माई - एक अस्वस्थ झंझावात
नगरच्या फाटके पाटील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात, डॉ. फाटकें बरोबर मला पाहताच माई म्हणाली " अनिल, बर झालं तू आला. मला आता घरी घेऊन चल. मला इथे एक क्षणही थांबायचे नाही. तूच मला इथून बाहेर काढू शकतोस. तूच मला शरद जोशींच्या जागी आहेस. मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे, काही सांगायचे आहे. मला तुझ्या बरोबरच घेऊन चल......" कसाबसा माईला धीर देत माईची समजूत घातली व उद्या घरी जाऊ असे म्हणालो. डॉक्टर म्हणाले, प्लास्मा देऊन पाहू, शरिराने प्रतिसाद दिला तर आशा आहे नाहीतर परमेश्वराची मर्जी. पहा काय करता येते म्हणालो व दु:खी अंतकरणाने काल संध्यकाळी दवाखान्याच्या बाहेर पडलो.
१ मे २०२१ रोजी माईला कोरोनाची लागण झाल्याचा निरोप आला व नगरला दवाखान्यात दाखल करण्यात आले. सीटी स्कॅन केला तेव्हा तिचा स्कोअर १५ असल्याचे समजले. हे धक्का दायक होते. पहिल्याच दिवशी इतका स्कोअर असणे चिंताजनक होते. अतिशय तुटवडा असताना तिला चांगल्या खाजगी दवाखान्यात अॉक्सीजन बेड मिळाला. त्वरित आॉक्सिजन लावण्यात आले. रेमडसिवीर इन्जेक्शने मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. काही इंजेक्शने जिल्हाधिकार्यांकडून तर काही काळ्या बाजारातून खरेदी करून देण्यात आली. तरी पण अॉक्सिजनची पातळी घसरत राहिल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तरी सुद्धा सुधारणा दिसत नसल्यामुळे डॉक्टरांनी मला निरोप पाठवून बोलावून घेतले. मला घेऊन अतिदक्षता विभागात घेऊन गेले होते.
माई लहानपणापासूनच जरा हट्टी स्वाभावाची.सर्व काही भव्य दिव्य करण्याची इच्छा.'टोलेजंग ' हा तिचा आवडता शब्द. १९७२च्या भर दुष्काळात दादांनी तिचे टोलेजंग लग्न करून दिले होते. पुढे काही कारणास्तव पती पत्नीत वितुष्ठ आल्यामुळे घटस्फोट झाला व माई आमच्याकडेच रहायला आली. भावांवर आपला बोजा नको म्हणुन तिने काहीतरी व्यवसाय करण्याचे प्रयत्न केले. डेअरी, किराणा दुकान, शिलाई मशीनचा कोर्स असे प्रयोग झाले पण हिशेब ठेवण्याची सवय नसल्यामुळे सर्व व्यवसाय बंद पडत गेले.
सामाजिक कामाची आवड असल्यामुळे मग नंतर आरोग्य सेविकेचे काम सुरु केले. होमगार्ड मध्ये काम केले. मी शेतकरी संघटनेच्या कामाला लागल्या नंतर तिने शेतकरी संघटनेच्या कामात झोकून दिले. आंबेठाणला अनेक शिबिरे केली, सभा मेळावे गाजवू लागली. उत्तम वक्ता झाली. संघटनेच्या अधिवेशन मेळाव्यासाठी स्वताच्या हिमतीवर शेकडो महिलांना घेऊन दिल्ली, पंजाब, पाणीपत, तिरुपती अशा ठिकाणी हजर राहिली. एकदा अमरावती जिल्ह्यात शरद जोशी साहेबांनी महिलांचे शिबीर आयोजित केले होते. तेव्हा एकही पुरुष साथीला नसताना माई २५-३० महिलांना रेल्वेने विना तिकीट अमरावतीला घेऊन गेली व सुखरूप परत घेऊन आली होती. तेव्हा साहेबांनी ही अाश्चर्य व्यक्त करत कौतुक केले होते. जिल्ह्यात शेतकरी संघटना बांधण्यात मला तिची खूप मदत झाली. माझी आंदोलने तशी आक्रमकच असत तेव्हा पोलीस माईला हाताशी धरून मला व जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असे. नगर जिल्ह्याच्या महिला अघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदावर तिने सक्षमपणे काम केले होते.
पुढे ती मा.श्री. हजारे अणणांच्या कार्याकडे आकर्शित झाली. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनची ती तालुका अध्यक्ष राहिली. राळेगण सिद्धी येथे अनेक वर्ष राहून अणणां बरोबर काम केले. तेथील इमारती श्रमदानातून उभ्या राहिल्या आहेत त्यात माईने बराच घाम गाळला आहे. आदर्श गाव योजनेत आमच्या संस्थेने एक गाव दत्तक घेतले होते त्यात माईने जिव आेतून काम केले पण गावांची कामे मंजूर करताना होत असलेला भ्रष्टाचार सहन न झाल्यामुळे तिने ते काम सोडून दिले.
माईचा स्वभाव अगदीच भोळा भाबडा. कशाचाच हीशेब ठेवणे माईला जमले नाही. काही एम एल एमचे ( साखळी पद्धतीने विक्री) व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण भोंगळ कारभारामुळे पैशाचा मेळ बसत नसे. माई म्हणजे विसरभोळे पणाचा कळस. बर्याच गोष्टी खुप जपून ठेवणार पण गरज पडेल तेव्हा कुठे ठेवले ते आठवत नसे मग पुर्ण पसारा काढून शोधत बसायची. चश्मा तिला आठ दहा दिवसाच्या पुढे कधीच टिकला नाही. एक तर तो सापडत नसे किंवा हीच त्यावर बसायची व चश्मा मोडायाचा, खाली पडून फुटायचा. किंवा शेतात गेली तिकडेच विसरून यायची. पैशाची पर्स रिक्शा- एस टीत विसरून यायची. अनेक मोबाईल विसर भोळेपणामुळे खराब झाले. रिंग दिल्या शिवाय तिचा मोबाईल सापडत नसे. पैशाच्या व्यवहार माईला कधीच फायद्यात करता आले नाहीत.
माई म्हणजे खूप मोठ्या मनाची व्यक्ती. दुसर्यांना देण्यात तिला खूप आनंद. दुसर्यांना खूश करण्यातच तिला खरी खुशी मिळत असे. घरात कुणाचा वाढदिवस असला, रक्षाबंधन असो, दिवाळी असो पाडवा असो, माईचा उत्साह अोसंडून वहायचा. सकाळ पासूनच माई पाने फुले रांगोळ्या जमा करण्यच्या कमाला लागे व उत्सव साजरा करण्याच्या वेळे पर्यंत सुंदर, विलोभनीय अशी सजावट तयार करून ठेवत असे.
सेवा करण्याची माईला भारीच आवड. कुणाच्यातरी सांगण्यावरून पुण्यच्या एका वयोवृद्ध अाजींची सेवा करण्यासाठी साधारण वर्षभर पुण्यात राहिली. दहा हजार रुपये महिना तिला मिळत असे पण आमच्या वडिलांना आता आधारची गरज आहे असे लक्षात येताच माई ती कमाई सोडून घरी आली व चोवीस तास दादांच्या बरोबर राहून त्यांची मनोभावे सेवा केली. दादांची सेवा करताना इतर वेळेत ती पेनसीलने चित्र काढत बसे, कविता करत असे. तिने काढलेली हजारो चित्र व कविता तिच्या संग्रही आहेत. जुन्य हिंदी मराठी गाण्यांचा माईला मोठाच छंद. आमच्या मुलाकडून, पुतण्याकडून तिने खुप जुनी गाणी तिच्या मोबाईलमध्ये साठवली होती व दिवसभर ती गाणी तिच्या भोवती वाजत व ती ही गुणगणत असे. दादांना ही ती गाणी ऐकवत असे. फोटो काढण्याची तिला खूपच आवड होती. दादांचे हजारो फोटो, वेगवेगळी वेषभूषा करून काढले आहेत व मोबाइल हरवेल किंवा डिलीट होतील म्हणून पोरांच्या लॅपटॉप मध्ये सुरक्षित साठवून ठेवले आहेत.
दादा गेल्या नंतर घरी बसून काय करायचं म्हणुन ती नगर येथील एका वृद्धाश्रमात मॅनेजरचे काम करू लागली होती. माई गेल्या पासून वृद्धाश्रमात मोठा काया पालट झाला. उत्तम जेवण दिले जाऊ लागले. स्वच्छता पाळली जाऊ लागली. वृद्धांचा चांगला मेकअप करून फटे बांधून तिने फोटो काढले. गेल्या पाडव्यला सर्व म्हातार्यांच्या जेवणाच्या ताटा भोवती पाना फुलांच्या रांगोळ्या काढून जेऊ घातले. हे सगळे अनपेक्षित घडताना पाहून वृद्धांचा ऊर भरून येई. वृद्धाश्रमाचे संस्थापक माईच्या कामावर बेहद खूस होते. यापुढे आश्रमात काय काय सुधारणा करता येतील या बाबत माझ्याशी चर्चा करून सल्ला घेत असे. खूप स्वप्न रंगवले होते माईने.
सामाजिक कार्य करताना माईने कधीच अंग चोरून काम नाही केले. एक पंच वार्षीक माई आमच्या लिंपणगावच्या ग्रमपंच्यातीत निवडून आली. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियाना अंतर्गत आमच्या गावाला माईने पहिले पारितोषिक मिळवून दिले त्यासाठी हातात झाडू, खराटा घेऊन महिनाभर गाव झाडीत होती. गावकर्यांना स्वच्छतेचे महत्व सांगताना म्हातार्या पुरुषांच्या पायाची नखे ही माई काढत असे.
तिला मान सन्मान मिळावा याची खूप हौस असे. तिच्या सामाजिक कमा बद्दल तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तिला खूप आनंद होत असे व तो प्रदान होताना आम्ही सर्व तेथे उपस्थित असावे असे ही तिला वाटत असे. माई एक झंजावात होती पण ती कधी स्थीर राहू शकली नाही. माई एक अस्वस्थ झंजावात होती. काम सुरु केले की कुठे थांबावे हे तिला कधीच समजले नाही. शेवट पर्यात ती एक स्वप्न उराशी बाळगून झुंजत राहिली.
दोन महिन्या पुर्वी माई वृद्धाश्रमात कार्याला लागल्या पासून आमचे फोन होत असत ती अतिशय उत्साहाने तेथील प्रगतीचे रसभरीत वर्णन करीत असे व पुढील सुधारणांबाबत चर्चा करत असे. माईला कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आलेच नसावे. दोनच दवसा पुर्वी आमचा नेहमी प्रमाणे फोन झाला होता व ती खुशाल असल्याचे ती सागत होती व तिच्या बोलण्यातून कोरोनाची बाधा झाल्याचा लवलेषही बोलण्यातून जानवत नव्हता.
दवाखन्यात दाखल करताना मात्र माई एकदम गलित गात्र झाली होती. माझा पुतण्या वैभवने तिला दवाखाना, आॅक्सिजन, इन्जेक्शन मिळवून देण्यात बरीच मदत व धावपळ केली. मी, माझी भाची व दुसरी बहीण कोरोनग्रस्त असल्यामुळे त्यांच्या सेवेत व्यस्त होतो. सर्वांनी शर्तीचे प्रयत्न करूनही माई आपल्यातून निघुन गेली. नाईलाज आहे. माई शेवटच्या घटका मजत असताना तिने स्व.शरद जोशीचे स्मरण करावे याचे मला खरच आश्चर्य वाटले.
६ मेच्या रात्री १२.०० नंतर माईची प्राण ज्योत मालवली असावी. सकाळी तिचे पार्थीव शरीर ताब्यात घेऊन दहन करण्यासाठी पुतण्या वैभव, माईचा मुलगा प्रताप व दोन जावई नगरला गेले आहेत. पार्थिवाचे दहन झाले आहे. उद्या अस्थी मिळतील असे समजले आहे.
माई, खरे नाव सौ. शालिनीताई पंढरीनाथ साळुके पण सर्व जन तिला माई म्हणुनच अोळखत. काही माई साळुके व काही माई घनवट म्हणुन सुद्धा अोळखत. माईच्या मागे एक मुलगा तीन मुली व अनेक नातवंडे आहेत.
माईच्या दुखद निधनाची धक्कादायक बातमी समजताच अनेक परिचित व्यक्ती, नातवाईक व राज्यभरातून शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे सांतवनपर फोन व संदेश येत आहेत. माईचे असे अचानक जाणे खुपच क्लेष दायक आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी ही अपेक्षा. आमच्या कुटुंबच्या दु:खात सहभागी होणार्या सर्वांचे आभार. माईच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच पार्थना.
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना
७ मे २०२१