ऊठ ऊठ शेतकरी बाळा
ऊठ ऊठ शेतकरी बाळा, तोड रे पैंजणचाळा
भूमातेची साद तुला, रानगंध लेवी भाळा
उचलुनी देख फ़णा, मना... शोध रे कारणा ...!
ताई-दादा राबताती, पिकताती माणिकमोती
जसं कैवल्याचं लेणं, ओंब्या-कणसं झुलताती
तुझा बाप घाम गाळी, फुलोरते धरणी काळी
कोण करी सदावर्ते? चिंध्या का रे त्याच्या भाळी?
शोध हा तू न्यायपणा, मना... शोध रे कारणा ...!
तुझा बाप सांब भोळा, कष्टकरी मराठमोळा
घामदाम गिळण्यासाठी, घारी-गिद्ध होती गोळा
दूध-दही कोण प्याले? तुझ्या ताटी ताक आले
चातुर्याला हिरेमोती, श्रम मातीमोल झाले
ठेवुनिया ताठ कणा, मना... शोध रे कारणा ...!
आई करी शेण-गोठी, भात गहू भरती कोठी
दुरडीला सांजी नाही, झोपी जाते अर्धापोटी
भुईवरी घाम सांडी, कापुसबोंड कांडोकांडी
मलमली कोण ल्याले? तिची उघडीच मांडी
समजुनी घे धोरणा, मना... शोध रे कारणा .....!
कोण कसे बुडवीत गेले? हक्क कसे तुडवीत नेले?
स्वामी असुनिया का रे, पराधीन जिणे आले?
अंग कसे खंगत गेले? स्वप्न कसे भंगत गेले?
पोशिंदा तो जगताचा, कोणी कसे रंक केले?
काळी आई का बंधना? अभय.... शोध रे कारणा ...!
- गंगाधर मुटे 'अभय'
-------------------------------------------
ढोबळमानाने शब्दार्थ-
ओंब्या-कणसं = गव्हाची ओंबी,ज्वारीचे कणीस
दुरडी = भाकरी ठेवायची बांबुपासून बनविलेली टोपली
सांजी = समृद्धी = बरकत (किंवा शीग = धान्याचे
माप भरून त्यावर येणारी निमुळती रास)
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित - दि. १०.११.२०१०)
....................................................................
प्रतिक्रिया
फेसबूक लिंक
फेसबूक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2119156614775682
शेतकरी तितुका एक एक!
पाने