नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणून आजही संबोधल्या जाते. शेती व्यवसाय येथील शेतकऱ्यांच्या नसानसात भिनला आहे. राष्ट्राला अन्नधान्य मध्ये स्वयंपूर्ण करण्यात येथील शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. देशाच्या सकल घरेलू उत्पादनात शेती उत्पादनाचा मोलाचा वाटा आहे. पूर्वी शेतीला वरिष्ठ दर्जा होता परंतु उत्तम दर्जा असलेली शेती कनिष्ठ कशी झाली? का झाली? याची कारणे अनेक आहेत. महत्त्वाच्या कारणांचा शोध घेतला तर त्यात राज्यकर्त्यांचे 'शेती विषयक उदासीन धोरण आणि शेतमालाला नसलेले योग्य भाव' ही कारणे प्रामुख्याने जाणवतात. जो शेतकरी पूर्वी पाटील म्हणून ओळखला जायचा तो आज एवढा आर्थिक दृष्ट्या कमजोर कसा झाला हे सांगणारी ही एक कथा आहे.
शेखरराव एक शेतकरी होते; त्यांच्याकडे तीस एकर शेती होती. शेखररावांच्या कुटुंबात आई, पत्नी, तीन मुलीआणि दोन मुले असे एकूण आठजण होते. गावामध्ये शेखररावांचा मोठे लोकांमध्ये समावेश होता आणि नातेवाईकांमध्येही श्रीमंत शेतकरी अशी ख्याती होती. शेखररावांवर लक्ष्मीचा वरदहस्त होता; त्यांच्या घरी अक्षरश: धान्यांची रास असायची. शेखररावांनी त्यांच्या भाचा-भाचींची लग्न स्वतः खर्च करून लावून दिली. जशी जशी दिवस जात गेली तसं तशी त्यांची लहान मुले मोठी होऊ लागली. दोन मोठ्या मुली व त्यानंतरचा मुलगा सचिन नंतर एक मुलगी आणि एक मुलगा सर्वांचे शिक्षण आणि इतर खर्च अथवा कुटुंबाचा खर्च ते सहज करत होते. मोठ्या आरामात उदरनिर्वाह चालू होता. एके वर्षी कुणीतरी जळकुकड्याने भर उन्हाळ्यात शेतात असलेले शेवान आणि गुरांचा मांडव भर दुपारी पेटवून दिले. दोन विशीतल्या तरुणांनी शेखररावांची चार बैले आणि तीन गाई वाचविल्या. त्या तरुणांनी चक्क जीवांशी खेळून शेखररावांच्या गुरांचे दावे विऱ्याने कापून गाई-बैलांना जीवनदान दिले. धन्य ते बहादुर तरुण! या घटनेने शेखरराव खचले नाही नेटाने आणि हिम्मतिने शेती कसून भरघोस कापूस, ज्वारी पिकविली. झालेली हानी एका वर्षात भरून काढली. त्यावेळी शेतमालाच्या भावांची जास्त चिंता नव्हती कारण एक खंडी कापसाचा आणि एक तोळे सोन्याचा दर सारखाच होता.
आता दिवस बदलत गेली शेतमालाच्या भावामध्ये मोठी तफावत तयार व्हायला लागली. उत्पादन जरी भरघोस होती परंतु तेवढा पैसा दिसत नव्हता. अशातच शेखररावांच्या दोन्ही थोरल्या मुलींची शिक्षण पूर्ण झाली; त्या उपवर झाल्या. आता मात्र शेखर रावांच्या कपाळावर चिंतेच्या रेघोट्या दिसत होत्या. आईला मुलाचे सुखदुःख बरोबर कळते. असेच सचिनच्या आजीने मुलाची चिंता ओळखली आणि धीर देत त्याला म्हणाली 'एवढी चिंता कायले करते पाच -दहा एकर वावर विकून मुलींचे लग्न उरकून टाक.' शेखर रावांनी आईचा उपदेश ऐकला दहा एकर शेती विकली एक बैल जोडी कमी केली.
काळ आणखीच बदलला मित्रहो एके वर्षी शेखर रावांनी कपाशीची लागवड करून घेतली मात्र जमिनीत पुरेसे ओल नसल्याने सोयाबीनची पेरणी थांबविली. शिवाय जमीनही नांगरणी केलेली होती त्यामुळे पावसाची प्रतीक्षा सुरू होती. काही दिवसातच पाऊस आला परंतु असा आला की धो धो बरसला. शेखररावांचे शेत ओढ्याला लागून असल्याने ओढ्याचे संपूर्ण पाणी शेतात शिरले रात्रभर पाऊस चालला. शेखररावांच्या शेतात जवळपास बारा तास पावसाचे पाणी साचून राहिले. शेत ही खोलगट बदान होते. वाराणी यायचा काही पत्ताच नव्हता. वरून दोन-चार दिवसांनी पावसाचे आगमन होतच होते. शेत पेरणी काही जमलीच नाही. शेत पडले. उत्पादनही कमी झाले. शेतमालाला भावही कमी त्यामुळे त्यावर्षी शेखररावांचे सर्व कर्ज थकले.आर्थिक बोजवारा वाढला शिवाय शेखररावांची चिंता ही वाढली. शेखररावांचा मुलगा सचिन शिक्षण पूर्ण करून वडिलांना शेतकामात जमेल तेवढी मदत करीत होता. पडीक शेत तयार करून हरभरा आणि गहू पेरला. हरभरा छान आला फुलोऱ्यावर आला. एक हलके पाणी दिले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते अवकाळी पाऊस बरसला शेताच्या मानाने भरपूर झाला. फुलोरा खचला हरभरा नुसता वेल्या गेला. अपेक्षित उत्पादन आले नाही. त्यावर्षी उत्पादनात खूप कमी आली. सर्व घेतलेली कर्ज तशीच्या तशीच राहिली. आता शेखररावांचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण झाले. सचिन हे सर्व जाणत होता. सचिनने वडिलांच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले; त्याच्या मनात विविध शंका कुशंका येत होत्या. एके दिवशी तो बाहेरून आला बाबा-बाबा म्हणून हाक मारली. आईने सांगितले बाबा घरी नाही. त्याच्या मनात एकदम धस झाले. काळजाचे पाणी-पाणी झाले.सचिन बाबाला आजूबाजूला शोधू लागला. जेव्हा बाबा दिसले तेव्हा त्याच्या जीवात जीव आला.
आता सचिनने पुढाकार घेऊन एक एकर उन्हाळ वांगी लावली. चांगली मेहनत घेतली. वांगीची चार पाडगी पाडली. त्याची मेहनत फळाला आली. वांगी चांगली जोमात आली फळही लट-लट आली. रोज मंगळवार सोडून सहा ते सात वांग्याची पोते सचिन मार्केटला नेऊ लागला. भावही चांगला मिळू लागला. किमान अडीचशे ते साडेचारशे रुपये एका पोत्याला दर मिळत होता. असे जवळपास दीड महिना सतत चालले आणि सर्व खर्च वजा जाता एका एकरात सत्तर हजार रुपये मिळाले. शेती कसण्याची ऐपत नसताना हे मिळालेले बळ सचिनच्या कामी आले. शेती भाड्याने द्यायची वेळ आली होती परंतु वांगीच्या भावबाजीने टळली. वाचक रसिकहो बघा ही असते चांगल्या अपेक्षित भावभाजीचे महत्व. पुढे सचिनने या पैशातून पूर्ण शेती कसली. अपेक्षित उत्पन्न घेत गेला. कर्जाचे हप्ते भरत गेला. थोडे थोडके सावकारी कर्जही फेडले. मित्रहो कथा इथेच पूर्ण झाली नाही. पुढेही सचिनने कापसाचे शंभर-एकशे वीस क्विंटल उत्पादन घेतले परंतु बाजार भाव उपेक्षित होते. शेतमालाला रास्त भाव मिळत नव्हते परिणामी कर्जाचे हप्ते थकत गेले. राज्यकर्त्यांच्या उदासीन शेती विषयक धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत गेला. शेतमालाची लूट होऊ लागल्याने शेतकरी अधिकाधिक कर्जबाजारी होऊ लागला. सचिनला एक गोष्ट आजही आठवते. आजीला तंबाखू खायची सवय होती. आजी सचिनला तंबाखू आणायला दुकानात पाठवायची. कधीकधी सचिन नाही म्हणायचा मला रुपया दे तेव्हा मी दुकानात जातो असा म्हणायचा. तेव्हा त्याला आजी म्हणायची 'जान राजा कायले एवढा भाव खाते?' आज जर आजी जिवंत असती तर सचिन तिला म्हणाला असता "आजी भाव मी खात नाही तर सरकार भाव खाते." वाचक रसिकांना आता तुम्हीच सांगा भाव कोण खाते?