ढाल तलवारे गुंतले हे कर
निवडणूका, राजकारण आणि सत्ताकारणाच्या वातावरणात शेती आणि शेतकरी हा काही आता चर्चेचा किंवा महत्त्वाचा विषय राहिलेला नाही. निवडणूका असोत वा नसोत राजकारण हा एकमेव चर्चेचा विषय आहे. प्रत्येक गोष्टीची घटनेची चर्चा लिखित आणि समाज माध्यमांमध्ये राजकारणाशी निगडितच असते. आपल्या शेती व्यवसायाला महत्त्व देऊन विचारपूर्वक शेती करणारे शेतकरी १५ ते २० टक्केच आहेत. बाकी कुणाचे तरी झेंडे मिरवत आहेत. मन रमवत आहेत. अनुदानांची सवय खर्रा किंवा गुटख्यापेक्षा वाईट. नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाची बायकोला चीडच असते. पण अनुदान घेण्याचं व्यसन घरादाराला, बायकोमुलांनाही आवडू लागतं. लढणारे हात, व्यवस्थेविरुद्ध मुठी वळलेले हात केव्हां पसरले गेले हे कळलेही नाही. युगात्मा शरद जोशींनी सरकार शेतकऱ्यांचे किती देणे लागते हे अनेकदा गणितं मांडून अगदी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. त्यामुळे अनुदान स्वीकारतांना सरकार शेतकऱ्यांवर उपकार करत आहे असा लाचार भाव नकोच. पण एकदा हात पसरले की मिंधेपणा येतोच. न्याय्य भाव हिसकावून घेण्याची ताकद आणि हिंमत शेतकरी संघटनेने दिली पण अनुदानातच आनंद वाटायला लागल्यावर "भीक नको घेऊ घामाचे दाम" या बीजमंत्राचा विसर पडला.
घामाचं दाम मिळवायला अनेक पद्धतींनी अनेक आघाड्यांवर शेतकरी संघटना लढली. त्यासाठी अधिवेशन. अधिवेशनात लाखा-लाखांची उपस्थिती.वास्तवनिष्ठ, अभ्यासपूर्ण भाषणं. स्पष्ट अचूक मांडणी केलेले ठराव. मग प्रत्यक्ष आंदोलन. रस्त्यावरची लढाई, त्यातही लाखांलाखांचा सहभाग. हजारोहजारांची अटक. शेकडोंनी लाठी काठी झेललेली. गोळीबारात अनेकजण हुतात्मा झालेले. नंतर आंदोलनात कल्पकतेने वेगळेपणाही आला. प्रवाशांच्या कपड्यांवर संघटनेचा ठप्पा मारून राजीवस्त्राचा निषेध आणि सुती कपड्यांचा आग्रह. कधी प्रेमाने पानं फुलं पत्रकं देऊन परिस्थिती समजावणं. रेल रोको रस्ता रोको, घेराव, ठिय्या आंदोलनाचा माहौल वेगळा होता. पण हळूहळू शेतीतील कामे सोडून, आंदोलनात भाग घेऊन कोर्टाच्या चकरा मारण्यात वेळ आणि पैसा जाऊ लागला. शेतकरी पूर्वीच्या संख्येने आणि उत्साहाने आंदोलनात येईनासे झाले. चुकीच्या रस्त्याने जाऊन काही इतरांच्या शामियान्यात जाऊन बसले. त्यामुळे शोषण व्यवस्थेला बळ मिळालं. राज्यकर्त्यांना मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, शेतकऱ्यांचं उपद्रव मूल्य फारसं नाही हे लक्षात आलं. त्यातून ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंतची प्रत्येक निवडणूक शेतकऱ्यांमधले गट तट वाढवत गेली. वरच्या नेत्यांचा "जमलं तर तळ्यात नाहीतर मळ्यात" हा खेळ बघूनही शेतकरी शहाणा झाला नाही.
सर्व राजकीय पक्ष चोर आहेत. छोटा चोर आणि मोठा चोर यातील समतोल साधणे हे संघटनेचे राजकारण आहे. ही वाक्य अनेकदा घोकली गेली. पण प्रत्येकाच्या मनात त्याचा एक लाडका राजकीय पक्ष असतो. संघटनेचे धोरण त्या त्या लाडक्या पक्षास सोयीस्कर व पोषक असेपर्यंत संघटनेची वाहवा केली जाते पण राजकीय पक्षांची जवळीक ही आंदोलनाच्या सोयीसवडीनुसार ठरवायची असते हे सूत्र पचवणे बहुतेकांना जड गेले. (संदर्भ - बळीचे राज्य येणार आहे .लेखक - युगात्मा शरद जोशी )
प्रत्येक निवडणूक ही संधी समजून चळवळीची शक्ती वाढवण्यासाठी व्हावी असे धोरण असावे हे ठरले होते. पण प्रत्यक्षात प्रत्येक निवडणूक अगदी ग्रामपंचायतीची सुद्धा; चळवळीचे बळ कमी करणारी ठरली. आपल्या देशात राजकारणाइतका दुसरा प्रिय विषय नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मत देणे एवढीच आपली जबाबदारी. आपण मत देऊन मोकळे होतो. नंतर आपण निवडून आलेल्या किंवा पडलेल्या उमेदवाराला "शेतकरी" म्हणून भेटत नाही. आपल्याला "त्याचा कार्यकर्ता" समजणे त्याच्या सोयीचे असते. एकदा खुर्ची मिळाली की तो तर शेतकऱ्यांची काळजी करतच नाही पण त्याच्या राजकारणापुढे शेतकऱ्यांनाही आपली स्वत:ची काळजी वाटेनाशी होते. मत देतांना उमेदवाराच्या पक्षाची आतापर्यंतची शेतीविषयक धोरणे कशी होती, स्वत: उमेदवाराला शेती विषयक प्रश्नांची समज, निदान समजून घेण्याची तयारी आणि क्षमता हे लक्षातही घेतले जात नाही.
शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई ही कुणा एका पक्षाशी, व्यक्तीशी नाही, ही लढाई व्यवस्थेशी आहे. त्यामुळे ती जास्त काळ चालणार आहे. रामरावणाच्या लढाईत रामाने बाण मारून रावणाचे एक मस्तक उडवले तर लागलीच दुसरे मस्तक तिथे येत होते. प्रत्येक निवडणुकीत आपला हाच अनुभव आहे. आपल्या एकीपेक्षा आणि रावणाच्या मरणापेक्षा रावणाची मस्तके उडवणे आपल्याला आवडू लागले. व्यवस्था रावणासारखीच मायावी कपटी आहे. सगळ्या मस्तकांमधे शेतीच्या शोषणाचीच धोरणे आहेत.
हा सगळा निवडणूकनामा आपल्याला पाठ आहे. एकतेचं कौतुक सांगणाऱ्या काठ्यांच्या मोळीची, पारध्याच्या जाळ्यासकट उडालेल्या पक्षांची, एकत्र हल्ला करणाऱ्या मधमाश्यांची. हत्तीला लोळवणाऱ्या मुंग्यांची अशा अनेक गोष्टी आपल्याला पाठ आहेत. "आम्ही आता फसणार नाही. टाकले दाणे टिपणार नाही." ही पोपटपंचीची गोष्टही आपल्याला पाठ आहे. पण शेतकऱ्यांच्या एकीच्या गोष्टी कुणाला पाठ व्हायच्या आत विसरल्याही गेल्या.
सामाजिक अस्पृश्यांना खेडी सोडून शहराकडे चला असा आदेश डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. त्याचवेळी बलुतं झुगारून जे शहरात गेले त्यांची आर्थिक अस्पृश्यता संपली म्हणून सामाजिक अस्पृश्यताही संपली. पण खेड्यातल्या जमिनीच्या तुकड्यात ज्यांची मनं गुंतलेली होती त्यांना शहरात अधांतरी कसे रहावे हा प्रश्न होता. आज खेडी सोडून शहरात आले तरी नोकरीची शाश्वती नाहीच. तरीही खेड्यातून शहरात येणे सुरूच आहे. फक्त शेती करून जगणारे, शेतीवरच पोट असणारे शेतकरी किती हे पडताळून बघावं लागेल. नोकरीमुळे नियमित पैसा हाती येणारे, सरकारी नोकरीत मोक्याच्या जागा मिळाल्यामुळे भरपूर पैसा हाती असणारे, इतर उद्योगधंद्यांमधलं लपवायचं उत्पन्न "शेतीतले" दाखवणारे, राजकारणात शिरून खुर्ची मिळवलेले, त्यांच्या छत्रछायेत जगणारे, त्यांच्या कृपेने स्वत:ही राजकारणात शिरू बघणारे असेही शेतकऱ्यांचे प्रकार दिसून येतात. त्यामुळेही शेतकरी आंदोलन बोथट झाले आहे. चतुरंग शेतीच्या जोखमीच्या, कष्टाच्या, सामूहिक समंजसपणाच्या खडतर वाटेपेक्षा खेड्यातून शहरात दाखल होणे कमी कष्टाचे, कमी खर्चाचे वाटू लागले आहे. अनुदानांच्या व्यसनामुळेही खूप निष्क्रियता आली आहे.
शेतकरी संघटनेने आक्रमण आणि स्वसंरक्षण यासाठी वेगवेगळी शस्त्रं शेतकऱ्यांच्या हाती सोपवली. आक्रमणासाठी संख्याबळ आणि एकत्र उठाव करणे आवश्यक होते. स्वसंरक्षणासाठी जात, पात, पक्ष, पंथ यांचे भेद झुगारणे, व्यसनमुक्ती, घरलक्ष्मीचा सन्मान, तंत्रज्ञानाचा वापर, कटाक्षाने सुती कपड्याचा वापर, शेतीचा म्हणजेच माती, पाणी, बियाणे, औषधे, खते आणि बाजारपेठेचा अभ्यास ही खूप परिणामकारक शस्त्रे दिली. पण ती शस्त्रे आहेत, ती वैयक्तिक जीवनात वापरायची आहेत, ती आपल्याच हातात आहेत याचा विसर पडला. शेती व्यवसायाचे प्रेम, शेतकरी असल्याचा आनंद उणावला आहे. लढण्याची ऊर्मी संपली आहे. हातातल्या शस्त्रांचीही अडचण वाटायला लागली अशी परिस्थिती आहे.
एका तथाकथित शूराबद्दल तुकाराम महाराजांनी फार सुरेख लिहून ठेवलेलं आहे.
ढाल तलवारे, गुंतले हे कर
म्हणे मी जुंझार, कैसा झुंजो
पोटी पडदाळे, सिले टोप ओझे
हे तो झाले, दुजे मरणमूळ
बैसविले मला येणे अश्वावरी
धावू पळू तरी कैसा आता
असोनि उपाय, म्हणे हे अपाय
म्हणे हाय हाय, काय करू.
तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म
मूर्ख नेणे वर्म संतचरण
या स्वनामधन्य शूराला लढायचेच नाही. त्यामुळे तो तक्रारी करत बसला आहे. तो म्हणतो "खरे तर मी अतिशय झुंजार आहे. पण काय करू? माझ्या हातात ढाल तलवार दिली त्यामुळे माझे हात गुंतून पडले. मला चिलखत घातले, डोक्याला शिरस्त्राण, कमरेला पट्टा, या सगळ्याची मला भयंकर अडचण होत आहे. शिवाय मला घोड्यावर बसवले. मग धावत जाऊन मी शत्रूला पकडणार तरी कसे?जगत्गुरू तुकोबाराय म्हणतात की, अशी सगळी लढण्याची साधने जवळ असून हा त्यालाच अडचण समजत आहे. स्वत: अत्यंत सक्षम असूनही हा संतचरण म्हणजे संतांचे विचार... त्या विचारांकडे दुर्लक्ष करतो हा याचा मूर्खपणा आहे.
सौ.प्रज्ञा जयंत बापट
मोबाईल - ९४०५५०१७५१