नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कवितेचे रसग्रहण
वळीव : प्रा. संजय आघाव यांच्या कवितेतील अस्सल ग्रामीण शब्दरचना
वळीव
येता वळीव पाऊस वारा उधळीतो खूर
कोकिळेची कुहू - कुहू मध्ये मिसळीते सूर
वारा उधळीतो खूर गंध मातीचा पोटात
पक्षी झुरती रानात गानं घेऊन ओठात
चिंब धरणी नाहते जड भरल्या थेंबात
गर्द हिरव्या कोंबाचा शालू नेसते अंगात
नदीनाल्या पाणी पाणी साचं डचांग डबकी
भरे कोवळ्या पानाची नंग्या खोडाला झुपकी
ये जांभळ्या मेघातून सोन सावली शिवारा
हे दान ज्या देवाचं त्याचा उजळ देव्हारा
- प्रा. संजय आघाव
'चैत्रपालवी' या कवितासंग्रहातील प्रा. संजय आघाव यांची 'वळीव' ही कविता. मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील दौनापूर गावात वास्तव्यास असणाऱ्या संजय आघाव यांच्या एकूणच कवितेत ग्रामीण परिसर, शेती व शेतकऱ्यांच्या जीवनाचे चित्रण आल्याचे दिसून येते. त्यांच्या कवितेच्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अस्सल ग्रामीण शब्दयोजना! ओढून ताणून ग्रामीण बोलीतील शब्दयोजना न करता सहज अनुभूतीच्या पातळीवर त्यांची कविता वावरताना दिसते. जगलं भोगलेलं मांडताना संजय आघाव यांची कविता मुख्यत्वे मातीचे गाणे गाताना दिसून येते. कित्येक पिढ्यांची मेहनत या काळ्या मातीसाठी दिलेली असल्याने "मातीच्या केसात । विंचरावं कोणी ।। ज्याच्या हाती फणी । नांगराची" असे कवी 'चैत्रापालवी' संग्रहातील 'मातीच्या केसात' या कवितेत म्हणतो.
वळवाच्या पावसाचे वर्णन सदरील 'वळीव' कवितेत कवीने अत्यंत खुबीने केले आहे. मान्सून उंबरठ्यावर आल्याची वर्दी देण्यासाठी आलेल्या पावसाला वळीव म्हणतात. गरजणारे ढग आणि कडाडणाऱ्या विजा हे त्याचे साथीदार! दुपारपर्यंत वातावरण चांगलंच तापतं. अगदी नको नको होतं. त्यानंतर वळीव तडाखा देतो. धो धो कोसळतो. हा कधी सरळ नसतो. वाकडा, तिरका, वाट्टेल त्या दिशेनं येतो. रस्त्यांवर पाणी साठवून–घरांमध्ये शिरून दाणादाण उडवतो. सोबतीला वाऱ्याला घेऊन काही झाडं आडवी करतो. पिकं झोपवतो. जमलंच तर विजा पाडून चार–दोन बळीसुद्धा घेतो. एकाच झपाट्यात ढग रिकामा आणि आकाश पुन्हा नागवं! वळीवाचा पाऊस जेव्हा रानामध्ये धिंगाणा घालायला येतो तेव्हाची रानाची अवस्था कवीने या कवितेतून खूप सुंदर वर्णन केलेली पाहायला मिळते. वाचक अगदी अंतर्मुख होऊन वाचत राहतो. खूर उधळीत पळणाऱ्या बैलाप्रमाणे वळीवाच्या पावसात वारा थैमान घालत येतो. त्यामध्ये कोकिळेची कुहू-कुहूच्या सुरात घेतलेली तान मिसळते. वळविवाच्या पावसाने ओली झालेली माती गंधित होते. ओल्या मातीचा गंध अशावेळी सगळीकडे पसरतो. ओठांत गाणे घेऊन पक्षी रानात झुरतात. मातीच्या पोटातील मृद्गंध वाऱ्याच्या खुराने आसमंतात उधळला जातो. मृद्गंधाने वातावरण सुवासिक होते. वातावरणात एकप्रकारचे चैतन्य निर्माण होते. दिशादिशांत आनंद भरून राहतो. अशा प्रकारे वळीवाच्या पावसाच्या आगमनाने वसुंधरा चैतन्यमय होऊन जाते.
भरलेल्या जाड अशा टपोऱ्या थेंबांनी जेव्हा पावसाचे रानात आगमन होते तेव्हा धरणी चिंब भिजून न्हाऊन निघत असते. आणि हळूहळू तिच्या अंगावर ती गर्द हिरव्या रंगाचा शालू नेसते. म्हणजे सगळीकडे हिरव्यागार गवताच्या शालीने वसुंधरा सजून नटलेल्या नव्या नवरीप्रमाणे शृंगारिक झालेली पाहायला मिळते. धरणीवर फुटलेले हिरवे हिरवे कोंब धरणीला नवता प्रदान करतात. नदीनाल्यांना पाण्याचा प्रवाह वाढतो. जागोजागी 'डचांग डबकी' साचतात. 'साचं डचांग डबकी' म्हणजे काठोकाठ भरून खड्ड्यात पाणी साचून राहते. इथे ग्रामीण बोलीभाषेतील दुर्मिळ शब्द आले आहेत; जे की आज सहसा कुठेही वापरले जात नाहीत. ग्रामीण भागातील लोप पावत जाणाऱ्या शब्दांना पुनरुज्जीवन देण्याचे काम प्रा. संजय आघाव यांची कविता करताना दिसून येते. 'भरे कोवळ्या पानाची नंग्या खोडाला झुपकी' या ओळीतून निसर्गाच्या सृजनशीलतेचे खूप सुंदर वर्णन केलेले आढळते. पर्णविरहित खोडाला वळीवाच्या पावसानंतर ठिकठिकाणी कोवळ्या पानांची झुपकेदार हिरवळ बहरताना पाहायला मिळते. याठिकाणी कवीची निरीक्षणक्षमता उत्तम असल्याचे यावरून सांगता येईल. 'ये जांभळ्या मेघातून सोन सावली शिवारा' या ओळीत कवीने जांभळ्या मेघांतून येणाऱ्या सावलीला 'सोन सावली' असे म्हटले आहे. जांभळ्या मेघांतून जणू सोन्याची सावली शिवारावर पडते आणि सारं शिवार सोनेरी होऊन जातं! असे कवीने 'सोन सावली'च्या माध्यमातून सांगितले आहे. यानंतर शेवटी कवी म्हणतो, 'हे दान ज्या देवाचं त्याचा उजळ देव्हारा'... यावरून असे म्हणता येईल की, "हे जे काही दान ज्या देवासाठी दिले आहे त्या शेतकऱ्याचा, कुणब्याचा देव्हारा उजळून दे!' भरभरून दान त्याच्या पदरात पाडून त्याला जगातील सर्व सुखांचा भागीदार कर!" अशी विनवणी कवी या कवितेच्या माध्यमातून विधात्याकडे करताना दिसतो.
ग्रामीण भागातील शेतकरी सर्वतोपरी निसर्गाच्या चक्रव्यूहात सापडलेला असतो. स्वतःच्या हाती जे काही आहे तेवढे करून तो निसर्गाच्या स्वाधीन होतो. 'वळीव' कवितेच्याद्वारे कवीने शेतकऱ्यांची ध्येयवादी मानसिकता तयार केली आहे. वळविवाच्या पावसाने हर्षोल्हासित झालेल्या शेतकऱ्यांच्या मनोवस्थेचे चित्रण या कवितेत आल्याचे पाहायला मिळते. या कवितेची भाषा साधी, सोपी आणि सरळ आहे. खूर, डचांग डबकी, नंग्या खोडाला, झुपकी, सोन सावली इत्यादी ग्रामीण बोलीभाषेतील शब्दांचा योग्य जागी वापर करून कवीने कवितेचे माधुर्य वाढविले आहे. कवितेला त्यामुळेच जिवंतपणा आल्याचे म्हणता येईल! 'वळीव' ही कविता प्रा. संजय आघाव यांच्या कवितेतील वळीवाच्या पावसाचे वर्णन असणारी अस्सल ग्रामीण शब्दरचना आहे.
- केशव कुकडे (मुक्तविहारी)
क्वार्टर क्र. जुने डी-८, थर्मल कॉलनी,
परळी वैजनाथ - ४३१५२०
जि. बीड
मो.९८६०९८५९११
ईमेल : muktvihari@gmail.com
प्रतिक्रिया
छान परीक्षण
खुप छान परिक्षण
खूप सुंदर वर्णन!!
खूप छान वर्णन, मुक्तविहारी सर!!!
वळीव
प्रा. संजय आघाव यांच्या चैत्रपालवी काव्यसंग्रहातील वळीव ही कविता असुन कवी संजय आघाव यांच्या कवितेला ग्रामीण शब्दांचा बाज आहे , व केशव कुकडे
उर्फ मुक्त विहारी यांनी सुंदर शब्दात रसग्रहण केले आहे. दोघांचेही अभिनंदन .
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण