Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




ना धों महानोर ह्यांच्या कवितेतील रानावनात विरलेली स्त्री

लेखनविभाग: 
शोधनिबंध

*ना धों महानोर ह्यांच्या कवितेतील रानावनात विरलेली स्त्री* मी रात टाकली, मी कात टाकली। मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली। ज्या संसारांमध्ये तिचे मन रमत नाही, तिच्या कोणत्याही गरजा पूर्ण होत नाहीत त्या संसाराला निरोप देताना तिला लाज वाटत नाही अशी बिनधास्त, सडेतोड स्त्री महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ना धों महानोर यांच्या गीतांमधून आपल्याला भेटते. अठरा विश्व दारिद्र्य, धड खायला नाही धड ल्यायला नाही. मानसिक समाधान नाही, भावनिक आणि शारीरिक समाधान सुद्धा मिळत नाही मग अशावेळी असा संसार सोडताना कशाची तमा बाळगावी? असा विचार करून महानोरांच्या कवितेमधील स्त्री पुढे म्हणते, ह्या पंखांवरती, मी नभ पांघरती। मी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती। जर स्त्रीच्या पंखामध्ये आकाश पांघरण्या इतकी शक्ती आहे, तिचे जीवन, तिचे मन मुक्त मोरनी सारखे स्वातंत्र्यप्रिय आहे मग तिने चांदण्यात फिरण्याचा आनंद घ्यावा की बंधनात आनंद मानावा? अर्थात मुक्त मोरनी बंधनांमध्ये सुखी राहू शकत नाही, मग तो बंधनात टाकणारा मोडका संसार सोडण्याबद्दल विचार करायचा सरळ विचार महानोरांच्या कवितेतील नायिका व्यक्त करते. शुभ्र काचेत पारा, तसा संग साजुरा हिरव्या आषाढ वनात डांगोरा, कसा पाण्यात लाविला अंगारा जरा बांध गजरा, माझी आण शाहीरा नव्या फुलून आलेल्या संसारा, माझ्या घराला सोन्याचा उंबरा. खरेतर कोणत्याही स्त्रीचे संसाराबद्दल चे स्वप्न घराला सोन्याचा उंबरा म्हणजेच भरभराट आणि चैतन्य यांनी बहरून आलेला दोन जिवांचा मेळ इतका साधा सोपा अर्थ मनात ठेवून स्त्री संसाराकडे पाहत असते. रानकवी म्हणून ओळख असणाऱ्या ना धों महानोर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून प्रसिद्ध आहेत. महानोरांच्या कवितेमधून स्त्रीची विविध रूपे अविष्कृत झालेली दिसतात. त्यांच्या एकंदर सर्वच काव्याचा विचार केला असता त्यात येणाऱ्या स्त्रिया वेगवेगळ्या रूपात वाचकांना भेटते. जीवनातील बिकट परिस्थितीला सामोरे जाताना संसाराचा गाडा ओढणारी, कधी उदास झालेली तर कधी भ्रमिष्ट झालेली आपल्या सुख दुःखासह आपल्या अवतीभवती वावरणारी स्त्री ना धों महानोर आपल्या कवितेमधून रेखाटली आहे. पीठ गळे जात्यातून तसं पाणी डोळ्यातून, आई करपले हात तुझे भाकरी भाजून. या अतिशय साध्या आणि सोप्या शब्दांमधून आई या रुपामध्ये स्त्रीचे संपूर्ण आयुष्य नेमके कोणत्या पद्धतीने जाते याची जाणीव कवीने करून दिलेली आहे. आईचे दुःख डोळाभर पाणी दाटली कहाणी आयुष्याची।। जात्याच्या ओवीचा संपला वेदांत देव्हाऱ्यात वात करपली।। या अभंगांमध्ये आई गेल्यावर कवीच्या मनामध्ये दाटून आलेले दुःख आणि जात्याचा आणि ओवीचा वेदांत संपल्याची भावना घरामध्ये आई गेल्यानंतर जमा होणाऱ्या उदास वातावरणाची प्रकर्षाने जाणीव करून देणारी आहे यात शंका नाही. त्यातही कवी जेव्हा आमच्या संसारी, घोटाळो न मन। तिथे तरी प्राण। शांत राहो।। असे म्हणतात तेव्हा आई मेली तरी आपल्या मुलाची काळजी करणे सोडत नाही, तिचा आत्मा किंवा मन सतत मुलांच्या संसारामध्ये किंवा घरामध्ये घुटमळत फिरत राहते अशी भावना कवीने व्यक्त केली आहे. महानोरांच्या कवितेमध्ये शेतात वावरणारी, राबणारी कष्टनारी निसर्गाच्या कुशीमध्ये स्वतःचे अस्तित्व उडवून देणारी आई सातत्याने दिसत राहते.
जीवनाची टांगा टोली किती सोसू कशी सोसू डोळे झाकून पापण्या आता उरले न आसू अशा शब्दांमध्ये तिच्या दुःख भोगण्याचा आणि सहन करण्याच्या जाणिवा महानोरांनी शब्दांकित केल्या आहेत. आई अपरात्री उठायची आणि जात्यावर बसायची फाटक्या लुगड्याला गाठी बांधून अंग झाकून घ्यायची. तिला वाट्टेल त्या रात्री जात्यावर बसायची जुन्याच ओव्यांचे दारिद्र पांघरायची लक्तरा सारखी... तत्कालीन स्त्रीच्या आयुष्यातील जाते, ओव्या, आणि कष्ट हे जणू तिच्या पाचवीला पुंजल्या सारखे जीवनाचा अविभाज्य घटक होऊन बसले होते. बरे एवढे कष्ट करून ही माय माऊली साऱ्यांच्या सुखात, घरादाराच्या दुःखात स्वतःला झिजवून घेत असताना स्वतःला कायमच अर्धपोटी ठेवून झोपते ते सांगताना कवी म्हणतात, माय दळताना तुझे डोळे गळले जात्यात आणि ओंजळीचे आणि हात पीठ भरल्या सुपात. भाजी-भाकरीचा घास भरवला साऱ्यांसाठी आणि सांजेला झोपली एकटीच अर्धपोटी ... अगदीच जात्यात आयुष्य भरडुन काढावे आणि जणू पीठ होऊन कृतार्थ व्हावे असेच आयुष्य ग्रामीण भागातील माय माऊली यांचे जीवन पाहताना कवीला आढळून आले आहे आणि त्यांनी ते आपल्या कवितेतून सजीव केले आहे. कोन्या राजानं राजानं शेवडी खंदली न कोन्या रानीनं रानीनं पानीच भरलं कोन्या राजाच्या राजाच्या डोल्यांत भरली न कोन्या रानीला रानीला दीठच लागली हा पाय शेनाचा, हा पाय मेनाचा। बंधुनं बायको केली माय पदर सोन्याचा लग्नकार्यात म्हणायचं गाण्या मधील नेमका ठेका, लयबद्धता, आणि प्रासंगिक कथा असा सुंदर आविष्कार वरील गीतामध्ये महानोरांनी उभा केला आहे. यामध्ये राणीला दिठ लागणे, राणीने पाणी भरले ह्या अत्यंत स्त्रीसुलभ घटना कवीने नेमकेपणाने टिपल्या आहेत. त्यातही स्त्रीने आपल्या माहेरच्या लोकांना नेहमीच भरभरून कोडकौतुक केलेले ग्रामीण भागांमध्ये दिसते, त्याचाच एक भाग म्हणजे पाय शेणाचा असो की मेणाचा असो म्हणजे परिस्थिती कशीही असो पण स्त्रीच्या भावाने केलेली बायको म्हणजे जगातील सर्वात सुंदर असेच तिचे मत असते. तिचा पदर सोन्याचा असतो म्हणजेच आपल्या भावाकडे भरभरून संपत्ती आहे असा स्त्रीसुलभ बडेजाव प्रत्येक स्त्री करत असते ते महानोरांनी दाखवून दिले आहे. असे असले तरी स्त्रीच्या सहनशीलतेला अंत नाही, दुःखाच्या आणि कष्टाच्या वाटा सतत पुढे सरकत जातात त्या ती कुठे तक्रार करत नाही. बाई जन्माचे धिंदोडे सांगू कसे, झाकू कसे? चुलीतल्या गोवरीला चुलीमंधी जळायचे! इतक्या सोशिक विचाराने न धो महानोर यांच्या कवितेमधील स्त्री आपल्या भावना आणि वेदना मांडत असते. ती हे सर्व का सहन करते? अशा प्रश्नाची अनेक उत्तरे तिची कहाणी यासारख्या काव्यसंग्रहा मधून मिळतात. ती दररोज ओवी गाते सूर्यासाठी संसारातल्या सुखदुःखासाठी प्रकाश मागते अंधाऱ्या कडा पुसून टाकण्यासाठी... अशा उद्याच्या स्वप्नासाठी किती हे सर्व सहन करणे सुरू असते. पुरुषप्रधान व्यवस्थे मध्ये निमूटपणे सोसावे लागणारे अत्याचार, दारिद्र्य, जीवाची होणारी तगमग या सर्वांमध्ये एखादेवेळी अन्यायाविरुद्ध उभे राहाणे हे सारे महानोरांच्या कवितांमध्ये दिसून येते. व्यसनी पतीमुळे रोजची अमानवीय मारहाण सहन करणारी एखादी स्त्री काळीज चिरून ठेवणारा प्रश्न विचारते, माय बापहो मी कोणत्या रस्त्यावर राहू? या लहानग्या चिमण्यांना मी कसे काय सांभाळू? घरदार असून घर पाठीशी लागलेल कुठल्या काळातलं पाप माझ्या नशिबी आलेल.. आपल्या समाजव्यवस्थेमध्ये व्यसनापायी पुरुषाच्या पुरुषार्थ साठी स्त्रीवर होणारे अमानवीय हल्ले आपण सतत पाहत असतो, व्यसन करणारे व्यसन करतात पण त्याचा त्रास स्त्रियांना होतो याचा कोणी विचार करत नाही. त्याची जाणीव महानोरांच्या कवितेमध्ये स्त्री आपल्याला करून देते. अशा घरादाराचे शिव्याशाप, मारहाण सहन करून मेटाकुटीस आलेले हे जीवन खरेतर मातीमोल असते मात्र त्यातही तिला थोडाफार आधार असतो आपल्या माहेराचा, माहेर पणाची भावना व्यक्त करताना कवी म्हणतात, ऐन पंचविशीत म्हातारपण सोसतांना... भरल्या संसारात मन जळून जाताना... कुठे शब्द बोलण्याचा तिला अधिकार नाही. प्रत्येक गर्भारपणात माहेरच्या आठवणीत ती जळून जाई. एका विशिष्ट टप्प्यावर तिला तिचे माहेर सुद्धा पोरके ठरते अशा आशयाची स्त्रीचे दुःख मांडणारी कविता तिची कहाणी मधून अस्वस्थ करून जाते. तिचे दुःख इतके भीषण आहे की ह्या स्त्रिया देवाला विनंती करताना आपल्याला बाईचा जन्म पुन्हा देऊ नको अशी विनंती करताना दिसतात. त्या म्हणतात, बाईचा हा जन्म नको घालू सख्याहारी रात्र ना दिवस परक्याची ताबेदारी,
स्त्रीचा जन्म पुरुषाची गुलामी करण्यासाठी आहे, त्यातही तो पुरुष दिवस आणि रात्र न पाहता तिच्याकडून होईल ती सेवा करून घेत असतो, त्यामुळे अशा गुलामगिरीच्या जीवनापेक्षा बाईचा जन्म पुन्हा देऊ नको अशी विनंती स्त्रिया देवाला करतात, त्याचवेळी माय तुझ्या घरी मीन काम नाही केलं रांजणाच पाणी मले कोसावाणी झालं
असे जेव्हा कवी लिहितात तेव्हा मुलीला तिची आई काम करू देत नाही, तिचे कोडकौतुक करते माहेरा मध्ये तिला काम नसते त्यामुळे सासरी रांजणातील पाणीसुद्धा तिला कोसभर अंतरावर आहे असे वाटू लागते. लेक सासरी फार कष्ट करते, तरी तिला सासुरवास होतो हे आईला माहीत असते म्हणून आखाजी नागपंचमी दिवाळी अशा वेगवेगळ्या सणाला ती मुलीला माहेरी घेऊन येते त्यामागे तिच्या मनामध्ये पुढील भावना असते, बहिणीने भाऊ एक तरी वो आसावा, थकल्या जीवाले एका रातीचा विसावा... मुलगी माहेरी आली म्हणजे तिला तेवढाच आराम मिळू शकतो अशी धारणा तिच्या आईचे असते आणि ती रास्त सुद्धा असते. भारतीय समाजव्यवस्थेतील स्त्री खरोखरच प्रचंड दुःखात राहुनही जेव्हा शेवटची घटका मोजते तेव्हा ती म्हणते, गेला मह्या जीव मले मातीशी खुटवा सोन्याच पिंपळपान महया माहेरी पाठवा गेला महया जीव महया किल्डिले साखळ्या देर जेठ ओझाखांदे राम चालू द्या मोकळे, मी मेल्यावर माझ्या माहेरी निरोप पाठवा, माझी तिरडी दिर आणि जेठ यांना उचलू द्या नवऱ्याने आयुष्यभर माझे दुःखाचे ओझे वाहिले आहे त्यामुळे त्याला मोकळे चालू द्या एवढे विचार करूनच ती थांबत नाही तर आपल्या मागे आपल्या नवऱ्याचे हाल होऊ नये म्हणून त्याने दुसरे लग्न करावे असे सुद्धा ती त्याला सुचवते. तशीही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये स्त्री नवऱ्याला बहाल केलेली असते. नवऱ्याच्या संसारात रममाण झालेली स्त्री नवऱ्यासाठीच आपल आयुष्य मागत असते, दुबळी मी देवा मले दुबळे राहू दे, लग्नाचा जोडा सातजनमी जाऊ दे.. असे म्हणणारी स्त्री महानोरांच्या कवितेमध्ये सतत भेटत राहाते. ना धों महानोर यांच्या कवितेमध्ये स्त्रीचे दुःख आणि वेदना यांची मांडणी तर आहेच मात्र तितक्याच प्रभावीपणे कवितेमधील अल्लड अवखळ कधी प्रणयोत्सुक, अगदी आपल्या सौंदर्याने वेड लावणारी तर कधी अगदी उघड्यावर शरीरभोग देणारी अशी स्त्री त्यांनी उभी केली आहे. आज तिने कुठल्या साजनाला दूर नभातुन बोलाविले; भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले . काचोळीची गाठ सावरीत हळू तयाला सांगितले; तिचिया पोटी पचघडीचे लख्ख चांदणे अवघडले. धरती जशी पावसाला उघड्यावर मिठी मारते त्याच आवेगाने प्रेमातून साजणी आपल्या प्रियकराला भेटते असे वर्णन कवी करतात तसेही बऱ्याच ठिकाणी निसर्ग आणि स्त्री एकमेकांत मिसरून गेलेले दिसतात. तरीही ती अबोल... जरा दूर झाली लुगडं दूर फेकून नग्न नग्न झाली. नितळ भुऱ्या मांड्यावरती काळे डाग तिचा उभार देह एक जळती आग अशा बेधडक बिनधास्त वृत्तीची स्त्री महानोरांच्या कवितेमध्ये दिसते, तर कधी अगदी रान भलतच भरात जरा, पिकात धुडगूस घालून जा असे आवाहन करणारी प्रणय उत्सुक स्त्री निसर्गदत्त शृंगार भावनेची मागणी करताना दिसते. ज्या अर्थी स्त्री स्वतः पुरुषाला शृंगारासाठी आवाहन करते तेव्हा त्या स्त्री-पुरुषांमधील नाते ही तितकेच अलवार आले निर्मळ असले पाहिजे. मग अशा स्त्री-पुरुष नात्यांमधील निरागसता कुठेही बीभत्स न होता महानोरांच्या कवितेमधील पोरी सारखे नितळ रूप घेऊन येतात. असा धिंगाणा घालती रोज वाऱ्याला भरती, सारे कळू आले तरी पोरी झिम्माच खेळती. कधी महानोरांच्या कवितेमधील नवयौवना त्यातही गावात नव्याने आलेली म्हणजे शक्यतो नवपरिणीत अशी स्त्री असं एखादं पाखरू वेल्हाळ सारख्या वेल्हाळ शब्दरूपात समोर येते. तर कधी राजसा जवळी जरा बसा अशी प्रियकराला जवळ बसण्याची विनवणी करते. तर कधी पायात पैंजण मन ओलेचिंब कसा काल धरू गर्भात लेकरू अशा गर्भवती स्त्रीच्या मनाचे स्पंदन महानोरांनी नेमकेपणाने टिपले आहे. डोळे भलतेच बोलके, नको पायात पैंजण, चोळीचा गाठीत मावेना स्तनभार, नागिन मैथुनात मग्न अशा कवितांमध्ये ठळकपणे आणि प्रभावीपणे प्रणयोत्सुक स्त्रीचा मनोभाव कवींनी अधोरेखित केलेला आहे. या कवितांमध्ये स्त्री ही तरुणी, नुकतीच यौवनात पदार्पण केलेली आणि शृंगारासाठी आसुसलेली असलेली दिसते. ना धों महानोर यांच्या अजिंठा मध्ये तर पारू आणि रॉबर्ट गील यांच्या भावनिक प्रेमाविष्कारात अजिंठा मनाला आणखी मोहून घेतो. मात्र पारुच्या निधनानंतर सर्वकाही सोडून जाणार गील निशब्द करून जातो. ती पाठमोरी बाई... अंबाडा शुभ्र पिवळी फुलं. भिक्षापात्रातला बुद्ध आणखी यशोधरा असा उल्लेख करून जगाची दुःख मिटवणारा बुद्ध यशोधरेच्या दुःखाचे कारण झाला त्यामुळे दुःख हे चिरंतन आहे ते कोणीही नष्ट करू शकत नाही याची जाणीवही महानोरांनी करून दिली आहे. मेमरी ऑफ माय बिलव्हेड पारो अशी सुंदर कबर तयार करणारा गिल साब आणि रांगड्या सौंदर्याचा आविष्कार असणारी पारू यांची अनोखी प्रेमकथा अजिंठा मध्ये साकारली आहे. तर कधी शिवरायांची गाथा लिहिताना शिवरायांचा पाळणा ना धों महानोर ह्यांच्या लेखणीतून स्फुरलेला आठवतो. आता पाळणा आणि नाव ठेवणे हा स्त्री संस्काराचा अविभाज्य घटक आहे हे वेगळे सांगायला नको. असाच एक स्त्री संस्कार जो आपण सर्वत्र पाहतो तो म्हणजे सासा सुनेचे भांडण... ह्या सासासुनेच्या भांडणात आधी मुलगा जातो मग सूनही जाते आणि मग हतबल म्हातारी सुनेच्या मुलाला घास भरवते आणि त्या मुलांचे हाल पाहून स्वतः सुद्धा जीव सोडते मात्र मरताना लेकाचे आणि सुनेचे गुणगान गाते, अशी ही अतिशय विचार करायला लावणारी आणि स्त्री भूमिकेवर विचार करायला लावणारी कविता महानोरांच्या सूक्ष्म निरीक्षणातून जन्मास आली आहे. नामाच्या किर्तनी - भेटली जनाई - विठ्ठल रुक्माई - भेटी आले।। कबिराचा दोहा- मीरा जनाबाई- सारे एक देही- माऊलीच्या।। अशा अभंगांमधून जनाबाई मीराबाई अशा संत स्त्रिया विठ्ठलाच्या बरोबरीने रुक्माई यांचा गौरव करत ना धों महानोर यांनी आपल्या कवितेमधून स्त्रियांना मानाचे स्थान देत त्यांचा गौरव केलेला आहेच शिवाय पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्यांचे महत्त्व सुद्धा अधोरेखित केल आहे. त्याच वेळी दारिद्र्याने पछाडलेल्या समाजव्यवस्थेमध्ये, पाणवटल्या डोळ्यांनी गोऱ्या राजाचे महिमान गाणारी जख्ख म्हातारी, मी पाहिल्या पासरीभर बाजरीवर भोग देणाऱ्या रूपवंत पोरी।। हा ठसठशीत अनुभव बधीर करून जाणारा असतो. तर त्याच प्रमाणे, ही दुसऱ्याची बाईल माझ्या घरात मी ठेवू कशी! चुलीवरच्या विस्तवाची ठिणगी मी झेलू कशी।। एखादेवेळी एखाद्या स्त्रीवर दुर्देवाने विधवा म्हणून किंवा घटस्फोटिता म्हणून जगण्याची वेळ आली असता तिच्या मनामध्ये दुसऱ्यांदा फुलून येणाऱ्या संसार स्वप्नाला भंग करण्याचे काम सर्वात प्रथम एक स्त्रीच करत असते. अशी स्पष्ट कल्पना ना धो महानोर यांनी आपल्या कवितांमधून करून दिलेली आहे वरील कविता त्याचेच एक उदाहरण आहे. कालानुरूप स्त्रीची रूपे बदलली तरी सुद्धा दुःख रूप बदलून तिचा पिच्छा पुरवते. महानोरांच्या कवितेतील स्त्री निसर्गात मिसळली आहे त्यामुळे ती निसर्गा इतकीच बेहोष, बहकेलेली आणि उदास असते.महानोरांच्या कवितेमध्ये फक्त ग्रामीणच नाही तर प्रगत देशातील स्त्रीचे दुःखही आलेले दिसते. पन्नाशीच्या पोक्त बाईने सनफ्रान्सिस्कोच्या विमानतळावर केलेली आत्महत्या हे त्याचे एक उदाहरण आहे. त्यावरून समस्त स्त्री जातीचं दुःख जगाच्या पाठीवर सारखेच आहे असा संदेश कवी देतात. सुख दुःखाच्या झोक्यावर ह्या पुरुषी व्यवस्थेत स्त्री आपले आयुष्य कसे जगते त्याचे नेमके चित्रण कविवर्य ना धों महानोर ह्यांच्या कवितेमधून पाहायला मिळते हे निश्चितपणे म्हणता येते. *किरण शिवहर डोंगरदिवे, वॉर्ड न 7, समता नगर मेहकर, ता मेहकर जि बुलढाणा पिन 443301 मोबा 7588565576*

Share

प्रतिक्रिया