नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गझल -- दुःख मातीतले...!
चार ओळी उन्हा,पावसावर लिहू.
करपलेल्या पिका,वावरावर लिहू.
*
ऊस,कांदा,गव्हाने बळी घेतले.
चल विदर्भातल्या कापसावर लिहू.
*
पुस्तके छापण्याचे दिवस संपले ,
ही गझल काळजा काळजावर लिहू.
*
रक्त शाई करू,आतड्याची कलम,
काळजाच्या रित्या कागदावर लिहू.
*
आपल्या झोपडीच्या भुकेची कथा.
भाकरीच्या शिळ्या पोपड्यावर लिहू.
*
कल्पनेचा अता सोड पिच्छा गड्या,
वास्तवाच्या खऱ्या विस्तवावर लिहू.
एक शेतीतला...एक 'एसी'तला,
नेमके कोणत्या माणसावर लिहू ?
*
भिक मतांची भिकाऱ्यास मागू नये.
सूचना स्पष्ट अपुल्या घरावर लिहू.
*
फास घेऊ नका फक्त थांबा जरा,
दुःख मातीतले त्या नभावर लिहू.
*
By---गोपाल तुळशिराम मापारी,
अकोला !
(मो.नं.--9423484829)
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
गोपाला गोपाला
देवकी नन्दन गोपाला!!
सलाम!!
धन्यवाद
पाने