नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
धरणामध्ये गेलं घर तरी कोरडीच शेती
फाटला संसार सारा उसवली नाती
इस्कटला खोपा पुन्हा ईनायाचा हाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय
लटकुनी बा गेला, तू तसा ईचार नको करू
भेगाळल्या वावरामंदी अवंदा बारूद पेरू
लढूनिया हक्क अपुला मिळवायचा हाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय
आत्महत्या करून कुठे सुटतो कारे प्रश्न?
उचल दुःखाचा गोवर्धन तूच बनुनिया कृष्ण
सावकारी पाढा आता पुन्हा गिरवायचा नाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय
पिढ्यांपिढ्यापासून सुरू नियतीशी भांडण
दुःख पचवूनी जगा देशी सुखाचं आंदण
सातबाऱ्याचं चक्रव्यूह तुला तोडायाचं हाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय
कृषीप्रधान देशातून दिसेनाशी होईल माती
सिमेंटच्या जंगलात अमली पदार्थांच्या राती
जुलमी कपटी धोरणास या गाळायाचं हाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय....
••••
श्री.अनिकेत जयंतराव देशमुख
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम
ता. जि. अकोला 444006
MO. 9689634332
Email - anudesh25488@gmail.com