नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नमस्कार मंडळी,
****************
२]
अ.भा.शेतकरी साहित्य चळवळीद्वारा आयोजित येत्या वर्षभरातील आगामी कार्यक्रम /कवीसंमेलन / गझल मुशायरा /चर्चासत्र/ मेळावा / लेखनस्पर्धा / २ रे अ.भा.शेतकरी साहित्य संमेलन इत्यादी उपक्रमांची माहिती कळविण्यासाठी प्रतिनिधी यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
शेतकरी साहित्य चळवळीविषयी आस्था असणाऱ्यांनी, विविध उपक्रमात सहभाग नोंदवू इच्छीणाऱ्यांनी किंवा उपक्रमाला उपस्थित राहू इच्छीणाऱ्यांनी व्हाटसअॅप संदेशबॉक्स / फेसबूक संदेश बाँक्स / इमेल किंवा पोस्टाने खालीलप्रमाणे माहिती पुरवावी.
१) पूर्ण नाव
२) पोस्टाचा पत्ता
३) इमेल
४) व्हाटसअॅप नंबर
५) संपर्क नंबर
६) साहित्य परिचय
सहकार्याच्या अपेक्षेत!
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा.शेतकरी साहित्य चळवळ
फेसबूक संदेश बाँक्स : www.facebook.com/gangadharmute
इमेल : abmsss2015@gmail.com
पोस्टाचा पत्ता : मु.पो. आर्वी (छोटी)
ता. हिंगणघाट जि. वर्धा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
अभिनंदन मुटेसर.
अभिनंदन मुटेसर.
पहिले अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलन, अतिशय जोमात, थाटामाटात, अगदी सहजपणे तसेच तितक्याच सुबकतेने व व्यवस्थितपणे पार पडले. ह्या सगळ्याचे श्रेय तुम्हांला आणि तुमच्या निस्सिम कार्यकर्त्यांना तसेच शेतकरी संघटनेला जाते. तुम्हां सर्वांच्या अथक कष्टाचे हे फळ आहे.
माझ्या सारख्या शहरातील माणसाला आज ह्या संमेलनामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांचे कष्ट, त्यांचे विविध प्रश्न, समस्या, सरकारची चुकीची धोरणे, शेतकऱ्यांबद्दल एकंदरीच चालले राजकारण, निसर्गाचा कोप, शेतकऱ्यांच्या रोज रोज होणाऱ्या आत्महत्या, शेती मालाला न मिळणारा बाजार भाव, शहरी माणसांची शेतकरी वर्गा कडे बघण्याची मानसिकता, इत्यादी गोष्टींची जाणीव प्रकर्षाने झाली. माझ्या परीने त्यावर उपाय शोधण्याची एक जबाबदारी आपसूकच पडल्यासारखे वाटले. हेच ह्या संमेलनाचे फलित आहे.
ह्या संमेलनातून तुम्ही जो सारस्वतांचा एल्गार करण्याचा निर्धार केला आहे तो अगदी वाखाणण्या जोगा आहे. लेखणीला नांगराच्या फाळाला जुंपण्याची तुमची कल्पनाच ह्या एल्गाराची दिशा दर्शवते आहे. मला खात्री आहे की तुमचा हा संकल्प निश्चितच यशस्वी होईल.
मला ह्या संमेलनामध्ये तुम्हीं आमंत्रित करून कवी संमेलनात जो सन्मान दिलात त्याबद्दल मी आपला ऋणी आहे.
सर अभिनंदन व पुढील कार्यास माझ्या शुभेछ्या.
रविंद्र कामठे, पुणे.
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
धन्यवाद कामठे सर
धन्यवाद कामठे सर.
यापुढेही आपले असेच सक्रिय सहकार्य लाभेल, अशी आशा बाळगतो.
शेतकरी तितुका एक एक!
पहिले अखिल भारतीय शेतकरी
पहिले अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलन सुसुत्रपणे पार पडले. मी अनुभवलेले पहीलेच संमेलन! माझ्या कविता वाचनाची सुरुवात याच संमेलनात झाली.
मी स्वतः जरी शेतकरी नसले तरी आजोळ शेतकर्याचेच आहे. सुट्टीच्या दिवसात त्यांचे जीवन जवळून अनुभवायला मिळाले. तरी ही विदर्भ आणि सांगली यातल्या शेतकर्यांच्या जीवनात बरीच तफावत आढळेल.
संमेलनानंतर डोक्यात तेच विचार सुरु आहेत.
शेतीमालाला चांगला भाव मिळावा, शेतकर्याच्या कष्टाचा मेहनताना त्याच्या पदरात नक्कीच पडायला हवा.
पण आम्ही घेतो ती भाजी अतिशय महाग असली तरी त्यातला मोठा हिस्सा मधल्या दलालांचा खिशात जातो हे जाणवून महाग भाजीपाला घेतांना नाके मुरडली जातात. शेतकर्याच्या मळ्यातला भाजीपाला / धान्य डायरेक्ट आमच्यापर्यंत पोहोचेल असे काही करता येईल का ते पहावे.
आ. मुटेसर आणि त्यांचा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या संमेलनासाठी अविरत मेहनत घेतली. त्यामुळे हा सोहळा अतिशय शिस्तबध्द व सुसुत्रपणे पार पडला. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!! पुढच्या संमेलनाची वाट पहात आहे.
धन्यवाद विनिताजी
धन्यवाद विनिताजी.
यापुढेही आपले असेच सक्रिय सहकार्य लाभेल, अशी आशा बाळगतो.
शेतकरी तितुका एक एक!
अभिनंदन आणि पुढे ...
पहिले प्रथम या अत्यंत यशस्वी साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल आपले अभिनंदन ! प्रत्येक सत्र दर्जेदार काहीतरी देण्याचा प्रयत्न करणारे होतेच पण त्याबरोबर सहभागी प्रतिनिधींचा गुणात्मक सहभाग लक्षणीय होता... म्हणजे बहुतेक सत्रातील उपस्थिती ९० टक्क्यापेक्षा जास्तच होती आणि लोक मन लावून ऐकायचा प्रयत्न करत होते...! या गुणात्मक यशाचे श्रेय गंगाधर मुटे यांचे आहे, आपण मोकळेपणाने त्यांचे कौतुक केलेच पाहिजे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे विस्कळीत असलेल्या लेखकांना संघटीत करणारे एक हक्काचे व्यासपीठ मिळाले हेही आवर्जून नोंदवले पाहिजे. तथापि या चर्चेचा उद्देश पाहता मी काही नेमके मुद्दे मांडू इच्छितो....
१) शेतकरी चळवळीचे प्रतिबिंब साहित्यात पडत नाही हे ऐकणे म्हणजे माझ्यासाठी इतके दिवस तोंड धरून बुक्क्याचा मार असेच राहिले होते.... मी १९९८ सालीच.... चाहूल वादळाची...(अप्रकाशित) हे माझे पहिले नाटक लिहिले ज्याची संपूर्ण प्रेरणा शेतकरी चळवळ हीच होती... त्या संहितेला महाराष्ट्र कामगार साहित्य संमेलनात लेखनाचे प्रथम पारितोषिकही मिळाले. आणि त्यांच्या नाट्य महोत्सवात ते ललित कलाभुवन औरंगाबाद येथे सादरही झाले... तेव्हा मी औरंगाबादच्या हेमंत देशमुख, मानवेंद्र काचोळे आदी ज्येष्ठ संबंधितांच्या चांगला संपर्कात होतो, परंतु कैलास तवार वगळता कोणी तिथे पाहायला आले नाही किंवा नंतरही उत्सुकता दाखवली नाही... त्यानंतर माझ्या .... यशवंता (अप्रकाशित)... या नाटकात सुद्धा तिसऱ्या अंकात चाकणच्या भामा ... कंपनीच्या प्रयोगाचे प्रतिबिंब आहे... त्याच्याही प्रयोगाला कोणी पहायची उत्सुकता दाखवली नाही... किंवा गेल्या वर्षी मी लिहिलेली ...तुला कसला नवरा हवा...(अप्रकाशित) ही एकांकिकाही संपूर्णपणे शेतकरी जीवन आणि त्याच्या तत्वज्ञानाचे संदर्भ अधोरेखित करते... त्या लिखाणाला पुण्याच्या स्वप्न संस्थेचे... जयवंत दळवी लेखन पुरस्कार मिळाला... ती संस्था त्याचे प्रयोग त्यांच्या महोत्सवात करणार आहे.... परंतु जिथून आरोप होतो ते व्यासपीठ त्याची दखल मात्र घेत नाही... माझे ... आता उजाडेल (अप्रकाशित)... हे नाटक जरी कामगार जीवनावर असले तरी त्याची प्रेरणा शरद जोशी यांनी केलेल्या मुक्त अर्थ व्यवस्थेचे समर्थन हेच आहे... औरंगाबादचे ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी त्र्यंबक महाजन यांनी अनेक व्यासपीठावर त्याची आवर्जून दखल घेतली... पण आपल्या चळवळीने उपेक्षा केली.... तर असल्या प्रयत्नांची वाटचाल कशी व्हावी.... नवोदित लेखकाला प्रकाशक शोधणे अवघड असते... मिळाला तर तुमचा खर्च तुम्ही करा हेच सुचवतात.... नाटक लिहिले म्हणून प्रयोगही लेखकाने करायचा हे अनेकदा लेखकाच्या आवाक्याबाहेर असते... मला हे सविस्तर मांडावे वाटले ते निव्वळ टीका म्हणून नव्हे... तर या कोंडीवर मार्ग निघणेही गरजेचे आहे हे लक्षात घेतले जावे म्हणून. आताही लेखन स्पर्धा झाली... पण त्यातील विजेते साहित्य कुठे प्रकाशितच झाले नाही तर दुसर्यांदा लेखकांचा उत्साह ओसरतो... केवळ विजेते घोषित केले जाणे आणि मोमेंटो मिळणे इथेच ही प्रक्रिया थांबणे योग्य नाही... संबंधिताना प्रकाशन सहाय्य मिळाले तरच त्याला काही मार्ग सापडेल..! स्मरणिकेत काही साहित्य प्रकाशित झाले काही नाही... याचेही सुसंगत आकलन झाले नाही... विजेत्यांना स्थान नसेल तर दुसर्यांदा त्यांना सहभागी होण्याची उत्सुकता काय राहणार ?
२) मी या संमेलनात ... उगवला नारायण ... ही लघुनाटिका सादर करण्याचा प्रयत्न केला... त्याला दादही मिळाली... पण ... मुळात नाटक सादर करण्यासाठी रंगमंचच दोन तास उशिरा ताब्यात मिळाला... संयोजकांनी फोनवर आवश्यक ते तांत्रिक सहाय्य करण्याचे कबूल केले होते ... त्यावर विसंबून आम्ही फक्त कलाकार घेऊन तिथे आलो... बाकी साहित्य औरंगाबाद येथून आणणे व्यवहार्य नव्हते... पण ऐनवेळी आम्हाला योग्य क्षमतेचे माईक मिळण्यापासून सर्वच बाबतीत पुरेशी तांत्रिक उपलब्धी मिळाली नाही. माईक अत्यंत कमजोर असल्याने कलाकारांना आपल्या हालचाली आणि अभिनय सोडून केवळ माईकजवळ उभे राहून संवाद म्हणावे लागले... साहजिकच त्यांना ऐनवेळी बावचळून गेल्यासारखे झाले... पडदा उपलब्ध नव्हता... स्त्री कलाकारांना वेशभूषा करायला जागाच नव्हती... उघड्या खिडक्यांना कसेबसे पडदे लावून त्यांनी वेशभूषा उरकली ... स्पॉट लाईट उपलब्ध झालेच नाहीत... आणि नाटक नियोजित वेळेवर सुरु न झाल्याने बहुतेक मित्रांनी तिथून निघून जाऊन झोपणे पसंत केले... नाटकाचा फोटो प्रकाशित झाला असला तरी त्याच्यातील मांडणीची एका अक्षराची दखल माध्यमांनी घेतली नाही... मुळात नाटक प्रकार सादर करण्यासाठी काही किमान तयारी करावी लागते... याचे भान संयोजकांनी ठेवायला हवे होते. फक्त पाच दहा मिनिटात करा सुरु प्रयोग ... असे सांगितले जाणे ... तितकेसे योग्य नाही... तेवढा वेळ तर आधी मांडलेले साहित्य हटवण्यातच संपून जातो..! हे सगळे इतके सविस्तर सांगायचा उद्देश पुढील संमेलनात याबद्दल पुरेसा आधी विचार व्हावा इतकाच आहे...! ऐनवेळी दोषारोप करून काहीही साध्य होत नाही.
3) सम्मेलनातील परिसंवाद खूप दर्जेदार होते पण पण त्यांचे थोडेसे कुटुंबनियोजन व्हावे असे सुचवावेसे वाटते... कारण त्यांचे वेळापत्रक बिघडले की अनेक नवीन अडचणी उभ्या राहतात... त्यात जेवणाची वेळ लांबणे तर होतेच... पण समारोप सत्र इतक्या उशिरा सुरु झाले कि ज्यांचे परतीचे बुकिंग होते त्यांना ते सगळे सोडून रेल्वे/बस कडे धाव घ्यावी लागली... साहजिकच संमेलनाचा उत्कर्षबिंदू म्हणजे पारितोषिक वितरण याचा लाभ अनेक विजेत्यांना घेताच आला नाही... दोन्ही दिवसात एकेक परिसंवाद कमी असता तर वेळापत्रक कोलमडले नसते... याचा विचार पुढील नियोजनात अवश्य व्हावा...!
४) कविसंमेलन खूप सुंदर झाले पण खूप लांबलेही ... ऐनवेळी संधी देणे एकदा सुरु झाले कि नंतर त्याचे शेपूट लांबतच जाते.... त्याबाबतही पूर्वनियोजित कविंनाच सहभाग देणे ... याबाबत विचार करता येईल.
5) निवास व्यवस्था अत्यंत सुंदर होती, पण आंघोळीला ज्यांना गरम पाणी हवे असते.. अशा वृद्ध/आजारी/महिला प्रतिनिधींना सकाळी गेस्ट हाऊसला जाऊन नंबर लावावे लागले... आणि साहजिकच पहिल्या सत्रांना मुकावे लागले... ही फार मोठी त्रुटी नव्हे... पण या नंतरच्या आयोजनात विचारात घ्यावी असे वाटते.
या त्रुटी नोंदवल्या म्हणजे सगळे चित्र नकारात्मक आहे असे आजिबातच नाही... किंबहुना उर्वरित ९९ टक्के भाग हा संमेलनाच्या यशोगाथेचा आहे. गंगाधर मुटे यांनी चार/सहा महिने आधीपासून जी प्रचंड मेहनत घेतली आणि एकहाती हे संमेलन यशस्वी केले ते अचंबित करणारे आहे. शेकडो प्रतिनिधी, स्पर्धक, पाहुणे यांच्याशी सतत संपर्कात राहणे, त्यांच्या अगदी वैयक्तिक पातळीवरच्या अडचणी सोडवणे ... त्यांची जराही गैरसोय होताना दिसली कि धावून येणे... पुन्हा व्यासपीठावर एका पाठोपाठ येणाऱ्या सत्रांचा डोलारा सांभाळणे ... हे या अवलियाला कसे जमते कुणास ठाऊक..? अल्लाउद्दिनच्या दिव्याचा राक्षस तरी थकत असेल पण गंगाधरजीचा उत्साह जराही कमी होत नव्हता...
वक्त्यांनी क्वचित जरा भाषणे लांबवली पण कुठलेही सत्र रटाळ होऊ नये अशी मांडणी करण्याचे श्रम मुटे साहेबांनी घेतले हे आवर्जून नोंद्वावेच लागेल...
पहिलेच संमेलन इतके देखणे झाल्यावर पुन्हा व्हावे असे वाटणे साहजिकच आहे... त्याला वार्षिक असे स्वरूप येणे जास्त इष्ट राहील... तीन किंवा सहा महिन्यांनी घेणे जरा अति होईल... पण यातला मुशायरा आणि कविसंमेलन त्रैमासिक घेण्यास हरकत नाही.
विजेते साहित्य स्मरणिकेत आवर्जून प्रकाशित केले जावे.
विजेत्यांना मोमेंटोसोबत एक प्रमाणपत्र दिले जाणे इष्ट राहील..!
संमेलनाने अप्रकाशित लेखन साहित्याचा एक डेटाबेस तयार करावा... प्रकाशनयोग्य साहित्याला प्रकाशक मिळण्यास मार्गदर्शन करावे अशीही अपेक्षा आहे.
संमेलन मंगल कार्यालयाऐवजी नाट्यगृहात आयोजित करता आले तर आधी चांगले होईल.
निवास व्यवस्था आणि संमेलनस्थळ यात जास्त अंतर नसावे.
या सूचना बरोबरच पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद देऊन मी माझे मनोगत संपवतो..!
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra
विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार!
मुद्दा १ : जोरदार समर्थन
मुद्दा २ : मान्य आणि सहमत
मुद्दा ३ : वक्त्यांनी वेळेचे बंधन पाळावे असे यावेळेस कसोशीने प्रयत्न झालेत त्यात बर्यापैकी यश आलेही पण खरा विचका काही परिसंवादात सुत्रसंचालकांनी केला. त्यांना सुचना असूनही त्यांना मोह आवरता आला नाही आणि त्यांनीच थोडा जास्त वेळ घेतला.
अनेकदा वक्त्यापेक्षा सुत्रसंचालक जास्त बोलत असतो, शिवाय वक्ता काय म्हणाला हे सुद्धा समोरच्या श्रोत्यांना समजावून सांगत असतो. मात्र सुदैवाने सुत्रसंचालकांनी तशी वेळ आणली नाही, मात्र गरजेपेक्षा जास्त वेळ घेतल्याने थोडे वेळेपत्रक बिघडले.
भविष्यात याविषयी अधिक काटेकोरपणे अंमल केला जाईल.
मुद्दा ४ : यानंतर कवीसंमेलनात पूर्वनियोजित कवींनाच संधी दिली जाईल.
मुद्दा ५ : निवास आणि प्रसाधनाच्या व्यवस्था अधिक चांगल्या देण्याचा प्रयत्न अवश्य केला जाईल. पण उपस्थितीचा नीट अंदाज घेणे तसे फ़ार जिकिरीचे काम असते. अंदाजापेक्षा जास्त उपस्थिती असली तर व्यवस्था कोलमडण्याची भिती असतेच.
मात्र यावर्षी पुरेसा अवधी असल्याने योग्य ते बदल व उपाययोजना करण्यास संधी आहे.
मुद्दा ६ : विजेते साहित्य स्मरणिकेत घेण्याचा मुद्दा आर्थिक आहे. सर्व साहित्य घ्यायचे म्हटले तर स्मरणिकेचा आकार वाढत जातो. मुद्रणखर्च बराच आणि आवाक्याबाहेरही असू शकतो. त्यावर आर्थिक बाजू अधिक सक्षम होणे हाच पर्याय आहे आणि या पर्यायावर मात करणे इतके सोपे नाही, हे यावर्षी बर्यापैकी करून चुकले आहे. (अजूनही १ लाख ६० हजार रुपयाची वसुली येणे बाकी आहे. माझ्या सारख्या जेमतेम आर्थिक स्थिती असलेल्या कार्यकर्त्यासाठी ही बाब बरीच गोत्यात आणणारी आहे.)
मुद्दा ७ : विजेत्यांना मोमेंटोसोबत एक प्रमाणपत्र हा मुद्दा शतप्रतिशत मान्य.
विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार! आणि कौतुकाबद्दल सुद्धा
शेतकरी तितुका एक एक!
संमेलन वार्षिक असावे
नमस्कार सर,
संमेलन वार्षिक असावे असे मला वाटते. वर्षभर विविध उपक्रम राबविता येतील.
१. निसर्गाच्या अवकृपेने व्यथित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक व इतर प्रकारची मदत
२.कवी संमेलन
३. शेतकऱ्यांवरील कवितांचा सामूहिक काव्यसंग्रह
इत्यादी
धन्यवाद...!!
-विश्वजित गुडधे
धन्यवाद
विश्वा,
१) शेतकर्यांचे आभाळ इतके फाटले आहे की, त्याला साक्षात ब्रम्हदेव सुद्धा मदत करू शकणार नाही. त्यापेक्षा त्याला त्याच्या घामाचे दाम मिळणे हेच महत्वाचे आहे. शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून हा विचार अधिक प्रभावीपणे मांडता आला तर शेतकर्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे फारसे अवघड नाही.
२) मान्य.
३) शेतकऱ्यांवरील कवितांचा सामूहिक काव्यसंग्रह ही चांगली कल्पना आहे. या वर्षी हा उपक्रम राबवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. या कामी नवनाथ पवार सरांची मदत मोलाची ठरू शकते.
धन्यवाद...!!
शेतकरी तितुका एक एक!
संमेलन खुप छान झाले
सर संमेलन खुप छान झाले....
साहित्य संमेलन वर्षातुन एकदा ....
व दर तिन महिन्यांनी
परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा
आलटुन पालटुन घ्यावे.
- श्रीकांत धोटे
सहमत
सहमत आणि धन्यवाद!
शेतकरी तितुका एक एक!
संकल्पनाच मनाला भावली.
अभिनंदन...मुटे सर..!
अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाची मुळ संकल्पनाच मनाला भावली.
अखिल भारतीय शेतकरीसाहित्य चळवळीचे आपण प्रणेतेच आहात,असे संबोधने चूक ठरणार नाही.
एकंदरीत सर्व संमेलनाचे आयोजन उत्कृष्ठ ठरले.
मतः-
१) खर्च,वेळ,सहकार्याच्या दुष्टीने असे संमेलन वार्षीक करायला हरकत नाही.
२) चळवळ जिवंत रहावी म्हणून एखादं पाक्षिक,मासीक शेतकरी साहित्य पत्रीका काढण्याचा विचार करावा.
३) पुढील संमेलनात किमान ५०% शेतकरी बांधवांचा सहभाग असावा.
४) संमेलनापुर्वी शहरातून बैलगाडी पथसंचालन,कार्यकर्ता संचलन,शेतकरी परीधानातील कलावंत,रोड शो..सारखे उपक्रम राबवावेत.ज्यामुळे स्थानीक लोकांना उपक्रमाची माहीती होईल.
५) खास शेतकरी बांधवांकरीता नव कवीसंमेलन तैमासीक घेण्यात यावं. किंवा कार्यशाळा घ्याव्यात की जेनेकरुन बांधवांना लिहण्याची गोडी निर्मान होईल,आणी शेतकरी साहित्यीक घडतील.
अभावः- शहरातील स्थानीक लोकांचा अभाव जानवला.
- कार्यकर्त्यांचं सख्याबळ कमी जानवलं.
- -स्वागत,सत्कार,निवेदन,किंवा मचावर वावरणारे सुजान असावेत.
धन्यवाद ..!
!! रवी धारणे !!
--------------------------------------------
सहमत
धारणे साहेब, धन्यवाद
१) सहमत
२) चळवळ जिवंत रहावी म्हणून एखादं पाक्षिक,मासीक शेतकरी साहित्य पत्रीका काढण्याचा विचार करता येईल पण ही आर्थिक बाजू कशी भरून काढावी, हा मोठा प्रश्न आहे.
३) पुढील संमेलनात किमान ५०% शेतकरी बांधवांचा सहभाग असावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील.
४) स्थानीक लोकांना उपक्रमाची माहीती होण्यासाठी संमेलनापुर्वी शहरातून बैलगाडी पथसंचालन,कार्यकर्ता संचलन,शेतकरी परीधानातील कलावंत,रोड शो..सारखे उपक्रम राबवावेत, ही चांगली कल्पना आहे.
५) खास शेतकरी बांधवांकरीता नवकवीसंमेलन किंवा कार्यशाळा त्रैमासीक घ्याव्यात ही कल्पना चांगली आहे मात्र त्यासाठी वेगवेगळ्या भागात आयोजनात मदत मिळायला हवी. बघुयात.
अन्य सुचनांची सुद्धा नोंद घेतली आहे.
धन्यवाद ..!
शेतकरी तितुका एक एक!
सामाजिक जाणिवा जपणे महत्वाचे
शेतकरी साहित्य संमेलनातील माझा अल्प सहभाग हा योगायोगाचा भाग नव्हता. मी एका मोठ्या सामाजिक कार्याचा या निमित्ताने भाग झालो याचा मला मनस्वी आनन्द आहे. यातून किंवा यापुढील माझ्या सहभागातुन मला माझ्या नावाची चिंता नव्हती व नसेल. मला जगरहाटी पासून अलिप्त राहणेच आवडते. परन्तु या मंचाचा उपयोग चढवणे किंवा उतरवणे यापेक्षा सामाजिक जाणिवा जपणे राहणार तर यापुढे ही मी माझ्या खिशाचा कसलाही विचार न करता सहभागी होत राहीन. प्रश्न माझ्या अस्मितेचा नाही आणि नसेलही मात्र बलीचा माझ्या कंठातील आवाज एखाद्या व्यासपीठा वरून व्यक्त करता आलाच तर मला धन्यता वाटेल!
धन्यवाद
तुमचा वाटा सिंहाचा
राजसर,
या संमेलनात तुमचा सिंहाचा वाटा होता. यापुढेही आपले वेळोवेळी सहकार्य लाभत राहीलच, याची मला खात्री आहे.
शेतकरी तितुका एक एक!
महाराष्ट्राच्या सर्व भागात व्हावे
आदरणीय गंगाधरजी,
आपण वर्धा येथे घेतलेल्या संमेलनाची सर कुठल्याच संमेलनाला येणार नाही.
आपण जातीने लक्ष घालून व आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली जीवापाड मेहनत पाहून गजल नवाज भिमारावानाही मोह आवरला नाही कि या पूर्वी मला हे का सुचल नाही. असो तुम्ही भीमराव सारखे होवू शकत नाही व भीमराव तुमच्या सारखे होवू शकत नाही, हीच तर खासियत आहे.
त्रुटी म्हणाल तर शोधून सापडण्यासारखी नाही. राहिला प्रश्न पुढच संमेलन कुठ घ्याव तर सुरवात विदर्भात जोरदार झाली. महाराष्ट्राच्या सर्व भागात दर ३ वर्षांनी व्हावे अस माझ वैयक्तिक मत आहे. उदा.पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महराष्ट्र, मराठवाडा, कोकण,[शक्यतोवर जिल्ह्यापासून जवळ असलेला ग्रामीण भागात व्हाव म्हणजे खर्या अर्थाने शेतकरी साहित्य संमेलन होईल अस माझ वैयक्तिक मत आहे] वर्षभर कोण कोणते कार्यक्रम घ्यावे याच अधिक ज्ञान आमच्यापेक्षा तुम्हाला आहे किवा तुमच्यापेक्षा एखाद्या ज्येष्ठ माणसाचा सल्ला योग्य ठरेल.
फक्त एक सल्ला वजा सूचना बरेचसे शेतकरी साहित्यावर लिहिणारे भाष्य, कविता करणारे साहित्यिक अनवधानाने राहून गेले उदा.शिवाजी जवरे, भुसावळ रवींद्र महल्ले,अकोला अजून जे काही असतील त्यांना पुढच्या वेळेपासून आवर्जून बोलवावे हि विनंती.
बाकी काय मत मांडू तुमच्या अनुभव दांडगा आहे आमची कधीही,कुठेही,कशाच्याही बाबतीत,मदत लागली तर जरूर हाक मारा या शेतकरी भावांसाठी आम्ही शेतकरी भाऊ तय्यार राहू!
विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार!
पाटील सर,
विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार!
- महाराष्ट्राच्या सर्व भागात दर ३/४/५ वर्षांनी व्हावे, असा प्रयत्न अवश्य करू.
- शक्यतोवर जिल्ह्यापासून जवळ असलेल्या ग्रामीण भागात व्हावे : मान्य व सहमत
- शेतकरी साहित्यावर लिहिणारे, भाष्य करणारे साहित्यिक अनवधानाने राहून गेले हे खरे आहे. पण पहिल्या संमेलनात ज्यांनी स्वतःहून सहभागाची तयारी दाखवली त्यांनाच निमंत्रीत करण्यात आले होते. शेतकरी साहित्य चळवळ ही एखाद्या चळवळी सारखी चालावी असे मला वाटते. या कार्यात ज्यांना योगदान द्यावेसे वाटते त्यांनी स्वतःहून कार्याला वाहून घेतले पाहिजे. या प्रवाहात तुरळक अपवाद वगळता निमंत्रित/आमंत्रित वगैरे प्रकार नसावा, असेही वाटते.
"मला स्टेजवर संधी असेल तरच मी संमेलनाला येणार"
"श्रोता म्हणून ऐकायला किंवा उपस्थिती द्यायला अजिबात येणार नाही"
असा प्रकारच असू नये किंवा आपणच अशा स्वभावाच्या सर्व कवी/गझलकार/वक्ते यांच्यापासून ही चळवळ दूर ठेवावी, असेही वाटत आहे.
कारण कोणतेही संमेलन वक्त्यामुळे नव्हे तर प्रेक्षक/श्रोता/रसिक यांच्यामुळेच यशस्वी होत असते.
मी पहिल्या संमेलनाच्या वेळी परिसंदात भाग घ्यावा म्हणून एका साहित्यिकाशी संपर्क केला असता ते म्हणाले होते की "मला उद्घाटक म्हणून बोलावणार असाल, तर मी तुमच्या निमंत्रणाचा विचार करेन" मी त्यांचे नाव "काळ्या यादीत" घातले. भविष्यात त्यांना कधिही बोलावायचे नाही, असे ठरवले.
पाटील साहेब, आपण आपल्या परिचयातील शेतीसाहित्यिकांना, भाष्यकारांना आपल्या या साहित्य चळवळीचा परिचय द्यावा. त्यांना या कार्यात स्वेच्छेने रुची आहे, असे तुम्हास वाटले तर मला त्यांचा संपर्क नंबर द्या. मी त्यांचेशी अवश्य संपर्क करेन.
शेतकरी तितुका एक एक!
अभिनंदन
शेतकरी हा देशाचा कणा असून उपेक्षित,दूर्लक्षित पणाचा भाग बनला. साहित्याचे मेळे अमेरिका, घुमानला भरले. आम्ही चाललो, आलो चे गजर फेसबुक, वँट्सअप वर गरजले.
कणा मात्र गारपीटीने, भूसंपादनाच्या भीतीने हादरला ना त्याचे कोणाला सोयल सूतक.
गंगाधरराव खेड्याकडे हाक देणार्या महात्म्याच्या पावन भूमीत ,वर्ध्यात शेतकरी चितंनावर साहित्य संमेलन शासनाच्या मदतीविना यशस्वीपणे पार पाडता.
आपले मनापासून अभिनंदन.
धन्यवाद
धन्यवाद राऊत सर!
शेतकरी तितुका एक एक!
डॉ विशाल इंगोले
पाहिलेच आयोजन इतके सुंदर आणि नियोजन बध्द होते
दुसर्या संमेलनाची मनातून वाट बघतोय
दरवर्षी एक शेतकरी साहित्य संमेलन, दर तिन किंवा सहा महिन्याला कवी संबेलन आणि मुश्यायरा, आणि सोबत 'शेतकरी जागरण आणि प्रबोधन'यावर चर्च्या सत्र, व्याख्यान आयोजित करावे.
- Ingole Vishal Dr: डॉ विशाल इंगोले
धन्यवाद
धन्यवाद डॉ विशाल इंगोले साहेब.
आपल्या सुचनांची नोंद घेतली.
शेतकरी तितुका एक एक!
हार्दिक शुभेच्छा!
नमस्कार गंगाधरजी,
पहिले अ. भा. शेतकरी साहित्य संमेलन अतिशय यशस्वी झाले. मला वाटते साहित्य संमेलन वर्षातून एकदा घेतले जावे. परंतु मधल्या काळात स्वतन्त्र प्रंसोगोचित कार्यक्रम घेतले जावेत. यात व्याख्याने, छोटेखानी कविसंमेलन, मुशायरा, गायन, शेती मार्गदर्शन, प्रदर्शन, स्नेहसंमेलन, क्षेत्र भेटी ई. जेणेकरुन खर्चास फाटा देता येवू शकेल आणि माणसे विचारांनी जोडली जावू शकतील. यासाठी पेलवतील एवढ्या कार्यक्रमाची वर्षभराची रूपरेखा अ. भा. शेतकरी साहित्य संमेलनातच जाहिर केली जावी. इतर शक्यताही तपासून पाहिल्या जाव्यात.
मला 100 कि.मी. परिसरातील कार्यक्रमास उपस्थित राहणे आवडेल. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा!
आपला,
राज पठाण
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद पठाण सर,
आपल्या सुचनांची नोंद घेतली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
तरुण शेतकऱ्यांचा सहभाग
नमष्कार मुटेसर,
मी पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनास उपस्थित होतो. संमेलनाचे आयोजन नियोजन छान होते. मला संमेलन मनापासुन आवडले. आपल्या संमेलनास माझे पुर्णतः सहकार्य आहे......
सुचना :- संमेलन हे शेतकऱ्यांचे आहे शेतकरी साहित्याचे आहे म्हणुन त्यात शेतकऱ्यांचा व विशेषतः तरुण शेतकऱ्यांचा सहभाग जास्तित जास्त कसा वाढवता येईल या बाबत आपण प्रयत्न करु.
धन्यवाद
धन्यवाद श्रीकांतजी,
आपल्या सुचनांची नोंद घेतली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
या वर्षी पण ऑनलाईन स्पर्धा
या वर्षी पण ऑनलाईन स्पर्धा घ्या.
तसेच विजेत्या कथा, गझल कविता यांचे एखादे पुस्तक काढता येईल तर बघावे.
धन्यवाद विनिताजी
धन्यवाद विनिताजी,
आपल्या सुचनांची नोंद घेतली आहे.
विजेत्या कथा, गझल, कविता यांचे एखादे पुस्तक काढता येईल पण त्यासाठी सहभागी व्यक्तीकडून सामुहिक निधी घेण्याशिवाय सध्यातरी अन्य पर्याय दिसत नाही आणि अशा प्रकाराला कितपत यश येऊ शकते, याचीही पडताळणी करावी लागेल.
मात्र ऑनलाईन स्पर्धा नक्की घेतली जाईल. अशा तर्हेच्या दोन स्पर्धा घ्याव्यात असाही प्रयत्न आहे.
शेतकरी तितुका एक एक!
नमस्कार सर, पिंपरी चिंचवडमधे
नमस्कार सर,
पिंपरी चिंचवडमधे मासिक किंवा तिमाही कवीसंमेलन सुरु व्हावे म्हणून प्रयत्न करीत आहे. जमून येईल असे वाटते आहे.
घडामोडी कळवीत राहीन.
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण