अवघ्या जगाचा अन्नदाता
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील जवळ जवळ ८०% लोक शेती करतात. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. तो जगाचा पोशिंदा आहे. याच शेतकऱ्याला आज शेतकऱ्यांचा राजा बळीराजा म्हणून संबोधले जाते. आपल्या मातृभूमीसाठी अन्नधान्य मिळविणारा, धरतीला सुजलाम् सुफलाम् बनविणारा शेतकरी रात्रंदिवस शेतात राबत असतो. शेतकऱ्याला कष्टासोबतच उन, वारा, पाऊस, थंडी तसेच ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बेमोसमी पाऊस अशा अनेक संकटांशी सामना करावा लागे. सारं सहन करून शेतकरी मेहनत करत असतो. त्याच्या मेहनतीमुळेच आपणांस अन्न मिळते. जगातील इतर नोकरी, उद्योग करणारे लोक उदरनिर्वाहसाठी या शेतकऱ्यावरच अवलंबून असतात.
बळीराजाचं जिणं कोणालाच दिसत नाही. दिवसभर राब राब राबून आयुष्यभर शेतात घाम गाळतो. स्वतःच्या पदरी काहीही नसताना तो कर्ज काढून काळ्या मातीत उद्याचं पिवळं स्वप्न पेरतो. बियाणं मातीत पेरताना त्या सोबत तो स्वतःचा जीवही पेरतो. आपल्या कष्टाचं चीज होईल ह्या हिशोबानं तो झोपी जातो. अनेक भाव मनात ठेवून तो स्वप्नाच्या अधीन होतो. कालांतराने बियाण्याला कोंब फुटून पीक कसं बसं वरती येऊ लागतं. पीक यथावकास बाळसं धरू लागतं.
दिवसामागून दिवस सरतात अन् हळूहळू वाऱ्यासंग पीक डोलू लागतं. तेव्हा ते पीक पाहून बळीराजाचं मन सुखावून फुलू लागतं. त्याचा आनंद गगणात मावेनासा होतो. समाधानाने त्याचं मन त्या पिकाप्रमाणेच तरंगू लागतं. परंतु बळीराजाचा हा आनंद या निसर्गराजाला पाहवत नाही. अवेळी आलेल्या पावसानं सारं पीक झोडून जातं. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. त्याच्या तोंडाशी आलेला घास निसटून जातो. बिचारा शेतकरी कपाळ्यावर हात मारून धाय मोकलून रडतो. नशिबाने जे काही थोडं थोडकं पीक वाचलं ते वाचते. थोडी फार पिकाची रास वावरात दिसू लागली की, वेळेवर सरकार कोपू लागतं अन् पटकन बाजारभाव पाडू लागतं. मग अशा वेळी या बळीराजानं करावं तरी काय ? जगावं तरी कसं ?
बळीराजा पीकांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करतो. कर्ज काढून महागडी खते, बी- बियाणे , किटकनाशक औषधे खरेदी करून, त्यांचा वापर करून शेती करतो. एवढे करूनही जर ऐनवेळी पावसाने दगा दिला तर पीकांचे भले मोठे नुकसानही होते. तरीही तो शेती कसतच असतो. काय करणार? तो जणूकाही मातीसोबत एकप्रकारे जुगारच खेळत असतो. पीक चांगलं यावं म्हणून हाती आलेला सर्व पैसा बिन भरवशावर शेतातच खर्च करतो. पाऊस कमी पडला तर पीक जातं जळून. पाऊस जास्त पडला तर वावरात साचते तळं. ते सारं चित्रं पाहून त्याच्या स्वप्नातलं विरून जाते खळं. असा जर निसर्गाचा खेळ चालत राहिला तर ह्यातून तो कसा बाहेर पडणार? या सर्व कारणामुळे सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी बहुतांशी शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या असतात. वर्षभराच्या पीकांच्या भरवशावर घेतलेले कर्ज फेडता फेडता त्याचा जीव अगदी मेटाकुटिला येत असतो. पण कर्ज काही फेडता येत नाही. घेतलेल्या कर्जावर सावकाराने लावलेल्या दामदुपटीच्या व्याजाच्या कर्जातच तो पुरता कायमचा कर्जबाजारी होऊन जातो. ह्या कर्जाच्या विळख्यात तो हळूहळू गुरफटला जातो. वाढलेले चक्रव्याज पाहताच त्याला अक्षरशः पुढचा मार्गच दिसेनासा होतो. काय करावे? कर्जाची परतफेड कधी आणि कशाप्रकारे करावी? हा मोठा गहन प्रश्न त्याच्या समोर उभा राहतो. उभ्या ठाकलेल्या त्याच्या प्रश्नातच त्याला त्याच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचं दुखणं दिसते. खुप विचार करूनही त्याला कोणताच मार्ग दिसेना . शेवटी नाइलाजास्तव त्याच्याजवळ आत्महत्या करण्याशिवाय कोणताच पर्याय उरत नाही.
या साऱ्या प्रकारामुळे मुलांचं शिक्षण, आरोग्य, लग्न समारंभ इत्यादी खर्च भागविणेसाठी त्याला आर्थिक चणचण भासते. शेतात काबाडकष्ट करून पै - पै चा हिशोब ठेवून , स्वतःची हौसमौज बाजूला ठेवून दिवसरात्र उन्हातान्हात घाम भुईत सांडून कुटुंब सुखी राहावं म्हणून अतोनात कष्ट करत असतो. त्याच्या समोर अनेक पेच प्रसंग, अनेक संकटे उभी राहतात. त्याला काय करावे सुचेनासे होते शेवटी न राहवून तो पुन्हा सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी धाव घेतो. कर्ज घेण्याशिवाय त्याला गत्यंतर नसते. तेथेही त्याला दाद मिळेना. सुरवातीचे कर्ज फेड झाल्याशिवाय दुसरं कर्ज भेटेना. या पेच प्रसंगातून कसं सुटावं? हे त्याचं त्यालाच कळेना. घोर निराशा त्याच्या पदरी पडते. तो या कोंडीतून मुक्त होण्यासाठी नाईलाजास्तव आत्महत्येचाच मार्ग अवलंबीतो.
संपूर्ण देशात होत असलेल्या दुसऱ्या आत्महत्येचं मूळ शेतीला न मिळालेल्या पाण्यात आहे. बहुतांश शेती ही निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. शेतकरी शेतीत मातीत केवळ बियाणंच पेरीत नसतो. त्याच्या भरवश्यावर तो आपल्या जीवनातील एक एक स्वप्न पेरीत असतो. पेरलेल्या या बियाण्याला पाणी मिळालं नाही तर त्याच्या स्वप्नातल्या अपेक्षांचा भंग होत असतो.
आभाळात ढग दिसत नाहीत तेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यातून पावसाळा पाझरतो. शेती व्यवसायामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध घटकांपैकी पाणी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. कोणतंही पीक जमिनीत ओलावा असल्याशिवाय वाढू शकत नाही. उत्पादन घेण्यासाठी पिकांना जमिनीत वाफसा स्थिती कायम राहणे गरजेचे आहे. अन्यथा पिकांची समाधानकारक वाढ होत नाही. त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जेथे शेतीला भरपूर पाणी मिळतं तेथे भरघोस पीक पिकूनही तेथे आत्महत्याचं प्रमाण वाढत असते. याचं कारण कोणत्याही कृषी उत्पादनाला मग तो गहू, सोयाबीन, भात, मूग, कापूस, उडीद, हळद, संत्र, द्राक्ष यां सारख्या अनेक प्रकारच्या पिकांवर जेवढा उत्पादन खर्च होतो त्या तुलनेने भाव मिळत नाही. शासनाचा हमी दर ही मिळत नाही. बळीराजाच्या घरात पीक आलं की बाजारभाव गडगडतात. तेच व्यापाऱ्यांच्या घरात जाताच पिकांचे भाव आभाळाला भिडतात. अस्मानी - सुलतानीचा कहर, कर्ज, व्याज, सावकारीचा पाश यातून शेतकऱ्याची सुटका नाही. त्यामुळे मग कसं जगायचं? हा पेच त्याच्यासामोर पडतो.
अशा अनेक अस्मानी सुलतानी संकटांनी बळीराजा मारला जातो अन् तो मेल्यावरही त्याच्या आयुष्याचा तमाशा चालवला जातो. आजपर्यंत एवढे कष्ट करूनही बळीराजा कधीच स्वतः मन भरून जगला नाही. तो सतत मन मारूनच जगत आला. त्याने कधीच अंगावर नवा कपडा वापरला नाही.
स्वप्नवत वाटावी अशी परिस्थिती गेल्या अर्धशतकातील खेड्यांची होती. प्रत्येक बळीराजाच्या घरी वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य कमी- अधिक प्रमाणात वर्षभर उपलब्ध असायचे. पैसा फारसा कुणाकडे नसायचा. सारा व्यवहार हा धान्यांच्या देवाण - घेवाणीतून चालायचा. साऱ्या कुटुंबाला वर्षातून पुरेसे नविन कपडे घेता येत होते. सर्वांना पुरेसे अन्नधान्य मिळत असल्याने कुपोषणाचा व भुकबळीचा प्रश्नच येत नव्हता. सर्वत्र परिस्थिती आनंदमय, मंगलमय असल्याने बळीराजाचं जीवन सुखमय होते.
आज चित्र थोडं विदारक आहे. मानवाच्या खाण्या पिण्याच्या व पीक पाण्याच्या सवयी बदलू लागल्या. बळीराजा गावरानी बी- बियाणे आणि रासायनिक खतासाठी लाचार व परावलंबी होऊ लागला. रासायनिक खतांच्या सततच्या अमर्याद वापरांमुळे मातीची जैविक संरचना बिघडली. तापमानात वाढ, निसर्गाची अनियमितता, दुष्काळाचे चक्र, पाण्याचे दुर्भीक्ष, कमी बाजारभाव, रोग, किडी यांसारखा शेतकऱ्यांसमोरच्या समस्या वाढल्या. त्यांच्या वाट्याला अठरा विश्व दारिद्रय आले. सरकारकडून मदत सवलतीसाठी शेतकरी आत्मसन्मान व आत्मबलिदान गमावून बसला. एकेकाळी आत्मविश्वासाने जगाचे पोषण करणारा बळीराजा आज फाशीच्या फंद्याला लटकू लागला अन् तिथेच जगाच्या अन्नसुरक्षिततेबाबत चिंता सतावू लागली.
शेतकरी अतोनात कष्ट करूनही काळजीत असतो. कारण पावसाची
अनियमितता, अतिवृष्टि, यांमुळे पीकांच्या वाढीवर व उत्पादनावर अनेक प्रकारचे परिणाम होत असतात. पीक येवो न येवो तरीही त्याला शेती करावीच लागे. शेतकरी स्वतः हालअपेष्टा भोगत असला तरीही तो सर्व जनतेला अन्नपुरवठा करत असतो. त्याला स्वतःच्या काळजी पेक्षा दुस-याची काळजी मोठी वाटते म्हणून तो कितीही त्रास झाला तरी धान्य पिकवून करोडो लोकांची भूक भागवतो. त्याने आजपर्यंत प्रत्येक माणसाला जगवले. त्यानं पोटाला पालू बांधून अवघ्या जगाला तारलं. तरीही आजपावेतो त्याची कोणीच दखल घेतली नाही. तो जगाला पोसत राहिला पण त्याच्या हाती काहीच उरलं नाही. अनवाणी चालून रक्ताचं पाणी केलं. रोज उपाशी राहून तो कष्ट करीत राहिला. जणू काही तो एक प्रकारे जीवघेणं युद्धच लढत राहिला. या युद्धातही त्याला सतत हारच खावी लागली. तो कधीच ते युद्ध जिंकू शकला नाही. जर नशिबात नसेल तर या जीवघेण्या युद्धातून माघार घ्यावी असंच त्याच्या मनाला वाटायचं. सण असो वा उत्सव तरीही तो चोवीस तास कष्टच करत राहिला. काळ सरत गेला पण त्याचे कष्ट मात्र कधीच सरले नाही. आतापर्यंत त्यानं खूप सोसलंय. अजून कुठवर सोसायचं? कुठवर त्यानं जगाचं पोट भरत राहायचं? त्यानं वर्षानुवर्ष मातीतच कां रुतून बसायचं? कधी घ्यावी त्याने झेप? कधी मिळायचं त्याला सुख?
पुराणातल्या बळीराजाला जसे पाताळात ढकलले गेले तसेच आजच्या बळीराजाला म्हणजेच शेतकऱ्यालाही कर्जबाजारीपणाच्या 'पाताळातच' ढकलले गेले. बळीराजाला सन्मानाने जगू द्यायचेच नाही ही जणू काही कपटनितीच आहे. बळीराज्यावर आलेली ही एक प्रकारची इडा पीडाच आहे. बळीराजा सुखी तर सारं जग सुखी. बळीराज्य आलं तरच सर्वांची इडा पीडा टळू शकेल. परंतु बळीचं राज्य येऊच दिले जात नाही हा एक मोठा प्रश्न आहे.
साऱ्या जगाला पोसणाऱ्या बिचाऱ्या या बळीराजाचं जिणं आजपावेतो कोणालाच दिसलं नाही. ज्यानं मातीसोबत कुस्ती खेळत साऱ्या जगाला जगवलं त्या बळीराजाला आता तरी निट जगू द्या. तो जर कां संपावर गेला तर साऱ्यांचं जिणं मुश्किल होईल.
बळीराजाचं राज्य यावं आणि तो ह्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडावा असं वाटत असेल तर आपण प्रत्येकांनी तसा संकल्प केला पाहिजे.
सौ. अनुराधा धामोडे
वाणगाव (पालघर )
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे.
लेखन छान आहे.