नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी आत्महत्या आणि वास्तव
संपूर्ण जगात भारत हा कृषिप्रधान कृषिसंस्कृतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो भारतीयच मूळ या कृषिव्यवस्थेत स्थिरावलं असून आपण सर्व अनादी काळापासून चालत आलेल्या कृषिसंस्कृतीचे उपासक, अगदी भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर पहिली पंचवार्षिक योजनादेखील कृषिक्षेत्रावरच आधारली होती. जिथे बारमाही वाहणाऱ्या मोठमोठ्या नद्यांवर बांधलेली अजस्त्र धरणे,सुपीक समृद्ध अशी उपजाऊ जमीन,मोठमोठ्या कृषीविषयक वस्तूचे कारखाने,शासनाच्या समाजाच्या सर्व स्तरासाठी असणाऱ्या कृषीविषयक विविध योजना, एवढे सर्व असूनसुद्धा जगाचा पोशिंदा बळी,शेतकरी,कास्तकार,कुणबी आजच्या घडीला नाकारत्मकतेच्या शेवटच्या पायरीवर उभा असून तेथून पुढे असलेल्या आत्महत्येच्या खोल खाईत दिवसानुदिवस ढकलला जात आहे,कुठे शेताच्या बांधावर विष घेऊन,तर कुठे भर सभेत आपलं जिणं झुगारून देत आहे,तर कुठे झाडाला टांगला जात आहे.
संपूर्ण भयावह अशीच स्थिती थोड्या अधिक फरकाने सर्वत्र दिवसानुदिवस अधिकच गळद होत असतांना मनात असंख्य प्रश्न घोंघावत राहतात आणि सहजच वाटून जात अरे असं का? कोण कुठे कमी पडतो तो बळी,शासन,राजकीय अनास्था,निसर्ग, कि निसर्गाचा लहरीपणा प्रश्न अनेक मात्र उत्तरे तीच ती.आजच्या घडीला शेती आणि शेतीकामाविषयीची उदासीनता गावपातळीवर मोठ्या प्रमाणात वाढीला लागलेली दिसत असून माझेच खेड्यातील मित्र आज घरच्या शेतीत कामाला न जाता हॉटेलात, ट्रॅव्हल गाडीवर काम करणे या सारखी वेठबिगारीसारखी कामे करताना दिसत आहे त्यामुळे शेतीच्या कामात कुटुंबप्रमुखाला मदत न झाल्यामुळे तो कौटूंबिक स्तरावर एकटा पडल्याचे चित्र दिसत आहे खरं म्हणजे शेतकऱ्याच्या फरफटीची ओढाताणीची सुरवात हंगामाच्या सुरवातीपासूनच सुरु होते आणि पीकहाती येईपर्यंत ती तशीच सुरु राहते साधारणतः जून जुलै हा हंगामाचा महिना याच महिन्यात बी बियाणे खते,कीटकनाशके या सारख्या नेहमीच्या आवश्यक वस्तूंची गरज असते आणि जवळपास सर्वच शेतकऱ्याची हीच कसोटीची वेळ असते आणि या सर्वांचे नियोजन करण्यासाठी सरकारकडे पुरेसा अवधी असतांनाही या नेहमीच्या बाबीचे नियोजन न होता हंगामात साधे बी बियाणे शेतकऱ्यास रास्त भावात देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे चित्र दरवर्षी दिसत आहे आणि हीच वस्तुस्थिती आहे. मग व्यापारी वर्गाकडून या बाबींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून प्रचंड प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग होतांना दिसते आणि चढ्या दराने विकत घेण्याची पाळी शेतकऱ्यावर येते परिणामी त्याचे आर्थिक नियोजन कोलमडून हंगामात बँकेकडून सावकाराकडून कर्ज घेण्याची पाळी त्यावर येते.कधी कधी बी बियाण्याच्या दुकानावर एवढी गर्दी उसळते कि पोलिसांना पाचारण करावे लागते आणि झालेल्या लाठीमारात शेतकऱ्याला आपला जीव सुद्धा गमवावा लागल्याच्या घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत इथे सुद्धा शेतकरी व्यवस्तेचा बळी ठरतो.
आजकाल तंत्रज्ञानाच्या वापराने परंपरागत बियाणे नाहीशे झालेले असून नवनवीन कंपनीचे बी बियाणे बाजारात हंगामात दाखल होत असून शेतकरी सुद्धा आपल्या जमिनीचा पोत. बीबियाणाची उपयुक्तता इत्यादीबाबतची कोणतीही खातरजमा तपासणी न करता केवळ जाहिरातीला बळीपडून असे बीबियाणे घेण्याकडे उत्सुक असतो असेही निदर्शनास येते की मग असे पेरलेले कुठे उगवते तर कुठे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही इथे सुद्धा शेतकऱ्याचे अज्ञान जाहिरातींवरील सरकारचे नियंत्रण आणि वितरण व्यवस्तेतील त्रुटींचा बळी शेतकरी पडतो.
साधारतः दोन वर्ष्यापुर्वी मराठवाड्यात जून जुलै महिन्यात पाऊसच पडलेला नव्हता महाग बियाणे मातीमोल झालेले आणि साधा कोंबही फुटलेला नव्हता शेतकरी मात्र कर्जबाजारी झालेला नंतर मात्र विदर्भात प्रचंड गारपीट होऊन हाती आलेलं पीक डोळ्यासमोर जळत होत आणि आपलाच मरण निसर्गाच्या लहरीपणामुळे आपल्याच डोळ्यांनी शेतकरी हताशपणे पाहत होता वर्ष दर वर्ष कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी,वादळवारा तर कधी गारपीट अश्या प्रकारे शेतकऱ्याची निसर्गाने प्रत्येक टप्प्यावर परीक्षाच घेतलेली होती निसर्गाच्या लहरीपणाबाबतच प्रा. डॉ.गिरीश खारकर याचा एक शेर आठवतो
'' अवकानी पावसानं आलं डोयामध्ये पाणी
सांगा आता कसा गाऊ निया अभयची गाणी"
शासनातर्फे परिस्तिथीनुसार ओला कोरडा दुष्काळ जाहीर केला जातो फारच मोठी ओरड झाली तर पॅकेज नावाचे हुकमी अस्त्र बाहेर काढले जाते पिकांची आणेवारी ठरवली जाते पंचनामे केले जाते गावपातळीवर तर पंचनाम्यासाठी सुद्धा चिरीमिरीची अपेक्षा केली जाते उध्वस्त झालेल्या त्या बळीकडून. एक तर सूत्रबद्धपने फारच कमी पंचनामे केले जाते आणि झाले तरी शासनाकडून पंचनाम्याची शेतकऱ्याच्या हक्काची रक्कम शासनाकडून बँकेत जमा होण्यात एवढा कालावधी लागतो की तोपर्यंत त्याची भीक नको पण कुत्रा आवर अशी स्तिथी निर्माण होऊन पुरता हवालदिल झालेला असतो, आशा कोमेजलेल्या असतात आणि येथेही नोकरशाही कडून तो शोषित झालेला दिसतो.
या सर्व दृस्टचक्रातून पुढे जात असताना शेतकरी आपला तयार झालेला माल विकण्याचे स्वप्न मनात रंगवीत असतो घरी जमलेले लग्न असते मुलांच्या शिक्षणाची तरदूद असते त्यावरच त्याच्या संपूर्ण वर्षाचे आर्थिक घडामोडीचे सूत्र आधारलेले असते परंतु इथेही नियती त्याला साथ देत नाही बाजारात प्रत्येक वस्तूचे भाव ठरलेले असते निर्मात्याला त्याच्या वस्तूचे भाव ठरविण्याचा अधिकार असतो परंतु जगाच्या या पोशिंद्याला त्याने निर्माण केलेल्या वस्तूचे भाव ठरविण्याचा अधिकार मात्र नसतो आणि शासनाकडूनही ते ठरलेले नसतात उसाची उचल कापसाचे हमी भाव मिळण्यासाठी त्याला दरवर्षी रस्त्यावर उतरावे लागते हि खरे तर शोकांतिकाच दरवर्षी संघर्ष केल्यावरही हमीभाव ठरविण्यासंदर्भात सरकार वेळखाऊ धोरण अवलंबविते या लागलेल्या विलंबात शेतकरी पुरता खचून जातो त्याची सहनशीलता संपून जाते आणि मग नाईलाजाने तो आपला सोन्यासारखा माल मातीमोल भावाने व्यापाऱ्याच्या घशात टाकतो येथेही सरकारची शेतकर्यांबाबतची अनास्था एक प्रकारे शेतकऱ्याची फसगतच करीत असते.
मात्र या गोष्टीचे सोयरसुतूक कोणालाच नसते सतत वाढत जाणारी महागाई,सावकाराचे दृष्टचक्र, निसर्गाचा लहरीपणा या ना त्या हाताचे बाहुले तो कळत न कळत बनत जात असतो आणि एक दिवस तो कुठे शेताच्या बांधावर तर कुठे झाडाला आपला जीव टांगून देतो मात्र तथाकथीत नेते, कैवारी,पुढारी, विविध परिषदांमधील स्वयंघोषित तज्ञ या आत्महत्येचे दूषण शेतकऱ्याच्या व्यसनाधीनतेला,त्याच्या कर्जबाजारीपणा,त्याच्या अज्ञानपणाला देऊन मोकळे होतांना दिसतात आणि खरी परिस्थिती दूरच राहते.कुणीही त्याच्या मूलभूत प्रश्नाकडे आपुलकीने पाहत नाही.का नकोसा होतो हा सुंदर जीव आणि कोणाला वाटत हो मरावं आणि तेही आजच्या काळात परंतु ज्याचं जळते त्यालाच कळते.
जेव्हा एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या होते ती काही त्या एकट्या शेतकऱ्याची आत्महत्या नसते,संबंध कुटुंबाचा प्रमुख गमावला असतो आणि त्यापेक्षाही भयंकर हि असते कि ज्याकारणाने तो मेलेला असतो, त्याने आत्महत्या केलेली असते ती शेती ती नापिकी त्यामुळे पुढील पिढीचा शेतीविषयक नकारात्मक दृष्टीकोन आपोआपच तयार होत जातो आणि हि बाब आपल्या देशाच्या कृषिसंस्कृतीला लाजिरवाणी अशीच.कुठलाही शेतकरी आधी हा मनुष्यच असतो कुणाचा तरी बाप असतो कुणाचा तरी मुलगा असतो नवरा असतो कुणाचा तरी भाऊ असतो आणि मग अर्थार्जनाच्या सोईनुसार तो शेतकरी ठरत असतो.आणि असा हा माणूस ते शेतकरी असणारा जीव सहसा आपला जीव देत नसतो.ती एक मानसिक प्रक्रिया असते आणि फार लांबून चालत आलेली निराशेची वाट असते अशी वाट कि ज्या वाटेवर आशेचा एकही किरण मिळणार नाही अशी जेव्हा त्या वाटसरूंची धारणा पक्की होते त्या दिवशी तो वाटसरू आत्महत्येच्या खोल दरीत स्वतःला झोकून देतो त्या वाटेवरचा एक प्रवाशी संपतो पण ती वाट मात्र तशीच चालत राहते आणि इतरही प्रवाशी चालतच राहतात त्या आशेच्या एका किरणांच्या शोधात कुणीतरी या वाटेला आशेचं, विश्वासच,आपुलकीच वळण द्यायला हवं.फार काही लागत नसत या जीवाला आधारासाठी, शेतकऱ्याच्या गरज अगदी ढोबळ मानाने पाहिल्यास हंगामात माफक दारात वेळेवर बीबियाणे उपलब्ध करून देणे,शेतमालास वेळेत हमीभाव देणे,शेतमालाची विक्री पनण व्यवस्था सुटसुटीत करणे नफाखोरीवर, सावकारीवर अंकुश ठेवने,जेणेकरून त्याला त्याचा मोबदला वेळेत मिळेल अशी व्यवस्था करणे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यास आधार देऊ शकेल त्याचे मूलभूत प्रश्न सोडू शकेल हि सर्व शक्ती शासनात,आणि राज्यकर्त्याच्या इच्छाशक्तीत आहे. परंतु निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सातबारा कोरा करणे वीज बिल माफ करणे अश्या सारख्या गुळगुळीत वेळखाऊ घोषणा करणे म्हणजे त्या बळीशी केलेली प्रतारणाचं होय, मला वाटते शेतकऱ्याचे वीज बिल माफ करण्याऐवजी त्याला वीज बिल भरण्यास सक्षम करणे त्याच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी मदत करणे आणि आहे त्याच योजनाची सक्षम पणे वेळेत प्रभावीपणानं शेवटच्या घटकापर्यंत अंमलबजावणी करणे पण असे आढळत नाही ज्या प्रमाणे पोलिसांचे यश हे चोर पकडण्यात नसून चोरी होऊच नये अशी व्यवस्था निर्माण करण्यात असते त्याच प्रमाणे आत्मह्त्या केलेल्या शेतकऱ्यास मदत करणे म्हणजे चोर पकडणे आणि आत्महत्या होऊच नये अशी व्यवस्था करणे म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यास आधार देणे हे होय.
शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर बऱ्याचदा त्या कुटुंबाला मदत करतांनाही तथाकथित कैवाऱ्याच्या भूमिकेतील मंडळी आपल्या सोईनुसार राजकारण करतांना दिसतात वास्तविक पाहता महाराष्ट्रातील बहुतेक मंत्री,नेते हे शेतकरी कुटुंबातीलच असून शेतकऱ्याच्या भरोश्यावरच इच्छित स्थानापर्यंत पोहचले असूनसुद्धा विधानसभेत,संसदेत या विषयीची वास्तववादी चर्चाच करतांना दिसत नाही जणू काय शेतकरी मेला काय आणि जगला काय याची कोणालाच पर्वाच नसते यात आशेचं किरण म्हणजे श्री नाना पाटेकर आणि श्री मकरंद अनासपुरे यांनी नाम या संस्थेमार्फत आत्महत्या केलेल्या कुटुंबाला आर्थिक रूपाने मदत कार्याला आता लोकचळवळीचे रूप येऊ लागले आहेत.
एक निरीक्षण या ठिकाणी नोंदवतो मागील दोन वर्षांपूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता आणि तो सतत पडतच होता त्यामळे शेतमालाची प्रत खालावली होती जेव्हा शेतमाल तयार झाला तेव्हा सुद्धा प्रचंड गारपीट झालेली होती त्यामळे शेतमालाची अधिकच बिकट अवस्था झालेली होती कसाबसा उरलेला माल शेतकरी मोठ्या उमेदीने अन्नधान्य कृषिमहोत्सवात विकण्यासाठी म्हणजेच थेट ग्राहकापाशीच आलेला होता परंतु गम्मत म्हणजे तेथेही निसर्गाने त्याची पाठ सोडली नव्हती त्या तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात धुवाधार पाऊस आलेला होता आणि अन्नधान्याचे नुकसान केलेले होते.म्हणजे निसर्गाच्या लहरीपणाचा काळ्सच.प्रत्येक घटक त्याच्या विरोधात होता तरी त्याची जिद्ध सलामत या ठिकाणी प्रसिद्ध गझलकार कवी श्री.नितीन देशमुख यांचा एक शेर आठवून जातो
"जरी वांझ माझे पुरे शेत आहे
तरी पेरणीला बिया नेत आहे "
केवढा दुर्दम्य आत्मविश्वास फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेण्याचं कसब ते भान जिद्दीने उभं राहण्याची उमेद त्या काळ्या आईने मातीने त्याला दिलेली असते फक्त गरज आहे त्याच्याकरिता थोड्या नियोजनाची त्याला समजून घेण्याची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला त्याचे मूलभूत हक्क देण्याची, नाही तर हे जर असेच चालले तर एक दिवस परत अन्नधान्य हे दुसऱ्या देशातून मागविणे भाग पडेल आणि जो देश अन्नधान्याच्या बाबतीत दुसऱ्या देशावर अवलंबून असतो त्या देशाची प्रगती हि अर्थहीनच.
रवींद्र अंबादास दळवी
3 श्याम रेसिडेंसि रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ
डीजीपी नगर नाशिक 422006
मो. न.9423622615
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने