नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
होय! शेतकऱ्यांचे साहित्य संमेलन
शेतीमालाला रास्त भाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांचे व एकूणच देशाचे दारिद्र्य कधीही दूर होणार नाही हे प्रथमतः शरद जोशी यांनी मांडले. "इंडिया" विरुद्ध "भारत" हे भारताचे मूलभूत दुभंगलेपण अधोरेखित करणारेही ते पहिलेच. शेतकरी आंदोलन हे स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात मोठे जनआंदोलन. केवळ स्वच्छ विचाराच्या बळावर, पाठीशी पैशाचे, घराण्याचे, जातीचे वा सत्तेचे कुठलेही बळ नसताना त्यांनी शेतकऱ्यांची संघटना उभारली. शरद जोशी हे विचारांच्या ताकदीचे जाज्वल्य प्रतीक आहे. (संदर्भ - भानू काळे लिखित अंगार वाटा.. शोध शरद जोशींचा)
शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व समृद्धीचे जगणे यावे याकरिता स्वित्झर्लंड मधील उच्च पदस्थ नोकरी सोडून ८० च्या दशकात भारतात येऊन शरद जोशी ह्यांच्या अर्थशास्त्रीय मांडणीतून निर्माण झालेला झंझावात, तत्कालीन वयाच्या विशीत असलेल्या तरुणांना स्फूर्ती देणारा व आकर्षित करणारा होता, त्याच काळात वर्ध्यातील हिंगणघाट जवळील आर्वी येथील विशीतला पदवीला शिकणारा तरुण गंगाधर मुटे हा शरद जोशींच्या संपर्कात आला व त्याने आंबेठाणमध्ये शरद जोशींचे प्रशिक्षण वर्ग सुद्धा पूर्ण केले.
शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील सुवर्णकाळ ...भीक नको.. घेऊ कामाचे दाम .. महाराष्ट्रात सर्वत्र झालेले चक्काजाम आंदोलने... पंजाब मधील राजभवनाला घेराव घालून झालेले गव्हाचे आंदोलन... त्या वेळेस वर्धावरून सायकलने पंजाबला गेलेले ध्येयवेडे तरुण... त्यातही गंगाधर मुटे यांचा समावेश होता.. अशा सर्व आंदोलनात त्यांनी भाग घेतला. शरद जोशींच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते शरद जोशींचा विचार पूर्ण ताकदीनिशी मांडण्याचा अविरत प्रयत्न करत आले. २०१४ साली शरद जोशी हयात असतानाच त्यांनी शेतकरी साहित्य संमेलन घेण्याची इच्छा प्रकट केली, जेणेकरून शेतकऱ्यांचे साहित्य जगासमोर येऊन त्याला वाचा फोडता येईल. नुकतेच ४ व ५ मार्च 2024 रोजी सह्याद्री फार्म मोहाडी, नाशिक येथे ११ वें अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन संपन्न झाले... त्यानिमित्ताने हा लेखातून अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या तपपूर्तीपूर्वीच्या ११ व्या साहित्य संमेलनाचा हा घेतलेला धांडोळा व त्यातून निर्माण झालेला हुंकार मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न.
शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतकरी साहित्याचा एल्गार पुकारून शेतकऱ्याला बाजारपेठेचे स्वातंत्र्य तसेच तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे याचा प्रचार व प्रसार करणारे .. विज्ञानाला धरून बाजू मांडणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे व शेतकरी कसा लुबाडला जातो हे जगासमोर आले पाहिजे जेणेकरून हा जगाचा पोशिंदा सुखाने व सन्मानाने जगेल. या संमेलनाचे विशेष वैशिष्ट्य ठरले ते नाम फाउंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध सिने अभिनेते श्री नाना पाटेकर यांची संमेलनाचे उद्घाटक म्हणून असलेली उपस्थिती. त्याबरोबरच हे संमेलन जिथे संपन्न झाले तो परिसर म्हणजे..श्री विलास शिंदे ह्या तरुणाने स्थापन केलेली शेतकऱ्यांची कंपनी... सह्याद्री फॉर्म चा परिसर .... हा सबंध परिसर व सह्याद्री फार्म ची वाटचाल म्हणजे श्री शरद जोशी यांनी सांगितलेल्या चतुरंग शेतीच्या (सीता शेती, माजघर शेती ,व्यापार शेती व निर्यात शेती) उपक्रमातून साधलेला नावीन्यपूर्ण आविष्कार साधून केलेला यशस्वी प्रयोग .... शरद जोशी यांच्या वैचारिक अर्थशास्त्रीय विद्यापीठातून घडलेला गंगाधर मुटे नावाचा अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा कार्याध्यक्ष आपल्या लेखणीतून लिहितो .....
||आता सुजाण व्हावे| शिकण्यास लेखणीने||
चतुरंग वित्त शेती | रुजण्यास लेखणीने |
नवज्ञान निर्मितीला | जेथे उभार तेथे||
आशय हळूच न्यावा | भिजण्यास लेखणीने||
एखाद्या कृषी विद्यापीठातील किंवा अकृषी विद्यापीठातील प्राध्यापकांना लाजवेल असे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन करणाऱ्या ह्या शरद जोशींच्या शिष्याच्या लेखणीतून आलेला ह्या सृजनशील ओळी बरेच काही बोलून जातात. यातूनच शेतकऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा व जाणीव असणारे तसेच प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले अभिनेते जे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे प्रसिद्ध सिने कलावंत श्री नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे (२०१८) हे सुद्धा या संमेलनाचे उद्घाटक म्हणून येणे पसंत करतात. सोबतच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ(२०१८) ,डॉ. रा. रं.बोराडे(२०१६) डॉ. शेषराव मोहिते(२०१७) ,डॉ.अभय बंग(२०१७), एबीपी माझा चे संपादक श्री राजीव खांडेकर(२०१५), डॉक्टर इंद्रजीत भालेराव (२०१९), माजी आमदार सरोजताई काशीकर, माजी आमदार ॲड.वामनराव चटप, ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप, ज्येष्ठ शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील, गझल नवाज भीमराव पांचाळे (२०१५), अँड .सतीश बोरुलकर, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, ज्येष्ठ पत्रकार व संपादक सामना श्री संजय राऊत (२०२०) इत्यादी सन्माननीय ह्या शेतकरी साहित्य संमेलनाला शेतकऱ्यांप्रती जाणीव ठेवून आवर्जून उपस्थित राहणे पसंत करतात.
संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री गंगाधर मुटे आपल्या कार्यक्रम पत्रिकेत नमूद करताना म्हणतात त्याप्रमाणे... कल्पना विश्वात रमणाऱ्या आभासी शेती साहित्याची शेती मधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्य विश्वाला जाणीव करून देण्यासोबतच त्यांच्या शेती अर्थशास्त्र व नवतंत्रज्ञाना विषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य सारस्वतांची कृषी उद्योगी जगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्या इतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे चे प्रयत्न म्हणून दोन दिवसीय ११ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
ह्या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी आणि चतुरंग शेती परिसर परिक्रमा याद्वारे झाली. उद्घाटन सत्रात मराठी गौरव गीत व शेतकरी नमन गीत जे श्री गंगाधर मुटे यांच्या लेखणीतून साकारले आहे त्याद्वारे झाली. सह्याद्री फार्मच्या निसर्गरम्य वातावरणात झालेल्या उद्घाटन सत्रात मंचावर उपस्थित संमेलनाध्यक्ष श्री भानू काळे, उद्घाटक श्री नाना पाटेकर ,प्रमुख अतिथी पुष्पराज गावंडे , प्रमुख अतिथी रामचंद्रबापू पाटील , प्रमुख अतिथी माजी आमदार ॲड. वामनराव चटप, विशेष अतिथी माजी आमदार शेतकरी संघटना सरोजताई काशीकर, स्वागताध्यक्ष व चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे श्री विलास शिंदे, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संयोजक ॲड.सतीश बोरुळकर, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव ॲड.श्री नीतिन ठाकरे उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रमोद राजे भोसले यांनी केले.
डॉ. प्रा. कुशल मुडे
मुंबई