स्त्री महादेवासारखा नवरा का मागते? विष्णूसारखा का नाही?
प्रथम ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोगाचा समन्वय करून जे समाजासाठी जगले, ज्यांनी गीता जगून, अनुभवून आपल्यासाठी ग्रामगीता लिहिली त्या वंदनीय राष्ट्रसंतांना नमन करते. ज्यांनी विचार करायला शिकवलं त्या युगात्मा शरद जोशींच्या स्मृतींना वंदन करते.आजचा आपला विषय... ग्रामीण बोलीभाषेतील पारंपारिक लोकसाहित्य.!
बोलीभाषा दर चौदा कोसांवर बदलते. नागरीभाषा - प्रमाणभाषेच्या व्याकरणाच्या चौकटीतच राहते, वावरते. प्रमाणभाषेची गरज आहे म्हणून महत्त्वही आहे पण प्रमाणभाषा दिवाणखान्यातल्या फुलदाणीतल्या फुलांसारखी असते, तर ग्रामीण भाषा झाडावर फुलून झुलणाऱ्या फुलांसारखी असते. ग्रामीण भाषेचं मातीशी, मातीतल्या व्यवसायांशी नातं असतं. ती लोकांची भाषा असते. लोकसाहित्यातल्या कथा कवितांचा कुणी लेखक नाही. कुठेही कुणाकडेही ”सर्व हक्क स्वाधीन” नाही. कारण ती अनुभवांची लिपी आहे. लिहिता वाचता न येणाऱ्यांची अभिव्यक्ती आहे. अनुभव कल्पना आणि शब्द यांच्या अपार साठ्यातून लोकगीत आणि लोककथा रचल्या गेल्या. हे साहीत्य पिढ्यांनपिढ्या ऐकलं, ऐकवलं गेलं, सांभाळलं गेलं.
वरवर ”भाकड” वाटणाऱ्या या लोककथा अतिशय आशयपूर्ण असतात. चातुर्मासातल्या पूजांच्या कथा खूप सुंदर आहेत. सुमारे सात -आठशे वर्षांपूर्वी आपल्या अनाम पूर्वज स्त्रियांनी त्या रचल्या. पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांना कर्मकांडात गुंडाळून आपापल्या लेकीसुनांना त्या देत राहिल्या. त्या कथांचे आज संकलन, मुद्रण केल्यामुळे त्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. पूर्वीच्या स्त्रियांना त्या ऐकून ऐकून पाठ होऊन जात. त्या कथांमधल्या शब्दांचा नाद, वाक्यांची लय त्या कथांना काव्याच्या....कवितेच्या सीमेवरआणून ठेवतात. ऐकणाऱ्याला आकर्षण वाटावं म्हणून त्यात अनेक चमत्कारही असतात. चमत्कार बाजूला केले की कथेच्या विषयाची ओळख होते.
युगात्मा शरद जोशी नेहमी म्हणायचे की ”कुटुंबात आणि समाजात दुय्यम स्थान स्वीकारून स्त्रियांनी स्वत:च्या बोलण्यातला एक विशेष गुण जोपासला आहे. जे काही सांगायचं ते पुरुषवर्गाला खटकणार नाही अशा पद्धतीने सांगायचं” अनेक कथांमधून हे स्पष्ट दिसतं. या सगळ्या कथा आणि पूजा कुटुंबातली नाती सशक्त, सुदृढ करण्यासाठी आहेत. आपण अनुरूप नवरा - बायकोला, लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतो. विष्णू हे स्थैर्याचं आणि लक्ष्मी हे समृद्धीचं प्रतीक आहे. समाजाला समृद्धी हवी असेल तर स्थैर्य हवंच! पण आपल्या पूर्वज स्त्रियांनी मात्र माता पार्वतीचं उदाहरण कायम आपल्यासमोर ठेवलं आहे. कारण त्यांना हे माहीत होतं की आपण लक्ष्मी झालो तर कायम पायाशी उभं राहावं लागेल आणि नारायण कायम आरामात झोपलेले. याउलट शंकर-पार्वतीच दांपत्यजीवन, सर्वांना आवडणारं आणि आदर्श आहे. शंकर पार्वती एकमेकांसोबत सारीपाट खेळतात, यात्रेला जातात, आकाशमार्गांनी जाऊन पृथ्वीवर काय चाललंय ते बघतात, एकमेकांना कोडी घालतात, प्रश्न विचारतात, उत्तरं देतात. एकमेकांशी भांडतात, रुसून निघून जातात, पण पुन्हा एकमेकांना शोधत येतात. एकमेकांचा सन्मान करतात. सन्मान जपतात. म्हणून प्रत्येक स्त्री ”महादेवा”सारखा पती असावा म्हणून व्रत करते.
सात-आठशे वर्षापूर्वीच्या सामाजिक व्यवस्थेतला हा महिला सक्षमीकरणाचा वसा आहे. बहुतेक कहाण्यांमध्ये वसा म्हणजे व्रत, नागकन्या, देवकन्यांकडून घेतल्याचा उल्लेख आहे. कोणे एकेकाळी उत्तर भारतात असलेल्या अतिशय समृद्ध आणि सुसंस्कृत अशा नागवंशी आणि देववंशी समाजाचं ते स्मरण आहे. त्या सगळ्या कथांचा आशय फार सुंदर आहे. त्यातील नागपंचमीची कहाणी आपल्या ग्रामीण स्त्रियांची जास्त आवडती. मुलांमाणसांनी भरलेल्या घरात, एकीला माहेराची ओढ असते. दुर्दैवाने दुष्काळात तिचे मायबाप देवाघरी जातात. तिचं दु:ख जाणून नागराज तिचा मामा होऊन येतो. तिला ”माहेरी” घेऊन जातो. पण तिथे तिच्या हातून नागराजाच्या पिलांना मोठी दुखापत होते. त्यांच्या शेपट्या जळतात. मोठे झाल्यावर रागारागाने तिला शिक्षा म्हणून दंश करायचं ठरवतात. तिच्या घरी जातात तर... तिच्या घरी नागपूजेचा थाट असतो. सारवलेल्या भिंतीवर हळदी कुंकवाची नागनक्षी... त्याला चंदन, बेल फुलं वाहिलेलं. समई लावलेली. दुधाचा, लाह्या फुटाण्याचा प्रसाद ठेवलेला. ती डोळे मिटून देवाला ”भावांना” सुखात ठेव, असं विनवते. ”त्या” भावांचा राग मावळतो. ते बहिणीला आशीर्वाद देतात.
या कथेला काहीजण निरर्थक मानतात. पण जेव्हा निंदतांना, खुडतांना, कापूस वेचतांना, गहू सवंगताना... एखादा भला मोठा साप दिसतो. तेव्हा थोडं थांबून, हात जोडून, ”देवा नागराजा, तुझी, वाडी तुझं वावरं, बहिणा आली भावाच्या पातीवर”...... असं भावाला सांगून पुन्हा काम करत राहण्याचं बळ ग्रामीण स्त्रियांमध्ये कुठून येतं? या पूजांच्या कथा कहाण्यांतून येतं. समाजातल्या डंख करणाऱ्या प्रवृत्तींना बहिणीच्या मायेनी, सौम्य, सभ्य करण्याचा आशय ह्या कहाणीत दिसतो. बहुतेक सगळ्या पूजा स्त्रियांनी एकत्र येऊन करायच्या आहेत. कुठे जमायचं ?.... देवाच्या दारी, पिंपळाच्या पारी, वडाच्या पाठी, नदीच्या काठी..... त्या काळात स्त्रियांनी एकत्र येऊन बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी या पूजांची संहिता आपल्या अनाम पूर्वज स्त्रियांनीच- शेतकरणींनीच तयार केली.
एका वेगळ्या संदर्भातली लोककथा..... "गिराणाची गोष्ट” गिरान म्हणजे ग्रहण. ग्रहण का आणि कसं लागतं हे सगळ्यांना माहीत आहे. पण लोककथा सांगते..... "पूर्वीच्या जमान्यात सूर्य आणि चंद्र कास्तकार होते. मोठ्ठा कारभार! जमिनीला आकाश टेकतं तिथपर्यंत वावर. पाऊस सुरू झाला. चंद्र, सूर्य, त्यांच्या बायका वावरात गेल्या. जवारीचं पेरणं सुरू झालं. बियाणं नूपुर गेलं. बायकांनी बियाण्याची ठेवरेव नीट निगुतीनी केली नव्हती. आता कातावून काय उपयोग ? गावात कुणीच नव्हतं. सगळे आपापल्या वावरात. बियाणं कुठून आणायचं? गावच्या मसणात दोन इसम आले होते. राहू आणि केतू.. त्यांच्या जवळ ज्वारी होती. तीच पेरायला घेतली.सुगीला पोतभर देऊ म्हणाले. पेरणं झालं. पाऊस पाणी चांगलं झालं. वारेमाप कणसं लागली. खुडणं झालं. खुरवत खळं झालं.वण दिली. ज्वारी काढली. ढोले भरले. सूर्य,चंद्र, राहू, केतूची उसनउधारी भुलून गेले. तेव्हापासून राहू-केतू कधी सुर्याला धरतात तर कधी चंद्राला. म्हणून ”गिरान” लागते. या अशास्त्रीय कथेत शेतीचं शास्त्र आहे.
१) बियाणं नीटनिगुतीनं ठेवलं पाहिजे.
२)ती जबाबदारी घरलक्ष्म्यांची
३)बियाणं पुरेसं आहे ना हे पेरणं धरण्याआधी बघितलं पाहिजे.
४)उधारी उसनवारी वेळेवर परत केली पाहिजे, नाहीतर नामुष्की होते.
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आले की ग्रहण लागतं या वैज्ञानिक सत्यापेक्षा ही लोककथा शेतीतल्या व्यवस्थापनाचं विज्ञान सांगते.
एक लोककथा मनोविज्ञान सांगणारी.... एक होता राजा. त्याला दोन राण्या.. एकीला मुलगा झाला ती आवडती झाली.. दुसरीला मुलगी झाली ती नावडती झाली.. नावडतीला मुलीसह घराबाहेर काढलं.. ती जंगलात राहायला लागली. काही वर्षांनी राजा राजधानीत फिरायला निघाला. त्याला कोष्ट्याच्या घरासमोर सुंदर साडी दिसली. त्यावर मोर विणले होते. राजाला साडी आवडली. पण ती साधी रंगीत सुताची होती. राजा म्हणाला मी सोन्याची जर देतो. हिरे माणकं मोती देतो. माझ्या राणीसाठी अशी साडी विणून दे. कोष्टीदादा म्हणाला ”ठीक आहे” कोष्ट्याने साडी विणली. सोन्याची जर गुंफली, हिरे माणकं जडवली. राजा आला. पण त्याला साडी आवडली नाही. राजा म्हणाला ”या साडीवरचे मोर श्रीमंत आहेत. पण त्या साध्या सुती साडीवरचे जिवंत आहेत.असं का?" कोष्टी म्हणाला ”राजा मी ती साडी माझ्या लेकीसाठी विणली आहे. त्यात धाग्यांसोबत माझा आत्मा विणला मी. "राजाला अपराध्यासारखं वाटलं. लेकीला शोधत जंगलात गेला. एक चिमुरडी देवाला सांगत होती.
"दिली जंगल जमीनं, दिलं आभाळ आभाळ
देवा बापा माझ्या बापा सांभाळ सांभाळ.!"
राजाने भरल्या डोळ्यांनी लेकीला कडेवर घेतलं.
या लोककथा उन्हाळ्यात अंगणात, पावसात ओसरीत छपरीत आणि थंडीत शेकोटीच्या उबेत... जिज्जीकडून, आज्जीकडून, मोठ्या मायकडून ऐकायच्या असतात. तो एक शब्दांच्या पलीकडचा सुंदर अनुभव असतो.
लोककथांसारखीच लोकगीतही फार सुंदर असतात. विदर्भाचे वैशिष्ट्य असणाऱ्या पोळ्याच्या झडत्या, दिवाळीतल्या गायीगोधनाच्या आरत्या आणि माघ महिन्यात खेड्याखेड्यात गायल्या जाणाऱ्या महादेवाच्या गाण्यात नाद, लय, सूर, ठेका आणि अर्थ यांचं कानामनाला भारून टाकणारं गारूड असतं. हातगा, भोंडला, भुलाबाईची गाणी उत्साह आणि निरागस आनंद देतात. काही लोक त्या गाण्यांना सासवासुनांची भांडणगाणी म्हणतात, टिंगल करतात. पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की कित्येक वर्षं, पिढ्यान्पिढ्या, घरोघरच्या, शेजारपाजारच्या, सासवासुना, लेकीबाळी, जावानणदा एकत्र येऊन ती गाणी आवडीने, हौसेने रंगून जाऊन म्हणतात. या भांडणगाण्यांमुळेच कुटुंबातल्या खऱ्या भांडणांची दाहकता कमी होते. कुटुंबातल्या सगळ्याच नात्यात थोडेफार ताण तणाव असतातच. पण ते तुटू न देण्याचं कौशल्य याच सासवासुनांत असतं. म्हणूनच शेतकरी कुटुंबात गरिबीच्या वर्तुळातही कष्ट करताना झिम्मा फुगडी रंगते.
जात्यावरचं दळण संपलं पण सोयरीक जुळली की मुहुर्ताला जातं, सूप, उखळ पुन्हा मानाने समोर येतं. सुरेल शब्द, गोड आवाज, जात्याच्या घरघरीची लय, उखळात कांडण्याचा ठेका. माउली गात असते.. आई वडिलाच्या... सासू सासऱ्याच्या पाचा गं घरच्या पांच जणी.... जात्याच्या पाऊला लाव हळद कुकु वरणाला नको थकू सखुबाई..... घरात एखादं तान्हुलं असेल तर आजीची कविता बहरते..
तान्ह्या लेकराला ऊबजुनी वाकळ चौघडी
शिउ सावून या केली मावशी मामीची लुगडी
काकीच्या लुगड्याला आत्तेचा जरीकाठ
आजीच्या पदराला माया वं काठोकाठ......
लोकरामायणातल्या काही ओव्यातर दृक्श्राव्य आहेत. शूर्पणखेबद्दल वाटणारा राग कसा व्यक्त झालाय बघा..
सुलक्षेना सकवार सीता घाबरी घुबरी
सामोर उभी राहे शूर्पणेका निलाजरी......
शूर्पणखेच निलाजरेपण ऐका...
निलाजरी शूर्पणेका रामा लक्षुमना झोंबी
झिंज्या मोकळ्या गळ्यात उघडी पाठ दावी ठोंबी.
तर सीतेला वडिलकीच्या नात्यानी सल्ला दिलाय....
गुंजभर सोनियानी गळसरी शोभे गळा
सोनियाच्या हरणाचा का गे सीताबाई लळा....
एक ओवी तर इतकी अर्थपूर्ण, अगदी आशयघन.....
सीतेच्या डोळा पानी, मंदुदरीला ये रडं
बोले नाही भरतारा, सोनियानं गळा जड......
आजही समाजात सोन्यानं गळा जड झाल्यामुळे भ्रष्टाचारी नवऱ्याला शब्दानेही बोलू न शकणाऱ्या अनेक मंदोदरी दिसतात.अशी आशयपूर्ण, अभिरुची संपन्न रचना करणाऱ्या अनेक बहिणाबाई शेतात, घरात कामे करत असतात. बी अंकुरावे इतकी सहज त्याची अभिव्यक्ती असते. आजकाल टि.व्ही. वर सादर होणाऱ्या भिकार, टुकार, अर्थहीन, दरिद्री प्रस्तुतींमुळे हा प्रतिभेचा पारंपारिक, श्रीमंत अविष्कार दडपला न जावो.
शेतातल्या मातीतली एक ओवी
लक्षुमीच्या हातामधी इळा पालवाचं लेणं
खांदाडीत वो माईना पऱ्हाटीनं दिलं देणं.
- प्रज्ञा बापट
यवतमाळ