Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***बी आर एस चा भुलभुलैया

*बी आर एस चा भूलभुलैया*
~ अनिल घनवट

"अगली बार किसान सरकार" अशी घोषणा देत तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (के सी आर) यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. नांदेड येथे विराट सभा घेतली व तेलंगणा राज्यात राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. तिकडे राबविली जाणारी रयतू बंधू योजनेने सर्वांचेच लक्ष वेधले. सर्व शेतकऱ्याने वर्षाला दहा हजार रुपये दिले जातात ही विशेष आकर्षण निर्माण करणारी योजना ठरली.
शेतकऱ्यांचे विषय घेऊन एक पक्ष येतो आहे म्हटल्यावर सर्वच शेतकरी संघटना, चळवळीतील अनेक कार्यकर्ते बी आर एस मध्ये सामील होण्यास उत्सुक झाले. शरद जोशींनी स्थापन केलेल्या स्वतंत्र भारत पक्षाने सुद्धा निवडणुकीत या पक्षाशी युती करायला हरकत नाही असे बहुतेक कार्यकर्त्यांचे मत झाले होते. शेतकरी संघटनेत बऱ्यापैकी योगदान असलेले काही कार्यकर्ते थेट बी आर एस मध्ये प्रवेश करते झाले.
मुख्यमंत्री के सी आर ज्या योजनाबद्दल इतक्या गर्वाने महाराष्ट्रात मांडतात, त्यात किती सत्यता आहे हे एकदा समक्ष पाहून यावे म्हणून काही कार्यकर्त्यांसह तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना भेटायला गेलो.
ज्या परिचिताकडे हैदराबादमध्ये आमची मुक्कामाची व्यवस्था होती त्यांना आमच्या दौऱ्याचा हेतू सांगताच त्यांनी, " आरे कायकू उसके नाद को लागते" असे ताडकन उत्तर दिले. आम्ही हादरलोच. पण ही व्यक्ती शेतकरी नाही, शेतकऱ्यांसाठी केलेले काम यांना माहीत नसावे म्हणून कदाचित असे मत बनले असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष केले.
दुसऱ्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी ग्रामिण भागात गेलो. तेलंगणातील शेतकऱ्यांची संघटना , 'रयतू संघम' च्या नेत्याने हिंदी समजणाऱ्या व बोलणाऱ्या शेतकऱ्याचा नाव पत्ता दिला. जमलेल्या पाच सहा शेतकऱ्यांना आम्ही विचारले की शेतकऱ्यांसाठी इतक्या योजना तेलंगणात आहेत तर शेतकरी खुश आहेत का? तर सगळ्यांनी नाही असेच उत्तर दिले. दहा हजार वर्षाला मिळतात हे खरे पण शेतीतसाठी असलेले सर्व अनुदान बंद केले आहेत. आता ठिबक, शेततळे, ट्रॅक्टर, मशिनरी, कांदाचाळ कशावरच अनुदान मिळत नाही. हंगामाच्या सुरुवातीला दिले जाणारे म्हणजे डिसेंम्बर मध्ये पाच हजार मिळायला पाहिजे होते ते अजून मिळाले नाही. एकाने सांगितले की सामान्य शेतकऱ्याला दोन तीन एकर जमीन असते पण काही पुढार्यांनी शेकडो एकर जमीन घेऊन ठेवली आहे, ते शेती करत नाहीत पण त्यांना लाखो रुपये असेच मिळतात.
शेतीसाठी वीज मोफत आहे म्हणजे वर्षाला चारशे रुपये आकारणी करतात पण घरासाठी लागणाऱ्या विजेचे बिल काही पटीने वाढवले आहे. म्हणजे इकडे मोफत दाखवायचं अन दुसरीकडून वसूल करायचा कार्यक्रम आहे असे शेतकरी सांगत होते. वीज २४ तास मिळते पण उन्हाळ्यात शेतीसाठी रात्रीची वीज नसते. तरी महाराष्ट्रा पेक्षा बर आहे असं आम्हाला वाटले.
तेलंगणा मध्ये आत्महत्या पूर्ण बंद झाल्या आहेत असा प्रचार केला जातो पण प्रत्यक्ष विचारणा केली असता " रोज हो रहें साब आत्महत्या" असे उत्तर मिळाले. या बाबत माहिती घेतली असता असे दिसते की आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे पण के सी आर च्या काळात २०२२ पर्यंत ६८३१ आत्महत्या झाल्या आहेत व जानेवारी २०२३ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंत तेलंगणात ७६ आत्महत्या झाल्या आहेत. (एन सी आर बी अहवालानुसार). एक ही आत्महत्या होत नाही हा दावा सपशेल खोटा आहे.
प्रत्येक जेष्ठ नागरिकाला दोन हजार पेन्शन दिली जाते हे सुद्धा खरे नाही. कुटुंबात एक व्यक्तीला दिली जाते त्यात अनेक निकष आहेत. फार थोड्या लोकांना मिळते. आपल्याकडे दारिद्र्य रेषेखालील लोकांना जसे पिवळे कार्ड असते तसे तिकडे पांढरे कार्ड असते अशांनाच प्राधान्य आहे.
बेघरांना दोन बी एच के घर देण्याची फक्त घोषणा झाली अद्याप कोणाला ही घर मिळाले नाही असे लोक सांगत आहेत. इतकेच नाही तर भूमिहीनांना तीन एकर जमीन देण्याची सुद्धा फक्त घोषणाच आहे, एकालाही जमीन मिळालेली नाही.
सिंचनावर राज्यात भर दिला व क्षेत्र वाढवले हे खरे आहे पण सर्व क्षेत्र सिंचनाखाली आले हे खरे नाही आम्ही ज्या भागात होतो तेथे सर्व शेती विहीर बोअरवेल वरच होती कॅनॉल बागायत नव्हते.
भगीरथ योजने अंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणी अजून मिळालेले नाही. जिथे योजना आहे तेथील लोक हे पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. गावात फिल्टर बसवलेत पण त्याचे पाणी फार कोणी वापरत नाही असे ग्रामस्थ सांगत होते.
दलित बंधू योजनेत बिन परतीचे दहा लाख रुपये दिले जातात हा विषय काढला असतात गावकऱ्यांनी सांगितले की फक्त निवडणुकी पुरतीच ती घोषणा होती. निवडणुकीच्या वेळेस एका मंडळामध्ये फक्त काही दलितांना दिले. नंतर देई ना. बाकी परिसरातील दलितांनी परत जोर लावल्यावर एक दोन एक दोन लोकांना देत आहेत. तेथे छोटी मोठी सामाजिक कामे करणारी एक कार्यकर्ती भेटली तिने सांगितले की व्यवसायासाठी पाच लाख रुपये द्यायची योजना आहे. पण एक लाख रुपये आगोदर तेथील कार्यकर्त्याला व कर्मचाऱ्याला द्यावे लागतात मग ते मंजूर करतात. तीने पाच सहा बायांचे एक एक लाख रुपये जमा करून दिलेत पण तीन महिने झाले अजून प्रकरणे मंजूर झाले नाहीत.
शेतकरी कुटुंबात मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये दिले जातात या बाबत विचारणा केली असता एक शेतात काम करणाऱ्या बाईने सांगितले की तिची सासू वारली व अनेक महिने झाले ते पाठपुरावा करत आहेत पण सरपंच ग्रामसेवक सांगतात की ती योजनच बंद झाली. शिवाय निकष आहेतच.
तिसऱ्या दिवशी आम्ही बाहेर पडलो तर पाऊस झालेला होता, काही ठिकाणी गारपीट ही झाली होती. रस्त्यावर वाळू घातलेल्या धानाच्या ( भाताच्या ) खाली पाणी जाऊन खराब झाले होते. शेतकरी कॉक्रीटच्या रस्त्यावर धान पसरवून वळवीत होते. नैसर्गिक आपत्तीची किती नुकसान भरपाई मिळते असे विचारले असता. काहीच देत नाहीत असे म्हणाले. तिकडे पीकविमा नाही अन कर्जमाफी सुद्धा मिळलेली नाही. ही शेतकऱ्यांनी दिलेली माहिती.
एकूणच के सी आर च्या नेतृत्वाखाली दाखवले जाणारे तेलंगणाचे गुलाबी चित्र इतके गुलाबी नाही. राज्यात यांचे सरकार आल्या पासून भ्रष्टाचार वाढला आहे. राज्याची सत्ता के सी आर च्या कुटुंबाच्या हातात आहे. मुलगा , मुलगी, जावई, साडूचा मुलगा ही मंडळीच सर्व कारभार पहातात. के सी आर ची मुलगी कविता ही मागील लोकसभेत मुख्यमंत्र्याची मुलगी असताना निझामाबाद मतदारसंघात हारली. तिच्या भ्रष्टाचाराला व दादागिरीला निझामाबाद परिसरातील व्यापारी व जनता वैतागली होती.
ते इतके खराब आहे मग निवडून कसे येतात असा प्रश्न आम्ही केला तर एम आय एम ची साथ आहे म्हणून निवडून येतात. पुढच्या वेळेला यांचं सरकार येण्याची शक्यता नाही असे काही लोकांचे मत आहे. बी आर एस चे काम खरच इतके चांगले असते तर त्यांना निवडणुकीत दारू, कोंबड्या व पैसे वाटण्याची गरज का पडावी?
कलमेश्वर उपसा जलसिंचन प्रकल्पाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. या प्रकल्पामुळे काही क्षेत्र सिंचन खाली आले आहे पण यात नवीन काही नाही असे प्रकल्प इतर राज्यात आहेत. तसेच कलमेश्वर प्रकल्पाचे जनरेट मागील पुरात पाण्या खाली गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. असे तेथील जाणकार सांगत होते.
शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते बी आर एस मध्ये दाखल झाले आहेत. काहींनी तेलंगणाचा 'सरकारी' दौरा केला. सरकारी लोकांनी जे गुलाबी गुलाबी आहे तेच दाखवले व ही मंडळी त्याला भाळली. काहींनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे भले होईल या आशेने बी आर एस स्वीकारले पण काहींनी केवळ बी आर एस कडे खूप पैसा आहे व आपण लटकून राहिलो तर काही न काही ओघळ आपल्या पर्यंत येईल व आपल्याला बरे दिवस येतील म्हणून बी आर एस मध्ये गेले आहेत.
शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पार्टीची बी आर एस बरोबर युती करून निवडणूक लढविण्याची प्रामाणिक इच्छा होती. त्यासाठी काही नेत्यांना संवाद करण्याची जवाबदारी ही दिली होती पण के सी आर ने छ. संभाजीनगरच्या भाषणात खाजगिकरणाला विरोध करीत थेट राष्ट्रीयकरणाची भाषा केल्यामुळे एका स्वातंत्र्यवादी पक्षाला बी आर एस बरोबर युती करणे शक्य होणार नाही असे दिसते.
मी जे लिहिले आहे ते सप्रमाण आहे. शेतकऱ्यांशी बोलतानाचे व्हिडीओ आहेत. कोणाला खात्री करायची असेल तर माझ्याकडे येऊन पाहू शकता. ही महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांशी तुलना नाही , फक्त बी आर एस ने केलेले दावे किती खरे, किती खोटे याची पडताळणी करण्याचा प्रयत्न आहे.
शेवटी एकच म्हणेल की जे आर्थिक किंवा राजकीय लाभासाठी बी आर एस मध्ये जात आहेत त्यांनी खुशाल जावे. पण जे शेतकऱ्यांचे भले होईल या आशेने ( किंवा शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी) बी आर एस मध्ये जात आहेत त्यांनी एकदा तेलंगणाचा ग्रामीण भागाचा दौरा करावा, शेतकऱ्यांशी बोलावे व पटले तरच प्रवेश करावा. आयुष्यभर चळवळीत कमावलेली प्रतिष्ठा अशी गमावू नये. महाराष्ट्रातील राज्यकर्ते लबाड आहेत म्हणून बी आर एस मध्ये प्रवेश करत असाल तर आगीतून निघून फुपाट्यात प्रवेश करण्यासारखे आहे हे मात्र नक्की.
दि.२९/०४/२०२३

अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी

Share