नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पुस्तकाचे नाव:-वांगे अमर रहे
लेखक :-गंगाधर मुटे
प्रकाशक :-जनशक्ती वाचक चळवळ पिनाक २४४,
समर्थ नगर ,संभाजीनगर ४३१००१
मुखपृष्ठ:- सरदार
अक्षर जुळवणी:- जनशक्ती वाचक चळवळ
मुद्रितशोधन :-विवेक देशमुख संभाजीनगर
प्रथमावृत्ती:- २२ जुलै २०१२
मूल्य :-१३०रुपये
मुद्रक :-सुरज सुगन संभाजीनगर गंगाधर मुटे
आर्वी छोटी ४४२३०७
ता. हिंगणघाट जि. वर्धा
मो.९७३०५८२००४
लेखकाचे रानमेवा कविता संग्रह नोव्हेंबर २०१० ला प्रकाशित साहित्य असून दैनिक लोकमत ,तरुण भारत ,सकाळ लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्रामधून सातत्याने लिखाण झाले आहे.
स्टार माझा या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी तर्फे आयोजित ब्लॉक माझा या जागतिक स्पर्धेत नोव्हेंबर २०१०मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला असून.मेहता पब्लिशिंग हाऊस व मी मराठी डॉट नेट आंतरजालीय लेखन स्पर्धेत पारितोषिक.
वरील पुस्तक आदरणीय युगात्मा शरद जोशी यांना अर्पण केलेले असून शेतकऱ्याच्या समस्येवर घणाघाती प्रहार करण्याचे काम लेखकांनी चोखपणे यात केलेले आहे .तसेच हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने व क्रमबद्ध पद्धतीने लिहिले असून असून पुस्तकाची भाषा अतिशय ओघवती असून वाचकाला सहजपणे समजेल अशी आहे .शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचा धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
पुस्तकांमध्ये अनुक्रमणिकेनुसार एकूण 23 घटक समाविष्ट आहेत. त्यात शेतकरी पात्रता निकष या घटकामध्ये शेती कशासाठी करायची? उपजीविकेसाठी शेती कशी करावी ?त्यासाठी लागणा-या शारीरिक , मानसिक गरजा कायदेशीर गरजा याविषयी उहापोह करण्यात आला आहे.
शेतक-याने थोडे मुजोर होण्याची येत्या काळात गरज आहे.कारण कोट्यावधी रूपयांचे कर्ज घेऊन मोदी माल्आया सारखे काही लोक पळाले आहेत. त्यामुळे शेतक-यालाही हीच भूमिका घेणे अपरिहार्य आहे.तरच आत्महत्या थांबतील..
भारतीय सणांचे अनर्थशास्त्र या घटकामध्ये इडा पिडा जावो बळीचे राज्य येवो असे आपण म्हणतो.परंतु ऋणको व धनको अशी दुकानदारी सावकाराच्या रूपाने चाललेली आपण पाहतो. सणाच्या निर्मिती मागचे ऐतिहासिक महत्त्व विशद करणारे पुराण शास्त्री काही म्हणो .परंतु शेतीमध्ये मिळकतीचा संचय शेतकऱ्याच्या घरात होता कामा नये. शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवून सणांची निर्मिती केली गेली असावी असे लेखक स्पष्ट करतात.कारण अर्थशास्त्रीय दृष्टीने हे घातक आहे.वारीचे दुर्भिष्यही कथन केले आहे.
"वांगे अमर रहे ...."हा घटक मला फार आवडला.कारण यात लेखकाने अनुभव मांडलेला आहे. त्यात शेतमालाला न मिळणारा भाव याची वास्तवता व विदारकता व्यक्त केली आहे .
कॉलेजचे शिक्षण संपल्यावर लेखक शेती करायला लागतो .अन आपल्याकडे जे ज्ञान आहे. ते इतरांकडे नाही या अविर्भावात वांग्याची शेती करण्याचा निर्णय घेतो .पाच एकरात वांग्याची लागवड करतो .अन त्याची मेहनत फळाला येऊन भरघोस उत्पन्न होते .
परंतु पुढेच तर खरी गोम आहे. आंध्रप्रदेश आदिलाबादलामध्ये वांगे नेल्यावर तेथे पोत्यामागे मिळालेला पाच रुपये भाव,त्या तीस पोत्यांच्या हर्रासीसाठी लागलेले तीन दिवसाचे थांबणे असे वर्णन शेतक-याची भयाण वास्तवता सांगून जाते.
जेवणाचा, निवासाचा खर्च वजा जाता पंधरा रुपये कसे जवळून खर्च करावे लागले .आणि तेव्हापासून लेखकाचे पुस्तकी ज्ञान उताणे झोपल्याप्रमाणे झाले आहे.म्हणूनच वांगे अमर रहे हा घटक जरूर वाचावा.
कृषीभूषण पुरस्काराने सन्मानीत शेतकरी जेव्हा कर्जापायी शेतजमीन विकतो .त्यांच्यावर ही पाळी का येते?याचाच अर्थ शेती तोट्याची आहे हे कारणासहीत स्पष्ट केले आहे.
"कु-हाडीचा दांडा ,गोतास काळ" या व्यक्तीप्रमाणे क्षणिक सन्मान मिळवण्यासाठी आपण काळ्या मातीशी प्रतारणा करू नये .आणि बळीराजाने हे वागण्याचे पाप केले म्हणूनच नियतीने त्यावर ही वेळ आणली . असे लेखक खेदाने याप्रसंगी लिहितात.
हत्या करायला शिक या घटकात
"विद्येविना मती गेली......." असे महात्मा फुले म्हणायचे .
विद्येमुळे गती आणि वित्त आले.पण निती नावाचा मधला टप्पाच गहाळ झाला आहे .त्यामुळे शूद्राचा पोरगा आपल्या बांधवांपासून अधिक दूर गेला व आत्मकेंद्रित बनला.
शेतकऱ्याच्या आत्महत्येविषयी जळजळीत प्रकाश टाकण्याचे कार्य या घटकात केलेले असून
सरकारच्या कुचकामी धोरणावर कोरडे ओढलेले आहे.त्याविषयी वरील ओळी:-
"असे गैर की आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुणी"
"परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी "
कवी इंद्रजीत भालेराव म्हणतात:-
"शिक बाबा शिक लढायला शिक
कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक "
शासन आणि प्रशासनाला बंदुकीची भाषा कळत असेल तर आत्महत्या करणे निरर्थक आहे.त्यासाठी अन्यायाविरुद्ध हत्या करायला तुला शिकलेच पाहिजे .घामाची किंमत तुला वसूल करून रस्त्यावर उतरलेच पाहिजे.
Art is moral passion married to entertainment. Moral passion without entertainment is propaganda and entertainment without moral passion is television तात्पर्य कलेचा आस्वाद घेण्यासाठी तुला मन मोठे करण्याची गरज आहे.हेच श्याम्याची बिमारी या माध्यमातून लेखक लिहितात.
लेखनासाठी दोन पर्याय श्याम्या सांगतो ते पुढीलप्रमाणे
१) प्रत्येकाने काळजीपूर्वक एक लक्षात घ्यावे की लिहिणाऱ्याने लिहिताना इतरांवर आपले मत लादत आहोत का? याचा विचार करावा आणि नाराजीचा, नावडल्याचा सूर आल्यास त्याने कलेची कदर केली नाही अशी संभावना करायची नाही
2आत्मपरीक्षणांनी अभ्यास करून तळागाळातल्या जनसामान्याची ज्वलंत प्रश्न हाताळावे . त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा .
तात्पर्य आपले लिखाण कुणाची मर्जी सांभाळण्यासाठी असू नये.तर सत्याची कास धरलेली असावी.हेच आग्रही मत लेखकाचे अधोरेखित केले आहे.
गंध वार्ता एका प्रेताची या घटकामध्ये अर्जुन आणि नीलिमा या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन केलेली आत्महत्या याबाबत माहिती आहे.
अर्जूनला एक मुलगी मुन्नी तर दुसरी शब्दाली असते.सावकार, बँकेच्या कर्जामुळे मुलीचा ड्रेस घेऊ शकत नाही .१५ ऑगस्टला घेऊ,२६जानेवारी घेऊ अशा तारखा तो मुलीला सांगतो.मुन्नीचे विहिरीतून भरतेवेळी छातीवर शर्ट फाटणे व समजदारीने तेच घालणे असे गरिबीचे वर्णन यात केले आहे .शेवटी कर्जापायी मुलीला कपडे घेऊ शकत नाही या हतबलतेने आत्महत्या होते.
भोंडला ,हादगा,भुलाबाईची गाणी या माध्यमातून लेखकाने महिलांच्या व्यथा मांडल्या आहेत
अठराविश्वे दारिद्रय व त्यात संसाराचा गाढा , स्त्रीची होणारी दमछाक ससेहोलपट अचूकपणे या गाण्यातून टिपलेली आहे.
"रुणुझुणु पाखरा जा माझ्या माहेरा"
"माझ्या का माहेरी सोन्याची पायरी"
"त्यावरी बसजो शिदोरी सोडजो "
"माझ्या का मातेला निरोप सांगजो "
अशा प्रकारची कुतूहल वाढवणारी ही गाणी ,गीते.
पीएचडी डिलीटप्रमाणे जपलेले कौटिल्य अर्थशास्त्रीय पुस्तकांतील हे सुवर्ण पान.
शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता येण्यासाठी शेतमालाला रास्त भाव मिळाले पाहिजे. असा जेव्हा विषय निघतो .तेव्हा शेतमालावर प्रक्रिया करणारे युनिट किंवा उद्योग उभारले पाहिजेत असा युक्तिवाद वजा सल्ला तंज्ञाकडून दिला जातो .
कौटिल्य आणि राजा हरिश्चंद्र याचे बोलके उदाहरण लेखकाने वर्णन केलेले आहे. विश्वामित्र यांनी केलेल्या कारस्थानातून राजा हरिश्चंद्राचे संपूर्ण राज्य हातातून निघून जाते. तेव्हा तो मजुरांच्या बाजारात काही काम मिळण्यासाठी जाऊन उभा राहतो. त्याला जेव्हा तू कोणते काम करू शकतो? असे विचारल्या जाते तेव्हा तो राज्य चालवू शकतो म्हणतो.पण मजुरांना या गोष्टीची गरज नसते .शेवटी स्मशानात त्याला प्रेताच्या रखवालीची काम दिल्या जाते.
राज्य चालवणारा राजा हरिश्चंद्र आणि प्रशासन चालवण्याखेरीज कोणतेच कौशल्य अवगत नसलेला पदवीधर यांच्यात कोणता फरक आहे ?
म्हणून शिक्षण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल होण्याची कळकळ लेखक उध्दृत करतात.
शेतकऱ्यांना सबसिडी दिल्या जाते असे वारंवार म्हटले जाते. पण हे अर्धसत्य असून शेतकऱ्याला किंवा शेतमालास प्रत्यक्ष सबसिडी दिल्या जात नाही .शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू ,अवजारे यांना सबसिडी दिल्या जाते .शेतकऱ्यांना ती न मिळता ती उत्पादक कंपन्यांना मिळते.
रासायनिक खते शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध व्हावी .म्हणून उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकार सबसिडी देते .
आमदार ,खासदार मंत्री जनप्रतिनिधी यांना मिळणारा श्रमाचा मोबदला मानधन हा प्रचंड स्वरूपात असून . त्याला सबसिडी किंवा अनुदान मानले जात नाही ही भारतीय शेतक-याची शोकांतिकाच आहे.
"अण्णा सेवाग्रामला या "
या लेखांमध्ये लोकपाल विधेयक यावर प्रकाश टाकलेला आहे.तसेच सेवाग्रामला बापू कुटीसमोर कार्यकर्त्यांसह या .दारुने आंघोळ करावी एवढे मद्यपानाचे ,लायसन देण्याचे प्रमाण वाढले आहे. कायद्याचा कुठलाच धाक राहिलेला नाही.
"गाय वाघ आणि स्त्री" यामध्ये स्वर्गीय सुरेश भटानंतरची गझल या त्याच्या पुस्तकात लेखकाच्या तीन गझलांचा समावेश करण्यात आला होता.
गझल कवितेपेक्षा भिन्न कशी . तिचे वेगळेपण लेखकाने सांगितले आहे. मतला जमीन ,बहर, काफिया, रदीफ हे कसे वापरावे लागतात .यातून चिकीत्सक पध्दतीने गझलेविषयी मत लेखकाने मांडले.ती नजाकत गझलेत असावी असे आग्रही प्रतिपादन ते करतात.
गाईस अभय देण्या वाघास दात नाही
रजनीश जोजविण्या ,सूर्यास हात नाही
खांद्यास नांगराचा का भार सोसवेना
प्राशू नको विषा रे, देहास कात नाही
शेतकरी आत्महत्या, दुर्दशा यावर घणाघाती प्रहार यातून केला आहे.
गाय आणि बाई मधले समानांतर अबला वृत्ती यात व्यक्त झाली आहे.
मानवाला बचावासाठी काहीच दिलेले नाही. पण बुद्धी दिली आहे ज्यामुळे तो संपूर्ण सृष्टीवर हुकमत गाजवतो.
वाघ म्हणजे शासन भक्षक झाले असून गाईचे रक्षण करू शकत नाही.हे विदारक सत्य कुणीही नाकारू शकत नाही .म्हणूनच कृषीमूल्यावर आधारित व्यवस्था नक्कीच येईल हा आशावाद मांडलेला आहे.युगात्मा शरद जोशी यांच्या विचारातून गरीबी निर्मूलन व शेतक-याची आर्थिक सुबत्ता वाढावी यासाठीच्या उपाययोजना शास्त्रशुद्ध पध्दतीने वर्णिल्या आहेत.प्रत्येक व्यवस्थेला अंत हा असतो व तो असलाच पाहिजे.बळीविषयी असलेली कणव लेखकाच्या लेखनीतून पदोपदी जाणवते व हा बदल घडावा क्रांती घडणारच आहे.हा आशावाद शेवटी व्यक्त केला आहे.
अजित नरेंद्र सपकाळ
अकोट जि अकोला
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांची अंत्यंत दयनीय
शेतकऱ्यांची अंत्यंत दयनीय अवस्था च विदित केली.
खूप खूप आशयगर्भ व वास्तववादी.जय, किसान.
पाने