कुणाचे तरी कुंकू पुसणार बहुतेक
हळूहळू शाब्दिक चकमक पुन्हा झडणार बहुतेक
हे शब्दच कुणाचे तरी कुंकू पुसणार बहुतेक
काल न्यायमंदिरात बाटल्यांची मैफल रंगली
आज सुकले कमी ओलेच जास्त जळणार बहुतेक
मोर झाडाकडून झुडपाकडे निघाला दिसतोय
बघा झाडावर भयंकर वादळ चढणार बहुतेक
सत्य असते सारं तर मग असत्य ते काय असते?
याच गुंतागुंतीत असत्य सत्याला गिळणार बहुतेक
बाग उद्ध्वस्त न करता वादळ संपलेले दिसते
फेक व्हर्जन त्याचेही आलेच असणार बहुतेक
बास झालं यार! शंभर गुन्हे तुझे माफ केले
चक्र आता माझ्या बोटातून सुटणार बहुतेक
झुंडीने घेरून मारा केल्याचे दुःख नाही
सल इतकीच की जखमा मुसलसल नसणार बहुतेक
गद्य तुला कळत नाही तर पद्य कधी कळेल तुला
शब्दांची गहराई नाहीच उमजणार बहुतेक
तूच तुझा वैरी मग तुला शत्रू हवेच कशाला
तू अहंभावात गुंतूगुंतू मरणार बहुतेक
नाद सूर ताल लय तर तुझ्या नादी लागत नाही
तू केवळ नुसती घंटा हलवत बसणार बहुतेक
अचकट विचकट किचकट अन शब्दांची रांगोळी
शब्दांच्या ओझ्याने गझलीयत मरणार बहुतेक
कसा संवादु विठ्ठला तू कानडी नि कर्नाटकी
आर्त मम मराठी तुला नाहीच कळणार बहुतेक
मेघमल्हार आळवला अन डोळे भरून आले
मायमातीचा निर्जल उपवास सुटणार बहुतेक
लोकसंख्या फार वाढली म्हणे! लक्षात घे अभय
कफन विक्रीस आता लायसन्स मिळणार बहुतेक
- गंगाधर मुटे 'अभय'
============
चौदा/आठ/एकेविस