नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आठवे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन
शेतकरी - स्त्री कवी संमेलनाचा वृतांत
युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, भूमिकन्या सीताकुटी, रावेरी ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ येथील नियोजित असलेले सातवे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन कोरोणाच्या सार्वत्रिक वाढलेल्या प्रादुर्भावामुळे कोरोणा अरिष्ट पर्यायी ऑनलाईन वेबमिलन सप्ताहाच्या माध्यमातून गेल्यावर्षी यशस्वीरीत्या पार पडले. याच वेळी कार्याध्यक्ष श्री. गंगाधरजी मुटे यांनी पुढच्या वर्षी आठवे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन याच रावेरी नगरीत प्रत्यक्ष स्वरूपात म्हणजेच ऑफलाईन घेण्याचे निश्चित केले होते. आणि ठरल्याप्रमाणे दिनांक २७/फेब्रुवारी/२०२२ रोजी 'मराठी राजभाषा दिनी' हे संमेलन मोठ्या उत्साहात व चैतन्यदायी वातावरणात पार पडले. याचे सर्व श्रेय कार्याध्यक्ष श्री. गंगाधरजी मुटे आणि त्यांची संपूर्ण टीम यांना जाते.या सर्वांचे अथक परिश्रम व मेहनतीचे आणि त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनाचे फलित म्हणजेच यशस्वी आणि उत्तमरीत्या पार पडलेला हा आठव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा संस्मरणीय सोहळा होय.
संमेलनातील सकाळच्या उद्घाटन सत्रानंतर झालेल्या 'निमंत्रितांच्या जम्बो शेतकरी कवी संमेलनामध्ये' शेतीमातीशी व स्त्री जातीशी निगडित अप्रतिम कवितांनी रसिक श्रोत्यांची दाद मिळविली. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील सुप्रसिद्ध कवयित्री मा. धनश्रीताई पाटील या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. गंगाधरजी मुटे उपस्थित होते. या कवीसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन व निवेदन आपल्या खुमासदार शैलीमध्ये प्रसिद्ध निवेदक कवी श्री.अनिकेत जयंतराव देशमुख, पाऊलखुणाकार, गोपालखेड जिल्हा अकोला यांनी केले.
"नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!"
विवेक मुटे, तेजू कोपरकर व स्वरा पोहणे या बालकलाकारांनी आपल्या गोड गळ्यातून सादर केलेल्या या मराठी भाषेच्या स्तवनाने या शेतकरी कवीसंमेलनाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. आपल्या सुमधुर आवाजामध्ये या बालकलाकारांनी हे अप्रतिम गीत सादर केले.
"आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने, रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने |
न्यावा शिवारराणी जागर सरस्वतीचा, इडापिडा अव्यक्ती पुरण्यास लेखणीने ||"
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पंचप्राण फुंकणाऱ्या वरील ओळींनी सूत्रसंचालक मा.अनिकेत देशमुख यांनी या कविसंमेलनाचा आगाज केला. सर्व उपस्थित मान्यवर व निमंत्रित कवींचे शब्दसुमनांनी स्वागत करून त्यांनी
"नांगराचा फाळ म्हणजे कविता
भजनातील टाळ म्हणजे कविता
काळ्या आईला हसवणारं
काळंकुट्ट आभाळ म्हणजे कविता !!"
या स्वतःच्याच कवितेतील ओळींनी या कवीसंमेलनाची दमदार सुरुवात केली. आयोजकांच्या सूचनेनुसार निमंत्रित कवींची संख्या मोठी असल्यामुळे टप्प्याटप्प्याने हे कविसंमेलन पुढे नेण्यात आले. कविता सादरीकरणासाठी प्रत्येक टप्प्यामध्ये सात ते आठ निमंत्रित कवींना विचारपीठावर बोलावण्यात येत होते.
या कविसंमेलनाची सुरुवात अकोला येथील ज्येष्ठ कवी 'वऱ्हाडधनकार' मा. शिवलिंगजी काटेकर यांच्या 'समतेची दिंडी' या कवितेने झाली.
"जवारीच्या रानामंदी जशी डोलती कणसं, डेबूजीच्या कीर्तनात जसे डोलती माणसं" समतेचा संदेश देणाऱ्या या कवितेने रसिकांची दाद मिळविली व कवीसंमेलनाची दमदार सुरुवात झाली. त्यानंतर पर्यावरण कवी म्हणून प्रसिद्ध असलेले अंजनगाव सुर्जी येथील मा.विनायक अंगाईतकर यांनी "कधीतरी असे मनासारखे घडावे" ही निसर्गाचा समतोल राखा हा संदेश देणारी कविता सादर केली. त्यानंतर अमरावती येथील सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी मा. खुशाल गुल्हाने यांनी आपली "औंदाचं साल" ही कविता सादर केली.
"जलमभर भूलणार नाही औंदाचं साल" या त्यांच्या वऱ्हाडी कवितेतून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामधील विदारक स्थितीचे व अस्मानी-सुलतानी मुळे येणाऱ्या अवकाळी संकटांचं मार्मिक वर्णन केलं. त्यानंतर उमरखेड येथील युवाकवी सचिन शिंदे यांनी बापाचं आपल्या गोठ्यातील जनावरांशी असलेलं मायेचं नातं मांडणारी "दावण" या भावगर्भ कवितेतून त्यांनी शेती मातीची व्यथा आपल्या शब्दात मांडली. त्यानंतर चंद्रपूर येथील ज्येष्ठ कवी मा. प्रदीप देशमुख यांनी आपल्या "गंजीफा" या कवितेमध्ये
"मातीमध्ये स्वप्न पेरतो जागत बसतो
अशी आंधळी चाल नेहमी चालत असतो" शेती करणे म्हणजे हा एक प्रकारचा जुगारच आहे हे मार्मिक भाष्य करणारी कविता मांडली. त्यानंतर अकोला येथील ज्येष्ठ कवी मा. वासुदेव खोपडे यांनी आपल्या "पेरनं" या कवितेतून
"आल्या मिरगाच्या सरी तृप्त झालीया जमीन
काळ्या काळ्या मातीतून सुरू झालया पेरनं"
शेतकऱ्यांच्या जीवनामधील पेरण्याची लगबग मांडली.
या कविसंमेलनाचे पुढील पुष्प मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथील प्रसिद्ध कवी प्रा. संजय कावरे यांनी आपली "जातं" ही रूपकात्मक कविता सादर करुन रसिक श्रोत्यांची दाद मिळविली.
"जातं फिरे गरगर, पीठ येई भरभर
माय दयता दयता, चिंब भिजते पदर"
या त्यांच्या ओळींनी श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला. यानंतर कविसंमेलनाच्या पुढच्या टप्प्यामध्ये अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचे अध्यक्ष मा. श्याम ठक अकोला यांनी आपली "बाप वावर पेरते" ही कास्तकाराचं जगणं मांडणारी रचना सादर केली. त्यानंतर "ग्रामसेवा संदेश" या महाराष्ट्रातील प्रतिथयश दिवाळी अंकाचे सहसंपादकीय कार्य सांभाळणारे अहमदनगर येथील प्रसिद्ध साहित्यिक मा. राजेंद्र फड यांनी कोरोना काळात शेतकऱ्यांनी लोकांना केलेली मदत "मी पाहिला एक शेतकरी" या कवितेतून मांडली. त्यानंतर राळेगावचे भूमिपुत्र युवाकवी निलेश तूरके यांनी
"शेतकऱ्यांची झाली बघा दैना दैनारे लग्नासाठी पोरी कोणी देईना?
ही भीषण वास्तव परिस्थिती "शेतकऱ्यांची दैना" या कवितेतून मांडली उपस्थित रसिक श्रोत्यांनी याला भरभरून दाद दिली. त्यानंतर परळी बीड येथील कवी मा. लक्ष्मण लाड यांनी आपल्या "आत्मकथा" या कवितेतून शेतकरी जीवनाच्या वास्तव परिस्थितीचे चित्रण केले. त्यानंतर शेतकरी साहित्य चळवळीशी व वऱ्हाडी बोलीभाषेशी घट्ट नाळ जुळलेली असलेले नाशिक येथील प्रसिद्ध कवी मा.रवींद्र दळवी यांनी आजची मुलं आपल्या बापाला काय सांगू पाहत आहेत? हे "कास्तकार नाही बनायचं" या वऱ्हाडी बोली भाषेतील चिंतनशील कवितेतून त्यांनी वास्तव चित्र रेखाटले ज्याला रसिकांनी दाद दिली. त्यानंतर यवतमाळ येथील कवी मा. देवेंद्र जोशी यांनी "सुंदर माझे खेडे" या वृत्तबद्ध रचनेतून खेड्यातील बदलत जाणारी परिस्थिती मांडली. त्यानंतर अमरावती येथील कवी मा. राजेश अंगाईतकर यांनी "सुखाची घडी" ही कविता सादर करुन शेतकऱ्यांची व त्यांच्या कुटुंबांची व्यथा मांडली. त्यानंतर
बीड येथील कवी मा. सिद्धेश्वर इंगोले यांनी आपल्या गोड गळयातुन "येचतिया पांढरं सोनं" या कवितेतून कापूस वेचनाऱ्या स्त्रीची तळमळ या शेतीमातीशी नातं सांगणाऱ्या कवितेतून मांडली. त्यानंतर परळी बीड येथील कवी मा. केशव कुकडे मुक्तविहारी यांनी सुद्धा हाच धागा पुढे नेत "बाप सृष्टीचा निर्माता" ही बापाच्या डोळ्यातील ओलं चैतन्य टिपणारी त्यांची रचना काळजात घर करून गेली. त्यानंतर हिंगणघाट येथील कवी मा. नरेंद्र गंधारे यांनी आपल्या गोड गळ्यातून "जरासं हितगूज तुमच्याशी" ही गेय कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली. त्यानंतर परळी येथील कवी मा. बालाजी कांबळे यांनी आपल्या "इतकं जोरात फेकू नका साहेब आम्हाला झेलता येत नाही" या कवितेतून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य आपल्या ठसकेबाज शैलीत केले. त्यानंतर वर्धा येथील सुप्रसिद्ध कवी वावरकार मा. संदीप धावडे यांनी शेतकरी आत्महत्यांचे वास्तव मांडणारी 'साहेबराव करपे पाटील' यांच्यावरील कविता सादर केली व त्यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची व्यथा मांडली व "किसानपुत्र शेवटपर्यंत लढणार आहे" हे आपल्या कवितेतून सांगितले. त्यानंतर हिंगणघाट येथील कवी मा. रंगनाथ तालवटकर यांनी आपल्या "नफ्यात उरतो बारदाना" या कवितेतून पिकांवर येणाऱ्या रोगराईच संकट व त्यातून होणारे शेतीचे अतोनात नुकसान हे वास्तव चित्रण मांडले. त्यानंतर अमरावती येथून आलेले ज्येष्ठ कवी मा. रत्नाकर वानखडे यांनी "शेतकऱ्याचे जीवन" ही शेतकऱ्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकणारी रचना सादर केली. त्यानंतर अमरावती येथून आलेले ज्येष्ठ कवी मा. दिलीप भोयर यांनी "आम्ही पाहिले" ही सामाजिक व राजकीय वास्तव चित्रण रेखाटणारी रचना सादर केली. त्यानंतर वर्धा येथील ज्येष्ठ कवी मा. नारायण निखाते यांनी "देव म्हणे मी सध्या तरी या माणसाला भेटणार नाही" ही वेगळ्या धाटणीची रचना सादर केली. त्यानंतर बुलडाणा येथून आलेले कवी मा. मारुती कुळसंगे यांनी बळीराजाचं वेदनादायी जीवन मांडणारी "फास" ही गेय रचना सादर केली. त्यानंतर यवतमाळ येथील युवाकवी महेश कोंबे यांनी "काळी माय" ही मातीशी नातं सांगणारी भावगर्भ रचना सादर केली. त्यानंतर या संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे सुंदर निवेदन करणारे आकाशवाणीचे निवेदक राहिलेले वर्धा येथील कवी मा. जगदीश भगत यांनी "उगाच गैरसमज करून घेऊ नकोस पाऊस सर्वांसाठी सारखा असतो म्हणून" ही विचार करण्यास भाग पाडणारी मार्मिक रचना सादर केली. त्यानंतर मारेगाव येथून आलेले ज्येष्ठ कवी मा. रामदास आत्राम यांनी आपल्या गोड आवाजामध्ये शेतीमातीशी सांगड घालणारी गेय कविता सादर केली. त्यानंतर रावेरीचे भूमिपुत्र या शेतकरी साहित्य संमेलनाच्या आयोजन व नियोजनामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे ज्येष्ठ कवी मा. राजाभाऊ देशमुख यांनी "बोंडअळी" ही शेतकऱ्यांच्या पिकांवरील रोगराई व समस्यांचे चित्रण करणारी रचना सादर केली. त्यानंतर
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे कार्याध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार कवी लेखक मा. गंगाधरजी मुटे यांनी या कवी संमेलनामध्ये आपल्या शृंगारिक कवितेने वेगळी रंगत आणली.
"चांदसा मुखडा झीलसी आँखे जुल्फो का बादल राहू दे,
तुझ्या डोळ्यातलं वादळ पाहूदे"
शेतीमातीशी निगडित प्रतिमा व उपमा असणारी वेगळ्या धाटणीची ही शृंगारिक रचना त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये सादर केली.
अशा प्रकारे सर्व उपस्थित निमंत्रित कवींच्या कवितांनंतर सलग अडीच तास या शेतकरी कविसंमेलनाचे आपल्या खुमासदार शैलीत बहारदार सूत्रसंचालन व निवेदन करणारे प्रसिद्ध कवी निवेदक पाऊलखुणाकार या नावाने सुपरिचित असलेले गोपालखेड, जिल्हा अकोला येथील मा. अनिकेत जयंतराव देशमुख यांना कविता सादर करण्यासाठी प्रमुख अतिथी गंगाधरजी मुटे यांनी निमंत्रित केले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम या आठव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनाबद्दल सर्व आयोजकांचे आदरणीय गंगाधरजी मूटे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन करून या निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे निवेदन करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले. बापाचं आणि लेकीचं हळवं नातं मांडणारी आपली एक रचना "लेक" ही कविता त्यांनी यावेळी सादर केली.
"सारं बदललं जग
आता उरली ना नेकी
बापासाठी पुन्हा माय
सदा होतात ह्या लेकी"
या त्यांच्या गोड आवाजातील ओळी रसिकांच्या काळजात घर करून गेल्या. त्यानंतर या कवीसंमेलनाच्या अध्यक्षा मा. धनश्रीताई पाटील नागपूर यांनी शेवटी अध्यक्षीय समारोप केला. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये त्यांनी या कवीसंमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कवींचे अभिनंदन केले तसेच सर्वांना शेती मातीशी निगडित प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या लिखाणासाठी शुभेच्छाही दिल्या. त्यांनी यावेळी स्त्रीत्वाचा सन्मान वाढवणाऱ्या व शेतीमातीशी नातं सांगणाऱ्या आपल्या दोन रचना सादर केल्या. आपल्या मनातील कविता "कविता कशी असावी" ही रचना त्यांनी सादर केली. त्यानंतर शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने तब्बल अडीच तास चाललेल्या या ऑफलाईन व फेसबुक लाइव्ह या ऑनलाईन माध्यमातून पार पडलेल्या या निमंत्रितांच्या जम्बो कवीसंमेलनाचा समारोप झाला.
••••
- श्री.अनिकेत जयंतराव देशमुख
(पाऊलखुणाकार)
रा. गोपालखेड ता.जि. अकोला
संपर्क- ९६८९६३४३३२
======