.
आयुष्याला वळण देणारी मायबोली
.
.
नातीगोती अनेक तर्हेची असू शकतात.
नातीगोती माणसांची माणसांशीच असतात असेही नाही.
ऋणानुबंध चकोराचे चंद्रकिरणांशी किंवा ....
चातकाचे मृग नक्षत्रात बरसणार्या पहिल्या-पहिल्या टपोर थेंबाशीही असू शकतात.
नाते कधी रक्ताचे तर कधी स्नेहबंधनातून निर्माण झालेले असू असतात.
नात्याचा लौकिक प्रकार कोणताही असला तरी ज्या ॠणानुबंधनातून आत्मिक अलौकिकतेचा आनंद झिरपून मनाला नि:स्पृह निर्माल्यतेची अवस्था प्राप्त होत असते, त्या स्नेहबंधाचे धागे मनामध्ये फार खोलवर गुंतलेले आणि अतूट असतात, शब्दातीत असतात.
माझाही असाच एक धागा जुळलाय मायबोलीशी. शब्दात न सामावू शकणारा.
या कहाणीची सुरुवात तशी फार जुनी नाही. उण्यापुर्या दोन-अडीच वर्षातली; पण माझे अख्खे आयुष्य बदलून टाकणारी. आयुष्याला नवे वळण देऊन कलाटणी देणारी.
तसा मी स्वतःला फार भाग्यवान समजतो कारण जे आयुष्य माझ्या वाट्याला आलं ते फारच चित्रविचित्र विविधतेने नटलेलं आहे. दु:ख, वेदना, यातना मिळाल्यात त्या पराकोटीच्याच; पण सौख्य, आनंद, सन्मान मिळाला तोही पराकोटीचाच. अवहेलना झाली ती पराकोटीची; पण आदरभाव मिळाला तोही पराकोटीचाच. साडेसातीने आयुष्याच्या पूर्वार्धात घेतलेली कसोटी पराकोटीचीच; पण उत्तरार्धात जे छप्परफ़ाड दान दिले तेही पराकोटीचेच. मध्यम किंवा सरासरी स्वरूपाचे जीवन कसे म्हणून माझ्या वाट्याला आलेच नाही. अगदी दैवाने दिला तो रक्तगट सुद्धा अत्यंत तुरळक वर्गवारीत मोडणारा आहे.
मी आज सांगणार आहे त्या कहाणीची सुरुवात झालीय २५ नोव्हेंबर २००९ रोज मंगळवार या दिवशी. रात्री ९ वाजून २८ मिनिटांनी मी
"औंदाचा पाऊस" ही माझी कविता मायबोलीवर प्रकाशित केली आणि लगेच केवळ ४ मिनिटात'श्री' यांचा पहिला प्रतिसाद पाहायला मिळाला. माझ्या संबंध आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या कवितेला चांगले म्हटले होते. तो माझ्यासाठी अभूतपूर्व क्षण होता. पाठोपाठ चंपक, कौतुक शिरोडकर, मुकुंददादा कर्णिक, गिरीश कुळकर्णी यांचे प्रतिसाद आलेत आणि याच प्रतिसादांनी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. माझ्यातला आत्मविश्वास जागवला आणि आजपर्यंत माझ्या शरीराच्या कोणत्या तरी कप्प्यात उतानाचीत झोपून असलेला कवी खडबडून जागा झाला.
मी त्यापूर्वी कविता लिहिल्याच नव्हत्या असे नाही. मी मॅट्रिकमध्ये असताना १९७८ मध्ये श्री सती जाणकुमातेवर आणि श्री संत गजानन महाराजांवर काही भजने लिहिली होती. ती भजनी मंडळींना एवढी आवडली होती की त्यांनी वर्गणी करून ”गजानन भजनावली" नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते. पहिल्या आवृत्तीत १००० प्रती मुद्रित करण्यात आल्या होत्या. पैकी काही प्रती आपसात वाटून घेतल्यानंतर उरलेल्या सहा-सातशे प्रती शेगाव येथे विक्रीला दिल्या. आश्चर्याची बाब अशी की, त्या सर्व प्रती केवळ एका पंधरवड्यात विकल्या गेल्या. नंतर ”गजानन भजनावली" ची मागणी करणार्या ऑर्डर पोस्टाव्दारे नियमितपणे येतच होत्या. पण दुसरी आवृत्ती काही निघाली नाही आणि तो विषय तेथेच संपला.
त्यानंतर १९८४-८५ च्या सुमारास मी
“बरं झालं देवा बाप्पा” ही पहिली कविता लिहिली. ती कविता शेतकरी संघटनेचे मुखपत्र असलेल्या शेतकरी संघटकच्या “ग्रामीण अनुभूती विशेषांक” (२६ जुलै १९८५) मध्ये प्रकाशित झाल्यानंतर वेगवेगळ्या शेतकरी आंदोलनात कार्यकर्त्यांकडून त्या कवितेचे थोडेफार वाचन/गायनही झाले. श्री विनय हर्डीकर यांनी लिहिलेल्या “जग बदल घालुनी घाव” आणि “विठोबाची अंगी” या दोन पुस्तकात त्या कवितेचा उल्लेख झाला, दोन वृत्तपत्रीय स्तंभलेखात सुद्धा त्या कवितेचा उल्लेख झाला. आणि महत्त्वाचे म्हणजे मा. शरद जोशींनी “आठवड्याचा ग्यानबा” (०५ ऑक्टोबर १९८७) या साप्ताहिकात लिहिलेल्या एका लेखाचे शीर्षकही “बरं झालं देवा बाप्पा” असेच होते. माझ्या पहिल्याच कवितेची एवढी दखल घेतली गेल्यामुळे तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मात्र ही रचना कवितेपेक्षा गीताकडेच अधिक झुकणारी असल्याची मला जाणीव असल्याने मी कविताही लिहू शकतो, असा विश्वास काही मला मिळाला नाही.
त्यानंतरच्या काळात मी १०-१२ कविता लिहिल्या. त्यातील काही कविता लोकमत, लोकसत्ता व तरुण भारत यासारख्या नामांकित वृत्तपत्रात छापूनही आल्यात. ज्यांनी वाचल्यात त्यांनी मला कविता वाचल्याबद्दल आवर्जून सांगितले पण अगदी निर्विकार चेहर्याने. त्यांचा चेहरा वाचताना माझी कविता बरी असावी असा मात्र पुसटसा सुद्धा अंदाज न आल्याने माझी कविता अगदीच सुमार दर्जाची असावी, अशी माझी खात्री पटत गेली. त्यानंतर माझी कविता फुलायच्या आतच करपून गेली कारण भाकरीचा शोध घेण्यातच त्यानंतरचा सर्व काळ खर्ची पडला. आणि काळाच्या वाहत्या प्रवाहाच्या उसळत्या लाटांमध्ये कविता लिहिण्याची प्रेरणा व ऊर्मी कशी दबून गेली ते कळलेच नाही.
“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली, तारुण्य जाळताना”
आयुष्याची अशी अवस्था चक्क दोन तपापेक्षाही अधिक काळ तशीच कायम होती. मात्र २५ नोव्हेंबर २००९ रोजी
“औंदाचा पाऊस” ही कविता ‘मायबोली’ वर प्रकाशित झाली. त्या कवितेवर मिळालेल्या अभूतपूर्व अभिप्रायानेच कदाचित माझ्यातला कवी पुन्हा जागृत झाला असावा आणि इतका प्रदीर्घ काळ कोंडमारा झालेली मनातील भावना शब्दबद्ध होवून कवितेचा आकार घेत अवतरीत झाली असावी. कारण त्यानंतर कविता लिहिण्याचा वेग इतका जास्त होता की...... ते माझ्यापेक्षा माबोकरांनाच जास्त माहीत आहे. नोव्हेंबर २००९ ते ऑगष्ट २०१० या नऊ महिन्याच्या काळात माझ्या हातून ८० पेक्षा जास्त कविता लिहिल्या गेल्यात.....
रानमेवाच्या प्रास्ताविकात मायबोली आणि माबोकरांचा मी अगदी प्रांजळपणे
ऋणनिर्देश केलेला आहेच.
वयाच्या ४६ व्या वर्षी मी मायबोलीवर आलो, कवितेचा श्रीगणेशा केला आणि ४७ व्या वर्षी अधिकृतपणे कवी झालो.
मायबोलीने मला भाषेची शुद्धता शिकवली, व्याकरण शिकवले, वृत्त शिकवले, गझलेचा आकृतिबंध शिकवला आणि १५ दिवसाच्या कालावधीत मी चक्क गझलकार झालो. गझलेच्या प्रवासात मला सर्वांचा नामनिर्देश करणे शक्य नसले तरी छाया देसाई, शरद, चिन्नु, ......... या माबोकरांचे जे भरीव सहकार्य लाभले आणि मिलिंद छत्रे "मिल्या" यांचा मानसिक आधार मिळाला, ते मी विसरायचे ठरवले तरी विसरूच शकणार नाही.
मायबोलीवर माझा झालेला चंचुप्रवेशही थोडा मजेशीरच म्हणावा लागेल. नोव्हेंबर २००९ च्या पहिल्या आठवड्यात मी घरी संगणक आणला, इंटरनेट कनेक्टीव्हीटी घेतली. तेव्हा विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न झालेला होता. आंतरजालावर या संबंधात कुणी काही लिहिले आहे काय? हे शोधायचे म्हणून मी गूगल सर्च बॉक्समध्ये मी "शेतकरी आत्महत्या" हा शब्द टाकला आणि क्लिक केले. मला दोन लेख मिळालेत. पहिला होता ब्लॉगवरील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी लिना मेहेंदळे यांचा आणि दुसरा होता मायबोलीवरील लक्ष्मण सोनवणे यांचा. मी दोन्ही लेख वाचले पण समाधान झाले नाही. माझ्या मनात जे खदखदतेय ते व्यक्त करायलाच हवे, या एकमेव प्रेरणेने मायबोलीचे सदस्यत्व घेतले; आणि माबोवर पहिला लेख लिहिला,
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे' .या लेखाची माबोकरांनी दखल घेतली. धमासान चर्चा झाली. आपण वाचकांचे लक्ष वेधून घेण्याइतपत किंवा वाचकांना चर्चेस प्रवृत्त करण्याइतपत चांगले लेखन करू शकतो, असा आत्मविश्वास मला या लेखाने दिला. चर्चेच्या ओघात एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी माझा एक स्वानुभव कथन केला आणि अनपेक्षितपणे जन्माला आला
"वांगे अमर रहे!" हा माझ्या जीवनातला पहिला ललितलेख. हाच लेख मला एका स्पर्धेमध्ये पुरस्कार देऊन गेला.
माबोकर नानबा यांनी "एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल - आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत?" असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर द्यायचे म्हणून मी जे काही खरडले, ती खरड म्हणजे
"शेतकरी पात्रता निकष". हा लेख श्री श्रीकांत उमरीकर यांना एवढा आवडला की त्यांनी भरसभेत त्या लेखाचे कौतुक करून "शेतकरी संघटक" मध्ये प्रकाशित केला.
सध्या मी औरंगाबादवरून प्रकाशित होणार्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोचणार्या पाक्षिक
"शेतकरी संघटक" मध्ये नियमितपणे "वाङ्मयशेती" या सदराखाली लेखमाला लिहितोय. कोल्हापूरवरून प्रकाशित होणार्या "शेतीप्रगती" या मासिकात, ठाण्यावरून प्रकाशित होणार्या "अमृत कलश" आणि राज्यातल्या इतर ३० दैनिक/साप्ताहिकात माझे लेखन नियमित प्रकाशित होत आहेत.
एका मोठ्या दैनिकाने दिवाळी विशेषांकासाठी पत्र पाठवून माझा लेख मागवून घेतला तर काहींनी कविता. मुद्रित माध्यमातील दिवाळी विशेषांकात माझे साहित्य प्रकाशित झालेली यंदाची माझी पहिली दिवाळी ठरली आहे. यंदाच्या लोकमत, पुण्यनगरी, सकाळ, शेतीप्रगती, तरुण भारतच्या दिवाळी अंकात कविता आणि देशोन्नती व शेतीप्रगतीच्या दिवाळी अंकात माझे लेख प्रकाशित झालेले आहेत.
आज मी कवी, गझलकार आणि लेखक म्हणून नावारूपास आलो असेल तर ती केवळ मायबोलीची किमया आहे. मी जर मायबोलीवर आलो नसतो तर काय झाले असते, ठाऊक नाही पण मी कवी, गझलकार आणि लेखक नक्किच झालो नसतो.
- गंगाधर मुटे
-------------------