![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
दुबार पेरणी
वाण महागा मोलाचे
घेऊनिया पेरणीला
केली पेरणी शेतात
हात जोडले धरणीला
इवलासा आला कोंब
खाते ती गोगलगाय
आले संकट कुठून
तिला नसतना पाय
ऊन-सावलीचा खेळ
रोज खेळतोय बाप
झोप कसली? उशाला
सदा बसलेला साप
उभे संकट दारात
उन्हा-तान्हात राबून
केली दुबार पेरणी
शिळा छातीवर ठेवून
कशीतरी आली सुगी
स्वप्न माझे विसरले
भाव हे सोयाबिनचे
बाजारात कोसळले
सरकारी व्यवस्थेला
कधी येईल कळून?
शेती बेभरवशाची
बळी जातोय मरून
- दत्ता वालेकर
विक्रम फोटो स्टुडिओ,
शिवाजी चौक, घाटनांदूर,
ता. अंबाजोगाई, जि. बीड
मो.९४२१४४०९२२