IT कार्यशाळा - वेबसाईटवर लेखन कसे करावे? - भाग-८
वेबसाईटवर एकदा सदस्यत्व घेता आले आणि Sign In करता आले कि वेबसाईटवर लेखन करणे सोपे असते शिवाय तोपर्यंत वेबसाईट क्रिये-प्रक्रियेशी आपली बऱ्यापैकी ओळख होऊन बऱ्याच बाबी कळायला लागलेल्या असतात.
ही तशी अत्यंत सोपी क्रिया-प्रक्रिया आहे पण त्यासाठी वेळ देऊन मेहनत घ्यायची गरज असते. पण अशी गरज फक्त इंटरनेट तंत्रज्ञानाची ओळख करून वापर करतानाच असते का? अन्यत्र नसते का?
जरा आठवण करून बघा. तुम्ही शाळेत जायला लागल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला "अ" लिहिता आला? स्वतःचे नाव खडूने पाटीवर लिहायला किती महिने लागलेत? तुम्हाला शाळेत ११ वाजता दाखल केले आणि "प्रिय आई/बाबास पत्र" तुम्ही ११.३० वाजताच लिहायला लागलात का?
विधा कुठलीही असो ती अवगत करायला एक काळ लागतोच. पण आता आपल्या बुद्धीला अनेक फांद्या फुटलेल्या असतात त्यामुळे काही वेळ देऊन नवीन शिकायची आपली तयारी नसते आणि हाच अनुभव मला वारंवार येतो.
मागील सात वर्षांपासून आपण
http://www.baliraja.com/spardha-2020 या साईटवर
ONLINE विश्वस्तरीय लेखनस्पर्धा घेत असतो. हे ७ वे वर्ष आहे पण दरवर्षी डझनाने लोक तिथे न लिहिता मला व्हाटसपवर किंवा ईमेलने आपली प्रवेशिका पाठवतात. त्यांचे म्हणणे असते कि तिथे लिहिणे वगैरे आम्हाला जमत नाही. आपणच टाकून द्यावे. त्यांना ही सर्व प्रोसेस समजून सांगण्याची आणि त्यासाठी पुरेसा वेळ देण्याची माझी तयारी असते पण त्यांना ते नको असते. बहुतेक त्यांचा विचार असा असतो कि त्यांच्या प्रवेशिका रात्रभर जागून मी अपलोड कराव्यात आणि ते त्यांचे काम माझ्यावर सोपवून त्याच वेळात एखादी TV सिरीयल किंवा एखादा सिनेमा किंवा क्रिकेटची मॅच बघायला मोकळे राहू शकतील.
पण मी स्वतः अशा व्हाटसपवर आलेल्या किंवा ईमेलने आलेल्या प्रवेशिका कधीच दाखल करून घेत नाही. माझ्याकडे वेळ नाही म्हणून नव्हे तर यासाठी की ही ONLINE स्पर्धा असल्याने ज्याला ऑनलाईन कार्य जमते तोच स्पर्धेसाठी पात्र असू शकतो. ज्याला ऑनलाईन काम जमत नाही तो पात्र असूच कसा शकेल?
त्याच एका कारणासाठी मी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. मग यानिमित्ताने ज्यांना ज्यांना इंटरनेट तंत्रज्ञान शिकायचे आहे त्यांना हे दालन का उघडून देऊ नये, असा विचार करून ही कार्यशाळा आपण व्यापक स्तरावर आयोजित केली आहे.
यानिमित्ताने इंटरनेटचे अनेक प्रकारचे उपयोग, याविषयी सुद्धा मी माहिती देणार आहेच. ही कार्यशाळा व्हाटसपवर असली तरी वेबसाईटवर (
www.baliraja.com/karyshala) येथे सुद्धा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ज्यांना लाभ घ्यायचा असेल ते अन्य लोकही लाभ घेऊ शकतील. निदान "आम्हाला हे जमत नाही" असा त्यांचा नेहमीचा बहाणा यामुळे नक्कीच संपुष्ठात येणार आहे.
तर चला बघुयात की वेबसाईटवर लेखन करणे किती सोपे असते.
२) sign in करा.
३) पेज स्क्रोल केल्यावर सदस्य खाते असा एक ब्लॉक दिसेल.
४) लेखन करा यावर क्लिक करा.
५) कोणत्या विभागात लेखन करायचे त्या विभागाची यादी दिसेल.
६) हवा तो विभाग निवडून त्यावर क्लिक करा.
७) शीर्षक - या रकान्यात शीर्षक लिहा.
८) लेखनविभाग - यात तुम्हाला हवा तो लेखनप्रकार निवडून त्यासमोरील चौकटीत क्लिक करा.
९) Body (Edit summary) - या रकान्यात मजकूर/लेख लिहा.
१०) शोधखुणा Tag - या रकान्यात टॅग द्यायचा असेल तर द्या. किंवा मोकळा सोडा.
११) पूर्वपरीक्षण या बटनावर क्लिक करा. प्रकाशित झाल्यावर आपली पोस्ट कशी दिसणार आहे याचा नमुना इथे पाहता येईल. काही बदल करायचे झाल्यास आपण बदल करू शकता.
१२) प्रकाशित करा या बटनावर क्लिक करा.
किती सोपे आहे, नाही का?
चला मग लागा प्रयत्नाला.
शुभेच्छेसह!
- गंगाधर मुटे
=======