नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मला आत्महत्त्या करायचीय! (एकांकिका)
मला आत्महत्त्या करायचीय!
होय, होय. मला आत्महत्त्याच करायचीय!
काय म्हटलं? आत्महत्त्या का करायचीय? अरे शहाण्या! तू स्वत:ला शहाणा समजतोस ना? विद्वान समजतोस ना? तज्ज्ञ म्हणवतोस ना?...... आणि तुला इतके साधे वास्तव देखील कळू नये?
नाहीच कळणार! कळणार तरी कसे? तू ठरला पुस्तकी ज्ञानाचा महामेरू. एसी मध्ये बसायचं, तीन पुस्तकं वाचायची आणि स्वत:ला तज्ज्ञ म्हणून मिरवायचे. यापुढे तुला समजते तरी काय रे?
अरे, तुला काहीच नाही कळलं. माझी व्यथा, माझे दु:ख तुला नाहीच कळले रे!
काय म्हणालास? आत्महत्त्या करणे म्हणजे पळपुट्याचे लक्षण आहे? भित्रेपणाचे लक्षण आहे? नामर्दाचे लक्षण आहे?
च्यायला! मायला तुझ्या!!
अरे तू जे बोलतोस ते मला माझ्या आईनेच लहाणपणी शिकवलंय रे. प्रगाढ पंडीताचा आव आणून तू जे मार्गदर्शनात्मक बोलतोस ना, ते अत्यंत भिक्कार दर्जाचे आहे रे. भिक्कार नाही तर काय म्हणू? जे मला लहाणपणीच कळले ते तू आता सांगतोस? मी अज्ञानी आहे असे समजून किंवा तुला जेवढी अक्कल आहे, तेवढी मला नाही असे समजून तू जे बोलतोस ना? ते आम्हा शेतकर्यांच्या शेंबड्या पोरालासुद्धा कळतय रे!
खरं तर तुम्हा विद्वानांच्या बुद्धीची कीवच करायला हवी. काय आहे रे तुमच्याकडे? कष्ट करण्याची ताकद? घाम गाळण्याची ऐपत? मातीशी इमान राखण्याचा प्रामाणिकपणा? स्वस्तात खाल्लेल्या अन्नाला जागण्याचा कृतज्ञपणा? यापैकी काय आहे रे तुमच्याकडे? काहीच नाही.... काहीही नाही! बरं ते असू दे. निदान अभ्यास करण्याची वृत्ती तरी? एखाद्या विषयाच्या खोलात शिरण्याची प्रवृत्तीतरी? शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अथक परिश्रम घेऊन सखोल चिंतन करण्याची ऐपत तरी आहे का रे तुझ्याकडे?
काहीच नाही.... काहीही नाही बघ तुझ्याकडे! तुला स्वत:चे अन्न स्वत: तयार करता येत नाही. स्वत:चे कपडे स्वत: तयार करता येत नाही. हे बघ तुला काहीही करता येत नाही. केवळ शेतीच्या लुटीतून निर्माण झालेल्या संचयावर बांडगुळासारखे जगायचे, यापलिकडे तुझी कुठलिच पात्रता नाही बघ. पण.....
ज्यांच्या बुद्धीची कीव करावी, तेच आम्हा शेतकर्यांच्या बुद्धीची कीव करायला निघालेत रे! दुर्दैव.... दुर्दैवच रे आमचं आणि आमच्या देशाचं!!
काय म्हणालास? साहित्यिकपण तुझ्याशीच सहमत आहेत? घाल चुलीत त्या साहित्यिकांना. आयला त्यांच्या. नुसते पैशाच्या मागं धावतात साले. ते तेच लिहितात जे विकलं जाते. आमची गोरगरिबांची दु:ख आणि वेदना विकून स्वत:चे पोट भरतात हरामखोर. एखाद्या आत्महत्त्याग्रस्त कुटूंबाला त्यांच्या रॉयल्टीमधून थोडीफ़ार तरी मदत करायला काय जाते रे ह्यांच्या बापाचं? एसी-कूलरमध्ये बसतात आणि कादंबरी लिहितात. कादंबरीसाठी विषय समजून घ्यायचा असेल तर इकडे या म्हणावं पहिल्यांदा शेती करून जगायला. शेती करून जगण्याचा पहिल्यांदा अनुभव घ्या म्हणावं त्यांना मग कळेल त्यांना कादंबरी कशी लिहायची असते ते.
त्या पेपरवाल्यांची आणि चॅनेलवाल्यांची तू गोष्टच नको सांगू. अरे त्यांना चिकण्या-चिकण्या बायकांची थोबाड पाहिजे असते दाखवायला. आणि आमच्या बायका..... उन्हातान्हात राबून पार खंगून गेल्यात ना रे? त्यांच्या दु:खाला विचारतोच कोण? टीव्हीवाल्यांना काय त्यांच्या टीआरपीशी मतलब. देश गेला खड्ड्यात तर जाऊ दे म्हणतात.
हे बघ! तू आणखी माझं डोकं खाऊ नकोस.
तुला ऐकायचंच आहे काय?
मग कानात तेल टाकून ऐक एकदा.
२० साल पुरानी बात है! जब मेरा फ़ादर रामपूरमे खेती करता था!
मी नुकतंच विद्यापीठातील M.Sc (Agri) ची मास्टर डिग्री घेऊन गावात आलेलो. मला पुस्तकांनी शिकवलं होतं की अद्ययावत तंत्रज्ञान वापरल्याखेरीज शेती फ़ायद्याची होऊ शकत नाही.
आमचे कुलगुरूही म्हणत होते की शेतकर्यांची उच्चशिक्षित मुलं शेती कसायला गेली पाहिजे. शेतीमध्ये भरमसाठ स्कोप आहे. आधुनिक पद्धतीने शेती केली तर चिक्कार पैसा मिळू शकतो शेतीत.
मी त्यांचे शब्द शिरसावंद्य मानले आणि उतरलो शेतीच्या आखाड्यात. बापाला म्हटलं तुम्ही थांबा आता. मी शेतीत चमत्कार करून दाखवतो.
तरी बाप जीवतोडून सांगत होता.... नको रे पोरा उतमाज करू.... सारं काही सांभाळून कर पोरा!
शेतीत तेवढी कमाई नाही होऊ शकत..... जेवढी तुझ्या पुस्तकाने तुला शिकवलीय.....
अरे ही माती आहे... सार्यांना जगवते, पण..... पण; एक जरी पाऊल चुकलं तर.....
होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही..... सारं काही मातीत मिसळायला....
......... एकच चूक पुरेशी ठरते रे बाळा!
बाप जीवतोडून सांगत होता. पण त्याचं ऐकतं ऐकतो कोण? माझ्या डोक्यात विकासाचं, नव्या तंत्रज्ञानाचं भूत संचारलं होतं. त्यात माझा तरी काय दोष होता? १८ वर्षे पुस्तकांनी जे शिकवलं, डॉक्टरेट मिळवलेल्या कुलगुरूने जे सांगीतलं, शेतीतज्ज्ञ म्हणून ज्यांचा रुतबा होता, ते जे बोलले ते उंटावरचं शहाणपण होतं, हे मला कुठं माहीत होतं?
माझा या सर्वांवर प्रगाढ विश्वास होता. ही सारी मंडळी शेतकर्यांचं भलं करायला निघाली आहे पण शेतकरीच अडाणी व बावळट असल्याने त्यांचा सल्ला ऐकत नाही त्यामुळे दारिद्र्यात आहे, हे मला मनोमन पटत होतं.
सरकार योजना घेऊन आलं, महाबीज सबसिडीवर बियाणं घेऊन आली, बॅंक कर्ज घेऊन आली, कृषिखातं सल्ला घेऊन आलं......
बस्स! मी फ़सलो यांच्या प्रलोभनाला!! बापाचं ऐकलं नाही!!!
.... अपूर्ण
प्रतिक्रिया
ज्यांच्या बुद्धीची कीव करावी,
तेच आम्हा शेतकर्यांच्या बुद्धीची कीव करायला निघालेत रे!....उंटावरचं शहाणपण. निखालस सुंदर शब्दाविष्कार!
हेमंत साळुंके
पाने