पहिले शेतकरी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्षांचे भाषण

अ. भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलानाच्या या शेतीसाहित्य प्रवाहात सामील झालेल्या सर्वांचे मी मन:पूर्वक स्वागत करते. विचारमंथनावर भर देणारे व व्यापक स्वरुपात आयोजित झालेले हे ऐतिहासिक संमेलन आहे. या निमित्ताने शेती आणि शेतकरी जीवनावर आजपर्यंत लिहिले गेलेले साहित्य हा विषय ऐरणीवर आला आहे. आजपर्यंत अनेक साहित्यिकांनी शेतकर्यांविषयी लिहिण्याचा, कविता करण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही. पण त्या सर्व कविता, सर्व कथा शेतकरी या देशाचा एक बाशिंदा म्हणूनच लिहिल्या गेल्याचे दिसते. शेतकरी हा अभ्यासाचा विषय आहे, हा विचार त्यात आढळून येत नाही. शेतकरी केवळ बाशिंदा नव्हे तर पोशिंदा आहे. शेतकरी हा या समाज घटकातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे, या दृष्टिकोनातून मात्र लिखाण झालेच नाही. आयुष्याचे रहाटगाडगे ओढताना व देश जगवताना त्याला काही आयुष्य असेल, त्याची काही स्वप्न असतील, त्यालाही जीवनात कुठे निवांतपणा हवा असेल, असा विचार कोणत्याही साहित्यात उमटला नाही. त्याच्या बद्दलची कणव शिवाजी राजे, ज्योतिबा फुले, गाडगे बाबा यांच्या विचारातून दिसून येते; पण त्याचा खोलवर विचार पुढच्या साहित्यात दिसून आला नाही. आमच्या सारख्या सुशिक्षित म्हणविणार्यांच्या तर गावीही शेतकर्यांच्या गहन आयुष्याची जाण नव्हती. हे साहित्य वाचून शेती म्हणजे मौज मजा, हिरवळीत मन हरवून जाणारे दृश्य, मोटेचे पाणी, खिल्लारी बैलजोडी, गडी माणसांचा राबता, परसदारावरची ताजी भाजी, दूध-दुभतं, दही, लोणी आणि वर मस्त पैकी हुरडा पार्टी या सगळ्या गोष्टींचा बाजच काही वेगळा असावा असा भास होत असे. हीच सगळी वर्णने शेती विषयक काव्यातून, कदंबर्यामधून वाचायला मिळत होती.
१९८० साल उजाडलं. शेती शेतकरी यांच्या समस्यांवर भाषणं होऊ लागली, आंदोलनं होऊ लागली आणि पूर्वी डोळ्याच्या ऑपरेशन नंतर बांधलेली हिरवी पट्टी काढली की पुन्हा स्पष्ट दिसत असे, तसेच शेतीच्या हिरवळी आडचे प्रश्न आम्हाला लख्खपणे दिसू लागले. “चार झोपड्यांचे खेडे मला लखलाभ” यातला फोलपणा जाणवयला लागला. पुन्हा पुन्हा शेतीशी संबंधित साहित्य उलगडण्याचा प्रयत्न केला पण त्यात खरी शेती, खरा शेतकरी, त्याचे प्रश्न याचा मागमूस ही नव्हता. एखाद्या रम्य नाटकाचे चित्रण व कथन जसे मुंबई पुण्यात बसून लिहिल्या जात असत तोच फोलपणा यात दिसून आला, शेतीचे सुंदर चित्रण चौपसी चिरेबंदी वाड्यातच हे सत्य गाडून राहिले असते जर शरद जोशींचे शेती विषयक खरे साहित्य दर्शन झाले नसते तर.
शरद जोशींच्या शेती विषयक साहित्यातून शेतकर्यांचे खरेखुरे प्रश्न पुढे आले. कारण हे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी टिपले, एक एक गाव, खेडे, मोठे शेतकरी, छोटे शेतकरी, शेतमजूर जे या मानव जातीच्या उत्कर्षाचा पाया होते, तेच या जमिनीत गाडले गेले होते. गावातल्या पाटलांकडे गेल्यावर फक्त समोरचा तक्तपोस, त्यावरची चादर आणि बैठक सोडली तर आत नुसताच अंधार. जर ५० एकर जमिनीच्या मालकाकडे अंधार असेल तर ज्यांच्याकडे १०, १५ एकर किंवा भूदानाची २ एकर असेल तर त्यांचं काय? घरची शेती वाहून चार दिवस दुसरीकडे मजुरीला जाणे हीच त्यांची जीवनशैली.. पाटलीन शेतात कामात गढलेली, म्हातारा बाप कुठंतरी दोरखंड वळत, आजी फाटकी गोदडी शिवत, छोटी मुलं शेण गोळा करत किंवा छोटी भावंडं सांभाळत आहे, हेच चित्र सर्वदूर खेड्यात दिसत असे. हे दु:ख, विदारक चित्र बघायला कोण येणार? कारण गावात जायला रस्ता नाही. एखादी बस किंवा गाडी चुकून-माकून गेली तर धुळीने अभ्यंग स्नान होत असे. गावाच्या बाहेर येऊन दु:ख सांगायचे कोणाला? जो गावातून नोकरीला गेला तो फक्त शेतीतील पीक मागायलाच आला. बदल्यात “तुला शेतीच करता येत नाही” असा सल्ला देऊन गेला. खूपच कणव वाटली तर आपले जुनेरं कापड ठेवून गेला. पुढार्यांचे तर बरेच बरे होते. पाच वर्षातून एकदा यायचे. शेती विरोधी कायदे करताना मूग गिळून बसायचे. मत घेताना गोडगोड बोलायचे. मग तो शेतकरी कोणाकडे व्यथा मांडणार?
शेतकर्याचे चित्रण योग्य शेती न करणारा, लोकसंख्येत वाढ करणारा, व्यसनी, अडाणी, दारुडा हेच समाजापुढे मांडल्या गेले. योग्य प्रकारे शेती का करता आली नाही, याचा अभ्यास कोणी केला का? लोकसंख्या वाढू नये म्हणून आरोग्याची दखल कोणी घेतली होती का? अडाणी नसावा म्हणून शिक्षण दिल्या गेले काय? व्यसनी व दारुडा होऊ नये म्हणून त्याच्या आयुष्यात, भविष्य-वर्तमानात बर्यापैकी जगण्याची संधी कधी निर्माण केल्या गेली का? हे सर्व प्रश्न ज्यांना दृष्टी आहे, मन आहे त्यांच्या करिता मन हेलावून टाकणारे आहेत. ज्यांना सत्य समजून घ्यायचे नाही त्यांच्या करिता विचार न केलेलाच बरा!
उत्तम शेती ज्याच्या स्वप्नरंजनात आपण १९८०-८५ पर्यंत जगलो (काही आजही जगत आहेत.) ती कनिष्ठ कशी झाली? शेतकरी एकाएकी आळशी कसा ठरला? व्यसनी का झाला? याचं उत्तर जर साहित्याने शोधलं असतं तर शरद जोशींना गेली ३५ वर्षे शेतीचे सत्य साहित्य शोधण्यात व ते जगन्मान्य करण्यात घालवावे लागले नसते आणि शेतकरी चळवळ आणखी पुढे गेली असती. या साहित्य संमेलनाकडून मला शेतकर्यांच्या व्यथा, कथा, काव्य इतक्या पुरत्याच मर्यादित अपेक्षा नाहीत. या सर्व साहित्यिकांनी सत्य शोधन करून शेतकरी विरोधी कायद्यांवर हल्ले चढवणे गरजेचे आहे असे मला वाटते. शेतकर्याला भीक नको आहे. तो पोशिंदा आहे. अठरा पगड समाजाला काम देण्याची त्याची क्षमता कोणी मोडून काढली याचा शोध घेणे आवश्यक आहे.
अन्नदात्याला कर्जबाजारी का व्हावे लागले, याचे उत्तर आजच्या सुशिक्षित समाजापुढे साहित्याच्या माध्यमातून मांडून, आज पर्यंत उपेक्षीत, दुर्लक्षित असलेल्या शेतकरी समाजाचे खरे वर्णन यावे ही अपेक्षा आहे. शेती, शेतकरी, शेती प्रश्न, कायदे, अर्थव्यवस्था या सर्व गोष्टींवर सत्य प्रकाश टाकणारी ग्रंथरचना आदरणीय शरद जोशींनी केलेली दिसून येते. शेतकरी साहित्याची ही वाट चालण्याकरिता पथ प्रदर्शनाचे काम अंगारमळ्यातील साहित्य करू शकेल याची मला खात्री आहे. शेती, शेतकरी जीवनाचा भविष्यवेध घेण्याकरिता हे संमेलन मैलाचा दगड ठरेल अशी म. गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वर्धा भूमीत भरलेल्या पहिल्या शेतकरी मराठी साहित्य संमेलनाकडून माझी अपेक्षा आहे.
- सौ. सरोज काशीकर
स्वागताध्यक्ष
(दि.२८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे संपन्न झालेल्या पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष सौ. सरोज काशीकर यांनी केलेल्या प्रास्ताविक भाषणाचा संपादीत भाग)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------