Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




परतीचा पाऊस

लेखनविभाग: 
कथा

"परतीचा पाऊस "

"आयुष्य वेचावं तेवढं कमीच, एखाद्या नांगराची फळी जमिनीत रूतुन बसावी अन संपूर्ण जमीनंच त्या फळीने नांगरून टाकावी असं ह्या जगण्याचं झालं. कितीही हाय-हाय करा, शेवटी 'पळसाला पानं तीनंच' कितीही राबलं तरी काई उरत नाई . या प्रपंच्याच्या चक्कीत सगळं आपोआप भरडून निघते. साऱ्या जिंदगीचंच पीठ होते. तरी जगल्या सारखं वाटतंच नाही. या संसाराचं रडगाणं आयुष्यभर सरता सरत नाई. सुख दुःखाच्या या चक्रव्युहात माणूस इतका गुरफटून जातो, की त्याला त्यातून मृत्यूशिवाय सुटकाच नाई. ही आजची परिस्थिती ......" हा मनोमन विचार करत सुमन आपल्या मनातली गोष्ट उकलत होती.
आपल्यालाही कधी कधी असं वाटते, की या शेतीवाडीत काहीच पडलं नाई. पण खेड्यात तिच्याशिवाय आता पर्याय नाही. आधी शेती एवढी पिकत नव्हती, एकरी आठ दहा क्वीटल कापूस कधीच होत नव्हता, त्यावेळी रासायनिक खतं नव्हते, फवारे नव्हते, आजच्या सारखे अर्लीचे बियाणे नव्हते, घरचंच शेणखत टाकू टाकू कास्तकार शेती कसदार बनवत..... तरी पीक कमीच....आता तर पेरणीच्या आधी पासून सेल्फेट टाकू-टाकू जमीन कसदार बनवावी लागते. पेरणी पासून तर सोंगनी पर्यंत खत, फवारे मारून पिक उभं करावं लागते, तेव्हा कुठं तीन- चार महिन्यात येणारा उडीद, मुंग, सोयाबीनचं पीक, एकरी दहा अन बाराचा ऍव्हरेज देते. तेव्हा कुठं कास्तकाराचे घरं सोयाबीनच्या पोत्यानं बदबद भरले दिसते, अवाका मोठा दिसते पण तरी हणहण घरात कायमचीच..... !एवढा पैसा दिसूनही घरात कधी लक्ष्मी नांदतच नाही, घरात पैसा थांबतच नाही. मोरीतलं पाणी मोरीतच आटून जाते.... पूर्वी एवढा पैसा नव्हता. पण घरदार कसं दणदण बोलत होतं. घरादारात लक्ष्मी येरझारा मारत होती. शेतीतल्या राशींची आधी पूजा केली जायची, मगच रास घरात आणल्या जात होती. आता तर शेतातच धान्याची गाडी भरली जाते ते थेट मार्केटात. शहर अन खेडे जवळ-जवळ सारखेच झाले. गावातली लक्ष्मी तसीही आता भंगली, सगळी ओढ आता शहराच्या दिशेने लागली. गावात राहिलंच कोण? फक्त शेतमजुरी करणारा.......त्याचाही नाईलाज आहे म्हणून तो खेड्यात राहतो; पण त्याचेही पोरंबाळ आता खेड्यातल्या शाळेत न शिकता तालुक्याच्या कॉन्व्हेंट मध्ये शिकतात. आपण आपलं शिक्षण मनासारखं शिकू शकलो नाही पण कमीतकमी मुलांनी तरी त्यांच्या मनासारखं शिक्षण शिकावं. ह्या आजच्या आई वडिलांच्या मापक अपेक्षा; म्हणून कितीही धावपळ केली, कितीही शिल्लक पाडलं तरी हा प्रपंचच शेवटी.... यात काही पुरतंही नाही आणि उरतही नाही. दरवर्षी तेच ते रडगाणं..... तीच ती कटकट....वर्षभर जरी राबलं तरी गाठीले काही उरलेलं दिसतच नाही.
असे नाना विचार सुमनच्या मनात सैरावैरा धावत होते. क्षणात कितीतरी विचाराची गर्दी होऊन मन एका गोष्टीवर थांबायला तयारच होत नव्हतं. कुठेतरी मनात एक पोकळी निर्माण झाली होती.आणि ती पोकळी भरण्यासाठी मनाने एखाद्या गोष्टीचा घेतलेला वेध जोपर्यंत आपलं लक्ष पूर्ण करीत नाही, तोपर्यंत मनातली हुरहूर कायमच राहते म्हणूनच न राहवून ती एकनाथला म्हणाली,
"अहो कार्तिकचे बाबा, एक गोठ होती, सांगू काय?
"हं सांगणं ! काय म्हणतं?" एकनाथ बसूनच विचारू लागला.
एकनाथ म्हणजे सुमनचा जन्माचा साथीदार, नवरा... स्वभावानं साधा, सरळ, भोळा शंकर..... उन्हाळ्याची ऊन म्हणजे लाही लाही करणारी, त्यात तो अंगणातल्या खाटेवर निंबाच्या झाडाखाली हवा खात बायकोचं बोलणं ऐकत होता. घरात ती एकटीच बळबळ करत होती. जीवाला वैताग आल्यासारखी आपला हलकासा राग कधी आपल्या परिस्थितीवर तर कधी नवऱ्यावर काढत एकनाथला बोलू लागली.
"गावात आता पहिल्यासारखा राम राहिला नाही. हे जंगलातलं काम करणं म्हणजे बैल बनून जगण्या सारखं हाय. खांद्यावर जु घेतलं की निघालं, घानीच्या बैलासारखं दिवसभर राबत रहा. तरी हातात काय पडते तर चार टिकल्या, काय होते तेवढ्यात? महागाई अभायाले टेकली. त्यात गावात कधी मजुरी लागते, त कधी चार-चार दिवस कामच नसते. पेरणीची अन कापणीची वेळ सोडली तर वर्षभर मजुरीचं हे असंच, कार्यक्रमाला बोलावलेल्या निमंत्रित पाहुण्या सारखं...... आठवड्यातुन एक-दोन दिवस जरी मजुरी लागली, तरी बाजारहाट अन तिखट मिठाची सोय होते; पण गावात कोणताही धंदा टाकावं म्हटलं तर तोही चालत नाही. साधा किराणा, स्टेशनंरी जरी टाकली तरी लोक इथून वस्तू न घेता तालुक्याला जातात. साधी गुटखापुडी जरी खायची झाली तर इथंले माणसं लगेच गाडीला किक मारली की तालुक्याला निघतात. गावात शेतीवाडीशिवाय काही राहिलं नाही. काय कराव काही~~ कळत नाही".
सुमन आपलं दुःख व्यक्त करू लागली. आडे-वेडे देऊन बोलू लागली. सरळ सांगणं तिला अवघड वाटत होतं. म्हणून ती घरातच कुरकुर करू लागली. एकनाथला त्याचा काही अर्थ कळत नव्हता. तेव्हा तोच उठून उभा होत बोलू लागला.
"आवं, मनात काय हाय ते एकदाचं सरळ सांग बाई, म्हणजे कळल तरी, ह्या डोस्क्यात तू बोललेलं काई बसत नाई." सुमन जवळ येत
"माया मनात लय दिवसाचा एक विचार हाय,जरा अवघड हाय पण आपल्या संसाराच्या हिताचा हाय, सांगू काय? "
"सांगणं तं मग......!मी काय नाई म्हणतो " एकनाथ कपाळावरचा घाम पुसत विचारू लागला.
"यंदा एक- दोन एकर वावर लागोनन करावं असा इचार हाय माया ! तेवढाच पैसा शिल्लक पडते. बाकी उरतेच काय म्हणा?तशी तं खड्यातली माती खड्डा बुजवालेच कमी पडते पण अशी उलाढाल केल्याशिवाय पर्याय नाही. काय तेवढी मेहनतच जाईन आपली...!"
तीचं बोलण खरंच होतं पण एकंदरीत कठीण होतं. म्हणून एकनाथ शांतपणे सर्व ऐकूण मग बोलला,
"आवं पण, तू म्हणतं ते इतकं सोपं काम हाय का.... ? सुरवातीलेच पैसा पाहिजे लागोनचे द्याले. बी भरन, खतपाणी,फवारणी, पेरणी यालेच तं किती खर्च येते. शिवाय वावर तयार करा, त्याले वेगळा खर्च.... तोंडातली गोष्ट काढल्या बरोबर होत असते का, 'लागली तहान की खंदली विहीर'. असं थोडी असते. काही आपलं.....गावात लागोनचे भाव अभायाले टेकले. चांगलं वावर म्हटलं की, दहा-बारा हजाराशिवाय भेटत नाई. मागच्या चार पाच वर्षात लोकायले बदबद पिकलं म्हणून हे पाच-सात हजाराचे भाव एकदम दहा-बारा हजारावर गेले. घरात एक रुपयाही शिल्लक नाई, तसंच तं आपलं सांजी आणनं अन सांजी खानं चालू हाय. काहीतरी आपलं बोलण......उचलली जीभ की लावली टाळूले." एकनाथने ती गोष्ट हुडकून दिली.
"आहो पण, मी काहीतरी विचार करूनच बोलली असलं ना !"
"म्हणजे... !" एकनाथ आच्छऱ्याने विचारू लागला.
"आपल्याजवळ पैका नाही पण त्यासाठी काहीतरी करावंच लागन ना! माया मनात एक ईचार हाय.सध्या लागोन एकरी आठ-दहा हजार हाय, म्हणजे दोन एकराचे पंधरा सोळा हजार झाले. तसा वर्षभऱ्याचा खर्च आपण आपल्या मजुरीतुन भागून घेऊ. वाटल्यास एका सांजिले कमी खाऊ, सनावाराले गोडधोड करू नाई. पण पुरा पैसा वावरालेच लावू. हे सर्व वावर केल्यावर पाह्यता येईन. एकदाची पेरणी झाली की, मग जास्त खर्चच नाही. सोयाबीन, तूरच टाकू. कमी खर्चाचे पीक...".
कुसुम बोलत होती. एकनाथ फक्त ऐकत होता.थोडा विचार करून नंतर तोच काही वेळाने बोलला,
"हे तुय बरोबर हाय पण पैशाचा बजेट कसां लावशीन".
"त्यासाठी मी बरोबर ठरवलं हाय, तुम्ही आता त्याचा विचार करूच नका. तुम्ही ज्या मालकाकडे महिन्याने काम करता त्यांना अंगावर दहा हजार मांगा आण मी माया भावाले आठ-दहा हजाराचं म्हणून पायतो,पाहू लेकाले पुढच्या पुढं..... जे होईन ते पाह्यता येईन.यंदा हात टाकूनच पाहू...... "
सुमन मनातलं सर्व उकलून टाकल्यासारखं मन मोकळ करून बोलत होती.
पण तिच्या हिमतीने एकनाथची छाती एकदम फुगून गेली. त्यालाही बरं वाटलं. तिच्या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावरचे हाव- भाव बदलून गेले. पण एक मन हो म्हणतं होतं तर दुसरं मन मनालाच खात होतं. त्यांन सर्व शांतपणे ऐकून घेतलं पण मनात आणखी विचार येऊ लागले. एवढा पैसा आपण मालकाला आजपर्यंत मागितला नाही, दिले त बरं, नाही दिले त....आणि त्यात निसर्गाचा काय भरोसा, मागच्या दोन चार वर्ष चांगल पिकलं पण दरवर्षी पिकनच कशावरून. हा पाऊस तर वेळेवच चाट मारते. चांगले-चांगले, सदन कास्तकार यात डुबले तेव्हा पासून ते वर आलेच नाही; पण काहीजण तरलेय म्हणा....... अशा द्विधा मनस्तीतीत तो विचार करू लागला. पाहू लेकाले जे होईन ते.... तरु नाही त मरू, यंदाच साल असंही. असं म्हणून त्यानं सुमनले होकार दिला.
"ठीक हाय तू म्हणतं तसं...! पाहू काय होते ते. जाऊन विचारतो मालकाले" तेवढंच सुमनले बरं वाटलं.
एकनाथ तसा कामाले जब्बर माणूस. पण हिमतीने बराच कच्चा होता. प्रत्येक कामात त्याला सुमनचा आधार हा डोंगरा सारखा वाटत. संसारात बायकोच्या प्रेमाइतकं मोठं सुख नाही. कितीही दुःखात असला तरी सुमन त्याला घरी आला की, प्रेमाच्या दोन गोष्टी सांगून त्याच्या मनावरची मरगळ दूर करत होती. त्यामुळे त्याला आकाश ठेंगनं असल्यासारखं वाटत होतं. कितीही संकट आली तरी तो सहज पेलत होता. लहानपनापासून आई-वडिलांच छत्र हरवलेलं, त्यात पाठीवर लहान दोन बहिणी, त्यांचं शिक्षण, त्यांचे लग्न हे सर्व एकनाथनेच पार पाडले होते. दहावी नापास झाल्यापासून तो पंडितराव देशमूखाकडे साला- महिन्याने राहू लागला. जबाबदारीचं ओझं लहानपणीच अंगावर आलं होतं. आणि तेव्हापासून तो पंडितरावाचा विस्वासू बनला होता. लागणाऱ्या पैशाची उचल आधीच करून तो महिनोगणती ते पैसे फेडत होता. मागचेच पाच-सहा हजार अंगावर असल्यावर अजून मालक दहा हजार देतील का याचा तो विचार करीत होता.
तरी तो मोठया हिमतीने मालकाच्या घरी गेला. पंडितराव ओसरीवरच पान खात बसला होता. दुरूनच एकनाथ हासल्यासारखं करून जवळ येत लाजत, हात जोडत जरा अंतरावरच उभा राहिला .
"बोला एकनाथराव, आज काय नवीन काढलं?" एकनाथ तोंडातली थुंकी आत गिळत.
" काही नाही तुमच्याकडेच काम होतं."
"आमच्याकडे.... कायचं बॉ? "
"पैशाचं होतं मालक..... . !"
"अरे, एकनाथराव मागचेच त पाच-सहा हजार अजून शिल्लक हाय, वरतून हे म्हणजे लय होईन ना.आता कायले पैसे पाहिजे तुले. बरं किती पाहिजे आता.....?"
एकनाथ लाजत लाजतच, "पाहिजे होते दहा हजार..... !"
"बापा बापा...... दहा हजार! कायले रे बावा? " पंडितराव अवाक झाल्यासारखा बोलू लागला.
"अरे भल्या माणसा मागचे पाच - सहा, आताचे दहा म्हणजे......लय झाले ना ते. पंडीतराव एकदम तोडल्या सारखा बोलू लागला.
"मालक यंदा वावर लागोनन कराचं हाय. बायकोची इच्छा होती म्हणून म्हटलं यंदा हिम्मत करूनच पाहातो "
पंडितराव त्याच्या बोलण्यावर उपेक्षात्मक हसून,
"अरे, घरच्या बाया मूर्ख असतात रे... त्यांच्या मागे आपण कधीच लागायचं नाही सांगून ठेवतो. त्यांना वाटते, लागोनने वावरं केले की झालो आपण श्रीमंत; पण त्या मागचा-पुढचा काहीच विचार करीत नाही. मागच्या दोन-तीन वर्षापासून घरच्या शेतीवाल्याचीच कंडिशन बेकार हाय, तिथं लागोन वाल्याचा काय विचार करतं... लावलं तेवढंही निघतं नाही. लागोनने शेती करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा, लागोनन तर शेती करालेच पुरतं नाही...... म्हणून म्हणतो त्याच्या मागे लागू नको, मी तुले सरळ सल्ला देतो: आपलं मासोयच्या नाल्याजवळच मुरमाळ दीड-दोन एकर हाय, तेच वाह्यतिले घे अन पीक काढ चांगल. लागोनचे पैसे फेडता यीन मजुरीतुन हळूहळू....."
तसा एकनाथचा चेहराच उतरला. तो हात जोडत पंडितरावाना म्हणाला, "त्या मुरमाळ जमीनीत काय पिकते मालक, मागल्या वर्षी त्या दोन एकरात कुळभर सोयाबीन झाली नाही, लावलं तेवढंही निघालं नाही. आधीच मुरमाळ जमीन ती, त्यात उतारपाट्यावर असल्याने सगळं पाणी वाहून जाते. ते वावर परवडत नाही मालक"
हे ऐकल्याबरोबर पंडितरावाची चांगलीच लाल झाली. तो आणखी रागात येऊन बोलू लागला.
"मग तुले काय सोन्याचा तुकडा पाहिजे काय? सर्व तुया मनासारखंच भेटणं काय? आपला म्हणून तुले सांगतलं तं तू तुयीच टपरघाई लावून राहिला. जाऊ दे, तू या लागोनच्या झंझटीत पडूय नको, अन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊय नको. आपलं हेच काम कर. अर्धी सोडून सगयीच्या मांग धावन बरं नसते."
एकनाथ एकही शब्द न बोलता," येतो " म्हणून तेथून निघून गेला. घरी येऊन त्याने पूर्ण हकीकत आपल्या बायकोजवळ सांगितली. तिकडे भावाच्या घरी जाऊन सुमनही नाराज होऊन आली होती. भावाला उसने दहा हजार मागितले तर त्याने सरळ नकार दिला होता. उलट त्यानेच "इथं का पैसाचं झाड आहे का?" म्हणून सुमनले चांगलच खडसावलं होतं. वर्षातून फक्त एकदा भाऊबीजीले साडीचोंडी करुन तो मोकळा होत होता. तसा गावच्या जमिनीत सुमनचाही भावहिस्सा होता, पण भावाचा हिस्सा आपण काय घ्यावा ते बरं दिसत नाही म्हणून वडिलांने म्हणून सुध्दा तिने तो घेतला नव्हता. पण आज तिच्यावर जेव्हा अशी पाळी आली तेव्हा भावाने हात वर केले होते. याचा तिला पच्छाताप तर होत होताच पण मनातल्या मनात भावाचा रागही येत होता.
दोघेही खाली हातानेच आले होते. लागोनने वावर करण्याचं स्वप्न आता स्वप्नच राहणार काय याची सुमनला भीती वाटत होती. पण ती अजून हिम्मत हारली नव्हती. तिने एकनाथला सरळ सांगितलं होतं, " कायजी कराचं काम नाही, पाहू पुढच्या पुढं, काहीतरी मार्ग सापडनच लेकाले." असं म्हणून ती स्वतःच स्वतःला आणि एकनाथला हिम्मत देत होती. अशाही परिस्थितीत मजुरी करून संसाराले हातभार लावतच होती; पण कधीच एकनाथला ती एकेरी शब्दानं, किंवा रागात बोलली नाही. त्यामुळे एकनाथ तिला नेहमी म्हणायचा,
" खरं सांगू सुमन, तू घरात असली की घर एकदम भरल्या भरल्या सारखं वाटते, घर आपोआप बोलायले लागते. घरात लक्ष्मी नांदते, घरात पैसा नसला तरी गरीब असल्यासारखं वाटतं नाही. ना कालची चिंता, ना उद्याचा विचार फक्त वर्तमानातं जगल्या सारखं वाटते. घरात दोन लेकरं, आपण दोघ... सर्व आंनदी वातावरण यापेक्षा स्वर्ग तो काय असणार?"
हे एकूण सुमनला लाजल्या सारखं झालं. गालात हसू घेऊन ती "काहीतरीच आपलं" म्हणून आणखी कामाला लागली पण तिच्या मनात वावराचं विचारचक्र चालूच राहते.
आपण घेतलेला निर्णय कदाचित चुकीचा तर नाही!. समजा लागोनचं वावर पिकलच नाही तर ;किंवा वेळेवर पाऊसच आला नाही तर; किंवा कोणते अस्मानी संकट आले तर. आधीच आपलं हातावर पोट. म्हणजे 'आगीतुन निघा आणि फुफाट्यात जा' अशी गत होईन.
शेवटी न राहून तीच एकनाथला म्हणाली,
"तुम्ही अजिबात विचार करू नका. आता कोणाजवळ काही हात पसारायाचं काम नाही. घरीच 10-15 ग्राम सोन्याची पोत हाय ती गहाण ठेवा, पंधरा विस हजार काय ते आणून लागोनचे पैसे देऊन टाका."
"पण मी काय म्हणतो एवढा आटापिटा करून वावर केल्यापेक्षा, पुढच्या वर्षी करू. यंदाच्याच वर्षात काय एवढं अडलं हाये ? तो बिना पोतीचा गळा कसा दिसणं, राहू दे!" एकनाथ म्हणाला.
"तुम्ही नका विचार करू, हाय एक काळ्या मन्याची पोत. तिच्यावर भागते.अन तुम्ही आहेच ना एवढे मोठे! माया सोबत. मग त्या पोतीचं काय काम?"
हसत हसत सुमनने तशीच गळ्यातली पोत काढून एकनाथला दिली. त्यानेही घट्ट मन करत ती हातात घेतली पण मनातले भाव डोळ्यातून झिरपत होते. दोघेही व्याकुळ झाले होते.कुठंतरी हृदयाचा ठोका चुकल्या सारखा वाटतं होता. सारा जीव मुठीत आवळून एकनाथने उंबरठा ओलांडला. सोनाराजवळून पंधरा हजार आणले. आणि शेवटी लागोनचे पैसे देऊन गावातलच काटीचं दोन एकर वावर लागोनने करून तशी चिट्ठी घेतली.
त्या वावराचा उन्हाळी उदिम चालू झाला. दोघेही कसोशीन काम करू लागले. वावर नागरून टाकलं, फनं वेचून काढले, पंजी मारली. होत्या नव्हत्या पालव्या तोडून टाकल्या, वावर तयार झालं. सर्व झाल्यावर सुमन म्हणाली,
"आपल्याले जर हेच वावर चांगल पिकलं तर पुढल्या वर्षी आणखी दोन एकर वावर करू म्हणजे लेकराचं शिक्षणही बरोबर होते. अन दोन पैसे गाठीले राह्यते, कोणासमोर हात पसरायचं काम पडत नाही. लेकरंही गावातल्या बाकी पोरासारखे शहरात शिकू शकते "
सर्व कास्तकारांणी आपापले शेत तयार करून ठेवले होते. एकसारखे दिसणारे काळेशार शेत काळा रंग दिल्यागत भासत होते. सकाळचे ढग अन दुपारची कडक ऊन मनाला झुरनी पाडत होती.
नेहमीप्रमाणे मृग नक्षत्रात गोमूत्र अंगावर शिंपडाव त्याप्रमाणे पाऊस येत आणि जमिनीचा पापुद्रा ओला करून निघून जात होता. एकदाचा धो-धो पडून जमिनीची तहान काही भागवत नव्हता. पावसाच्या पाण्यासाठी आसूसलेली धरती काकूळतिला आली होती. प्रत्येक माणूस शेतात जाऊन पाऊस पडला काय म्हणून जाऊन पाहत. आणि नाराज होऊन वापस येत होता. पाहता पाहता मृग कोरडाच गेला. पण आषाढात पावसाने चांगलाच जोर धरला. प्रत्येकजन पेरणीच्या तयारीत लागला. घरादारात, शेतशिवरात एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. मोठे कास्तकार ट्रॅक्टरने तर लहान बैलजोडीने पेरणी करू लागले. पेरणीच्या आधी बैलाची पूजा होऊन, तिफनीवर नारळ फोडून दिवसभर बैल तिफण ओढू लागले, तोंडाला बांधलेल्या मुसक्यातुन फेस गाळू लागले. पहिल्या दुसऱ्या पाण्यातचं एकनाथनेही आपली पेरणी उरकून घेतली. जमिनीतही चांगलीच हितभर ओल गेली होती. पण पेरणी केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सूर्य तापायला लागला. दोन-तीन दिवस पावसाने एकदम सुट्टीच घेतली. पेरणी झालेल्या सर्वांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालं. चिंतेच्या छटा कपाळावर स्पष्ट दिसू लागल्या. हृदय धडधडू लागलं. दुबार पेरणीची वेळ येते की काय असं वाटू लागलं. ढग येत आणि निघून जात होते. पाण्याचा मात्र पत्ता नव्हता. सर्व मजूर घरीच दिसत होता. जो तो पाण्याची वाट पाहत होता. महागाईचं बियाणं जमिनीत नेऊन टाकल्याने आणि कर्ज काढून केलेल्या पेरणीमुळे शिवराम डांबरे कातावाल्या सारखा बोलत होता, निसर्गाले, या पावसाले एकटाच शिव्या शाप देतं होता.
"आरे कुठं दडून बसला रे....पावसा! येनं राजा, काऊंन असा अंत पाह्यतं आमचा.इकडून सरकार मारते अन तिकडून तूबी आमच्याच उरावर बसून मारतं काय?"
मागच्या वर्षी बावीसशे रुपये क्वीटलने सोयाबीन विकाचं काम पडलं होतं आणि आता पेरणीसाठी विकत घेतलं तर 30 किलोचीच ब्याग बत्तीसशे रुपयाची पडली होती. सरकारचं हे धोरण कोणाच्याचं पचनी पडत नव्हतं. त्यामुळे गरीब श्रीमंत सर्वच लोकांचे उर फाटले होते. दिवसा चांगलीच ऊन तापत होती तर रात्री थोडे फार ढग फिरताना दिसत होते. पुन्हा सकाळी उठलो की उन्हाचे तिरपे किरण तोंडावर पडत होते. हवामानाचा अंदाजही खोटा ठरत होता. पण पाचव्या, सहाव्या दिवशी पावसाचा बारीक शिरवा आला. तेवढाच जीवात जीव आला. दुसऱ्या दिवसापासून पावसाने आणखी जोर धरला.धो- धो पाऊस पडू लागला. सर्व माती न्हाऊन निघाली. वातावरनातं थंडावा पसरला. वृक्ष, वेली, प्रफुल्लित, टवटवीत दिसत होती. काही दिवसातच जमिनीच्या पोटातून हळूच अंकुर बाहेर येताना दिसू लागले. त्या चार पाच दिवसातचं हिरवी शाल सर्व जमिनीवर पांघरली. एका सरळ रेषेत पीक हवेसोबत डोलू लागले. सोयाबीनच्या पाच तासावर एक तुरीचं तास भरधाव वेगाने आपल्याचं तोऱ्यात वाढू लागलं. सोबत-सोबत तनकटही पिकासोबतचं वाढू लागलं. पावसाचा लपंडाव चालू झाला. आला तर दोन-दोन दिवस मुक्काम करत, नाहीतर तीन-चार दिवस येतच नव्हता.
सुमन मनातल्या मनात खुष होती. एकनाथ एक दिवस आड शेतात जाऊन पीक पाहून येत होता. काही लोक त्याची मजा घ्यावी म्हणून उपेक्षात्मक बोलतही होते,
"काय एकनाथराव? यंदा लय हिम्मत केली बॉ! अन पीकय लय जोरदार हाये पण, पैशाची रास लागणार आहे घरात रास... मावणार नाही एवढं पीक होणार हाय तुम्हाले. फक्त आम्हाले विसरू नका म्हणजे झालं..."
एकनाथ त्यांच्या समोर हात जोडत,
"तुमच्या तोंडात साखर पडो भाऊ, पण पीक घरात येईपर्यंत काही सांगता येत नाही, निसर्ग थोडी आपल्या हातचा हाय. पिकलं तं बदबद पिकते, नाही तं घरी दानाय येत नाही." असं म्हणून एकनाथ घराकडे वळत.
आता दोन दिवसा पासून सकाळचे बारा पर्यंत चांगलीच कडक ऊन तापत तर दोन-तीन च्या दरम्यान जोरात पाऊस पडला की, अर्धवटच मजुरी पाडून घरी जावं लागत होतं. असं तीन चार दिवस चाललं आणि पाचव्या दिवसापासून सतत धारा चालू झाल्या. एखाद्या भूतांसारखा पाऊस येऊ लागला. हवा, वीजाचा कडकडाटासह पाऊस एकसारखा चालू झाला. एक.....दोन.... तीन.... चार दिवस सतत पाऊस चालूच होता. घरातल्या मातीच्या भिंती ओलाव्याने खचू लागल्या. घरा- दारात, राना- वनात डबकेच्या डबके थांबू लागले. कौलात न मावणारं पाणी घरात गळू लागलं. टपटप गळनाऱ्या पाण्याखाली बकेट, गंज, कोपर ठेवल्या जाऊ लागले. घरादारात ओलंच ओल असल्यामुळे बसायलाही कुठं जागा राहत नव्हती.
शेजारी राहणाऱ्या संपत काळेचा तेवढ्या पाण्यातही मोठमोठ्याने आवाज येतच होता,
"काय? अवदशा पाऊस हाय रे हा... ये म्हणावं त येणार नाही, अन आता येऊन मरून राहिला इथं! अरे बस कर रे म्हणा बावाच्या नाना....!गरीबाची थोडी तरी कीव कर, फुकट शिव्या कायले खातं राज्या..... काही ठेवशीन का नाही वावरात?"
बाहेरच्या नालीतलं घरात येणारं पाणी काढत संपत काळे चिडल्या सारखा बोलत होता. पावसात ओला होतं होता पण त्याची बडबड थांबली नव्हती,तो निसर्गाले, पावसाले शिव्या देतच होता
"अरे का आमचा जीव घ्याले आला का राजा? आता वावरातल्या होत्या नव्हत्या सोयाबीनय पिवळ्या पडते रे देवा..... तुरीही जळल्या शिवाय राहत नाही रे... .पाणबसण वाले मेले रे..... मेले, सपाच मेले, डुबले रे.... वावर करणारे डुबले....... "
सहाव्या दिवशीही पावसाची भूरभुरी चालूच होती. तरी चिखल, गाटा तुडवत काहीजन वावरात जाऊन पाहत होते. पिकाची दशा महामारी आल्यागत झाली होती. तासंचे तासं मरणावस्थेत असल्या सारखे पार जमिनीवर आडवे झाले होते. तर काही माना मोडलेले स्वतःच स्वतःच्या आधारावर उभे होते. खरोखर वाईट दशा होती. डाबरीतल्या तुरा अख्याच जळल्या होत्या. पाण्यात तरंगनाऱ्या सोयाबीनचे पट्टेच्या पट्टे पिवळे दिसत होते.
पावसाचा जोर हळूहळू कमी झाला. लोकांची काम पूर्वीसारखी चालू झाली. निंदन, खुरपन लोक करू लागले. कोणी तननाशक मारू लागले. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. उथळ माथ्यावरची जिवंत राहिलेली तूर, सोयाबीन हळूहळू वाढू लागली. अखाडी, जीवती, नागपंचमीचे सण भराभर निघून गेले. पुढे पोळा आला, बैलाच्या अंघोळी झाल्या, घरात गोड धोड झालं. सुमनने कुरड्या, पापळ, भजी, काढली, पुरणपोळी केली. कार्तिक व पायल खुष होते; पण सुमनच्या पोटात अचानक गोळा उठला. तिला पुढची काळजी लागली. लोकांचे डवऱ्याचे दोन दोन फेर झाले. आपला अजून एकही नाही. तनकट पिकाच्या वर गेलं होतं. डवरे मारले की, तेवढीचं माती कूस बदलते, पीक खेळत राहते. आठ दहा दिवसापासून हाताला मजुरी नव्हती. काय करावं काही कळत नव्हतं, तरी पण सुमनने भय्या कडूला सांगून तेवढी वही मारून घेतली. पैसे नंतर देतो म्हणून सांगितलं. निंदन-खुरपन दोघांनी घरीच चालू केलं. शनिवार, रविवार पायल अन कार्तिकही मदत करू लागत. आठ दहा दिवसात तेही झालं. डोक्यावरचा ताण जरा कमी झाला.
शेतातून घरी जाताना मधातचं त्यांना विस्वासराव दिवटे भेटला. तसाच सुमनने डोक्यावर पदर घेतला, साडी नीटनेटकी करून घेतली. तो अमरावतीवून गावात दररोज ये-जा करायचा. तसं त्याचं गावातही मोठं घर, पण असे गावातले भरपूर लोक अमरावती किंवा चांदुर बाजारहुंन ये-जा करत होते. गावातले वाडे फक्त ढोर - वासरं बांधायसाठी अन शेतमाल ठेवायसाठीच होते. रस्त्याने जाता जाता त्याने सुमन दिसताच गाडी थांबवली, अन विचारू लागला, "अरे काय एकनाथराव!, काय म्हणते यंदा पीक पाणी?"
"बरं हाय मालक...!" जास्त न बोलता एकनाथ समोर निघाला. विश्वासरावाना काहीतरी खोचट बोलायचं म्हणून त्याने आणखी गाडीतून तोंड बाहेर काढलं आणि बोलू लागला.
"मी काय म्हणतो एकनाथराव,वावर केलं वाटते यावर्षी, लागोननं"
" हो मालक .... !"
"काय, जमन काही ताल....?"
"आता सर्व निसर्गाच्या भरोस्यावर हाय मालक, पाहू पुढच्या पुढं....!" एकनाथ असं बोलताच विस्वासराव आणखी टोचून बोलू लागला.
"लय कठीण काम हाय लागोनवाल्याचं राजा, लावलं तेवढंही निघते का नाही त.... . त्यापेक्षा मजुरी पुरली. दोपारगी काम करा अन बिनधास्त झोपा. येलाले दुःख ना वायकाले दुःख. ही माती होय एकनाथराव..... माती, जोपर्यंत ती माणसाले मातीत घालत नाही ना..... तोपर्यंत ती शांत होत नाही. बरं जाऊ दे, ही घरची मंडळी वाटते! अरे फुलासारख्या लेकरायले वावरात नको घालू रे आतापासून, त्यापेक्षा आपली सदानिबी पुरली रे बाबा... "
तो बोलत होता पण एकनाथ फक्त हो ला हो लावत होता. त्यावर प्रतिउत्तर देत नव्हता. त्यामुळे विस्वासरावने गाडी सुरु केली, येतो म्हणून एक नजर सुमनवर टाकत तो तसाच निघून गेला.
दोघेही जण एखाद्या जुपलेल्या बैलासारखे दिवसरात्रं काम करू लागले. सुमन वावरात काम करता करतांच पिकाचा अंदाज बांधू लागली. आजूबाजूच्या बायांना त्यांचे मत विचारू लागली. त्याही तिच्या हो ला हो मिसळत होत्या.
पाहता, पाहता दोन-अडीच महिने निघून गेले.वापस्याचा महिना चालू झाला. या महिन्यात हरीणीच्या पाटा काळ्या पडते तिथं माणसाची काय गत.... दुपारच्या उन्हानं अंगाची लाही-लाही व्हायला लागली. अंगातून घाम फोडू लागली. पोटऱ्या, मांड्यापर्यंत आलेली सोयाबीन फुलापात्यानं गजबजुन गेली.पण काही दिवसातंच सोयाबीनवर एकेरी हिरवी अळी दिसू लागली. तर काही भागात मावा रोग आल्याप्रमाणे सोयाबीन आपोआपच सुकू लागलं. हाता तोंडाशी आलेला घास जाते की काय असं वाटू लागलं. लोक वेगवेगळ्या प्रकारचे फवारे मारू लागले. हिरव्या अळीवर तरी उपाय होता; पण करपनाऱ्या सोयाबीनवर काहीच इलाज नव्हता. काही भागात अमरवेलने वेटोळी घालून सोयाबीनच निकामी केली होती. आता त्या सोयाबीनला उपटून फेकल्याशिवाय पर्याय नव्हता. हा निसर्गही माणसाच्या भावनेशी खेळत होता.
पोळा, गणेश उत्सव सारखे लहान,लहान सण भराभर निघून गेले.आता सोयाबीन फुला पात्यावर येऊ लागली.पण आठ- दहा दिवसापासून पावसाचा पत्ताचं नव्हता. सोयाबीनला एका शेवटच्या पाण्याची वाट होती, त्यासाठी ती आतुर झाली होती.शेंगा भरण्यासाठी हे पाणी येने आवश्यक होतं. वातावरणात गरमाटपणा होता. शेतात दुपारची ऊन खायला उठत होती. विषारी सर्पा सारखी विष पसरत होती. काही भागातल्या सोयाबीन पिवळ्या पडायला लागल्या. तसंतसा निसर्गाचा रंग बदलल्या सारखा दिसू लागला. संपूर्ण शेताला पिवळा रंग दिल्यासारखं वाटतं होतं. सूर्य लाजून ते दृश्य पाहत होता. थोडी ऊन तर थोडी थंडी असा काहीसा मेळ बसला होता. संपूर्ण सृष्टीवर गारव्याने आपले जाळे पसरले होते.
आता देवीचा उत्सव जवळ आला होता. कधी गारवा, कधी ऊन, तर कधी पाऊस सरी कोसळत होत्या. सोयाबीनची गळणारी पानं अखेरचा निरोप देतं, पानाखाली दबलेल्या टपोरं शेंगाचं प्रदर्शन मांडत होतं. तर कुठे टपोऱ्या दाण्याने भरलेल्या शेंगाचा भार सहन करत झाड वाकून जमिनीला हात जोडत होते. काही भाग सोडला तर एकंदरीत सोयाबीन चांगली होती. सुमन मनातल्या मनात खुश होती. आता स्वप्न पूर्ण होण्याची वेळ जवळ आली होती. पण तरी, कधी विस्वासराव तर कधी पंडीतरावचं बोलनं मनात घोळत होतं. तर कधी भावाने केलेला अपमान आठवत होता, त्यामुळे सुमनला खचल्या सारखं वाटतं होतं. वावराच्या धूऱ्यावर ती बसून विचार करीत होती. तेवढ्यात पांदनने जाणाऱ्या संपत काळेने सुमनला मोठ्याने आवाज दिला,
"व सुमन बाई , कायचा इतका इचार करून राह्यली व ? एकटीच बसून."
"काही नाही काका! या ना, घ्या ना बापा सुपारी."तसाच तो वावरात येऊन तुरीच्या खाली पालकट मांडून बसला. सुमन बोलू लागली,
"आता सोयाबीनय पिवळी पडून राहयली, म्हटलं आठ दहा दिवसात येतेचं सोंगाले.आता मजूराचा मेळ लावा लागण ना, मग एकच गळबळ होते सर्वांयची. गावात इतके गोंड, कोरकु लोक येतात पण ते सगळे मोठे कास्तकारचं आणते ना. आपल्याले त्यायचं झाल्याशिवाय मजूरही भेटत नाही. वाटच पहा लागते." तसेच दोघेही विचारात पडले.
"हव ना ! पाहू आता" असं म्हणून संपत काळे सुपारी चघळत चघळत तिथून निघून गेला.
आठ दहा दिवसातच सर्वांचे शेत एकसाथ सोंगनीला आले. लोक मजूर शोधू लागले. मोठ-मोठे कास्तकार आणलेल्या मजुराकडून सोयाबीन सोंगु लागले. गावातला मजूर जास्त मजुरी घेऊन उधळयानं सोंगु लागला. सुमनला तीन दिवसापासून मजुरचं मिळत नव्हता. आता सोयाबीना कडक वाळल्या होत्या. जसंजशी ऊन तापत होती तसतशा त्या ताडताड फुटत होत्या. वावरभर दाना पसरत होता. वावरातला तो फुटन्याचा आवाज एकूण सुमनचं हृदय धडधड, धडधड करीत होतं. ती आता काकूळतीला आली होती.आजूबाजूच्या वावरातले मजुर पाहून ती झुरत होती. याला त्याला मजुरा विषयी विचारत होती, पण कोणीच तिच्या बोलण्याला साद घालीत नव्हते. गावातील मजुरांना विचारलं ते सरळ म्हणायचे
"बाई सध्या मजुर नाही, आणि आम्हाला आठ दहा दिवस तरी वेळ नाही.थांबाचं असणं तर थांबा नाही तर सोंगुन घ्या "
शेवटी नाईलाजाणे सुमनने एकनाथला सोबत घेऊन वावर सोंगायला सुरुवात केली.
"मजुर भेटेपर्यंत जेवढं होते तेवढं सोंगुन टाकू" असं म्हणून सुमनने कार्तिकलाही सोबत घेतलं. तिघेही सकाळपासून संध्याकाळ पर्यंत काम करू लागले. कार्तिक उन्हामुळे धापा टाकत होता; तर कधी बाभूळीखाली जाऊन बसत होता. एकनाथ अन सुमन दिवसभर मशीनसारखे काम करू लागले. सोंगता, सोंगता सुमन एकनाथ आणि कार्तिकला सोयाबीन फुटू नये म्हणून बजावून सांगत होती. दुपारी कसाबसा भाकर तुकडा चटणीसोबत खाऊन कामाला लागत होते. कधी कधी एकसारखी कडक ऊन तर कधी अचानकचं एखादं काळ ढग सूर्याच्या आडवं येऊन पडणारी सावली गोड वाटतं होती. अंगाखांद्यावरून चालणाऱ्या घामाच्या धारेला ती सावली अन वाऱ्याची थंड झुळूक गोड वाटत होती; पण या सुखाच्या वाटणाऱ्या काळ्या ढगाच्या पोटात काय आहे हे त्यावेळी कोणाच्याचं लक्षात येत नव्हतं.
चार पाच दिवसातच त्या तिघांनी दोन एकर वावर सोंगुण टाकलं. पूर्ण वावरात आता सोयाबीनचे गंजच्या गंज पडले होते. पण आता तेवढी चिंता राहिली नव्हती. आभाळासारखं वाटणारं काम त्यांनी जिद्धीने पूर्ण केलं होतं. ढग जोर धरत होते पण अचानकच निघून जात होते. पण तरी सुमनला काळजी वाटत होती.म्हणून ती एकनाथला म्हणाली.
"अहो, आता एका ठिकाणी पूर्ण गंजी लावून देऊ करण पावसाचा काही नेम नाही, कधीही येऊ शकते. त्याचा काय भरोसा "
"नाही येणार! पाहू, उद्याच गंजी लावून टाकू. आज लय थकलो मी, अन दिवसय बुडत चालला,आजच येऊन पडते काय तो... !" म्हणून एकनाथने आजचं काम उद्यावर नेलं; पण रात्रीपासूनच आभाळाने गुरगुरायला सुरुवात केली. आणि अचानकच सकाळी पाच वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. तशीच सुमन झोपेतून खळबळून उठली.
" अहो उठा.... अहो उठा.... " म्हणून सुमनने एकनाथला उठवलं. आणि डोक्याला हात लावत एकटीच ढोरासारखी रडू लागली. एकसारख्या पडणाऱ्या पावसाकडे एकटक पाहत वेड्यासारखं करू लागली.पावसाच्या धारा चालू होत्या. झोपेतले डोळे चोळत कार्तिक, पायल सुमनला समजाऊ लागले. एकनाथही स्वतः पच्छाताप करू लागला पण त्याला रडता येत नव्हतं.
सुमन रडतच "तोंडापर्यंत येणारा घास ह्या पाण्यानं हिसकावून नेला व.... होत्याचं नव्हतं केलं व....." तीचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं. एकसारखा येणारा पाऊस तासभऱ्यानंतर बंद झाला. पण सुमनच्या डोळ्यातल्या धारा चालूच होत्या.
सकाळी-सकाळी पाणी पूर्णच बंद झालं. दोघेही उठून तसेच वावराच्या दिशेने धावत निघाले. वावरात जाऊन पाहते तर, सर्वीकडे पाणीच पाणी झालं होतं. काही सोयाबीनचे गंज हवा,पाण्याने उडून सर्व वावरात पसरले होते. तर काही पाण्यात तरंगत होते. काही सोयाबीन खालून फुगू लागली. हे पाहताच सुमन म्हणाली, "अहो, आता या गंजीले दोन-चार दिवसाची ऊन देणं आवश्यक हाय. पलटी मारण आवश्यक हाय. खालून सोयाबीन हूपीजुन येईन पण आता त्याले पर्याय नाही. जे आलं ते आता आपलं ".
त्यावरून आठ दिवस निघून गेले.पण तरी आभाळाची गुरगुरी थांबली नव्हती. ऊन सावलीच्या पाठशिवनीच्या खेळाने सर्व हैराण झाले होते. तरी चार दिवसाने चौघानी ती गंजी फोडून तळवावर पसरवली होती. सुमन आणि एकनाथ घामाने लथपथ झाले होते. कार्तिक आपल्या चिमण्या आवाजाने मायसी बोलला, "आई पुढंच्या वर्षी मी चांदुरच्या शाळेत शिकणार आहो....आपल्याले चांगलं पीक झालं की." तसच सुमनच्या डोळ्यात गरगर पाणीच आलं. आता तिच्या मनात भीती अन शंका दोन्ही घर करून बसल्या होत्या. लावलेला दिवा वाऱ्याने फळफळ करत होता.
आता वातावरण जरा मावळलं होतं. लोक आपापल्या कामाला लागले होते. काही वावरात थ्रेशरचा आवाज ऐकू येत होता. प्रत्येकजण आपापल्या धावपळीत दिसत होता. सुकलेल्या गंज्या काढण्याची लोक लखलख करीत होते. हवामानाचा अंदाज दररोज काही प्रमाणात चुकत होता. दोन वावर चालून सुमनने थ्रेशर वाल्याची भेट घेतली. तोही अडती घेत म्हणाला, "हे पहा सुमन काकू उद्या तुमची गंजी नक्की काढून देतो, पण चांबट नाही ना... नाही त लोचा होईन सारा." सुमन हवं नाही करत तयार झाली. दुसरा दिवस उजाळला. त्या दिवशी सकाळ पासून उन्हाने आपला चांगलाच जोर धरला होता. अडीच-तीन वाजेपर्यंत कडक ऊन पडली पण, हळूहळू ढगं जमा होऊ लागले. निघून जाऊ लागले. गर्मी अंगातून घामाच्या धारा फोडू लागली.पाहता पाहता चार वाजता वावरात थ्रेसर आलं. पण तरी सुमनचा जीव थाऱ्यावर नव्हता. मनातली धग तिला शांत होऊ देत नव्हती. तेवढ्यात थ्रेसर वाल्याने मध्ये आवाज देल्ला, "काकू घ्या बरं लवकर लवकर, चला रे पाणी प्या पोट्याहो अन लागा लवकर कामाले, पाण्याचा काही नेम नाही." तसाच त्याने गंजीले हात लावला, अन एक कवठा हाताने दाबून पाहिला,
"जरा चांबट आहे काकू गंजी, अशा गंजीले थ्रेसर, डिझेल लय ओढते. काय करावं तुम्हीच सांगा.? पोत्यामागं पन्नास जास्त लागण, म्हणजे दोनशेचे अडीचशे, आताच सांगा नाही त चाललो दुसऱ्या गंजीवर... "
तसाच एकनाथ बोलला, "नाई नाई , लावा थ्रेसर. तेच ते कामं कराले नाही पुरत.आधीच माणूस परेशान झाला या सोयाबीनले "
शेवटी थ्रेसर चालू झालं.कार्तिक, पायल इकडे -तिकडे धावपळ करू लागले. वावरात सांडलेला सरवा वेचून गंजीवर टाकू लागले. दोन पोते भराभर निघाले ;पण एकदमच सर्वीकडून अंधारून आलं.तसीच सुमनच्या जीवाची घालमेल वाढली., "भाऊ निघन ना एवढी गंजी?" म्हणून ती विचारू लागली. एकटीच बळबळ करत "देवा पायजो रे बा.... गरीबाकडं लक्ष ठेवजो, आजच्या रोज पाणी नको येऊ म्हणा." अभयाकड हात जोडत विनंती करू लागली.तिसरं पोत भरत आलं पण काळे ढग चांगलेच जमू लागले. आता थ्रेशर वाल्याची पंढरी घाबरली. पण तरी माल काढणं चालूच होता. चोथ पोत अर्ध्याच्या वर गेलं आणि टपोरे थेंब पडायला लागले. पाच वाजताच अंधार झाला. सर्वीकडे काळे ढग सैताना सारखे नाचू लागले. तसच थ्रेशर बंद झालं.आणि लगबग करीत त्याने आपला ट्रॅक्टर चालू करत थ्रेशर वावराच्या बाहेर काढलं. टपोऱ्या थेंबानी चांगलाच जोर धरला. इकडे सोयाबीन ओलं होऊ नये म्हणून सुमन आणि एकनाथ पोते झाकू लागले. त्यावर खालचाच तळव उलटा मारू लागले पण तो पाहिजे तेवढा पुरत नव्हता. काही भाग उघडा पडत होता, त्यामुळे पोते आजूबाजूने ओले होतं होते. हवेमुळे चारी बाजूने पाऊस विजे सहित कडकड्त होता. पाणी उताराच्या दिशेने खालून पोत्यात जाऊ लागलं. तशीच सुमन चिल्लावली , "आहो, हे इकडून खालून पाणी धसुन राहिलं.दांड काढा तिकडे, माती लावा इकडे, येणारे पोट्याहो हातभार लावू लागणा". तसेच सर्वच जण माती ओढून पोत्याच्या अवती भवती लावू लागले.पण पावसाले इतका जोर आला होता की काही केल्या ते थांबायचं नावच घेत नव्हता. कार्तिक अन् पायल पोत्याच्या बाजून कुटार टाकू लागले.पण पोते ओले होतच होते. सुमन त्या पोत्यात पाणी जाऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत होती. त्या पोत्याना आपल्या पदराने झाकू की काय अशी करत होती. त्या पावसाले शिव्या शाप देतं होती. पाण्याच्या धारा नाका तोंडात जातं होत्या. अर्ध्या तासात पावसाने सर्वांची लाही लाही केली होती. काही वेळाने पाऊस थांबला सर्व शांत झालं. अंधाराने आपला मंडप चहुबाजूने टाकला होता. सुमन एकनाथला काय करावं काहीच कळतं नव्हतं. त्यांनी शेवटी पोत्याच्या भोवतीचा तळव मोकळा केला पण पोते बाहेरून ओले झाले होते. ते पाहताच सुमनला रडू आवरले नाही आणि ती ढसाढसा रडू लागली., "सर्व संपलं व माय...काय विचार केला होता अन काय झालं. ह्या पावसानं पुऱ्या जिनगाणीचं वाळवंट करून टाकलं व माय.आमच्याच साठी आला होता काय रे तू मराले" ती आक्रोश करीत होती. शेवटी कार्तिक तिच्या जवळ आला आणि सुमनला समजावू लागला. काही वेळ ती शांत झाली.
संपूर्ण वावरभर पाणीच पाणी झालं होतं, त्यात तेवढे पोते उभे होते एखाद्या समुद्रातल्या बेटा सारखे. शेवटी एकनाथने शक्कल काढली, "ते सर्व पोते उचलून आपण कुटाराच्या खाली दाबून देऊ आणि वर सोयाबीनचं कुटार टाकू म्हणजे त्या पोत्याची तेवढी ओल कमी होइल." सुमनही तयार झाली. चौघानी मिळून पोते ओढले पन आता ते डबल न भारी आले होते. ओढता ओढल्या जातं नव्हते. कसेतरी ते पोते त्यांनी कुटाराच्या खाली दाबून घराकडे निघायला लागले.
सगळं भयाण वाटतं होतं. छाती धडधड करीत होती. कुणीच कुणासोवत बोलत नव्हतं. मुक्या तोंडाने हातात चपला घेऊन सर्वजण अंधार तुडवत जातं होते. हे सर्व स्वप्न असावं असं सुमनला मनोमन वाटतं होतं.पण ते सर्व सत्य होतं.

विशाल मोहोड
तळवेल, चांदुर बाजार
अमरावती,
मो. न.9011578771
Vishal84mohod@gmail.com

Share