नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
'शेतकऱ्यांच्या १३ आत्महत्यांपैकी ९ मदतीस पात्र ' अशी बातमी वाचून मन अस्वस्थ झालं ... आपण त्याला जगण्याच्या लायक ठेवलं नाही आणि मेल्यावरही त्याला अपात्र ठरवत आहोत !! जगाला पोसणार्यालाही जिथे असं स्वतःला संपवावं लागतं ,अशा देशाचे आपण नागरिक आहोत ,याची लाज वाटली ... मरणाचा घास होऊ पाहणार्या कास्तकाराला काही सांगावंसं वाटलं .... त्यातून उमटलेली ही कविता ...
जीवन एक लढाई
घाव होतील पावलोपावली
वार होतील ठायी ठायी
कधी खचून जायचं नाही
असं मैदान सोडायचं नाही
नको लावूस फास गळ्याला
तुला जगवंल काळी आई
हे जीवन एक लढाई
कधी हिंमत हारायची नाही ॥धृ.॥
तुझ्या पोराचा बघ जरा मुखडा
त्याला म्हणतोस काळजाचा तुकडा
बघ पोरीचं हासरं रूप
तिला शिकायचं आहे खूप
तुझ्या घरात बिमार माय
बाप म्हातारा करील काय
किती राबून राबून थकली
तुझी बायको बघ किती सोकली
गोठ्यातल्या मुक्या जनावराचाही
विचार कर गड्या काही
हे जीवन एक लढाई
कधी हिंमत हारायची नाही ॥१॥
कास्तकारी हे कठीण काम
तुझ्या जीवाला नसे आराम
जरी मातीत आटवलं रक्त
शेतमालाला मिळेना दाम
तुझं जीणं भारी खडतर
हे सगळं सगळं खरं
पण तुझ्या ह्या प्रश्नावर
आत्महत्या नसे उत्तर
घाबरण्याने तुझ्या अशा
गड्या पर्वत झाली राई
हे जीवन एक लढाई
कधी हिंमत हारायची नाही ॥२॥
'शाही' लोकांची ही लोकशाही
त्यांच्या छातीत काळीज नाही
असं कसं हे स्वातंत्र्य आलं
तुझ्या जीवनाचं मातेरं झालं
एकजुटीनं सत्तेशी झगड
नाक दाबून तोंड तिचं उघड
घात आजवर जिनं तुझा केला
टाक जाळून ह्या व्यवस्थेला
पेटून ऊठ,जरा आवळून मूठ
तुझ्या दुनिया झुकेल पायी
हे जीवन एक लढाई
कधी हिंमत हारायची नाही ॥३॥
- किशोर बळी
--------------------------------------------------------------