नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
“अय पुरी, आसी लेकुरवाळी भाजी नाय मिळणार कुठंच. लाल कोराची हाय. समदा बजार फिरली तरी येशील इठ्ठच.”
खरंच व्हतं ते. आतापोतर सम्दा बजार धुंडाळून आली व्हती ती. “घेयचं ते काय मेलं, दोन मेथीच्या जुड्या.” मनात कुरकुरत मंदानं समदा बजार पालथा घातला पर भाजी काय मनात भरत नव्हती.
“नाय... पर शंकर आन्नाच्या भाजीची बरुबरीच नाय व्हऊ शकत.” असा मनात इचार करत ढिगातून दोन जुड्या उचलल्या. बोटं खुपसून कवळ्या बगल्या न्यहाळीत शेंडे इकडंतिकडं लोटत जुडीत लपलेल्या गवताचा शेंडा नखानं खुडून खाली टाकला. जुड्या पिसीत टाकल्या. भाव न करता छातीवर जपलेल्या पाकिटातनं धा रुपयाची नोट काढून शंकर आन्नाच्या हाती दिली. आधीच बटाटे, मिर्च्या अन टरबुजाच्या भारानं तान्लेल्या नाड्या जुळवत पीसी उचलून हाती धरली. बोटांवर पडणाऱ्या करकुच्याचा इचार न करता ती झपाझपा चालत चौफुलीवर पोचली. काळ्या पिवळ्या जीब्गाडीतल्या दाटीवाटीत घुसली. कसीबसी बसली.
धडधडत चालनारी गाडी थांबवली. मळ्याच्या पायवाटवर उतरली. वजनदार पीसी तोलत चालत निन्घाली. घराच्या पडवीत पोचली. पीसी मेडीला नीट उभी करून ठीवली. दुसऱ्या मेडीला पाठ टेकून उसासा टाकत बसली. आता तिला मावळतीच्या उन्हाचा रंग दुपारपेक्शा जरा फिका वाटू लागला व्हता.
सकाळची शाळा असल्यानं वंदी आज दुपारपसूनच घरी आली व्हती. आईला पाहून तिनं दप्तर बाजूला सरकवत वहीतून भाईर काढून ठीव्लेलं पिवळ्या रंगाचं आपलं परगती पत्रक आईपुढ केलं “आई यच्यावर सै करून ठीव. परत ध्येनात नाय ऱ्हाणार.” मंदानं तो पिवळा कागद एका हातात धरला. दुसऱ्या हातात पेन धरून बराच येळ निरखत ऱ्हायली.
तव्हर वंदीनं पिसीतून एकेक करून समद्या वस्तू भाईर काढून टोकरी पाटीत भरल्या अन घरात नेऊन ठीवल्या. शेवटचं टरबूज मात्र उचलून वट्याकडंच्या राजनात नेऊन अलगत सोडून दिलं. त्याचा गरमपणा कमी व्हायच्या आशेनं. कदाचित ते उद्याच कापलं जानार व्हतं.
वंदीचं परगती पत्रक मंदानं सै करून बाजूला ठिवलं. “वंदे पानी आं गं.” वंदीनं पाण्याचा तांब्या भरून आईच्या हातात दिला. आपलं परगती पत्रक अन पेन उचलून दप्तरात यवस्थित ठिवलं. मंदानं दोन घोट पानी गिळून तांब्या जमिनीवर ठिवून उजवा तळहात तांब्याच्या तोंडावर ठिवला अन मिटल्या व्हटांनी स्वताशिच बोलत हरवत गेली. बराच येळ मंग तांब्यावरचा तळहात तसाच राहिला. तोंड कोरडं आसुनबी.
कालपरवापोतर पाट्या भरून बजारात इकायला नेणाऱ्या मंदानं आज त्याच बजारातून तेच माळवं इकत आनलं व्हतं. बटाटे, काकड्या, वांगे, मेथी असं एक नंबर माळवं पिकवून दर सोम्मारी बजारात माळवं इकनारी ती मालकीन आज मात्र तेच माळवं इकत घेताना मालकीनीचा दिमाक गमावून बसली व्हती. अचानक नदरेपुढं तिला उरल्या चार बिघ्यातले ढेकळं किडलेल्या टरबुजान्सारखे दिसू लागले.
“वंदे, ते टरबूज तसंच टाकलं ना राजनात? नीट पाह्यलं व्हतं का?”
“आगं ते लई गरम लागलं हाताला. पक्कं उन्हटलं आसंल म्हनून टाकलं राजनात.” वंदीचं बोलणं मंदाला काय ऐकू गेलं नही. ती उठली. राज्नातून टरबूज काढलं. पदरानं पुसलं. चहुकून न्याहाळलं. काय कुठं किडीबिडीचं भोक नसल्याची खातरी झाल्यावर पुन्हा राजनात सोडून दिलं.
“वंदे चुल्ह पेटव.” मंदाच्या सांगण्याआधीच वंदीनं चुल्ह्यातली राख आळ्यात वढून गवरीच्या खांडावर राकेल वतलं व्हतं. अन पेटवलेलं ते खांड आपल्या नाजूक हातांनी हिकमतीनं रचल्या लाकडान्खाली सरकवून लाकडं पेटायची वाट पाहत बसली व्हती.
“पेटवलं. च्या ठिवू का कालवन टाकू?”
“च्या ठीव. कालवन टाकिते मी.” असं म्हणत मंदा घरात गेली. उभ्या पोत्याचं तोंड सोडून त्यातल्या चार खोंगा भिंगुनाच्या शेंगा पदरात घेतल्या अन पडवीत येऊन शेंगा सोलत बसली. मंदाचे खोंग दिड्खोंग शेंगदाने सोलून व्हईस्तोर वंदीनं च्याची कब्स्सी आनून मंदापुढं ठीवली अन तयार झालेले दाने वंजळीत उचलून घरात घेऊन गेली. हिरव्या जाडसर चार मिर्च्या, खोन्गभर जाड मीठ अन व्हते तेव्हढे शेंगदाने एका ताटलीत घेऊन दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या सांभाळत भितीला उभ्या पाट्याजवळ गेली. हातातल्या वस्तू खाली ठिवून पाटा आडवा पाडला. त्यावर वराटा सरळ उभा धारून त्याच्या अंगावर वंजळभर पानी घातलं. बाजूला ठिवला. पाट्याच्या खोलगट जागी साचलेलं पानी तळहात आडवा करून झटके देत दूर फिस्कारून दिलं. तोच रिकामी कब्स्सी खाली ठीवत मंदानं तिला थांबवलं. “थांब गं, मीच वाटीते वाटंन. तू लई जाड ठीविती.”
वंदी उठली. उष्टी कब्स्सी उचलली. तीत जरासं पानी घालून ईसळून बाजूला फेकलं अन घरात घेऊन गेली. मंदानं वाटन ताटलीत काढलं. घरात घेऊन गेली. धडकल्या चुलीवर भगूनं ठिवून कालवन टाकलं. उकळी फुटल्या कालवनाचं भगुनं बोटांवर काठ झेलत उचलून औलावर ठिवल. मोकळ्या चुलीवर भानुसीवरला उभा तवा आडवा पाडला. काठूटीत पीठ चाळून मळत सरावल्या हातांमधी उंडे आकार घेऊ लागले. तीन भाकऱ्या अन एक चान्की भाजून टोपल्यात पडली. मंग दोघी जेवल्या. खरं तर हे समदं रोजचंच पर आज सांगायचं कारण म्हंजी त्या दोघीमधी बोलणं कमी अन सराईतपनाच्या हालचाली तेव्हड्या चालत ऱ्हायल्या. तरीपन दोघी बी मनात मात्र रोजच्यापेक्षा जरा जास्तच बोलत व्हत्या. अन हे त्या दोघीन्ला बी जाणवत व्हतं. कदाचित म्हणूनच त्या दोघी एकमेकींच्या नजरा बी टाळत व्हत्या. “लई वारं सुटलंय भायेर. घरातच टाक गोधडी.” मंदाच्या उरातलं कापरं वारं बोलन्यात वाहू लागलं व्हतं. हे कळण्याइतकी समज वंदीला आली व्हती. ती आता नव्वीच्या वर्गाची स्सामाही परीक्षा देणार व्हती. म्हणूनच गोधडीवर आडव्या पडल्या आईशेजारी बसून दप्तरातून आपलं पुस्तक काढून वाचू लागली व्हती. चार पानं उलटल्यावर डोळ्यावरल्या पापण्या जडावल्या अन ती कव्हा कलंडली हे तिला बी नाय कळलं.
मंदानं तिच्या तोंडावरून हात फिरवला. गोधडी वढून तिचं आंग झाकून टाकलं. पर स्वताच्या डोळ्यावर मात्र पाप्न्या काय वढू शकली न्हाई. आढ्याच्या वाश्याकड पाहत ऱ्हाईली. आज आधाराचे वासे तिला सापासारखे वळवळताना भासू लागले. डोळा लागू लागताच वाशांचं असणं सरून आंगावर सपर कोसळून पडल का काय आसा भास व्ह्वू लागला. मंग ती उजाडायची वाट पाहू लागली. आता तिचे डोळे भितीवर लटकलेल्या घड्याळातल्या काट्यांवर लटकून ऱ्हायले. त्या काट्यांचं सरकणं तिला बरच मांगं घेऊन गेलं. तिच्या डबडबल्या डोळ्यात आज पुन्यांदा नवऱ्याच्या वरीसरीदाच्या दिसाची तिच्या नातलगांची बैठक उसळ्या मारत वाटणीच्या कसरती करू लागली. तिनं नेह्मीसारखा हुंदका दाबला पर गतकाळाचा काटा मात्र कुरपासारका टोचतच ऱ्हायला.
“सगळे पावने जमलेच हाय तर लावून टाका एकदांचा सोक्समोक्स.” तिच्या धाकल्या दिरानं इशयाला हात घातला. “दादाच्या आजारापाई चार बिघं जे वपलं ना तेव्हढं कमी द्या वयनीला.” हे मंदाच्या देराचं म्हणणं म्हताऱ्या धोंडीबा मामाला काय मान्य झालं न्हाई. “हे बग अन्ना, आरे एकत्र आसताना जे काय केलं ते समद्याइचं आसतय. मग ती कमाई आसू दे वा गमाई. तव्हा आसं करून न्हाय चालायचं.”
“न्हाय कसं? आता तिच्या नवऱ्याच्या आजारापाई गेली ना जुमीन? त्यात आमचा काय दोस? मंदाच्या ननंदेनं धाकल्या भावाची झील वढली.
“आगं बाई, ही वाटणी नावं करून घेईल अन दुसरा नवरा केला तर टाखिल ना सारं इकून.” गर्दीत कुज्बुजणाऱ्या शांताक्काचं बोलनं मंदाचं काळीज चिरत गेलं तरी बी नवरा गमाव्लेलं तिचं काळीज साऱ्यांचं सारं मान्य करित गेलं. तिचं चवताळ मन हुंब्रू नाय शकलं त्या घडीला.
शेवटी झाले तीन हिस्से. म्हंजी ननंदबाईचं निस्त नाव. हिस्सा ऱ्हाणार तो देराकडच. मंदाला पडीचा हिस्सा घ्यावा लागला. तोही कमीच. घेतला. वावराच्या वाटण्या सरल्या. हिरीच्या पाण्याची पाळी दोन दिसाची. वाटणीला आल्या भांड्यांवर बाडदन टाकून झाकलं. घर न्हाईच. घराचा एक कोपरा बी नाय आला वाट्याला. न्हाय म्हनायला घराच्या बदल्यात पंचीस हजार द्याचं कबूल केलं देरानं. त्यात सादी खोपटी बी नाय व्हणार हे कळत असून बी तिनं कुरबुर न्हाई केली.
“आपून कोर्टात जाऊ.” मंदाचा भाऊ तिच्याशी झाल्या दुजाभावाचं दुख हाल्क करायचा प्रीयत्न करित व्हता. भावाचा हा सल्ला बी नकारत तिनं पदर खोसला. कोपऱ्यावरल्या बाभळीच्या आसऱ्याला खोपी उभी केली. रात अन दिसातला फरक तिनं इसरून मळा फुलवला. चार बिघे जमीनीनं तिला आता बैलगाडीचीची मालकीन बनवलं व्हतं. बैलगाडीभर माळवं घेऊन बाजारला जाऊ लागली व्हती. तिची बैलगाडी बजार तळात आल्याआल्या धा-पाच खेपाडी भवती जमायचे. सौदा करायचे. माळवाच्या डालक्या उचलून न्यायचे अन रिकाम्या डालक्या सांजच्या आधी परत करताना सौद्यापरमानं पैसे मोजून द्यायचे. पर मांगच्या चार हंगामात हिरीचं पानी बसल्यानं तिच्या उरावर आता कोरडे ढेकळं तेव्हढे नाचत व्हते. तशातच गुडग्यावर रिन्ग्णारी वंदी आता नऊ वर्ग सरकत पुढं आली व्हती.
पापण्या दाबून डोळ्यातला साचला गतकाळ वाहता केला. गाल पुसले. घड्याळ पाहिलं. तास काटा आता तिनाला भिडला व्हता. भायेर आजून आंधारच व्हता. डोळे मिटायची गरज भासू लागली व्हती. पर काळीजाचं डूच्काळनं काय थांबना. दुसरी जखम ठसठसत भळभळू लागली.
“काय चूक व्हती यैंची? कोनासाटी करीत व्हते ते?” डोक्याला खोक पडून सूद हरपल्या नवऱ्याचा चेहेरा तिच्या डोळ्यापुढं तरळू लागला.
दसरा. वंदीच्या जल्माच्या सालची हकीगत. मंदा माहेरला. वली बाळतीन. बातनी कळल्या कळल्या वंदीला बाळंत्यात गुंडाळलं. धाकल्या भावानं गाडी जुपली. सासरी पोचली. निपचित पडलेल्या तिच्या नवऱ्याच्या डोक्याला फडकं गुंडाळून झाल्यावर त्याचं रक्ताळलं आंग पुसत म्हादू तात्या हकीगत सांगत व्हता.
मोहतुराला आपल्या लाल कांद्याची गाडी नंदूनं मोहळी लावून भरली अन मार्किटच्या तळावर पयल्या हारित पयल्या नंबरला उलाळून दिली. तेव्हढ्यात गावातल्या गंगारामची गाडी आली. मार्किटच्या बेपाऱ्याईचं अन गंगाराम्च साटंलोटं नंदूच्या काय ध्येनात आलं नव्हतं. गंगारामनं आपली गाडी नंदूच्या गाडीच्या आधी उभी केल्यानं नंदूचा नंबर डावलला गेला.
“गंगा, आरं मी पयला आलोय. मोहतुराचा निलाव माह्याच गाडीचा व्हाया पायजे.”
“येडा झाला का नंद्या? आजपोतूर मी मोतुर चुकवला न्हाई. तू कुठून आला शाना.” गंगारामच्या या बोलण्यानं नंदूचं उसळतं रगात डिवचलं गेलं.
“गंग्या आपल्या आदी गाडी लावू नको. नायतर आपल्यैत्क वाईट नाय मंग.”
“येड्यावानी नगं करू नंद्या. आज्पतूर माह्या नादी नाय लागलं कोनी. उगच जिरवून घ्याची आसल तर लाग नदी.” गंगारामच्या शांत पण मगृरीच्या बोलन्यानं नंदू उसळून उठणार तोच जमलेल्या गर्दीतून सखातात्या पुढं झाला अन नंदूला वढत बाजूला नेऊन चार शबुदाचं शानपन शिकवू लागला. तवर चार बेपारी आपला लवाजमा घेऊन गाड्यानच्या हारीच्या तोंडाशी आले. निलावाचा सुभारंब केला. नारळ फोडलं. गंगारामच्या गळ्यात शाल टाकली. “तीन हजार एकशे अकरा.” गंगारामची गाडी पुकारली. नंदूचा मान गमावला गेला.
“अन्याव हाय हा.” मनातली कळ नंदूनं दाबून धरली. भल्या पाहटी येऊन बी उपेग झाला न्हाई. ही सल डोक्याची सालं सोलत असताना नंदूनं हातातला कांदा मुठीत आवळून रस पिळून उरलेला चोथा बाजूला फेकला. नंदूच्या गाडीभवती बेपारी उभे ऱ्हाईले.
“सातशे अकरा.” माल तर सारकाच पर भाव....? ऐकून नंदूचे डोळे कान्द्यांपेक्षा बी लाल झाले व्हते. आपला मोहतुराचा चानस गंगड्यानं मारला, म्हणून चरफ्डणारा नंदू आतून पेटत ऱ्हाईला.
तसाही गंगाराम कमिटीच्या सदस्याचा पोरगा. त्यामुळं त्याचं समदीकड धकत व्हतं. “त्याच्या नादाला लागू नको.” हा सखातात्याचा सल्ला नंदूचं मन जुमानीना. ते सुडाचा जबडा उघडायचा प्रीयत्न करतच ऱ्हाईलं.
आटपला निलाव. काटा झाला. पावती घेतली. नंदू आल्या वाटानं परत निन्घाला. खरंतर बैलच त्याला घेऊन चालू लागले व्हते. पाठलाग करीत गंगारामची गाडी आली. नंदूला वलांडू लागली. बैलांच्या छंब्यांच्या घुंगुरनादापेक्शा बी त्याची हिंनवनीची नदर नंदूच्या मेंदूवर काकड्याचा फटका देऊन गेली. नंदूनं बी मंग काकड्याच्या पानाचा हवेत आवाज काढला. गाडी घेऊन बैल पळू लागले. गंगारामच्या गाडीच्या पुढं आपली गाडी पळवताना नदूनं शी हासडली अन मंग दोन्हीकडून रस्ताभर फक्त श्यांचा सडा पडत गेला.
थोड्याच येळात आंतराचा अंत झाला. गाड्या थांबल्या. दोघांनी खाली उड्या मारल्या. गळचुंडे धरले गेले. तुफान हानामारीला सुरवात झाली. नंदू पडला. गंगाराम गाडीसह गायप. नंदूची गाडी रस्त्यात उभीच. बऱ्याच गाड्या आल्या. पुढं गेल्या. आंधारात रस्त्याच्या चारीत पडल्या नंदूला कोनी पाह्यलं न्हाई. शेवटी म्हादुच्या म्हताऱ्या बैलांची गाडी वजंवजं आंतर तोडत जवळून जात आसताना नंदूची उभी त्यानं वळखली. मनात पाल चुकचुकली.
“नंद्या...?” हाक देऊन बी म्हादूला सुगावा लागना. धोतर सावरत उतरला. अंधारात डोळे फेकत इकडं तिकडं शोद घेऊ लागला. चारीत वळवळ जानवली. नंदूच व्हता तो.
“रगत?...” वासावरून त्याला कळलं. नंदूला चारीतून वढून वर काढलं. रगतानं भिजले कपडे. घाई करत उचलून गाडीत घातला. आपली गाडी पुढं घेतली. नंदूच्या बैलांचे कासरे आपल्या गाडीच्या पांजरीच्या मुन्यांला बांधले अन बैलांचे व स्वताचे म्हतारपन इसरून गाड्या पळवत नंदूचं घर गाठलं. नंदूच्या धाकल्या भावाला हाका मारत गाडीतून खाली उतरला. मंग आरडावरडा, रडगाग. शेजारीपाजारी धावले. तोवर नंदूला खाली घेऊन त्याच्यावर उपच्याराला सुरवात झाली व्हती. नंदू जरा सावद झाला. समद्यांना घडलं ते सांगून टाकलं पर आखरीला जो कलन्डला तो काय परत उठला न्हाय. सिरपाच्या पिकप गाडीत घालून तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात नेलं.
“ही पोलीसकेस आहे. आधी केस नोंदवा मग अॅडमीट करा.” डॉक्टरनं फोन करून पोलीस बोलवले. पंचनामा वगैरे झाल्यावर डॉक्टरनं सलाईन लावलं अन “ऑक्सिजन संपलाय.” असं कारण देत तिथून खाजगी दवाखान्यात हाकललं.
आरजंट मेंदूचं आपरीशन.
चंद्रकांत शेटला निरोप गेला. तसा तो थेट दवाखान्यात पैशांची थैली घेऊनच आला. एकरभर जमिनीचा तोंडी सौदा झाला. ‘नंदूच्या हिस्स्याची एक एकर जमीन’ असी इसार पावती झाली.
मह्यना उलटला. नंदू ठीकठाक व्हऊन घरी आला. बापाच्या मांगं उताऱ्यावर वारस असलेले तिघं तालुक्याला गेले. चंद्रकांत शेटसोबत ठरल्या आटीपरमानं खर्दीखत उरकवल.
पाच सालं उलटून बी नंदूचं वागणं डोक्यावर परिणाम झाल्यागतच ऱ्हायलं. अश्याच एक दुपारी तो एकलाच गव्हाला बारे द्यायला गेला. अन भवळ यऊन पाटसरीत पडला. कायमचा.
वंदी शाळतून घरी आली. आपलं दप्तर उघडत त्यातनं एक पिवळा कागद काढून आईपुढं नाचवू लागली. “आय दादा कुठंय?... सयी करून उद्या परत मांगीतलं बाईंनी.”
“आगं , लय कव्हाधरनं गेले गव्हाला पानी भराया. पाहाय तरी जाऊन.” मंदाचं बोलनं सरायच्या आधीच वंदीनं धूम ठोकली अन दोन वाटण्या वलांडून तिच्या डोक्याइतक्या वाढलेल्या गव्हाच्या वावरात पोचून हाका मारत सुटली. “दादा.... दादा...”
दांड फुटून पसरलेलं पानी पाहात कोरड्या बांधावरून चालत ऱ्हाईली. तोच पाटसरीत पालथा पडलेला नंदू पाहिला अन मोठ्यानं वरडून उठली. तिचं वरडनं शिवारभर पसरत गेलं. मंग समद्यांचीच धावाधाव.
नंदूला सरणावर सोडून आलेली मंदा सालभरानं येगळी झाली. नंदाला घेऊन.
आता भायेर फटकलं व्हतं. “वंदे उट गं. आज शाळाला सुटी हाय ना? तेव्हढं वावर येचून घेऊ.” आसं म्हणत वंदीचं दप्तर जवळ वढलं. त्यातनं पिवळ्या रंगाचं परगती पत्रक काढलं. त्यावर काल सई करायला इसरली नसल्याची खात्री केली. तेव्हढ्यात तिच्या डोळ्यातून निसटलेला आसू नेमका त्यावर टपकला. जरी तिनं तो हलक्या बोटान हळूच पुसला तरी त्यानं मराठीचे आकडे खाल्लेच, जे जरा जास्ती व्हते इतरांच्या मानाने.
“झोपू दे गं.” वंदी जरा वळवळली अन आंगावर गोधडी वढून पुन्हा झोपली.
रात लोटून लावल्याच्या उस्ताहानं मंदा उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात घोळ घेतला अन आंगनवटा झाडाया भायर पडली.
रावसाहेब जाधव (चांदवड)
७० महालक्ष्मी नगर, चांदवड, जि.नाशिक ४२३१०१.
rkjadhav96@gmail.com
9422321596/9881931384