नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रावेरी, जि. यवतमाळ येथे होऊ घातलेले यावर्षीचे ७ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वेब मिलन सप्ताह म्हणून सध्या आभासी/ ऑनलाईन सुरू असून त्याचे आज सोमवार, २२ मार्च २०२१ ला तिसऱ्या दिवशी तिसरे पुष्प 'शेतकरी - महीला' गझल मुशायऱ्याच्या रूपाने गुंफल्या गेले. झूम ऍप मीटिंग व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साकारण्यात आलेला आजचा हा गझल मुशायरा खरेच खूप आनंद देऊन गेला कारण तो साक्षात मंचावर होत आहे की काय असा जाणवला.
गझल मुशायऱ्याची सुरुवात शेतकरी चळवळीचे कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे यांच्या प्रास्ताविकाने तर शेवट हा मुशायऱ्याच्या अध्यक्षा मा. चित्राताई कहाते यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. सदर गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन पुण्याच्या मा. प्राजक्ता पटवर्धन यांनी आपल्या चिरपरिचित अशा गोड आवाजाने अतिशय प्रभावीपणे सांभाळले. मुशायऱ्यात अनेक प्रसिद्ध तसेच मातब्बर गझलकारांनी आपल्या गझला सादर केल्या.
मुशायऱ्याचा आगाज परभणीचे महेशहोनमाने यांच्या "किती दिवस हो रोज मरावे शेतकऱ्यांनी? मरण्यापूर्वी किती जळावे शेतकऱ्यांनी?" या शेराने झाला. त्यानंतर मग एकशे एक शेर सरशी शेर येऊन धडकू लागले. हिंगणघाटाचे मा. प्रदीप थूल यांनी "घरच्या घरीच राहून खळगी भरू कशी मी? बंदीत सांग माझी शेती कशी करू कशी मी? या आपल्या शेराने श्रोत्यांच्या मनाचा जणू ताबाच घेतला. त्यानंतर आलेले अकोल्याचे निलेश कवडे यांच्या "आत्महत्येने बळीची जिंदगी गेल्यावरी, कोणत्या चौकात सांगा मेणबत्ती लागते?" या शेराने श्रोत्यांना अंतर्मुख करून सोडले. धिरजकुमार ताकसांडे यांच्या शेरांनी मग मोर्चा महिला-विश्वाकडे वळवला. त्यांचा हा शेर, "इतिहास सांगतो हा दास्यातल्या स्त्रीयांना, वापर तुझा इथे हा होतो धना प्रमाणे!" मुशायऱ्यात महिला कैफियतेची पायाभरणी करून गेला. त्यानंतर आलेल्या हिंगणघाटच्याच डॉ. रविपाल भारशंकर यांच्या शेरांनी तर महिला मुक्तीचा जणू कळसच उभा केला. त्यांचा हा शेर, "स्त्री -हीच देत असते वरदान जीवनाचे, सामर्थ्य अन्यथा हे देवादिकात नाही." जबर दाद घेऊन गेला.
त्यानंतर आलेले परभणीचे आत्माराम जाधव यांच्या शेरांनी मोर्चा पुन्हा शेतकऱ्यांकडे वळवला. त्यांचा हा शेर, "खाऊन फस्त केले शेतास कुंपणाने, गावात या लुटीची हळहळ नवीन आहे" खूप टाळ्या घेऊन गेला. त्यानंतर आलेले परभणीचेच यशवंत म्हस्के यांनी "पाणगळीचे दिवस तरीही फुल पाहून मी रमतो आहे." ही गझल सादर केली. औरंगाबादचे गिरीशकुमार जोशी यांनी "पिकल्यात आत्महत्या पाऊस आटल्याने, करतो म्हणून आम्ही धिक्कार पावसाचा." या भन्नाट शेराने आपली गझल संपवली. नांदेडचे बापू दासरी यांचे हा शेर, "हृदयावरती या श्वासांची खूप उधारी, फेडत फेडत स्पंदन झाले काल फरारी." हळुवार अनुभूती देऊन गेला. बदीउज्जमा बिरासदार, सोलापूर त्यांनी आपल्या "मोठं मोठी नोकरी नाकारली मी, जिंदगी स्वप्नातली साकारली मी" या शेराने मुशायऱ्यास वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर साताऱ्याचे महेश मोरे, "ईश्वराबद्दल नका सांगू मला, माणसाला माणसाची द्या हमी." ही गझल घेऊन आले. नागपूरचे अजिज खान पठाण क्वारंटाईन असतानाही कनेक्ट झाले. त्यांनी "जरी सुगी वा हा नको हंगाम आता, द्या कुणी दिल्लीस हा पैगाम आता" ही गझल सादर केली. सुत्रसंचालिका मा. प्राजक्ता पटवर्धन, यांनी "गाऊ नको जराही गुणगान पावसाचे, बाहेर बघ जरा तू थैमान पावसाचे" ही गझल, तर मा. गंगाधर मुटे यांनी "लाजून पाहिले ना रोखून पाहिले, तुज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहीले" ही गझल सादर करून मुशायरा शेवटास नेला.
शेवटी मुशायऱ्याच्या अध्यक्षा मा. प्रा. चित्रा कहाते नागपूर यांनी "डोळ्यातल्या व्यथांचे हे अर्थ वेगळे, असतात आसवांचे संदर्भ वेगळे" ही गझल सादर करून व सर्व गझलकारांना दाद देऊन मुशायऱ्याच्या समारोपास हिरवी झेंडी दिली.
- डॉ. रविपाल भारशंकर
(अंगारमळा मार्च २०२१ मधे प्रकाशित)