Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कणसातील माणसं : काव्य संग्रहाचे समीक्षण

लेखनप्रकार: 
समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
काव्यसंग्रह समीक्षण
कणसातली माणसं         .

कविता संग्रहाचे नाव : कणसातील माणसं
(प्रातिनिधिक शेतकरी काव्य संग्रह)
प्रकाशक : अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ

     

          "कणसातील माणसं" हा प्रातिनिधिक शेतकरी काव्य संग्रह अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ वर्धा यांनी प्रकाशित केला आहे. काव्य संग्रहाचा पाया शेती तथा शेतकरी हा आहे. शेती तथा शेतकरी या विषयाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आलेला संबंध हा समान धागा प्रत्येक कवितेत आहे. कवितेतील भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्या गेल्याने त्या जिवंत वाटतात. यातील कवितांमध्ये कवीची संवेदनशीलता प्रकट झाली आहे. आजवर शेती ह्या विषयावर मराठी साहित्यिकांनी जे काही लिहले आहे त्यात हा प्रातिनिधिक शेतकरी काव्य संग्रह एक वेगळा आणि दखल घेण्यासारखा प्रयोग निश्चितच आहे

         "कणसातील माणसं" ह्या प्रातिनिधिक शेतकरी काव्य संग्रहात प्रस्थापित तथा काही नवोदित कवी अशा एकुण एकतीस कवींच्या एकोणसाठ कवितांचा समावेश झाला आहे. काव्य संग्रहाचे संपादन गंगाधर मुटे यांनी केले आहे. काव्य संग्रहाच्या शीर्षकाला अनुसरून एक समर्पक आणि योग्य मुखपृष्ट काव्य संग्रहाला लाभले आहे. पेरणीच्या हंगामात शेतात घाम गाळणा-या शेतक-यांचे दृष्य आणि आभाळात फुलत असलेले स्वप्न मुखपृष्टावर आले आहे. ज्याप्रमाणे कणसातील प्रत्येक दाणा जर मातीत रुजला तर शेत फुलवतो आणि जर जात्यावर दळला तर पीठ होऊन भुकेल्याची भाकर होतो. "कणसातील माणसं" सुद्धा अशीच असतात अगदी कणसातील दाण्यासारखी. काव्य संग्रहाच्या मुखपृष्टासाठी ओमप्रकाश देसले यांचे अभिनंदन. मलपृष्ठावर जेष्ठ ग्रामीण साहित्यिक तथा दुस-या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्री. रा. रं. बोराडे व्यक्त केलेला आशावाद पुर्ण करणारा हा काव्य संग्रह नक्कीच आहे हे काव्य संग्रहाचे वाचन केल्यावर वाटले.

     

          कणसातील माणसं या प्रातिनिधिक काव्य संग्रहातील पहिल्याच 'शीक बाबा शीक रडायला शीक' या कवितेत प्रा. इंद्रजित भालेराव म्हणतात...

       
"जातील हे दिस आणि होईलही ठीक
 उद्या तुझ्या शेतामधी उधाणेल पीक
 गाळलेल्या घामासाठी रस्त्यावर ठीक
 हक्कासाठी लढ बाबा मागू नको भीक"

ही कविता परिस्थितीने खचल्यापेक्षा शेतक-यांनी आपल्या हक्कासाठी संघर्ष कराण्याची शिकवण देते.

        शेतक-यांच्या जीवनाचा सर्वांग विचार या प्रातिनिधिक काव्य संग्रहात झाला आहे. या काव्य संग्रहात वास्तविकता दर्शविणा-या कवितांचा समावेश झाला आहे हाच आशय प्रा. श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेतही दिसतो त्यांचा

     
"जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले
 हे वृत्त आज आले की ते मरून गेले"
 हा मतला मन सुन्न करून जातो.

          शेतक-यावर बरेचदा लिहल्या जाते पण शेतकरी महिलेवर फारसे लिहल्या गेलेले नाही. शेतक-याला प्रत्येक पावलावर साथ देणा-या त्याच्या पत्नीच्या संवेदना 'घामाची लावणी' या कवितेतून व्यक्त करतांना प्रा. ज्ञानेश वाकूडकर म्हणतात...

       
"माझी माती, माझा माणूस
 माझे चारी धाम...
 राजसा,
 इथेच गाळू घाम..!"

 या कवितेतून शेतकरी महिला मातीला समर्पित आयुष्य जगतांना आपल्या नव-याला पदोपदी धीर देतांना दिसते.

        १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला परंतु अद्यापही शेतक-यांपर्यंत स्वातंत्र्याचे फायदे पोहचलेच नाही. नेमकी ही व्यथा शेषराव मोहिते आपल्या 'आमच्या पंधरा ऑगस्ट कवा हाय?' या कवितेतून व्यक्त करतात.
        पिढी दर पिढी कर्जाच्याओझ्याखाली जगणा-या कास्तकाराच्या आर्थिक ताळेबंदात केवळ देयतेचेच विवरण वाढत राहते ही गंभीर परिस्थिती 'ऑडीट" या कवितेतून व्यक्त करतांना रावसाहेब कुंवर म्हणतात...

     
"नेमाने असं एक
 सक्षम प्राधिकरण
 जे मागू शकेल
 माझ्या बापाला उध्वस्त करणा-या
 पापाचा खुलासा
 आणि देऊ शकेल दिलासा
 फासावर लटकवून
 या व्यवस्थेला..."

सरकारी यंत्रणेचे अपयश ही कविता अधोरेखित करते.

        शेतकरी कुटुंबात शेतकरी आत्महत्या करण्यापुर्वीची भीषणता दर्शना देशमुख "काळी माय" या कवितेतून व्यक्त करतांना म्हणतात...

     
" 'बा' च्या डोळ्यादेखत शेताच्या लिलाव होत होता
  'बा' च्या डोळ्यात पाण्याचा टिपुससुद्धा दिसत नव्हता"

ही कविता अंगावर काटा उभा करणारी आहे.

        पर्यावरणीय समतोल ढासळल्यामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. शेतक-याचे पुरामुळे होणारे नुकसान "जुगार" या कवितेत संघमित्रा खंडारे रेखाटतांना म्हणतात...

     
"पीक हालतं डोलतं सारं करपून गेलं
 या बाजिंद्या पाण्यानं काई खरं नाई केलं"

सर्व काही पणाला लावून शेवटी बळीराजाची ओंजळ रिती असते. ही कविता पापण्या ओलावून जाते.
   

        आपल्या देशाचे आर्थिकदृष्ट्या दोन भाग पडले आहेत. ज्यामध्ये एक भाग हा दुस-या भागाच्या शोषणावरच जगतो आहे आणि तो जास्तीतजास्त शोषण करीत चालला आहे. दुस-या भागाचं मात्र शोषण सुरूच आहे हा शोषक म्हणजे इंडिया आणि शोषित म्हणजेच भारत ही आर्थिक विषमता गंगाधर मुटे यांच्या गझलेत व्यक्त करतांना ते म्हणतात...

     
"पाहून घे महात्मा इथली शिवार राने
 केला भकास भारत शोषून इंडियाने"

तर "स्वदेशीचे ढोंगधतूरे" या कवितेत ते म्हणतात...

"एक आणखी झाडवरती लटकून मेला काल
 तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल"

अशा शब्दांत सरकारी धोरणावर ते घणाघाती प्रहार करतात.

        'कणसातील माणसं' या काव्य संग्रहातील कवितांना येथल्या मातीचा गंध आहे. शेतक-यांच्या भावनेची जाण आहे. आत्महत्येचा विचार करणा-या शेतक-याला किशोर बळी आपल्या "जीवन एक लढाई" या कवितेतून जगण्याची नवी उमेद देतात. नझीम खान यांची "माझा शेतकरी बाप" ही कविता शेतकरी बाप आपले संपूर्ण आयुष्य या मातीत पेरून बसल्यानेच कोरड्याठण मातीत  पीक उभे असल्याचे सांगते. प्रकाश मोरे यांच्या "जय जवान जय किसान" या कवितेत कापूस पिकवणा-या शेतक-यांचे यथार्थ चित्रण आले आहे. राज पठाण यांच्या गझलेत वैविध्यता आहे. याशिवाय 'कणसातील माणसं' या काव्य संग्रहातील रवि धारणे यांची "आलो तुझ्या न दारी", रविंद्र कामठे यांची "बळीराजा", रावसाहेब जाधव यांची "कदाचित", विनिता कुलकर्णी पाटील यांची "काळ्या आईच्या कुशीत", शैलजा कारंडे यांची "घरटं", राजीव जावळे यांची "बाबा गेले आभाळात", धीरजकुमार ताकसांडे यांची "चाहूल", रामकृष्ण रोगे यांची "झोपी गेलं सरकार", विनिता माने पिसाळ यांची "भरवसा", डाॅ. रविपाल भारशंकर यांची "तू जाण माणसा", विनोद मोरांडे यांची "भय", श्रीकांत धोटे यांची "भारत माझा देश आहे", दिपक चटप यांची "माझी माय", नयन राजमाने यांची "मित्रा", बद्दीउज्जमा बिराजदार यांची "शेतकरी", दिलीप भोयर यांची "शेतक-यांचा गळभास" आणि शरद ठाकर यांची "हाडाचे शेतकरी" ह्या कवितांचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. उर्वरीत इतर समाविष्ट कविता सुद्धा काळजाचा ठाव घेणा-या आहेत.

        कणसातील माणसं या काव्य संग्रहातील कवितांचे काव्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण करायचे झाल्यास गीत, गेय कविता तथा छंद मुक्त या प्रकारच्या जवळजवळ तेहत्तीस कविता, तेरा गझला, नऊ मुक्त छंदातील कविता, दोन अष्टाक्षरी कविता, एक लावणी तर एका मात्रा वृत्तातील कवितेचा समावेश झाला आहे. अभंग ह्या काव्यप्रकाराची अनुपस्थिती इथे जाणवली. काव्य संग्रहात काही पानांवर समास कवितेनुरूप असायला हवा होता. शेती-शेतकरी या विषयावरील हा प्रातिनिधिक शेतकरी काव्य संग्रह बहुधा पहिलाच काव्य संग्रह असावा ज्यात प्रस्थापित तथा काही नवोदित कवींच्या जे महाराष्ट्राच्या कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तथा पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक विभागाचे प्रतिनिधीत्व करतात यांचा समावेश झाला आहे.
        शेतक-यांच्या दुःखाचे भांडवल करून साहित्य क्षेत्रात नाव कमविण्यापेक्षा शेतीमधली गरिबी आणि शेतक-याच्या आयुष्यातील लाचारीचे जगणे संपविण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतक-यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्यासाठी लेखणी झिजली पाहिजे हा उदात्त विचार "कणसातील माणसं" हा प्रातिनिधिक शेतकरी काव्य संग्रह प्रकाशित करण्यामागे आहे.

         ग्रामीण जीवन आणि शेतकरी जीवन हा फरक अधोरेखित करणारा हा काव्य संग्रह आहे. "कणसातील माणसं" ह्या प्रातिनिधिक शेतकरी काव्य संग्रहाच्या पहिल्याच आवृत्तीत तीन हजार प्रति प्रकाशित झाल्या आहेत हे विशेष दखल घेण्यासारखे आहे. काव्य संग्रहाची किंमत ₹ शंभर असून काव्य संग्रहाचे साहित्यिक मूल्य बघता ही रक्कम माफक आहे. प्रगल्भ शेती साहित्यकृती निर्मितेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊलं म्हणून "कणसातील माणसं" ह्या प्रातिनिधिक शेतकरी काव्य संग्रहाचे रसिकांनी अवश्य स्वागत करावे.

निलेश कवडे अकोला
मो. 9822367706
------------------------------------------------------

Share

प्रतिक्रिया