवर ताबा मिळवून मानवतेचा ध्यास धरणे, हीच मानवतेच्या कल्याणाची रेशीमवाट आहे; मानवतेच्या कल्याणासाठी दुसरी वाट उपलब्ध नाही.
- गंगाधर मुटे आर्वीकर
==========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ३ - दि. ८ फेब्रुवारी, २०२० - मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी
http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
![](http://www.baliraja.com/sites/default/files/ar/3-rw.jpg)